श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ कावळ्यांचा सण… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
रविवारी सगळं कसं आस्ते कदम चाललेलं. रोज घड्याळाच्या तालावर नाचणारं आयुष्य गोगलगाय असतं. आमच्या घरात सुद्धा असंच आळसावलेलं वातावरण. आई किचन तर हॉलमध्ये बाबा पेपर वाचत होते. मी आणि दीदी मोबाईलमध्ये गुंग.
“परवा सकाळी सगळ्यांनी ऑफीसला तासभर उशीरा जा” किचनमधून आई म्हणाली.
“बरं” कारण न विचारता बाबांनी होकार दिला.
“आई, काही विशेष”दीदी
“जमणार नाही” मी म्हणताच आई तडक हॉलमध्ये आली.
“जमवावं लागेल. घरात महत्वाचं कार्य आहे म्हणून थांबायला सांगितलं. कळलं”
“तुझं प्रत्येक कार्य महत्वाचं असतं. परवा नेमकं काय आहे. ते किती महत्वाचं आहे. ते आम्हांला ठरवू दे. ”
“येस, आय टोटली अॅग्री”कधी नव्हे दीदीनं माझी बाजू घेतली. बाबांकडून मात्र काहीच प्रतिक्रिया नाही.
“पितृ पंधरवडा चालूयं”
“ओ! म्हणजे कावळ्यांचा सण”मी चेष्टेच्या सुरात म्हणाल्यावर आई चिडली पण काही बोलली नाही.
“गप रे, काहीही बोलू नकोस. ”दीदी.
“सण म्हण किवा अजून नावं ठेवा. तुम्हांला ऑफिसला उशीर होऊ नये म्हणून गुरुजींना सकाळी लवकर बोलावलंय. ”
“बाबा थांबणारेत तेव्हा आम्ही ऑफिस गेलो तर काहीच प्रॉब्लेम नाही. उगीच कशाला उशिरा जायचं”दीदी.
“तसंही फार काही महत्वाचं नाहीये”मी दिदीला दुजोरा दिला.
“ते मला माहित नाही. नमस्कार केल्याशिवाय कोणीही घराबाहेर जायचं नाही. हे फायनल”आईनं जाहीर केलं.
“आई, हट्ट करू नकोस. ”
“हट्ट मी करते की तुम्ही!! आणि हे काही माझ्या एकटीसाठी करत नाहीये. ”
“मग कोणासाठी?”
“आपल्यासाठी”
“कुणी सांगितलं करायला”
“सांगायला कशाला पाहिजे. पिढ्यानपिढ्या चालत आलयं”
“म्हणून आपण तेच करायला पाहिजे असं नाही”
“हे बघ उगीच वाद घालू नकोस”
“मला हे पटत नाही आणि तसंही या सगळ्या प्रकाराला काहीही लॉजिक नाहीये. ”
“प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायचं नसतं. काही गोष्टी मनाच्या समाधानासाठी करायच्या असतात”
“तुला जे करायचं ते कर ना. आम्हांला आग्रह का करतेस. ”
“आपल्या माणसांसाठी तासभर वेळ काढू शकत नाहीस. इतका बिझी झालास”.
“प्रश्न तो नाही. बुद्धीला पटत नाही. ”
“म्हणजे माणूस गेला की आपल्या आयुष्यातून कायमचा वजा करायचं का?गेला तो संपला. असंच ना. ”
“आई, इमोशनल होऊ नकोस. मी असं काही म्हटलेलं नाही. फक्त पित्रकार्य. मृत व्यक्तींच्या नावानं कावळ्यांना घास ठेवणं या गोष्टी डज नॉट हँव सेन्स.. ”माझं बोलणं आईला आवडलं नाही.
“ईट हॅज सेन्स, ”पेपर बाजूला ठेवत बाबा म्हणाले.
“म्हणजे, बाबा, तुम्ही पण.. ”
“येस, आईचं बरोबर आहे. तू साध्या गोष्टीचा इश्यू करतोयेस”
“गोष्ट साधीच आहे मग एवढा आग्रह का?”
“तेच मी म्हणतोय. एक नमस्कारासाठी एवढा आग्रह का करावा लागतोय. ”
“मला हे प्रकार आवडत नाही आणि मान्यही नाहीत”
“तू एकांगी विचार करतोयेस. यासगळ्याकडं दुसऱ्या बाजूने बघ. ”
“म्हणजे”
“एकाच घरात राहूनही कामाच्या व्यापामुळे एकमेकांशी निवांत बोलायला वेळ मिळत नाही आणि इथं तर विषय दिवंगत व्यक्तींविषयी आहे. काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं हळूहळू विस्मरणात जातात. महिनोमहीने त्यांची आठवणसुद्धा येत नाही. यानिमित्तानं त्यांचं स्मरण करून काही धार्मिक कार्य केली तर त्यात बिघडलं काय?”
“आठवणच काढायची तर मग कावळ्यांना घास देणं असले प्रकार कशासाठी?इतरवेळी कावळ्यांकडे बघायचं नाही आणि या पंधरा दिवसात मात्र कावळा हा मोस्ट फेवरेट!!. ”
“पुन्हा तेच!!तू फक्त क्रिया कर्माविषयीच बोलतोयेस. ”
“ज्यांचा वारसा आपण चालवतो त्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हाच प्रमुख उद्देश आहे. ”
“तरी पण बाबा.. ”
“मॉडर्न विचारांच्या नावाखाली प्रत्येक जुन्या गोष्टी, रीती, परांपरांना नावं ठेवणं, त्यांची चेष्टा करणं योग्य नाही. इतकी वर्षे यागोष्टी चालूयेत त्याच्यामागे काही कारण असेलच ना. ”
“प्रॉब्लेम हा आहे की तुमच्यासारख्यांचा सांताक्लोज चालतो पण कावळ्याला घास ठेवला की लगेच ऑर्थोडॉक्स, जुनाट विचारांचे वगैरे वगैरे अशी लेबल लावता. ”आई. “मला सांग. गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात का लावतात”बाबांचा अनपेक्षित प्रश्न.
“नक्की सांगता येणार नाही”
“भिंतीवर फोटो लावणे. हार घालणं हे सगळं पूर्वी व्हायचं. आजकाल हॉलमध्ये निवडुंग चालतो पण फोटोची अडचण होते. कपाटातला फोटोसुद्धा कधीतरी बाहेर निघतो. ”आई.
“फोटोच्या रूपानं ती व्यक्ती आपल्यात आहे या विश्वासानं काही चांगलं घडलं की नमस्कार करून गोडधोड ठेवलं जातं. आशीर्वाद घेतला जातो. फोटोतली व्यक्ती निर्जीव असते पण असं केल्यानं समाधान मिळतं. त्यांचा आशीर्वाद आहे या जाणिवेनं बरं वाटतं. ”बाबांचा मुद्दा आवडला. विचारचक्र सुरु झालं. काही गोष्टींकडे आतापर्यंत एकाच चष्म्यातून पाहत होतो. नावं ठेवत होतो. चूक लक्षात आली.
“बाबा, थॅंक्स. मी एकांगी विचार करत होतो. ”
“तुझ्यासारखाच विचार करणारे बरेच आहेत. सरसकट टीका करण्यापेक्षा दुसरी बाजू पहावी एवढंच सांगायचं होतं. जे बोललो त्यावर विचार कर. जर तुला वाटलं तर थांब. बळजबरी नाही. पालक म्हणून आपल्या परांपरांविषयी सांगू शकतो पण त्या स्वीकारायच्या की झिडकारायच्या तुम्ही ठरवा. अजून एक, काही गोष्टी मान्य नसतील तर तटस्थ रहा पण मनाला लागेल असं बोलू नका. प्लीज.. ”बाबांच्या बोलण्यात एक वेगळाच सूर जाणवला.
“जुन्या गोष्टींना नावं ठेवायची फॅशन झालीय”आईचा राग अजूनही शांत झाला नव्हता.
“आई, सॉरी!!परवा नमस्कार करून जाईन”
“असा बळजबरीचा नमस्कार नको. मनापासून वाटत असेल तरच थांब. ”एवढं बोलून आई किचनमध्ये गेली. दिदीकडं पाहिल्यावर ती लगेच म्हणाली “मी थांबणार आहे”तितक्यात बाल्कनीच्या बाजूनं ओरडण्याचा आवाज यायला लागला. पाहिलं तर झाडावर दोन कावळे ‘काव काव’ ओरडत होते. कदाचित ते माझे……..
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈