प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ अन्नदाता (सुग्गी) ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

आज शिरपा लै खुशीत होता. नेहमीपेक्षा जरा लवकरच हातरुन सोडलं. अन खालच्या अंगाला दोन पायऱ्या उतरून आंगणात आला, रांजण भरलेलं हुत, त्यामधलं गार पाणी घेतलं, अन सपासप तोंडावर मारून घेतलं. डोळे तोंड आपल्या धोतराच्या सोग्यांनी पुसत सोप्यात आला. डोक्याला मुंडास गुंडाळून परत पडवीत गेला. त्याला आल्याल बघून गायी म्हसरानी हंबरडा फोडला. तस त्यानी त्यांना वैरण टाकून, शेण मुत घाण काढली. त्याचा वास चवकड दरवळत पसरला हुता. परत त्यांनी कडवळ टाकली.

तस शेवंता बी उठली जरा कारदावून नाराजीच्या सुरात म्हणाली – 

“धनी आज येदुळा का उठलासा ” ? तस शिरपा म्हणाला आज जुंदळा कपायचा हाय. पोटरीतल दान भरल्यात बी अन वाळल्यात बी. बर बर म्हनत शेवंतां चुलीकड गेली,

चूल पेटवली. चहाच भोगान चुलीवर चढवत, साखर पत्ती टाकली. अन परसात जाऊन तंबाखुची मिश्री हातात घेऊन कुडाच्या भिंतीला टेकून दातावर घासत राहिली. तस तिला जरा झिंग बी चढली होतीच. मागच्या वर्षी एवढं राबून म्हणावं तस जुंधळ हाती लागला नव्हता ! आता ह्यावर्षी काय होईल कुणाला दक्कल ! असा इचार चालू असता शिरपान हाळी दिली, वाईच चहा जरा ज्यास्त टाक. तंद्रीत असलेली शेवंता गडबडली ! अन बेगिबेगीन तोंड खलबळत पदरांन त्वांड पुसत आली.

कुडातली असलेलं जळण व गोवऱ्या गोळा केली अन चुली म्होर ठेवून दिली. तेवढ्यात शिरपानी म्हसराम्होर पेंड, पीठ ठेवल कसंडी घेऊन धारा काढायला चालू केल. म्हशीच दोन दोन थान धरून कसंडी मांडीत धरून, दूध पिळत होता. म्हसबी गपगुमान रवंथ करीत डोळे झाकून उभी व्हतीचं. तिला बी लै झ्याक वाटत हुत, कारण तिची भरलेली कास रिकामी हुत व्हती ! कसंडी भरली तस शिरपान एक थान वासरासाठी सोडलं हुत. वासराला सोडताच ते पळत पळत आलं अन ढुसण्या देत थान चोखु लागलं.

अंगणातून शिरपा स्वयंपाक घरात वर आला. त्यानं एका वाटीत दूध घेतलं अन विठ्ठलाच्या चरणी रुजू केलं ! उरल्याल समद दूध बायको कड सुपूर्द केलं.

शेवंतान ताज फेसाळ दूध चहात टाकलं, अन फडक्यांनी गाळून एक लोटा शिरपाला अन एक लोटा आपण घेतला. तस उरलेल्या चाहाकड बघत शेवंता म्हनली – 

“किटलीत घालून देऊ का “? 

तस म्हणत असताच, गल्लीतील चार गडी जे सिरपानी सांगितले व्हते, ते सगळे आंगणात आले ; अन शिरपा अशी हाळी मारली, तस सिरपानी समद्याना चहासाठी वर बोलवलं. समदी जण सोपा माजघर ओलांडून परसात आली.

तस समद्याना चहा देण्यात आला. सगळयांनी चहा घेतल्यावर, गडीमानस सोप्यात आली. बदामाच्या खिश्यात हात घालून चंची उघडली गेली. कोण सुपारीचे खांड तोंडात टाकलं, कोणी हातात तंबाखू धरून चुना लावू लागले. तस गण्यानं आपल्या मुंडास्यात खोवलेली “रायल छाप सिन्नर बिडी अन कडीपेटी काढली. ” 

अन एक बिडी तोंडात धरत, काडी पेटवून आल्हाद बिडी पेटवली. डोळे किलकिले करत, नाकातून अन तोंडातून धूर सोडला. सगळी जण घराबाहेर पडली.

खोताच्या गल्लीतून बाहेर येत, पानंदीच्या बाजूनं शेताचा रस्ता धरला. बाहेर अजून तस अंधार व्हताच. पांनदीच्या दोन्ही अंगाला शेंड वाढलेली, त्यात वेली अडकलेल्या. चांदण टिपूर पडल हुत, आकाशात चांदण्या, त्यात पुरवला शुक्राची चांदणी, विरगळत व्हती. वरल्या आंगन गार वारा झोम्बत हुता. धुक्यात वाट हरवली व्हती. पाणंद सम्पली तस ओढ्याच्या पाण्याचा खळखळाट आवाज आला.

तस उगवतीला तांबडं फुटत हुत, नीरव शांतता हुती, दव दहीवरान वाट ओली झाल्याली मळकटलेली. माघ महिना सरत आल्याला. चिमण्यांची किलबिलाट चालू झाल्याली. हवेत एकप्रकारे येगळाच वास येत हुताच.

समदी जण शिरपाच्या शेतात पोहचली. शेतात खालच्या अंगाला खोप हुती तस कामाची आखणी झाली. चौघेजन दोन दोन वाकुऱ्या धरून सपासप जुंधळा कापाय लागली. पेट्टाला आठ आठ वाकुऱ्या, जुंधळयाची धाट कपित गडी म्होरच्या अंगाला सरत हुत.

सुरव्या हातभार वर आलेला तस सोनकीरणात धाट चकाकत हुतीच. जुंधळा कणसात गच्च बसलेला, टपोरी मोती चमकावेत तस चमकत हुता. एक एकर जुंधला कापून झाल्यावर, समदी घाम्याघुम झाल्याली. दिवस कासराभर वर सरकला, समदी जण आंब्याच्या झाडाखाली येऊन बसली. डोक्याची मुंडास सोडून घाम पुसू लागली. तस शिरपा उठला अन हिरीकड जाऊन, मातीच्या मंडक्यातून गार पाणी घेऊन आला. समदीजन गेळ्यातल पाणी मातीच्या मोग्यातून पिऊ लागली. तस गण्यानं बिडी शिलगावली, तेच पाहून इतरांनी चंची सोडली.

तंबाखुचा बार ओठात धरला 

” शिरपाला म्हणाली मळणी च कस करणार ” अस म्हणताच शिरपा – “हणम्याची बैल सांगून ठेवलीत की, ” अन तुम्हीबी हैसाच की. तस गण्या धूर सोडत म्हणाला हे लै बाकी झ्याक झालं बघ.

व्हय माझ्याकडन हे काय समद व्हतय्या व्हय, तुम्ही हैस म्हणून चाललंय. तस समदी जण उठली, उरलेला दुसऱ्या एकरातील जुंधळा सपासप कापून काढला असलं नसलं, तस शेवंता डोईवर दुपारची शिदोरी घेऊन आली.

समदी जण परत, आंब्याच्या झाडाखाली येऊन बसली. प्रत्येकांनी तोंडावरून पाणी फिरवलं, तस भुकेच डोंब कावळे वरडू लागल हुत. शेवंतांनी दोन दोन भाकऱ्यावर हिरव्या मिरच्यांचा खर्डा, एक कांदा, त्यावरच आंबड्याची भाजी ठेवून चौघांना वाटली.

समद्यांची जेवण झाल्यावर, नागलीची आंबील पण पेल्यातून दिली. सगळ्यांनी तृप्त मनाने ढेकर दिली, तस

समदी परत उठली अन कणसांच्या कापणीला लागली दोघ कणसं कपित हुत, तर दोघेजण कडबा बांधीत हुत. अस करता करता समद कणसांची खुडणी झाली. कडब्याच्या पेंढ्या रानंतच सुकण्यासाठी टाकून दिल्या. कणसं मात्र गोळा करून खोपित टाकली, तस खोप भरून गेली. त्यावर परत पेंढ्या टाकून, कणसं झाकण्यात आली. सांज होत आल्याली

समदी जण परत, घराकडे फिरली. गण्या म्हणाला रातच्याला कुणीतरी इथं झोपाय हुव ! नाहीतर चोर चिलटाची भीती हाईच ! तस शिरपा म्हणाला तू आणी मी परत येऊच की वस्तीला तस गण्या एका पायावर तयार झाला. चाललं की.

कारण बी तसच हुत गाण्याला माग पुढं कोण नव्हतंच एकटा जीव सदाशिव व्हता ! त्यानं लगीन च करून घेतलेलं नव्हतं ! ब्रह्मचारी बिचारा, त्याला पगार अन दोन वेळच जेवण मिळणार व्हतंच !

दुसऱ्या दिवशी हणम्या बैलजोडी सकट हजर झाला. त्यानं खळ्याची तयारी केली. गोल रिंगण तयार करून, त्यावर पाणी मारू लागला. पाणी सुकल्यावर, त्यावर पाचट टाकून बैल, गोल भल्या मोठ्या दगडी लाल गुंडाला (कुरण )जोडली. अन रिंगण मारू लागला, नंतर काही जुंधल्याची कणसं टाकून रोळगुंड फिरवला. तस तस गोल रिंगणाला रुपेरी झालर आली. तसच रिंगण जरा सुकविण्यासाठी रातभर सोडून दिलं. इकडे शेवंता पण रोज दुरडीतून भाकर भाजी आणून देऊ लागली.

समदीकडच अश्या मळण्या सुग्गी चालू झालेल्या हुतीच. तस बारा बलुतेदारी आपल्या वार्षिक बैत्यासाठी फिरू लागली. निंगअप्पा बेरड रामोश्यान तर शिरपाकडे मुक्कामच ठोकला. त्याची पण त्यात वाटणी हुतीच. त्यो वरीसभर शेताची देखरेख करत हुता. खुद्द बेरडाची नजर हुती ! त्यामुळं चोरा चिलटांची भीती नव्हतीच ! त्यात त्यो शिरपाचा दोस्त ! बाल मैतर.

बघता बघता मळणी झाली, वाऱ्यावर रास सुरू झाली. वाऱ्याने दान व धुस येगळी होत, मोत्याच स्वच्छ दाण 

रिंगणात पडू लागल. खाली बसलेल्या गण्यानं एक हातात बिडी अन एका हातात तुरीच्या खरट्यांन जुंधळ्यातील गोंड बाजूला केले. रास रिंगणात तयार झाली तस एकेक बलुतेदार आपआपला वाटा नेण्यासाठी येऊ लागले. सुतार, लोहार महार, कुंभार, अशी मांदियाळी येऊन गेल्यावर, मग गावच्या देवीचे पुजारी,

अस प्रत्येकाला त्यांच्या मानाप्रमाणे दोन चार सूप मोत्याचे दाणे दिले गेले. शेवटी किराणा दुकानाचा वाणी आला, वाण सामानाचा हिशोब करून त्यानं पण तब्बल दोन पोती दान नेलं !

उरल्याल दान त्यांनी रास करणाऱ्या गड्यांन दिल. तस त्याचा दोस्त निंगअप्पा बेरडास पण अर्धा पोत जुंधळ दिल तस, शिरपाचे अवसान गळून पडल ! त्यानं खळ्यातच बसकण मारली व धोतराचा सोगा डोळ्यांना लावला व ढसाढसा रडू लागला. मुंडास गळून पडलं !

खळ्यात फकस्त अर्धा पोत धान्य शिल्लक राहिले हुते ! त्याच्या म्होर पुढल एक वरीस कस ढकलायचा हा प्रश्न आ वासून उभा हुता. लक्ष्मी हाय म्हणून त्याने सगळं धान्य गोळा केलं अन घरचा रस्ता धरला ! 

घरी आल्यावर, शेवंतान तर रास बघून आवंढा गिळला ! धन्याला वाईट वाटू नये म्हणून म्हणाली ” लक्ष्मी घरी आली ” बेस झालं. हे बी दिस जातीलच की ! शेवंतान शिरपास अन निंगअप्पा बेरडास चहा करून दिला.

चहा त्यानं कसाबसा पिला ! अन दोघबी न बोलता न खतापिता झोपी गेले ! दोघांच्याबी मनात एकच प्रश्न आयुष्य कस काढायचं ! हे वरीस कस घालवायच ! 

गडबडीत त्यानं दारला कडी पण लावली नव्हती ! राती बाराच्या म्होर निंगअप्पा हळूच शिरपाचा घरी आला. बघतो तर काय दरवाजा अर्धवट उघडा हुता ! त्यानं हळूच दरवाजा उघडला. अन आंगणात असलेल्या, उंच धुणे बडवायच्या कट्ट्यावर, त्यांनी आणलेल् जुंधळ्याच आख्क एक पोत अब्दार ठेवून दिल !

अन गुपचूप आपल्या घरी निघून गेला ! 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments