सुश्री नीता कुलकर्णी

☆ “ते दोघे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सकाळची वेळ..

“अहो दुधाची पिशवी आत आणता का? मगाशीच बेल वाजली.. “

“अरे बेल कधी वाजली? मला नाही ऐकू आली. थांब तू नको उठू.. तुला बरं नाही. आज तू दिवसभर आराम करायचा हे ठरल आहे ना… म्हणून तर सकाळ संध्याकाळ डबा सांगितला आहे. दोन वेळेसचा चहा तो काय….. मी करीन. ” तो एका दमात हे बोलला. ती आत गेली.

त्याच्या लक्षात आल आज आपण प्रथमच दूध आत घेत आहोत….

नाहीतरी प्रत्येक वेळेस बेल वाजली की तीच दार उघडते….

दुधाची पिशवी कापून दूध पातेल्यात घालताना दूध सांडलंच.. पटकन त्यांनी तिथल्या नॅपकिननी ते पुसून घेतलं. ती समोर नव्हती… ते एक बरं..

“अहो दूध तापलं असेल बघा… नाहीतर गॅस मोठा करून तिथे थांबून तापवून घ्या… “

” बरं बरं…. “

च्यायला… दूध तापायला किती वेळ लागतो…. इथे नुसतं बघत उभ राहायचं…..

तो वैतागून पुटपुटला..

शेवटी तापलं एकदाच दुध. तो पेपर वाचत बसला.

सकाळी अकराची वेळ

“अहो तुमचा दुसरा चहा… “

” आता परत दूध तापवायचं? “

“साय चांगली येण्यासाठी मी चारदा दूध तापवते…. “

दुध गॅसवर…. गॅसची फ्लेम कमी झाली का काय… काय कटकट आहे… कुकरला शिट्टी असते तस काहीतरी हव होतं…

मग त्याच्या लक्षात आलं आपल्याच चहासाठी दूध तापवणं चाललं आहे….

तसा बरा झालाय चहा… जमतय आपल्याला पण… अजून प्रॅक्टीस हवी… तो मनातल्या मनात बोलला..

दुपारी पावणेचारची वेळ

“माझ्या लक्षात आहे हं.. चारला आपल्या दोघांचा चहा करणार तेव्हा दूध तापवतो… “

तीनी काही बोलायच्या आताच त्यांनी सांगितलं.

ती खुद्कन हसली…

आज त्याला समजलं की साधा चहा करायचा म्हटलं तरी बराच व्याप असतो.. गाळणं, कप, बशी, चमचा, ते आलं खिसायच…. एका चहाचा ईतका पसारा?

झालं एकदाच आजच्या दिवसातल चहा प्रकरण….

वेळ रात्रीची..

“अहो उद्या दुपारी जेवताना दही लागणार त्यासाठी दूध विरजण लावायच आहे….. ” तो आत आला.

 

 “दही नुसतं नाही घालायच. ती दह्याची कवडी चांगली हलवा.. मग दुध घाला म्हणजे दही घट्ट लागतं.. बास.. ईतके पुरे… सकाळच्या चहाला दुध लागेल… “

तिच्या सुचना सुरू होत्या..

आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी दुध विरझण लावलं.

 

“आता फ्रिज मधला तो साईचा सट घ्या. त्यात साय घाला. पाच दिवसांची साठली आहे. आता उद्या त्याचे ताक करते आणि लोणी काढते… तुमचे आवडते बेरी घालून कणकेचे लाडू करीन… आणि ताकाची कढी… गोळे घालून… गरम भाताबरोबर… “

 

तो बघत राहिला ती बोलतच होती…. आपल्याच तंद्रीत….. थोडं स्वतःशी थोडं त्याच्याशी…

तो नुसता ऊभा..

 

दूसरा दिवस… वेळ सकाळी साडे सहाची…

 

“अग आपला चहा झाला तरी दूध शिल्लकच आहे…. आता याचे काय करायचे… “

“आता हे रात्रीसाठी विरजण लावायचे…. पण इतक्यात नाही…

ताज दूध आलं की मग…

काल कसं… तुमचा मित्र आला की तुम्ही बाहेरून सांगितलं दोन कप कॉफी कर…… म्हणून हे ठेवायचे घरात दूध नाही असे नको व्हायला….. ” ती सांगत होती..

 

कालपासून आपण सकाळ… दुपार… संध्याकाळ…. दुधाच्या पातेल्याशीच खेळतं आहोत असे त्याला वाटले….

अरे देवा… एका दुधाच इतकं रामायण असतं ?

तो विचारात पडला….

स्वयंपाकघरात त्याने नजर फिरवली. भांडी, डबे, फ्रिज, बरण्या, बाटल्या, ताट, वाट्या….. मग या सगळ्यांचे किती असेल…

 

ती हे सगळं मॅनेज करते हे आपल्या कधी लक्षातच आलं नाही…

 

सारखं काय स्वयंपाक घरात काम असतं ग….

सारखी आत आत असतेस…

आपण तिला सहज म्हणत होतो…

तीनी केलेले अनेक पदार्थ त्यांना आठवायला लागले..

 

ती आत आली…

“अहो स्वयंपाक घरात काय करताय… “

 

“तू किती आणि काय काय करत असतेस माझ्या कधी लक्षातच आले नाही…. बायको सॅल्युट आहे तुला तो मनापासून म्हणाला….. “

 

“इश्य इतकं काही नाही हं…

आम्हा बायकांना सवय असते..

तुम्ही बाहेरचं सांभाळता आणि मी घरातलं… “

ती सहज म्हणाली

अचानक त्यांनी तिचे हात हातात घेतले…

“आज पर्यंत कधी बोललो नाही पण तू खरच संसार खूप छान केलास. नाती पण सांभाळलीस. कधी गंभीरपणे याकडे मी बघीतलच नाही. परंपरेनी चालत आलेल आनंदानी करत आलीस”

 

तो आज काहीतरी वेगळचं बोलत होता भाऊक झाला होता….

आवाजही नरम आणि कातर झाला होता…..

त्याचे आज एक निराळे रूप ती बघत होती……..

तो आज आतून.. अंतःकरणातून जे वाटले ते बोलत होता…. अगदी मनापासून..

खूप पूर्वीच आपण हे सांगायला हवं होतं असं त्याला वाटलं…..

 

ती तर गडबडूनच गेली होती…

तो अस कधीही आज पर्यंत बोलला नव्हता…

 

अनामिक अशा सुखानी ती भारावली होती… आनंदीत झाली होती…

जीवनाचं सार्थक झालं भरून पावलो असं मनोमन तिला वाटलं….

 

ते दोन जीव हातात हात घेऊन तृप्त मनाने एकमेकांकडे बघत होते…

त्याचे डोळे भरून आले होते तिचेही……..

आता शब्दही मुके झाले होते…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments