सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – सुवार्ता ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आजी गुरुप्रीतकौरचा ताप उतरतच नव्हता. त्यांची सून ज्ञानप्रीत हिने डॉ सतवीर सिंह यांना सांगितलं की, “डॉ. ह्या ना कुणाचंच अजिबात ऐकत नाहीत. काल रात्री त्या गच्चीवर कधी गेल्या, आणि तिथेच अंथरूण घालून,रजई लपेटून कधी झोपल्या, हे घरातल्या कुणालाच कळलंही नाही. सकाळी उठल्यावर विचारलं तर म्हणाल्या की “अगं दिल्ली बॉर्डरवर इतक्या थंडीत आणि सलग इतके दिवस,हे आणि कीरतबेटा उघड्यावर कसे झोपत असतील?”
डॉ. सतवीर त्यांचे फॅमिलीडॉक्टर होते. त्यांनी आजीला तपासलं तर त्यांच्या अंगात खूप ताप होता. पूर्ण शरीर थरथर कापत होतं. तापाचं कारण कळल्यावर ते म्हणाले “मी औषधं लिहून देतो, ती आणून यांना द्या . ठीक होईल सगळं.” आणि आजीला बजावलं–”आजी, आता अंथरुणातून अजिबात उठायचं नाही. आणि काळजीही करायची नाही. तिथे खूप माणसं आहेत एकमेकांची काळजी घेण्यासाठी.”
थंडीने कुडकुडत आजी म्हणाली–”अरे बाळा,पण मी टीव्हीवर पाहिलंय, की दिल्ली बॉर्डरवर खूप बॅरिकेड्स लावलेत, पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. शिवाय अश्रूधुराची नळकांडी, पाणी याचीही व्यवस्था दिसतेय.”
त्यावर डॉक्टरांनी समजावलं, “आजी ती दिल्ली-बॉर्डर आहे. वाघा-अटारी बॉर्डर नाहीये. आणि बॅरिकेडच्यापलीकडे पोलिसांच्या ज्या तुकड्या आहेत,त्यात सगळे आपले भाऊबंदच तर आहेत. काळजी करू नका. लवकरच चांगली बातमी मिळेल.”
पण यामुळे आजीचं मन थोडंच शांत होणार होतं?आणि त्यांना काळजी वाटणंही स्वाभाविकच होतं. आजोबांची बायपास-शस्त्रक्रिया झालेली होती. शिवाय त्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे होऊन गेली असली तरी,लग्न-कार्य, आणि कुणा नातेवाईकाचे निधन, याव्यतिरिक्त ते दोघे एकमेकांपासून असे लांब कधीच राहिले नव्हते—-त्यांचा नऊ वर्षांचा नातू गुरमीत आपल्यापरीने आजीची सेवा करत होता. मागेल ते पळत जाऊन आणून देत होता. आजी जेवल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरत नव्हता.
ज्ञानप्रीत बघत होती–जेव्हापासून गुरमीतचे आजोबा सरदार गुरुशरणसिंह, आणि वडील सरदार कीरतसिंह, दोघेही गावातल्या इतर लोकांबरोबर दिल्लीला गेले होते, तेव्हापासून त्याचा चेहेरा कोमेजल्यासारखा झाला होता. त्याच्या अजीतकाकांच्या घरीच आपल्या इतर मित्रांसोबत तो दिवसभर रेंगाळत रहायचा.
आज आजी तापाच्या ग्लानीत दिवसभर सारखी काहीतरी बडबड करत होती—”विचित्रच आहे सगळं…… प्रजासत्ताक राष्ट्र म्हणे….. लोकांनी इतक्या जागांवर यांना जिंकून दिलंय…… ,आणि लोकांच्या भल्यासाठी, लोकांना हितकारक असणारे कायदे करण्याचा हक्कही दिलाय…..पण हक्कासाठी लढण्याच्या हक्काबरोबर, राजकारणही खेळण्याचा हक्क नाही दिलाय….. राजकारण काय? काल टेबलाच्या या बाजूला होतं….. आज टेबलाच्या त्या बाजूला आहे…. उद्या पुन्हा या बाजूला येईल…… एक मुलगा देशाची सेवा करण्यासाठी आहे… त्याला करू दे देशसेवा…. एक या मातीची सेवा करण्यासाठी आहे…. त्याला मातीची सेवा करू दे….”आपल्या नवऱ्याच्या आणि मुलाच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली होती. गुरमीतला मात्र त्यातलं काहीच समजत नव्हतं… प्रजासत्ताक… कायदे… हक्क… राजकारण… हे शब्द त्याला विचित्रच वाटत होते. एव्हाना संध्याकाळ झाली होती. जरा वेळाने आजीचा ताप थोडा उतरला, आणि गुरमीत मित्रांसोबत पळतच अजीतसिंहांच्या घरी पोहोचला.
सासूची प्रकृती सुधारलेली पाहून ज्ञानप्रीतला बरं वाटलं. दिवसभरात दोनदा किरतसिंहचा फोन आला होता, पण तिने त्यांना काहीही सांगितलं नव्हतं. तितक्यात सासूने तिला हाक मारली…” ज्ञानप्रीत, यांना जरा फोन लावून दे. मला त्यांच्याशी बोलावसं वाटतंय.”
ती काही बोलणार, इतक्यात गुरमीत पळत आला.स्वयंपाकघरातून त्याने थाळी आणि चमचा आणला. आजीच्या खोलीतून टॉर्चही आणला. आणि तो गच्चीवर जायला लागला…. “अरे गुरमीत काय झालं? सांग तरी आम्हाला..”आजीने विचारलं .
“आजी, जोपर्यंत आजोबा त्यांचं म्हणणं पटवून देऊन परत येणार नाहीत, तोपर्यंत मी आणि माझे मित्र रोज संध्याकाळी सात वाजता एक मिनिटभर चमच्याने थाळी वाजवणार आणि एक मिनिट टॉर्च लावून ठेवणार….”गुरमीतने पळतापळताच सांगितलं.—–हे ऐकताच त्या दोघी हतबलपणे एकमेकींकडे पहात राहिल्या…..त्याच्या बोलण्याचा मनातल्या मनात आपापला अर्थ लावत राहिल्या—-.
मूळ हिंदी कथा : श्री हेमन्त बावनकर
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
आदरणीया सुश्री मंजुषा जी,
मेरी लघुकथा ‘अच्छी खबर’ के अतिसुन्दर भावानुवाद के लिए हार्दिक आभार