श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ थ्रिल… भाग-१ ☆ श्री दीपक तांबोळी

काँलेजमधून घरी येतांना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरुन मी वळलो तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला. फकाफका सिगारेट पित होता. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं

“काय सुऱ्या कसं काय चाललंय?”

मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं तसा सुरेश उर्फ सुऱ्या एकदम गडबडला. हातातली सिगारेट त्याने पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जिन्सची फाटलेली पँट, इन केलेला लालभडक शर्ट, डोळ्यावर काळा सडकछाप गाँगल. टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार.

“नको लपवू सिगारेट. मी पाहिलंय तुला पितांना” 

त्याने हातातली सिगारेट दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला.

“साँरी प्रशांतदादा. प्लिज घरी सांगू नका ना”

” नाही सांगणार” 

मी असं म्हंटल्यावर तो कसंनुसं हसला. पण मग त्याने खिशातून विमल गुटख्याची पुडी काढली आणि फाडून तोंडात पुर्ण रिकामी केली.

“अरे काय हे सुऱ्या?सिगरेट झाली, आता गुटखा?कशाला करतो हे सगळं? मधूकाकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना!”

” थ्रिल!थ्रिल असतं त्यात दादा. तुम्हांला नाही कळणार त्यातलं!”

“हे असलं थ्रिल काय कामाचं?शरीराची नासाडी करणारं. तुला असली थ्रिल अनुभवायचंय?”

” असली थ्रिल??ते काय असतं?दारु पिणं तर नाही ना?ते असेल तर आपल्याला माहितेय!सगळ्या प्रकारची दारु प्यायलोय दादा आपण. गांजा, अफू सगळं झालंय आपलं “

तो ज्या अभिमानाने सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला. मधूकाका खरंच म्हणत होते पोरगं वाया गेलंय.

“नाही त्यापेक्षा वेगळं आहे. तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट मी सांगेन तुला”

” बरं दादा तुम्ही म्हणता तर येतो”

मी निघालो पण घरी येईपर्यंत सुऱ्याचेच विचार डोक्यात होते. सुऱ्याचे वडिल ज्यांना आम्ही मधूकाका म्हणायचो, माझ्या वडिलांच्या आँफिसमध्ये शिपाई होते. वडिलांची आणि त्यांची चांगली घसट. सुऱ्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा. इनमीन अठरा वर्षाचा. अति लाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला. काँप्या करुन  दहावीत कसाबसा पास झाला पण बारावीत त्याची गाडी अडकली. आँक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं. दिवसभर पानाच्या टपऱ्यावर सिगारेट पित, गुटखे खात, येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यात त्याचा दिवस पार पडायचा. त्याला समजावण्याचे सगळे प्रयत्न त्याने हाणून पाडले होते. कुणी व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत त्याला समजावलं की तो एका कानाने शांततेने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. या व्यसनांना पैसा हवा म्हणून तो स्वतःच्या घरातही चोऱ्या करायचा असं ऐकण्यात आलं होतं.

दोनतीन दिवस सुऱ्याला काय थ्रिल असलेलं काम सांगावं या विचारात असतांनाच एकदिवस मधूकाका घरी आले. सुऱ्याने एका पोरीवरुन कुठंतरी माऱ्यामाऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं. “तुमच्या पोलिसखात्यात खुप ओळखी आहेत साहेब. प्लिज सुऱ्याला सोडवा ना ” अशी ते वडिलांना विनवणी करत होते. सुऱ्याच्या या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून वडिल नाही म्हणत होते. मग मीही वडिलांना आग्रह धरला. सुऱ्याची चांगल्या वर्तणूकीची ग्वाही दिली. शेवटी वडिलांनी सुऱ्याला सोडवून आणलं.

शनिवारी सुऱ्या मला भेटायला आला.

“काय दादा कसलं थ्रिल सांगणार होते तुम्ही मला?”

” तुझ्याकडे सायकल आहे ना?तिच्यात हवा भर, आँईलिंग कर. उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचंय सायकलने”

तो एकदम चमकला

” काय?सायकलने?आणि अजिंठ्याला?काय चेष्टा करता दादा?आजकाल कुणी सायकल चालवतं का?आणि तेही इतक्या दूर?त्यापेक्षा बाईकने जाऊ ना”

” काय सुऱ्या कसा रे तू इतका लेचापेचा?बाईकने जाण्यात कसलं आलं थ्रिल?तसं तर कुणीही जाऊ शकतं. आणि तुझ्यापेक्षा आमच्या काँलेजच्या मुली चांगल्या! पाच मुली आणि पाच मुलंही येणार आहेत आपल्या सोबत” 

ही मात्रा बरोबर लागू पडली. मुली आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे सुऱ्याला कदापिही सहन होणार नव्हतं.

“बरं येतो मी. पण मला जमेल का दादा?”

तो जरा अनिच्छेनेच म्हणाला.

“मुलींना जमू शकतं तर तुला का नाही जमणार?”

तो तोंड वाकडं करुनच गेला.

रविवारी पहाटेच आम्ही निघालो. सुऱ्याच्या पँटचे खिसे सिगारेट्स आणि गुटख्याच्या पुड्यांनी भरलेले खिसे माझ्या लक्षात आले. मी त्या मुलामुलींना सुऱ्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती. प्रत्यक्षात मी सुऱ्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करुन दिली. सुऱ्या खुष झाला. खरं तर माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती. त्यांच्या सायकलीही वजनाने हलक्या आणि चांगल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या वेगाने चालवणं सुऱ्याला जड जाऊ लागलं. तो मागे पडू लागला की मी त्याला हळूच म्हणायचो “बघ तू सिगरेट पितोस ना त्याचे परिणाम आहेत हे “त्याला ते पटायचं. त्याचबरोबर ” मुलींसमोर गुटखा खाऊ नको त्या तुझा तिरस्कार करतील. पुन्हा कधी ट्रिपला तुझ्यासोबत येणार नाहीत “असं सांगून मी त्याला गुटख्यापासून लांब ठेवत होतो.

रात्री आम्ही परतलो तेव्हा सुऱ्या जाम थकून गेला होता. आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलामुलींनी “साधी सायकल असूनही तू खुप चांगली सायकल चालवली. काय स्टँमिना आहे यार  तुझा!” असं म्हंटल्यावर सुऱ्या चांगलाच खुष झाला. सगळे गेल्यावर मला म्हणाला

“मजा आली दादा. काहीतरी वेगळंच थ्रिल होतं यात. पुन्हा काही असं असेल तर जरुर सांगा”

” अरे हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जाताहेत सायकलने. जायचं का तुला?”

” दादा जायची तर खुप इच्छा आहे पण खुप खर्च येईल ना!”

” काही नाही फक्त ४-५ हजार रुपये. तू जमव काही. उरलेले मी देईन तुला”

“धन्यवाद दादा”

” ते सोड. एक गोष्ट लक्षात ठेव तिथंही तुला दारु, सिगरेट पिता येणार नाही. गुटखा खाता येणार नाही. मुलींसमोर तुझी इमेज खराब करु नकोस”

“तुमची शपथ दादा. मी हातही लावणार नाही”

 – क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments