सौ. प्रभा हर्षे
जीवनरंग
☆ सुसंस्कृत… लेखिका : सुश्री ज्योती रानडे – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ सौ.प्रभा हर्षे ☆
राधाबाईंकडे आज खूप गडबड होती. त्यांच्या लेकीला, कलावतीला बघायला लोक यायचे होते. चार खोल्यांचं घर लखलखीत स्वच्छ करून झालं होतं. बाहेरच्या हॅालमध्ये त्यांचे यजमान, किर्तनकार वामनराव, येरझारा घालत होते. वामनरावांचं किर्तन म्हणजे आयुष्य कसं जगावं याचा धडाच असे पण आज ते स्वत:च थोडे काळजीत होते!
“अहो, मुलाचे वडील प्रसिध्द डॅाक्टर आहेत पण फार रागीट आहेत असं ऐकतोय. काणे मंडळी आहेतच म्हणे रागीट.” ते पत्नीस म्हणाले.
“हे बघा, योगेश फार चांगला मुलगा आहे हो.. आई प्रेमळ आहे. असेनात का वडील रागीट..आपली कला शहाणी आहे..
घेईल सांभाळून.” राधाबाई समजावणीच्या सुरात म्हणाल्या.
“रामकृष्ण हरी..रामकृष्ण हरी” वामनराव त्याच्या नकळत जपात हरवून गेले. या राधेची सकारात्मक वृत्तीच आपली शक्ती बनून आयुष्यभर पुरली होती हे त्यांना परत एकदा जाणवलं!
कलावती तयार होऊन बाहेर आली. ते सात्विक सौंदर्य व त्या मासोळीसारख्या काळ्या डोळ्यातील बुध्दिमत्ता बघून राधाबाई धन्य झाल्या. वामनरावांनाही भरून आलं..
मोतिया रंगाच्या साडीत कलावती किती सुंदर दिसत होती! हिरवेकंच मोरपीसाच्या नक्षीचे काठ, हातात मोत्याची एक एक बांगडी, कानात भोकरं, आणि गळ्यात मोत्याचा सर घातलेली कलावती अप्रतिम दिसत होती. संस्कृत मधे डॅाक्टरेट करत असलेली सुसंस्कृत लेक आमची! या हिऱ्याला उत्तम कोंदण मिळवून दे रे श्रीहरी..म्हणत वामनरावांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर हात जोडले..
अंगणात विठूकाका काम करत होता. त्यांनी पण खिडकीतून तर्जनी व अंगठा जोडून छान दिसतेस असं कलावतीला सांगितलं व ते परत बाग नीटनेटकी करू लागले.
कलावतीनं अबोलीच्या फुलांचा सुरेख गजरा केला होता तो आईच्या केसात माळला..
“कले..अग मला म्हातारीला कसला गजरा घालतेस? तू घाल ना! तुला बघायला येत आहेत ते!”राधाबाई लटक्या रागाने म्हणाल्या.
“घाल ग! गोड दिसत आहेस! आवडशील त्यांना!”कलावतीला आईला चिडवल्याखेरीज चैन पडत नसे!
“आवरा, आवरा पटकन!” वामनरावांनी उठून हॅालमधील आकाशी पडदा सरळ केला. बैठकीच्या गादीवरचे लोड सरळ केले. रामकृष्ण हरी जप करत त्याच्या खुर्चीवर बसले.
बेल वाजली.. मंडळी आली. उंच्यापुऱ्या, देखण्या योगेश कडे बघून वामनराव व राधाबाई खुष झाले. योगेश इंजिनीअर होऊन एका बड्या कंपनीत काम करत होता. त्याचे वडील डॅाक्टर काणे शहरातील प्रसिध्द डॅाक्टर होते. आई शांत व सौम्य दिसत होती.
हवा पाण्याची बोलणी झाली. हॅाल मधे घातलेल्या साध्या सतरंजीकडे बघताना त्यांच्या डोळ्यात तुच्छता तरळून गेली असे वामनरावांना वाटून गेले..
”तुमचं किर्तन कधी ऐकलं नाही कारण मला वेळच नाही कुणाची किर्तनं ऐकायला..पण काय हो..किर्तन करून पोट भरणे मला तरी कठीण वाटतं.” डॅा. काणे वामनरावांकडे बघत म्हणाले.
माणसाच्या वैभवाच्या व्याख्या घर, गाडी, बंगला यापर्यंतच सीमित आहेत हे जाणवून वामनराव मंद हसले.
एकमेकांच्या अंतरीच्या वैभवाकडे बघायला कधी शिकणार? कालच्या निरूपणाचा हाच विषय होता..अंतरीचे अमृत..
“आम्हाला डॅाक्टर मुलगीच हवी होती पण आमचे युवराज तुमच्या लेकीला भेटले म्हणून आम्ही आज इथे येऊन पोचलो आहोत. बोलवा तुमच्या मुलीला.” डॅा. काणे गुर्मीत म्हणाले.
कला बाहेर आली..तिच्याकडे बघून योगेशचा खुललेला चेहरा खूप काही सांगून गेला! तिनं केलेलं मेघदूताचं रसग्रहण ऐकायला गेल्यापासूनच ती त्याच्या मनात भरली होती. आषाढस्य प्रथमदिवसे.. नं तिनं केलेली सुरूवात व महाकवी कालिदासाच्या वाड्ग्मयावरचं तिचं प्रभुत्व बघून तो थक्क झाला होता. तिच्या साधेपणातलं सौंदर्यच त्याचा पाठपुरावा करत त्याला तिच्या घरी घेऊन आलं होतं.. पण आज बाबा कसे बोलतील आज याची त्याला फार काळजी होती.
“वामनराव, जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवणारे तुम्ही.
किर्तनाऐवजी काही दुसरं का केलं नाहीत?” काणे म्हणाले. वामनराव “देवाची इच्छा..तो ठरवतो..म्हणाले पण काणे काही पाठ सोडायला तयार नव्हते.
कलावतीला काण्यांचे प्रश्न खटकत होते…रामदासी किर्तनाने पंचक्रोशी पवित्र करणाऱ्या माझ्या संत प्रवृत्तीच्या बाबांबद्दल यांना थोडाही आदर नाही हे तिला दिसत होतं पण योगेश ते प्रश्न ऐकून इतका गप्प कसा बसतो आहे हे तिला कळतं नव्हतं.
खिडकीतून विठूकाकांनी मुलगा छान आहे असं दाखवलं व ती खुदकन् हसली. विठूकाका तिच्या जन्मापासून त्यांच्याकडे येत असतं. किर्तनाला येणारे एक साधक! पण वामनबुवांसाठी आपण काहीतरी करावं ही प्रबळ इच्छा! ते येत व बगीचा सुंदर करून जातं. कधी बुवांशी चहा घेत गप्पा मारत तर कधी कलावतीला बागकाम शिकवतं..
डॅा.काणे कलावतीला म्हणाले ,”संस्कृतचे क्लास तुम्ही घेऊ शकता. उठून बाहेर कुठं जाऊन नोकरी करायची जरूर नाही.” ते योगेशला काही बोलूच देत नव्हते म्हणून वामनरावच म्हणाले,”कला, योगेशना बाग दाखव ना आपली!”
ते दोघे बाहेर गेले. योगेश चांगला मुलगा होता. वडिलांपुढे मात्र एक अक्षरही मायलेक बोलू शकत नाहीत हे कलेला जाणवले. त्यांनी काहीवेळ गप्पा मारल्या व राधाबाईंनी चहा प्यायला आत बोलावले म्हणून ते आत गेले.
कला म्हणाली, “अहो विठूकाका, आत या ना चहा प्यायला!”
डॅा. काणे चहाचा कप हातात घेऊन बाग पहाण्यास दाराकडे वळत असतानाच आत येणाऱ्या विठूकाकाला धडकले व चहा धक्का लागून त्यांच्या शर्टावर सांडला..
“Nonsense! “ ते काकांकडे रागाने पहात ओरडले. काका बिचारे हातातल्या फडक्याने चहा पुसू लागले पण योगेशचे बाबा ओरडले, “ते घाणेरडं फडकं माझ्या कपड्यांना लावू नको. दिसत नाही हातात चहा आहे माझ्या?” काका शरमिंदे होऊन खाली बघत उभे राहिले..
कलावती एकदम उभी राहिली. ती काण्यांकडे बघून म्हणाली, “तुमचा चहा सांडला का?”
“हो मग!” हा गावठी माणूस येऊन धडकल्यावर आणि काय होणार?
कलावती हसली.. “नाही डॅाक्टर साहेब! तुमचा चहा सांडला कारण तुमच्या कपात चहा होता. तुमच्या कपात जर कॅाफी असती तर कॅाफी सांडली असती! बरोबर ना?”
डॅाक्टर काणे चिडून म्हणाले,”यात विशेष काय सांगितलंस?जे कपात आहे तेच सांडणार.. का पाणी सांडेल?”
“आपण मोठे डॅाक्टर आहात.. बरोबर आहे .. जे आत आहे तेच बाहेर सांडणार! आयुष्यात असे अनेक धक्के बसणार आहेत..परिस्थितीचे, नातेसंबंधांचे..आणि आत जर विवेक, नम्रता, कृतज्ञता असेल तर त्या धक्क्यांनंतरही हे गुणच बाहेर सांडतील..पण..आपल्या आतच जर तुच्छता, अहंकार, क्रोध असेल तर तेच बाहेर पडणार ना..ज्याचा मला गेले दोन तास त्रास होतो आहे.. योगेश मला आवडला आहे. पण आपल्यापुढे तो काही बोलू शकत नाही..त्याच्यात नम्रता आहे..माझ्या आई बाबांबद्दल आदर आहे आणि आपले बाबा आज कसे बोलतील ही काळजीही आहे. ते मला बाहेर अंगणात समजलं म्हणूनच मला तो अजूनच आवडला..
पण भारतीय समाजात लग्न होतं तेव्हा ते दोन कुटुंबांचं असतं. आमचं लग्न झालं तर माझे किर्तनकार बाबा आपले व्याही होणार याचा तुम्हाला त्रास होईल. ते व्यवहाराच्या दृष्टीनं आपल्या तोलामोलाचे नाहीत..पण ज्ञानाच्या बाबतीत त्यांची कोणी बरोबरी करू शकणार नाही..
मी घरात संस्कृतचे क्लास घेणार नाही.. मी विद्यापीठांत जाऊन संस्कृत शिकवणार आहे.. मी पण डॅाक्टरच होत आहे पण कालिदासाच्या वाड्ग्मयावर! रघुवंशातील भाषा थोडी कृत्रिम का वाटते व मेघदूत मनाला का भिडतं हे विद्यार्थ्यांना शिकवणारी..
आणि हे आमचे विठू काका आहेत ना त्यांचा मान राखणारं घरच मला हवं आहे..तिचे डोळे भरून येऊन आवाज कापरा झाला होता..
बरं झालं की आत जे असतं तेच बाहेर सांडतं.. निदान मला कळलं तरी.. योगेश तू जेव्हा डॅाक्टर साहेबांना सांगू शकशील ना.. बाबा तुमचं आज चुकलं किंवा बरोबर आहे त्यादिवशी येऊन माझा हात हातात घे.” ती थांबली!
डॅाक्टर काणे जळजळीत नजरेनं बायको व मुलाकडे बघत म्हणाले, “ चला इथून.. खालच्या दर्जाच्या लोकांशी नातं नाही जोडायचं आपल्याला.” ते तावातावानं बाहेर पडले..त्यांची पत्नी दु:खी चेहऱ्याने बाहेर पडताना बघून योगेश म्हणाला, “आई, थांब. मला कलावती पसंत आहे. मी तिच्याशीच लग्न करणार आहे!”
आईनं प्रेमाने कलावतीला जवळ घेतलं आणि वामनराव व राधाबाईंना त्या म्हणाल्या, “सुसंस्कृत आहे मुलगी असं ऐकलं होतं पण आज “सुसंस्कृत” म्हणजे काय समजलं”!
कलावती व योगेश नजरेत नजर घालून तो क्षण अनुभवत उभे होते. बाहेरून डॅाक्टर काणे गाडीचा हॅार्न वाजवत होते पण काही वेळात थांबले.. आत असलेलं सारंच बाहेर सांडून जगाला दिसू नये म्हणून!
कलावती हॅार्न थांबलेला बघून मनातच हसली.आयुष्य मोकळा कप देतं.. तो कशानं भरायचा हे आपल्या हातात आहे या विचारात असताना योगेशनं तिचा हात हातात घेतला व अंगठी पुढं केली..
वामनराव रामकृष्ण हरी..म्हणत स्मितहास्य करत डॅाक्टरांना आत बोलवायला बाहेर गेले.. खरेच सुसंस्कृत होते म्हणूनच !!
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
संकलन : प्रा. माधव सावळे
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈