श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ पार्सल (भाग -1) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
‘बेस फॉर रोमिओ टॅंगो…. बेस फॉर रोमिओ टॅंगो…. रिपोर्ट योर स्टेटस, ओवर!’
‘रोमिओ टॅंगो फॉर बेस ऑस्कर किलो, जस्ट थ्री ऑवर्स अवे, ओवर!’
‘बेस फॉर रोमिओ टॅंगो…. वेल डन! आपल्यासाठी एक मोठं पार्सल दिल्लीहून आलय. प्लीज पिकअप ऑन योर वे, ओवर!’
‘रोमिओ टॅंगो फॉर बेस… सेंडर्स डिटेल? ओवर!’
‘बेस फॉर रोमिओ टॅंगो….दिल्लीहून… मीनाक्षी, ओवर!’
‘रोमिओ टॅंगो फॉर बेस…हाऊ बिग पार्सल, ओवर!’
‘बेस फॉर रोमिओ टॅंगो…. ओवर एंड आऊट!’
रोमिओ टॅंगो….उर्फ रोहित ठाकूर… कॅप्टन रोहित ठाकूर, बेसद्वारा अचानक बंद केलेल्या वायरलेस सेटच्या या वार्तालापावर जाम चिडला. ‘अबे, नीट सगळं सांगायचच नव्हतं, तर सांगितलच कशाला पार्सलबद्दल!’ काय पाठवलं असेल बरं मीनाक्षीनं? उत्कंठेनं जसं काही त्याला मरायला होत होतं. तीन तासांची परतीची वाटचाल अचानक त्याला असह्य वाटू लागली. बेस हेडक्वार्टरकडे उडत जावसं वाटू लागलं. वाटू लागलं की बेसला संदेश पाठवावा की काहीच ठीक नाही इथे… ‘नॉट ऑस्कर किलो ओवर… म्हणजे इथे काही ठीक नाही. ‘लवकरात लवकर एक हेलीकॉप्टर पाठवा. ओवर!’ इकडे त्याच्या बरोबर तुकडीत सामील असलेले जवान त्याची चेष्टा करत होते.
‘काय झालं साहेब, गर्लफ्रेंडचं पार्सल आलं… आय हाय !.. चला साहेब, दुश्मनांशी सामना नाही झाला, तर काय झालं… आपल्यासाठी गिफ्ट तर आली.’
‘गप्प बसा रे! आधीच मूड खराब झालाय. त्यात आणि तुम्ही मला खेचू नका. बेसमधून बोलणारा कोण ऑपरेटर होता? तिथे पोचलो की त्याची चांगलीच झडती घेतो. एक तर सांगायचच नाही. सांगितलं, तर पूर्णपणे सांगायचं ना! कंबख्त!’ कॅप्टन रोहितची चीड जशी काही त्या वाळवंटातल्या तापलेल्या वाळूशी स्पर्धा करत होती.
‘साहेब, त्याची चूक असेल असं नाही. त्या बिचार्याने आपल्याला बरं वाटावं म्हणून सांगितलं असेल. मोठे साहेबसुद्धा ट्रान्समिशन ऐकत असतील, तर त्याला त्यांचा ओरडा खावा लागणारच ना की वायरलेस सेटवर फालतू गोष्टी बोलायच्या नाहीत म्हणून! म्हणून तर त्याने एकदमच ओव्हर एंड आऊट केलं असणार!’ हवालदार किशनने नेहमीप्रमाणे समजुतीची गोष्ट सांगितली, तेव्हा रोहितलाही वाटलं, कदाचित असंच काही तरी झालं असेल.
कॅप्टन रोहितची पंध्रा जणांची तुकडी, पाच दिवसांपूर्वी एका खास मिशनवर निघाली होती पण अचानक त्यांना परत येण्याचा निर्देश मिळाला. हा परत फिरण्याचा हुकूम अगदी निराशाजनक वाटला कॅप्टन रोहितला. या मिशनसाठी कमांडिंग ऑफिसरने, टीम लीडर म्हणून त्याची निवड केली, तेव्हा तो उत्साहाने नुसता रसरसत होता. आपल्या टीमसाठी जवानांना निवडण्याचे स्वातंत्र्य त्याला दिले होते. बटालियनच्या उत्कृष्ट जवानांधून चौदा जवानांची तुकडी मिशन पूर्ण करण्यासाठी मोठ्या उत्साहाने निघाली. या मिशनच्या सफलतेवर कारगीरवर चालेल्या धमासान युद्धाची दिशा ठरणार होती. मिशनसाठी निघाल्यानंतर तीन दिवसातच दोन्ही राष्ट्रांमध्ये चर्चा झाली आणि आदल्या दिवसापासून युद्धबंदीची घोषणाही झाली.
मिशन बाबतची सगळी माहिती त्याला दिली गेली, त्याच्या कमांडो टीमनी काय काय करायचय हे सांगितलं गेलं, या मिशनच्या सफलतेवर किती किती आणि काय काय निर्भर आहे, हे त्याला सांगितलं गेलं, तेव्हा तो वेगळ्याच नशेत होता. त्याला थोडसं समाधान मिळालं. त्याचे यार- दोस्त, त्याचे किती तरी बॅच मेटस कारागिलवर प्राणांची बाजी लावत असताना तो जेसलमेरच्या या उदास वाळवंटामधे आपल्या बटालियन बरोबर झक मारतोय. रात्रंदिवस, सकाळ – संध्याकाळ ही गोष्ट त्याला टोचत राहयाची. वाटायचं, त्याच्या बटालियनला या पश्चिमी सीमेवर का ठेवलं? त्याच्या बटालियनला या वेळी द्रास किंवा कारागिलला का पाठवलं नाही? मीनाक्षीला तो रोज पत्रातून आपल्या मनातल्या या टोचणीबद्दल लिहायचा आणि त्यावर मीनाक्षीचं खळखळणं… ‘बरं झालं तू कारागिलमध्ये नाहीयेस. जास्त हिरोगिरी दाखवण्याची गरज नाही,’ वगैरे… वगैरे…
मूळ कथा – ‘पार्सल’ – मूळ लेखक – श्री गौतम राजऋषि
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈