श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ धनगरवाडी प्रकाशाने भरली… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

संपादक मेहताच्या केबिनमध्ये मिटिंग सुरु होती. या वृत्तपत्रातील सर्व नवीन, जुने वार्ताहर जमले होते. उपसंपादक खानोलकर, विशेष वार्ताहर कामत पहिल्या रांगेत बसले होते. दुसऱ्या तिसऱ्या रांगेत जुनिअर वार्ताहर, नवशिके वार्ताहर बसले होते.

सर्व मंडळी जमली याची खात्री झाल्यावर सम्पादक मेहता बोलू लागले 

” लोकसभा इलेक्शन एका महिन्यावर आले, आता आपल्या पेपरने पण त्याची तयारी करायला हवी, रोजच्या बातम्या दिल्ली पासून गल्ली पर्यत त्यात येणारच पण आपल्या जिल्ह्यातील काना कोपऱ्यात आपण पोचायला पाहिजे. मुंबई पुण्याचे पेपर्स, त्त्यांचे वार्ताहर, इलेक्ट्रॉनिकमीडिया त्त्यांचे रिपोर्टर पण आपल्या भागात येणारच पण आपण अत्यन्त मायक्रोइंटिरियर्स पर्यत पोचायला हवे. या भागातील लोकांना बोलते करायला हवे. स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली, आजही या भागातील लोक कसे राहतात, त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोचतात की नाही, याचा रिपोर्ट लोकांपर्यत कळवायला हवा. तसेच आपले जे मागील खासदार, ते त्या भागात कधी त्या लोकापर्यत पोचले होते का याचाही अंदाज येतो. म्हणून आपल्या जिल्ह्यातील अनेक छोटया गावांना, वस्त्यांना आपण भेटी देणार आहोत. त्याचे रिपोर्ट आपल्या वर्तमानपत्रात छापून येणार.

आपल्या जिल्ह्यातील विभाग पाडले असून खानोलकर प्रत्येकाला विभाग देणार आहेत. त्या भागात आपण जाऊन तेथील लोकांना भेटायचे आहे, स्वतःच्या डोळ्यांनी सर्व पाहायचे आहे, त्यावर रिपोर्ट लिहायचा आहे आणि खानोलकराकडे द्यायचा आहे. खानोलकर या विभागाचे प्रमुख असतील. त्यातील योग्य तेवढे रिपोर्ट वर्तमापत्रात छापून येतील. ” 

मिटिंग संपली, खानोलकरांनी प्रत्येकाला त्याचा एरिया दिला. नीलिमाला सह्याद्री घाटातील भाग मिळाला. तिची मैत्रीण संध्या तिला त्याचाच बाजूचा भाग मिळाला.

नीलिमा आणी संध्या बाहेर आल्या, कॅन्टीनमध्ये शिरल्या आणि गुगल उघडून आपल्याला मिळालेला एरिया पाहू लागल्या.

निलिमा – “ अग मला सहयाद्रीचा भाग मिळालाय, त्या भागात पंधरा दिवस काढायचे म्हणजे.. राहायची तरी सोय असते की नाही.. निदान वॉशरूम्स. ?? “

संध्या -” अग शहर सोडले की कुठलं वॉशरूम.. ऍडजस्ट करावे लागेल.. आणि कुठे लग्न करून दिलय त्याभागात. थोडे दिवस काढायचे, आपल्या सारख्याच स्त्रिया राहतात ना त्या भागात, adjustment महत्वाची. ”

दोन दिवसांनी नीलिमा आपली ऍक्टिव्हा घेऊन निघाली, गुगलमॅप पहात पहात तालुक्याच्या गावी पोचली. याच भागातील एक वार्ताहर दुसऱ्या पेपरमध्ये नोकरीला होता, त्याची ओळख होतीच. त्या वार्ताहरने आपल्या घरी तिची सोय केली होती. नीलिमा आशिषच्या घरी पोहोचली, आशिष ड्युटीवर होता, पण त्याची बायको मयुरी घरी होती, तसेच आशिषचे सत्तर वर्षाचे बाबा घरी होते. आशिषने घरी कल्पना दिलेली, त्यामुळे मयुरीने तिचे स्वागत केले, तिला तिच्यासाठी वेगळी खोली दाखवली.

फ्रेश झाल्यावर नीलिमा आशिषच्या बाबांना भेटायला गेली, तिने तिला मिळालेला एरिया त्याना दाखवला आणि या गावात जाण्याचा सोपा मार्ग विचारला. त्यानी नीलिमाला प्रत्येक गावाची माहिती पुरवली आणि कसे जायचे किंवा त्या भागात गेल्यावर कुणाला भेटायचे याची व्यवस्थित माहिती पुरवली.

दुसऱ्या दिवसापासून नीलिमा तिच्या ऍक्टिव्हावरुन निघाली. प्रत्येक गावाचा नकाशा तिच्यासोबत होता. त्या गावात गेल्यावर गावातील प्रत्येक वाडीवर ती जात होती, त्यातील तिला वाटेल त्या दोन घरात ती शिरत होती. घरातील स्त्रिया तिला भेटत. मग ती सरकारी योजना कितपत या घरात आहेत किंवा सरकारी अनुदाने या कुटुंबाना पोहोचतात का याचा अंदाज घेत असे. अंगणवाडी जवळ आहे का, मुलांना दुपारची खिचडी मिळते का याचा अंदाज घेत असे.

एकंदरीत तिच्या लक्षात आले, सरकारी योजना गावात पोहोचतात, ज्या भागातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य धडपडे आहेत, त्या भागात शंभर टक्के योजना पोहोचल्या होत्या.

नीलिमा आपले रोजचे रिपोर्ट खानोलकर साहेबांना पाठवत होती. आता नीलिमाला अगदी सह्याद्रीपट्ट्यात जायचे होते, ही गावे एका बाजूला आणि जंगलातील असल्याने तिने तिच्याच पेपरमधील संध्याला बोलावून घेतले.

संध्या आली, तशी दोघी निघाल्या. आशिषच्या बाबांनी तिला कल्पना दिली होती, “त्या भागात जंगली श्वपादे असण्याची शक्यता असते, जंगली डुक्कर, लांडगे, रानगायी, वाघ सुद्धा दिसतात. तेंव्हा दिवसाउजेडी जा आणि दिवसा उजेडी परत या “.

आज नीलिमाला सह्याद्रीपट्ट्यातील मोरेवाडी भागात जायचे होते, कालच तिच्या सोबतीला संध्या आली होती, त्यामुळे हसत तिची गाडी चालली होती. या भागात वळणे खुप म्हणून गाडी हळूहळू चालवत दोघी दहा वाजता गावात पोहोचल्या.

तेथील एका लहानश्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिने चहाची ऑर्डर दिली आणि मोरेवाडी मधील किती वाड्या आहेत ते ती पाहू लागली. एकंदर सात वाड्या होत्या. प्रत्येक वाडीत वीस बावीस माणसे रहात होती, फक्त धनगरवाडीत दोनच स्त्रिया दिसत होत्या. तिने त्या हॉटेलवल्याला विचारले 

“या धनगरवाडीत दोनच माणसे दिसतात, बाकी कोणी राहत नाही तिथं? 

“लई एका बाजूला हाय धनगरवाडा, जायचं यायचं पण कठीण, कोन बी जात नसलं तिकडं “

“मग ती लोक येतात का इकडे?”

“कवतारी एक म्हातारी दिसते “

नीलिमा संध्याला म्हणाली 

“संध्या, आपण तिकडे जायला हवं, गावात, शहरात सगळेच जातात. पण धनगरवाडीत.. “

त्यांचे बोलणे ऐकून हॉटेलवाला म्हणाला 

“पण ताई, तिकडं रस्ता न्हाई, घाट हाये.. तुमची गाडी जायची न्हाई.. तुमास्नी घाटी चढून जायला लागलं “

“हो चालेल, आम्ही गाडी इकडेच ठेवतो. ”

संध्याने गुगलमॅप उघडला आणि मोरेवाडीतील धनगरवाडीच्या दिशेने दोघी चालू लागल्या. चढणं होती, वाट अरुंद होती, दोन्ही बाजूला काटेरी झुडुपं होती. मधूनच खसखस ऐकू येत होती, एखादे पाखरू झाडातून बाहेर येत होतं. दोघी हातात हात घेऊन आणि हातात काठी घेऊन चढणं चढत होत्या.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments