सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
जीवनरंग
☆ “रात्र थोडी सोंगं फार ( विनोदी कथा)” – भाग-१ ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
सात जणांच्या जोड्या आणिक
मुले-बाळेही होती सोबत
कश्यास सांगू अठ्ठावीस जण
अन् हास्याची रंगत संगत
सात दिवसांचा आमचा प्रवास. नांदेडहून रेल्वने डायरेक्ट जम्मुला निघालो. दोन दिवस ट्रेनमध्ये जाणार म्हणून सर्वांनी डबे वगैरे सोबत घेतलेले होते. त्यातील दोन कुटुंबांना जरा लांबच्या डब्यात जागा मिळाली. म्हणजे नऊ जण दुसऱ्या डब्यामध्ये आणि आम्ही राहिलेले १९ जण जवळच्या डब्यांमध्ये होतो. रेल्वे दहा वाजता सुरू झाली. अडीच तीनच्या दरम्यान जेवणं वगैरे सुखरूप पार पडली. चारची वेळ झाली असेल, लांबच्या डब्यात असलेल्या नऊ जणांपैकी एकाच्या बायकोला उलट्या सुरू झाल्या. त्या उलट्यांमुळे ती इतकी घाबरली की लगेच परत जाउया असे म्हणू लागली. तिचा नवरा तिच्याकडे असा काही पाहत होता की कुठून चूक केली आणि हिला ट्रीपला घेऊन आलो? नशीब, तोपर्यंत फोन सुरू होते. निरोप एकमेकांना मिळाले आणि गाडी एका स्टेशनवर थांबल्यावर, आमच्या डब्यातील दोघे -तिघेजण त्यांच्यापर्यंत पोहोचले. कसेतरी समजावून सांगून परत येताना त्यातील एक जण खाली उतरून येऊ लागला कारण एसी ट्रेनच्या डब्यांमधले दरवाजे उघडायला त्रास होत होता. जाताना एवढे डबे ओलांडून जायचे म्हणजे सर्वांच्या हाताची वाट लागली त्यामुळे परत येताना तो खालून येत होता. अचानक रेल्वे सुरू झाली आणि तो खाली राहिला असे वाटून त्याच्या बायकोने एकच गोंधळ सुरू केला.
“अहो आमचे हे राहिले ना खाली. ”
म्हणून ती ओरडू लागली. या सगळ्या गोंधळात कसातरी तो मागच्या एका डब्यामध्ये चढला आणि तिच्यापर्यंत पोहोचला. मग मात्र सगळ्यांनी त्याला रागावून सांगितले,
“हे एसी ट्रेनचे दरवाजे एकदा बंद झाले की परत उघडत नाहीत. तू परत खाली उतरू नकोस. “
हळूहळू सगळेजण कोणी पत्ते खेळत, कोणी गाण्याच्या भेंड्या खेळत होते. मुलंही काहीतरी खेळ खेळत छान मजेत प्रवास चालला होता. पुढच्या एका स्टेशनवर गाडी थांबली आणि सर्वांना चहा घ्यायचा होता म्हणून दोघे जण खाली उतरले. आमच्यातीलच एकीस कॉफी हवी होती. कॉफी काही तिथे मिळाली नाही. पुढच्या एका स्टेशनवर कॉफीचा गाडा दिसल्यावर तिने नवऱ्याला पाठवले. तो कॉफी घेऊन येईपर्यंत परत गाडी हलली. हे पाहून त्याची बायको घाबरून मोठमोठ्याने हाका देऊ लागली,
“अहो, मधे या, मधे या नाहीतर गाडी हलली तर तुम्ही खालीच रहाल बरं का!”
तिचा नवरा कसाबसा आतमधे आला आणि गाडी सुरू झाली. तिच्या हातात कॉफी देत म्हणाला,
“तुझ्यासाठीच गेलो होतो ना. मग कशाला ओरडत होतीस?”
त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून गंमत वाटून सर्वजण हसू लागले.
रात्री झोपताना एकाचा मुलगा जरा जास्तच गुटगुटीत होता. त्याला वरच्या बर्थ वर झोपण्यासाठी त्याचे आई वडील वर जा असे सांगत होते. माझा मुलगा पटकन चढून झोपलेला पाहून तोही चढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या अति गुटगुटीतपणामुळे तो वर जात नव्हता. खालून त्याचे आई वडील दोघेही त्याला ढकलत होते आणि तो वर चढताना रडत होता. पूर्ण शक्तीनिशी आई वडील त्याला वर ढकलताना मनातून ‘जोर लगाके हैशा।’ असेच जणू काही म्हणत असावेत. हे चित्र पाहून डब्यामधे सगळीकडे हशा पिकला. अशा प्रकारे कसेतरी त्याला वरच्या बर्थवर झोपवून सगळीकडे शांतता झाली. सर्वजण झोपले आणि थोड्यावेळाने हुडहुडी भरल्यासारखा आवाज येऊ लागला. कुठून आवाज येतोय म्हणून सगळेच घाबरले. ज्याला महत्प्रयासाने त्याच्या आई-वडिलांनी वरच्या बर्थ वर झोपायला पाठवले होते तोच मुलगा हुडहुडी भरल्यासारखा आवाज करत होता व आई-वडिलांनी विचारल्यावर म्हणाला,
“मला खूप थंडी वाजत आहे. “
पुन्हा त्याला खाली उतरवायची कसरत करण्यामध्ये अर्धा पाऊण तास त्यांचा गेला.
दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही मस्त गप्पा मारत होतो. पत्ते वगैरे खेळत होतो आणि त्यात दोघांच्या बायका नाहीत हे पाहून आम्ही मनात विचार करू लागलो, “या नेमक्या काय करत असतील?” त्यांच्या डब्यामध्ये पाहायला गेलो तर घरी त्या रोज दुपारच्या वेळेला पांघरून घेऊन झोपतात कशा खालून वरून पांघरून घेऊन झोपलेल्या होत्या. त्यांच्यापैकी एकीचा नवरा डोक्याला हात लावून वैतागाने म्हणाला देखील,
“झोपण्याशिवाय येतंय काय दुसरं!”
आणि सर्वजण हसू लागले. असाच हसत खेळत प्रवास करत रात्री जम्मूला पोहोचलो. जम्मूहून कटऱ्यापर्यंत गाड्या ठरवून तिथे आधीच बुक झालेल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन आराम केला आणि सकाळी सर्वजण तयार होऊन वैष्णोदेवीकडे जाण्यासाठी निघालो.
२८ जणांच्या वेगवेगळ्या विचारांचा कल घेऊन (म्हणजे कोणी घोड्याने जाऊ म्हणत होते, कोणी इलेक्ट्रिक कारने आणि कोणी चालत. ) शेवटी वैष्णोदेवीला चालत जायचे असे ठरले. आम्ही, आमची मुलं लहान असताना एकदा वैष्णोदेवीला चालत गेलो होतो त्यामुळे आम्हाला अनुभव होता. बाकीचे सर्वजण मात्र पहिल्यांदाच वैष्णोदेवीला जात होते. १४ किलोमीटर चालत सर्वजण निघालो.
कुठे थांबत, चालत, जय माता दी! च्या गजरामध्ये संध्याकाळपर्यंत आम्ही वैष्णोदेवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. पाय खूप दुखत होते. आमचे हे काळजीने माझा हात हातात घेऊन चालत होते. हे चित्र पाहून बाकीच्यांच्या बायकांनी त्यांच्या नवऱ्याची फिरकी घ्यायला सुरू केली,
“बघा वहिनीला कसे प्रेमाने, काळजीपूर्वक भैय्या घेऊन जात आहेत. नाहीतर तुम्ही हातात काठ्या देऊन आम्हाला चालवत आहात. “
तेवढे थकलेले असूनही सर्वजण हसू लागले. काळंकुट्ट आभाळ भरून आलं होतं आणि क्षणात विजा कडकडून महाभयंकर पाऊस कोसळू लागला. आम्ही एवढे उंच आलो होतो की जणू काही असं वाटत होतं की आभाळच आमच्या हाताला लागलयं.
सर्वांनी वैष्णोदेवीचे मनोभावे दर्शन घेतले. प्रसाद घेऊन बाहेर निघालो. रात्रीचा एक वाजला होता. हॉटेल जवळ जवळ बंद झाले होते पण भूक तर खूप लागली होती म्हणून एका हॉटेलमध्ये सर्वजण गेलो. तिथे फक्त कढी भात होता. आम्ही तो मागवला. एकीच्या मुलाला हाईड अँड सिक हे बिस्कीट खायचे होते. त्याची आई गडबडीने हाईड अँड सिक, हाईड अँड सिक असे म्हणत होती पण तिच्या नवऱ्याला काहीतरी वेगळेच ऐकू येत होते आणि तो चिडून म्हणाला,
“हाड हाड काय करतीयेस. “
शेवटी त्यांना शब्दाचा खुलासा झाला तेव्हा त्याने कपाळावर हात मारत मुलाला बिस्कीट आणून दिले. आम्ही सर्वजण जेऊन उठलो तर एकाच्या बायकोने मला विचारले,
“भातात कसले तरी गोळे गोळे होते ते आम्ही सगळे बाहेर काढून ठेवले. “
मी ती भजी होती असे सांगितल्यावर परत हळहळलेल्या चेहऱ्याने ती त्या भज्यांकडे बघत म्हणाली,
“अरे देवा, खाल्ली असती तर बरं झालं असतं!”
तिच्या चेहऱ्याकडे पाहून सर्वजणी मोठमोठ्याने हसू लागल्या. आता खरा प्रश्न होता तो परत खाली उतरून जाण्याचा. येताना जेवढे उत्साहात सर्वजण होते तेवढेच आता मात्र सर्वांचे पाय खूप दुखत होते. आमच्यापैकी १८ जण खाली उतरायला घोडे मिळतात का? म्हणून भैरवगडाच्या मार्गावर पाहायला, घोडे मिळतात तिकडे वर चढून गेले. आणि आम्ही तीन कुटुंब म्हणजे १२ जण खाली उतरायचा मार्ग धरला आणि पायी चालतच निघालो.
चढताना जितका त्रास झाला त्यापेक्षा उतरताना जरा कमीच होत होता. पण जे घोड्याकडे गेले होते त्यांचा एक तर पहिलाच अनुभव होता जाताना पाय खूप दुखत होते. वर चढून येताना घोड्याच्या पाठीवर ओझं असतं त्यामुळे ते सावकाश चढतात. रात्रीच्या दोन वाजता रस्ता रिकामा, अंधार आणि उतार त्यामुळे घोडे धडधडत खाली येतात याची कल्पना कोणालाच नव्हती. कसेबसे त्यांनी घोडे ठरवले. त्यातल्या एकाला जास्ती वजन आणि उंचीमुळे कोणीच घोड्यावर बसू देईना. तो बिचारा घाबरून गेला, आता खाली कसे जायचे म्हणून. शेवटी एक उंचा पुरा घोडा त्यालाही मिळाला आणि कसेबसे सर्वजण खाली जायला निघाले. आम्ही रात्री अडीच तीनला निघालेलो सकाळी सातच्या आसपास खाली पोहोचलो. घोड्यावरून आलेली मंडळी मात्र पहाटेच खाली आली होती.
— क्रमशः भाग पहिला
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈