श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ जाग ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
त्याच्या घराच्या अंगणात कसं कुणास ठाऊक औदुंबर उगवला होता. हे झाड एकदा का उगवून त्यानं बाळसं धरलं की ते उपटून टाकण्याची हिंमत सहसा कुणी करू धजत नाही. त्याच्या वडिलांनीही मग या देवाच्या झाडाला पार बांधून दिला आणि काही वर्षांतच तो पार देवाचा पार म्हणून ओळखला जाऊ लागला.
वडील असेतोवर त्याचं सर्व नीट होतं. एकुलता एक गडी.. लाड व्हायचेच. तालमीत जायचं, कबड्डीचे मैदान गाजवायचे हा नित्यक्रम. त्यात ढोल लेझिमचा नाद अंगात मुरला. ताशा असा घुमायचा की केवळ तो ऐकण्यासाठी लोक गर्दी करीत. गावोगावच्या जत्रेत त्याच्या मंडळाने बक्षिसं मिळवली नाहीत असं कधी होत नसे. देवळातली शो केस असंख्य मानाच्या ढाली, भिंतीवरची घड्याळं, स्मृतिचिन्हे यांनी भरून गेली होती. बिदागी म्हणून मिळालेल्या पैशांतून तालमीची आणि मारुतीच्या देवळाची डागडुजी केली जाई. पण रंगाचं काम करावं ते यानेच. नुसतं भिंती रंगवणं नव्हे. त्याचं हस्ताक्षर केवळ सुंदर आणि देखणं. गावातला फळा त्याच्याच अक्षराला सरावला होता.
लग्नात दिल्या जाणाऱ्या भांड्यांवर नावं कोरायला पण तो शिकला होता. मग गावातले वरबाप झालीत द्यायची भांडी तर विकत आणत, पण नावं टाकायला याच्याचकडे देत… पैसे द्यायचा विचार ते करत नसत आणि हा मागतही नसे. पुढे लग्नाचे बॅनर केले जाऊ लागले. लोक फक्त पांढरा कपडा आणून देत आणि जमलंच तर निळा रंग. हा बाबा आपला वेळ खर्ची टाकून लग्नाच्या दिवशी बॅनर लागेल गावात अशी व्यवस्था करायचा. थोडक्यात हा गावचा नारायण ! लग्न झालं आणि दोन मुलं झाली तरी याचा हा उद्योग काही थांबला नाही.
वडील गेले आणि कारखान्यात कामाला जाणं भाग पडलं. तरीही याचं रात्री ढोल लेझीम वाजवायला जाणं थांबलं नाही. याला त्याच्या गावातले खेळ म्हणत. आणि जत्रेतले खेळ तर रात्रीच असत. कबड्डीच्या टुर्नामेंट सुद्धा दूर दूर असत. नोकरी सांभाळून हे व्याप सांभाळणं किती अवघड. पण यातच जीव गुंतला असल्याने रात्रीचे जागरण आणि दिवसभर अंगमेहनत याचा मेळ घालणं कठीण होत होतं.
त्यात पाच पंचवीस पोरं एकत्र आणि शिवाय ही पोरं तरुण तडफदार. तारुण्यातील काही आकर्षणं ओलांडून डोळे बंद करून पुढे जाणे यातील प्रत्येकाला शक्य होईलच असं नव्हतं.
बाकी जाऊ द्यात… आधी काहीतरी भारी करायचं म्हणून एकदा तोंडाला लागलेली ती अगदी नसानसांत भिनायला लागली. देखणा, उंचापुरा गडी… दारूमुळे त्याची रया जायला लागली. अनेकांनी सांगून पाहिलं. पण क्रम चुकेना !
असाच एकदा मध्यरात्री तो घरी परतला.. झुलत झुलत…. एवढ्या रात्री कशाला घरच्यांना जागं करायचं म्हणून त्यानं औदुंबराच्या पारावरच अंग टाकून दिलं ! औदुंबर आता डेरेदार झालेला होता. त्याच्या बायकोने बुंध्यापाशी दिवाबत्ती सुरू केली होती… तुळस ठेवली होती. दत्ताची तसबीर होती. याची दारू सुटली म्हणजे या अवदसेसोबत आलेली सारी बिलामत सुद्धा निघून जाईल अशी त्याच्या आईला आणि कारभारणीला आस होती.
पहाटेचे तीन वाजले असावेत… त्याला कुणीतरी गदागदा हलवत होतं… त्याचे डोळे तांबारलेले.. शुद्ध नव्हतीच. त्याने कसेबसे डोळे किलकिले केले. “असं कुठवर चालायचं? जागा हो… ” असं काहीबाही त्याच्या कानापाशी कुणीतरी बोलत असल्याचं त्याला जाणवलं. आई किंवा बायको… या दोघींपैकी हा आवाज नव्हता… काही समजेना !
हा पुन्हा गाढ झोपी गेला. झोप कसली.. नशा ती. पण त्याला साडेपाच वाजता जाग आली. घरचे अजून उठायचे होते. हा सहज बाहेर रस्त्यावर आला. तिथून पुढे पाय मोकळे करायला म्हणून मारुतीच्या देवळाच्या चौकात निघाला… तर चौकात एस. टी. गाडी उभी. कोण कुठं निघालं असावं? लग्न तर नाही आज कुणाचं ! तो जवळ गेला.. पंचवीस बाया गडी माणसं तयार होऊन गाडीत दिगंबरा दिगंबरा भजन करीत बसली होती.. इतरांची वाट बघत. त्याने गाडीपुढे जाऊन बोर्ड पाहिला…. नारायणपूर ! कधी ऐकलं, पाहिलं नव्हतं. त्याला पाहून गाडीतील एक वयोवृद्ध म्हणाला…. “ बाळा, यायचं का नारायणपूरला? “
“ काय आहे तिथं? “ त्याने विचारलं.
” चल तर खरं.. कल्याण होईल ! हे असं किती दिवस राहणार…. दारूत आयुष्य बुडवीत? ” उत्तर आलं.
” पण मी तर अजून काहीच आवरलं नाही. आंघोळ पांघुळ काय नको का देवाच्या गावात जायला?” त्याने अडचण सांगितली !
” अरे, मन साफ आहे ना? चल.. गुरू माऊली समजून घेतील यावेळी !”
आणि तो गाडीत बसला. त्याला गाडीत बसलेलं अनेकांनी पाहिलं होतं, त्यांपैकी कुणी न कुणी तरी त्याच्या घरी सांगणार होतं !
गाडी नारायणपूर गावात पोहोचली. साऱ्या प्रवासात भजन सुरूच होतं. आज गुरुवार.. दत्त गुरूंचा वार. तुफान गर्दी. गुरुजी आसनावर बसलेले… त्यांच्या दर्शनाला मोठी रांग.. तो कितीतरी वेळ रांगेत तिष्ठत थांबून राहिला.. त्याची वेळ आली.. गुरुजींनी मस्तकावर हात ठेवला… “ बरं केलंस… माझं ऐकून इथवर आलास.. सोड तो मार्ग ! पुढच्या गुरुवारी व्यवस्थित अंघोळ, पूजा करून ये ! “
गुरुजींनी त्याच्या गळ्यात तुळशी माळ घातली.. ’. कल्याण हो ! ‘
तो रांगेतून पुढे सरकला आणि भानावर आला ! सामान्यांच्या आयुष्यात अध्यात्माच्या वरच्या पायऱ्या कधी येत नाहीत. पण एखादी अशी पायरी सापडते की जिच्यावर माथा टेकला की आहे या आयुष्याचा प्रवास सोईचा होऊन जातो. व्यसन सुटलं की चालणे सरळ मार्गी होऊन जाते.. याचेही असेच झाले.
भगवंताने सामान्य लोकांसाठी असे काही महात्मे धाडून दिलेत जागोजागी. त्याचं काम सोपं करायला !
अध्यात्म असं व्यवहाराच्या कामी आलं तरच ते लोक आचरणात आणतील, हेच खरं.
अशा असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून उत्तम मार्गावर आणणारे कित्येक महात्मे आपल्या आसपास आहेत. नारायणपूर, सासवड येथील अण्णा महाराज हे असेच एक सिद्ध ! त्यांच्या जाण्याने एक आधार हरपला आहे…..
… खरं तर असे आधार कुठे ना कुठे असतातच.. जे माणसाला उत्तम मार्गावर नेण्यासाठीच असतात.
पण ते योग्य वेळी सापडले पाहिजेत …. आणि नकळता नाही सापडले तर आपणहून शोधले पाहिजेत.
अर्थात ते शोधण्याची सद्बुद्धी देणारे कोण.. ते मन स्वच्छ-शुद्ध आणि खऱ्या अर्थाने जागं झाल्याशिवाय लक्षात येत नाही हे मात्र खरं !!!!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈