डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ माझं काय चुकलं ??? — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
शाळेपासूनच्या त्या दोघी घट्ट जिवलग मैत्रिणी. एका बाकावर बसणाऱ्या अभ्यास एकत्र करणाऱ्या आणि वर्गात मोठमोठ्यांदा हसल्याने बाईंची शिक्षा सुद्धा एकत्रच खाणाऱ्या. सगळ्या शाळेत यांची जोडी अगदी प्रसिद्ध होती. शाळेच्या गॅदरिंगमध्ये सख्या पार्वत्या, हरतालका असे फिशपॉंड्सही याना मिळालेले! मोना आणि सीमा यांची जोडी होतीच तशी. जवळच रहायच्या दोघीही आणि अजिबात करमत नसे एकमेकांशिवाय दोघीना. खरं तर मोना जास्त हुशार होती. तिचं गणित म्हणजे अतिशय उत्तम आणि सीमाच्या भाषा उत्कृष्ट ! निबंधाचे बक्षीस सीमाला दर वर्षी ठरलेलेच ! मोनाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सीमाला आई नव्हती आणि भाऊ फारसा न शिकता कुठे तरी नोकरी करायचा. पण सीमा फार समजूतदार होती. आहे त्यात आनंदी रहायचा स्वभाव होता सीमाचा.
मुली मोठ्या झाल्या आणि मोना कॉलेजला सायन्सला गेली. सीमा आर्टस्ला. दोघींच्या वाटा वेगळ्या झाल्या पण मैत्रीत कधी अंतर नाही पडलं. कायम भेटत राहिल्या दोघीही. सीमा बी ए झाली आणि तिनं बी एड केलं. तिला एका चांगल्या शाळेत नोकरीही मिळाली. मोना एका कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून लागली. मोनाला तिच्याच कॉलेज मधल्या एका सहकाऱ्याने मागणी घातली आणि मोनालाही तो आवडला होताच. आईवडिलांचीही या जावयाला पसंती होती आणि मोनाचं लग्न थाटामाटात झालं देखील. मोना आपल्या संसारात रमून गेली.
सीमाच्या लग्नाचं बघायला मात्र कोणीच नव्हतं आणि तिच्या मावश्या मामांना सीमा कधी फारशी चिकटून नव्हतीच. वय वाढत गेलं आणि सीमा शाळेतही प्रिंसिपल होणार होती काहीच वर्षात. मोनाला या काळात दोन मुलं झाली आणि अजूनही सीमाची आणि तिची मैत्री घट्ट होतीच.
मोनाच्या घरी वेगळीच कथा होती. घरचे लोक, भाऊ, आईवडील सगळ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मोनाच्या मोठ्या दिरानं एका पंजाबी मुलीशी लग्न केलं मुंबईला बदली करून घेतली. संतोषला नोकरी चांगली होती. चार वर्षे चांगली गेली आणि नंतर मात्र सतत भांडणं होऊ लागली त्यांची ! एक दिवस ती मुलगी न सांगता सगळे दागिने पैसे घेऊन निघूनच गेली. सगळं घर धुवून नेलं तिनं. ऑफिस मधून येऊन बघतो तर अक्षरशः घर रिकामे. तिने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि संतोषचा एक वर्षात घटस्फोट झाला. घरचे सगळे हताश झाले. हे होणार हे माहीतच होते सगळ्याना, पण त्यावेळी संतोष कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. आता मात्र आईवडिलांना त्याची काळजी वाटायला लागली. तरुण मुलगा एकटा असा कसे आयुष्य काढणार असं वाईटही वाटू लागलं त्यांना.
मोनाला हे सगळं दिसत होतं. ती सीमाच्या घरी गेली आणि म्हणाली ‘चल. बाहेर कुठेतरी मस्त खाऊया काहीतरी. आज मी डबा विसरले न्यायला ! तू नको आता घरी करत बसू बरं का. चल बघू. ‘ मोनाने सीमाला बाहेरच काढले. एका छानशा हॉटेल मध्ये गेल्या दोघी. ‘सीमा, तुझ्या लग्नाचं बघायला तर कोणाला सवडच नाही. तिशी उलटून गेली आपली. करणारेस का लग्न कोणी मिळाला तर?’ सीमा म्हणाली, ‘ मिळायला नको का? करीन मला त्याने पसंत केले तर. मला नाहीये का ग हौस संसाराची? पण कोण बघणार मला स्थळ?’
मोना म्हणाली, “ हे बघ सीमा. नीट ऐकून घे. माझे भावजी अतिशय चांगले आहेत. करतेस का त्यांच्याशी लग्न? “ मोनाने तिला सगळी हकीगत सांगितली.
त्यांचे पहिले लग्न, मग घटस्फोट, सगळं नीट सांगितलं आणि म्हणाली, “ बघ निर्णय तुझ्या हातात आहे. माझी जबरदस्ती तर मुळीच नाही. पस्तिशी उलटलेल्या बाईला आता प्रथमवर मिळणंही अवघडच. पाहिजे तर भावजीना भेट, बोला दोघे आणि मगच निर्णय घ्या. हे काही नवथर तरुण मुलांचं लग्न नाही तर तडजोडही आहेच सीमा. सावकाश सांग घाई नाही. ”
सीमा संतोष बाहेर चार वेळा भेटले. , सीमा म्हणाली “ मोना माझी आणि संतोषचीही हरकत नाही लग्नाला. मला नोकरी सोडावी लागेल पण मी दोन वर्षे पुरी करीन म्हणजे मला ऐच्छिक निवृत्ती घेता येईल आणि पेन्शन मिळेल. संतोष मुंबईहून अप डाऊन करील. चालेल ना? मी मग तुझ्या घरीच राहीन. कधीकधी मी जाईन मुंबईला. हे चालेल का?आधीच तुझ्या घरात खूप माणसं आहेतच. ”
मोना म्हणाली “काही हरकत नाही सीमा!भावजी आणि तुझंही घर उभं रहाणार असेल तर ही तडजोड तू जरूर कर. नोकरीचे सगळे फायदे घे आणि मग जा मुंबईला. दोन वर्षे कशीही जातील ग. ‘
मोना अतिशय सरळपणे म्हणाली. घरी जाऊन सासू सासऱ्यांना हे सांगितले आणि सीमा संतोष पण तयार आहेत लग्नाला हेही सांगितले. सगळ्याना खूप आनंद झाला. ओळखीचीच मुलगी घरी येणार याचा आनंद आणि विश्वास सुद्धा होता सगळ्याना.
अगदी साधं लग्न करून सीमा मोनाच्याच घरात आली. तिचीही नोकरी चालू ठेवणार होतीच ती. मोनाची तर सकाळी केवढी धावपळ असायची. पोळ्याच्या बाई उशिरा येत त्या आधी मोना आपल्या पुरत्या चार पोळ्या करून घेई आणि बाकी सगळं बाई आल्या की उरकत. सासूबाई खूप मदत करायच्या मोनाला. बाईंकडून सगळं करून घ्यायचं, मुलांचे डबे भरून द्यायचे. सगळं नीट सुरळीत चालायचं. सीमा संतोष आठ दिवस बाहेर फिरून आले. चार दिवसांनी संतोष मुंबईला जाणार होता आणि सीमा पण शाळेत जाणार होती.
मोना घाईघाईने आवरून डबे भरून निघून गेली. सासूबाई उठून बघतात तर सीमा अजून उठली नव्हतीच. त्या मुकाट्याने स्वयंपाकघरात गेल्या आणि बाकीचे काम चालू केले त्यांनी.
आठ वाजता सीमा उठून स्वयंपाकघरात आली. सासूबाई म्हणाल्या, “ चहा घेतेस ना? घे आणि उद्यापासून लवकर उठ. तिकडे काय करत होतीस तू डब्याचे? “.. “ मी माझ्या पुरत्या दोन पोळ्या भाजी करून नेत होते. शाळा 11 वाजता असते माझी. लवकर उठून काय करायचं असतं मला? “
“ हे बघ. इथे तू सासरी आली आहेस ना. मोना काहीच बोलणार नाही पण मी सांगते. मला मदत करत जा आणि अशी एकटीपुरती भाजी पोळी नाही करून चालणार. बाई येतीलच पण त्यांनाही मदत लागते ती करायला हवी. उद्या येताना मोनाला विचारून किती लागते काय लागते ते सामानही आण. सीमा, घर हे सगळ्यांचं असतं. नशीब थोर म्हणून अशी चांगली मैत्रीण आणि चांगलं घर मिळालं तुला. ” सासूबाई तिथून निघून गेल्या.
सलामीलाच ही चकमक झाली तर आता पुढं कसं व्हायचं असा विचार पडला सासूबाईंना. होईल ते बघावे असा विचार करून त्या गप्पच बसल्या. तयार असलेली भाजीपोळी घेऊन सीमा निघून गेली. ना तिने मागचे आवरले ना जाताना सांगून गेली कोणाला !
मोना संध्याकाळी घरी आली. सासूबाईंनी हे सगळं सांगितलं आणि म्हणाल्या, ” कठीण आहे हो मोना.. अग, काय तुझी मैत्रीण !अशीच का वागायची ही माहेरी? “ मोना म्हणाली, “ जाऊ द्या हो आई. बघूया काय काय होते ते. आपलं जाऊ दे. , भावजींचा संसार झाला म्हणजे पावलं. ” संध्याकाळी सीमा घरी आली. संतोष मुंबईला गेलेला होता. आता सीमाला दोन वर्षे मोनाकडे राहून काढायची होती. मोना संध्याकाळी तिच्या खोलीत गेली. “ घे ग मस्त गरम चहा. चल, बाल्कनीत बसून घेऊया “
सीमा म्हणाली, “ मोना, मला कामाची सवय आहे पण माणसांची नाही. मला समजत नाही कसं वागायचं ते. आमच्या घरी तू बघतेस ना बाबा, मी आणि भाऊ. कोणी कोणाच्या अध्यात मध्यात नसते. मला इतक्या माणसात वावरायची सवय नाही ग. तू शिकव मला मी शिकेन. ” मोना बरं म्हणाली. मनात म्हणाली, माणूस संगतीला आणि पंक्तीला आल्याशिवाय समजत नाही हेच खरं.
दुसऱ्या दिवशी मोनाला सुट्टी होती. तिने सीमाला हाक मारली. अजून उठली नव्हतीच ती. “ सीमा, आज आपल्या बाई येणार नाहीयेत. चल दोघी मिळून करून टाकूया स्वयंपाक “. मोना म्हणाली.
सीमा म्हणाली, “ काय करायचं ते सांग मला. मला सगळं उत्तम येतं करता. आज बघ मी करते ते आवडतं का. तू बस ना बाहेर. फक्त मला अंदाज सांग हं मोना. मला समजणार नाही म्हणून. ” मोनाने सगळं सांगितलं आणि ती स्वयंपाकघराच्या बाहेर आली.
सासूबाई हळूच म्हणाल्या, ” बाई ग. करणार का ही नीट सगळं? पिठलं भात करायची वेळ येते आपल्यावर? “ हसून मोना म्हणाली “ बघूया. मलाही माहीत नाही हो तिला काय येतं ते “.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈