श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-२ ☆ श्री मंगेश मधुकर ☆
काकूंबरोबर बोलल्यावर माझी अस्वस्थता वाढली. बायकोचा दुसरी बाजू समजून घेण्याचा मुद्दा योग्य वाटला. अवीला फोन केला. चार-पाच रिंग वाजल्यावर त्यानं फोन घेतला.
“अलभ्य लाभ, आज आमची आठवण, ”अवी नेहमीप्रमाणं सुरू झाला.
“मित्रा कसायेस”
‘मी मस्त, तू सांग. ”अवी.
“रुटीन”
“तेच बरं. बाकी ठिक ना. ”अवी
“तू कसा आहेस. काकू कशायेत”
“मी ठिक, एकदम आईविषयी विचारलसं. ”
“सहजच, विचारू नको का”
“अरे, तसं नाही रे. आता वय झालं. काहीतरी कुरबुरी असणारच. ”अवी
“तुझी तब्येत काय म्हणतीये”
“मी ठणठणीत, आता मुद्दयाचं बोल. महत्वाचं काम असल्याशिवाय तू फोन करणार नाहीस. ”अवी.
“मानलं तर महत्वाचं आहे. ”
“भाऊ, सरळ सरळ सांग ना. उगीच कशाला!!!”
“काकूंच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय”
“तुला कसं कळलं. ”
“ते महत्वाचं नाही. ”
“आईनं तुला फोन केला वाटतं. हाईट झाली. ”अवी वैतागला.
“एक मिनिट. ”
“सॉरी, तुला विनाकारण त्रास झाला. ”अवी
“काय म्हणतोय ते ऐक. मला फोन केला म्हणून काकूंवर चिडू नकोस. ”
“आईनं तुला बरंच काही सांगितलेलं दिसतंय. ”
“काही विशेष नाही”
“आता विषय निघालाय तर स्पष्टच बोल ना”
“काकूंना तुझी भीती वाटते. खासकरून तुझ्या चिडण्याची.. ”
“काय!!!”अवी किंचाळला.
“त्यांना खूप धाकात ठेवतोस. ”
“काहीही काय!!आई म्हणजे अति करते. ”अवी
“हे बघ. संतापू नकोस”
“एवढी वर्ष ओळखतोस. तुला वाटतं मी आईशी असं वागेल?जाऊ दे ना!!, मला यावर काहीच बोलायचं नाही”अवीनं फोन कट केला. पुन्हा पुन्हा डायल केलं पण त्यानं घेतला नाही. तासाभरानं परत फोन केल्यावर घेतला. “आपण नंतर बोलू”
“अवी, तू ठिक आहेस ना”
“खरं सांगू. याक्षणी अजिबात नाही. आईचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. ”
“माझं ऐक. ”
“आता अजून काय राहिलयं. माझा नालायकपणा आई जगजाहीर करतेय. ”
“शांत हो. उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. ”
“अजून कोणा कोणाला फोन केलेत काय माहिती?”
“कोणालाही नाही. फक्त माझ्याशीच बोलल्या ते सुद्धा सहज विषय निघाला म्हणून.. ”
“माझा स्वभाव कसा आहे हे तुला माहितीये. तरीही.. ”अवी
“तुझ्याविषयी खात्री आहे म्हणूनच तर इतकं स्पष्ट बोलण्याचं डेरिंग केलं”
“यार, सगळंच अवघड झालंय. काय करावं ते सुचत नाही. जमेल तितकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो ना बायको ना आई कुणी समजूनच घेत नाही. ऑफिसमध्ये वेगळीच तऱ्हा. घरी-दारी प्रत्येकाच्या अपेक्षा पुऱ्या करण्यातच आयुष्य चाललंय. शक्यतो कंट्रोल करतो तरीही कधी कधी तोल सुटतो. शेवटी मीही माणूसच आहे ना. सगळ्यांना चिडणं दिसतं पण माझ्या त्रासाची कुणाला जाणीवच नाही. ”
“प्रत्येक घरातल्या कर्त्याची हीच अवस्था आहे. मनाला लावून घेऊ नकोस. एखादे वेळेस ऑफिसचा राग काकूंवर निघाला असेल. इट्स नॉर्मल!!काकूंच्या वागण्यातही बदल झालायं परंतु हा सुद्धा विचार कर की तू तुझ्या आयुष्यात, संसारात आणि बाबा गेल्यापासून अनेक वर्षे काकू एकट्याच आणि सोबत प्रचंड रिकामा वेळ, म्हातारपणात शारीरिक दुखण्याबरोबर पण मनसुद्धा हळवं होतं. ”
“मान्य पण मी मुद्दाम वागत नाही पण काही वेळेला आईचं वागणं सुद्धा डोक्यात जातं मग संयम सुटतो. आवाज चढतो. फक्त आईवरच चिडतो असं नाही तर बायको, मुलीवर ओरडतो. आईनं पण थोड समजून घ्यायला पाहिजे ना”
“हे सगळ्याच घरात होतं. मला वाटतं तरी आई आणि तुझ्यात खूप अंतर पडलंय. ”
“ए बाबा, काहीही काय बोलतोयेस”
“जे खरंय तेच’
“असं काही नाहीये”
“आईबरोबर कामाशिवाय बोलणं सोडलं तर निवांत गप्पा कधी मारल्या होत्या हे आठवतंय का?”
“त्याचा इथं काय संबंध”
“तोच तर प्रॉब्लेम आहे. रागावू नको पण स्पष्ट बोलतो तुझा आईबरोबर संवाद संपलाय. ”
“कदाचित असेल. कामामुळे वेळ मिळत नाही म्हणून मला तिच्याविषयी काहीच वाटत नाही असं नाही. ”अवी.
“मित्रा, एकच विनंती करतो की कितीही बिझी असलास तरीसुद्धा आईसाठी वेळ काढ. प्रेमाचे दोन शब्द बोलावेत एवढीच तिची अपेक्षा आहे. तेच तिच्यासाठी टॉनिक आहे. आईची काळजी घे. पिकलं पान आहे. कधी गळेल त्याचा नेम नाही. नंतर कितीही वाटलं तरी उपयोग नाही. ”
“कुठला विषय कुठं नेतोयेस”अवी.
“अव्या, अजूनही आईचा आधार आहे ही फार मोठी भाग्याची गोष्टयं. तिच्यामुळेच तुझं बालपण अजूनही शाबूत आहे. बेटया, नशीबवान आहेस. आईविना आयुष्य काय असतं ते मला विचार. ”भरून आल्यानं मला पुढचं बोलता येईना. अवीची अवस्था देखील वेगळी नव्हती. तो सुद्धा भावुक झाला. फोन चालू होता पण कोणीच बोलत नव्हतं. नंतर कापऱ्या आवाजात कसंबस “थॅंक्स” म्हणत अवीनं फोन कट केला.
—-
चार-पाच दिवसांनी पुन्हा काकूंचा फोन. आवाजात एकदम उत्साह. “मंगेश, बोलू शकते ना. ”
“हो बोला काकू!!”
“अरे जादू झाली. अवीनं मला मोठ्ठं सरप्राईज दिलं. ”
“अरे वा!! काय ते !”
“माझ्यासाठी नवीन फोन आणला. त्याच्यावरूनच बोलतेय. आता रोज संध्याकाळी रूममध्ये येऊन माझ्याशी गप्पा मारतो. माझं लेकरू चांगलंय रे!!” बराच वेळ अवीविषयी कौतुकानं बोलताना काकूंच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारा आनंद स्पष्ट जाणवत होता.
“बरयं, ठेवते आता फोन. तुझा बराच वेळ घेतला. अवीच्या चिडण्याविषयी बोलले ते सगळं विसरून जा. कुणाला सांगू नको. ऑफिसच्या टेंशनमुळं होत असेल पण आता तो चिडत नाही. ”काकूंशी बोलल्यावर छान वाटलं आणि नकळत आईच्या आठवणीनं डोळे पाणावले.
– समाप्त –
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈