डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ ससा आणि कासव — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(कोकणच्या खेडेगावच्या सुरवंटाचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू झालं.. संजूची नोकरी सुरू झाली. पहिला पगार होताच तिने काका मावशी आणि कुमारला हॉल मध्ये बोलावलं..) – इथून पुढे —-
मावशीला सुंदर सोन्याचं कानातलं, काकांना छान शर्ट पॅन्टचं कापड आणि कुमारदादाला छान टी शर्ट. तिने मावशीच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाली, ” काका, मावशी तुमचे उपकार या जन्मी फिटणार नाहीत हो.. मावशी, तू मला आणली नसतीस ना तर मी अशीच त्या खेड्यात राहिले असते ग. मला काहीही भविष्य नव्हतं तिकडे. ”
संजू रडायला लागली.. मावशीलाही गहिवरून आलं. ”संजू, तुझेही खूप कष्ट आहेत बेटा या सगळ्या मागे.. छान झालं हो सगळं.. यश दिलंस आम्हाला.. अशीच मोठी हो बाळा”
सुबोध त्या वेळी बोटीवर गेला आणि चार महिन्यांनी पुन्हा काकूंकडे आला. संजूच्या गालावर गुलाब फुलले त्याला बघून..
त्या दिवशी घरी कोणी नसताना सुबोध म्हणाला, ” मला फार आवडतेस तू संजू. पण कसं विचारू? मी जवळजवळ दहा वर्षांनी मोठा आहे तुझ्यापेक्षा.. तुला तुझ्या वयाच्या योग्य मुलगा नक्की मिळेल “
संजू म्हणाली ” सुबोध, विचारून तर बघा ना एकदा. ” “ संजू, लग्न करशील माझ्याशी? आवडतो का मी तुला?”
संजूने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ” तुम्हाला मी आवडत असेन तर मला आवडेल तुमच्याशी लग्न करायला. ते वयातलं अंतर मला नका सांगू.. मला आवडता तुम्ही.. ” सुबोध हसला आणि तिला म्हणाला “ सुबोध म्हण.. अहो जाहो नको.. ”
संध्याकाळी काका काकू आल्यावर सुबोध म्हणाला, ” काका मला संजू आवडते. मी लग्न करणार आहे तिच्याशी. तिलाही हे पसंत आहे”.
काकू म्हणाली “ अरे बाबा, ती किती लहान आहे तुझ्यापेक्षा.. संजू, अग उषा काय म्हणेल मला? “
मावशी, आत्तापर्यंत माझं सगळं भलंच झालं ग तुझ्यामुळे.. मी तुझ्यावर कोणताही ठपका येऊ देणार नाही.. मी सुबोधशी लग्न करणार.. ”
.. अगदी घरगुती पध्दतीने सुबोध संजूचं लग्न झालं. तिचे आईबाबा भावंडं सगळे आले आणि लग्न झाल्यावर परत गेले. जाताना उषाने संजूला पोटाशी धरलं.
“मला माफ कर हं संजू. पण या प्रपंचाच्या रगाड्यात तुझी होरपळच झाली ग बाळा. ललिता, , किती आभार मानू ग तुझे? माझ्या एका लेकीचं आयुष्य सोन्याचं केलंस ग” डोळे पुसून उषा गावी निघून गेली.
सुबोध आणि संजू लग्नानंतर फिरायला म्हणून बँकॉकला जाणार होते..
आयुष्यात प्रथमच संजू विमानात बसणार होती. एअरपोर्ट वर बसलेली असताना तिच्या मनात आलं, देवाने किती दारं उघडली आपल्याला. “ किती रे बाबा तुझे आभार मानू मी?”
संजू आणि सुबोध त्यानंतर अनेक वेळा परदेशात जाऊन आले. हौशी सुबोधने संजूला सगळं जग दाखवून आणलं.
…….
दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या. सुबोध संजूला दोन मुलगे झाले आणि सुबोधने मुंबईतच काकू जवळच छानसा फ्लॅट घेतला. जमेल तशी, सुट्टी असेल तेव्हा, संजू मुलांना घेऊन बोटीवर जाऊन येई. सुबोधने किती सुखात ठेवले होते संजूला. काही वेळा तर संजूला आपल्याच भाग्याचा हेवा वाटे. काय मागच्या जन्मी पुण्य केलं म्हणून मावशी काका आणि सुबोध सारखी देव माणसं आपल्या आयुष्यात आली याचं आश्चर्य वाटे तिला. जवळच असणाऱ्या ललिता मावशीवर अत्यंत प्रेम होतं संजूचं. मावशीचे उपकार ती कधीही विसरली नाही.
एक गोष्ट मात्र तिला दुःख देऊन जाई. तिने कितीतरी वेळा म्हटलं तरीही तिच्या बहिणी कधीही मुंबईला यायला, तिच्याकडे रहायला पुढे शिकायला तयार झाल्या नाहीत. तिने विनवण्या केल्या तरी त्या कोणीही कोकण सोडून तिकडे यायला, पुढे शिकायला तयारच झाल्या नाहीत..
ललिता तिची समजूत घालायची आणि म्हणायची, “जाऊ दे संजू. अग सगळे नसतात तुझ्यासारखे कष्टाळू, जिद्दी. तू फार वेगळी आहेस. नाही त्यांना यायचे तर नको जास्त आग्रह करू. त्यांना आपलं हितच जर समजत नाहीये तर तू काय करणार? मग अशाच त्या तिकडेच सामान्य आयुष्य ढकलत बसतील. तू हुशार म्हणून आलीस हो माझ्याबरोबर”. मावशी म्हणायची.
त्यादिवशी सुबोध मलेशियाहून येणार होता. संजू त्याला न्यायला म्हणून गाडी घेऊन एअरपोर्टवर गेली होती. त्याची फ्लाईट यायला अजून अवकाश होता म्हणून संजू बाहेरच कट्ट्यावर बसली होती.
सहज लक्ष गेलं तर तिला ओळखीचा चेहरा दिसला. जवळ जाऊन संजूने विचारलं ” माफ करा पण तुम्ही पूर्वीच्या कुमुद करकरे का?”
ती बाई म्हणाली “ हो.. पण तुम्ही कोण? सॉरी मी नाही ओळखलं तुम्हाला. “
संजू हसली आणि म्हणाली, ”आठवते का शाळेतली संजीवनी पाध्ये? तीच उभी आहे बरं समोर. ”
कुमुद उठून उभीच राहिली. “ अग काय सांगतेस? किती सुंदर आणि मस्त दिसतेस तू संजू. केवढा ग बदल हा. ”कुमुदने तिला प्रेमाने मिठीच मारली.
“संजू, इतकी सुंदर आणि कॉन्फिडन्ट दिसायला लागलीस ग. सांग बघू सगळी हकीकत तुझी. ” संजूने सगळं सांगितलं. म्हणाली, “ किती ग मला इन्फीरिऑरिटी कॉम्प्लेक्स होता तेव्हा. सगळे फासे उलटे पडले होते ग माझ्या आयुष्यात. पण मावशी आली देवासारखी. मला तिने मुंबईला नेलं आणि माझं आयुष्यच बदलून गेलं कुमुद. शाळेत मठ्ठ, , डोक्यात काही न शिरणारी संजू मायक्रोबायॉलॉजिस्ट झाली. आज ती एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगली नोकरी करते. “ कुमुदला फार आनंद झाला संजूला बघून.
“माझं जाऊ दे कुमुद. तू तर केवढी हुशार, स्टार स्टुडन्ट होतीस शाळेची. मग तुझ्या ध्येयाप्रमाणे झालीस ना डॉक्टर? कुठे असतेस?”
कुमुदने सुस्कारा सोडला. ”छे ग संजू. कुठली आलीय डॉक्टर? नशीबच वाईट ग माझं. माझे वडील नेमके मी बारावीला असतानाच अचानकच गेले. भाऊबंदकीत सगळं होत्याचं नव्हतं झालं.
मग मला मार्क्स पण कमी पडले आणि मी नाईलाजाने बीएस्सीला ऍडमिशन घेतली. नंतरही मी बीएड केलं. माझा सगळा इंटरेस्टच गेला ग शिक्षणातला. आता मी शाळेत मुख्याध्यापक आहे. पण माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. काही का कारणे असेनात पण ते झालं नाही हे खरं संजू. “ कुमुदच्या डोळ्यात पाणी आलं. ” अर्थात मी या नोकरीतही सुखी आहे ग पण मला लायकीपेक्षा सगळं मग कमीच मिळत गेलं. असो. आता त्याची मला खंत नाही ग. आत्ता मी एअरपोर्टवर माझ्या भावाला आणायला आलीय. तो येतोय अमेरिकेहून. कधीकधी वाटतं मला, माझी बुद्धी हुशारी वाया गेली. मी होऊ शकले असते कोणीतरी मोठी. आणि गेलेही असते परदेशात. पण हे घडायचं नव्हतं.
पण संजू, तुझं मात्र मनापासून अभिनंदन करते हं मी. शाळेत वाईट वागलो ग आम्ही तुझ्याशी. पण लहानच होतो ग आपण तेव्हा. कुठे ती गबाळी, सदा दबलेली हडकुळी बिचारीशी संजीवनी आणि कुठे माझ्या समोर उभी असलेली ही आत्मनिर्भर सुंदर स्त्री. संजू, आपल्याला शाळेत शिकवलेली गोष्ट आठवते मला.. ससा आणि कासवाच्या शर्यतीची… आमचे ससे तेव्हा भरधाव धावायचे. तुझं बिचारं गरीब कासव आपलं हळूहळू रखडत यायचं मागून. बिचारसं, गरीब केविलवाणे..
ससे आपल्याच नादात गर्वात धावत असायचे. जेत्याच्या आवेशात. पण मग काळ बदलला आणि शहाण्या कासवाने आयुष्याचे निर्णय मात्र योग्य घेतले आणि ही महत्त्वाची आयुष्याची शर्यत सगळ्या सशांना मागे टाकून जिंकली. शाबास ग सखे. ”
पुन्हा संजूच्या पाठीवर थोपटून कुमुद निघून गेली.
तिला तिचा पत्ता फोनही न विचारता आणि आपलाही न देता.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈