प्रा. विजय काकडे
जीवनरंग
☆ झुणका भाकरी… ☆ प्रा. विजय काकडे ☆
लोणंद येथील मुक्काम संपवून माउलींची पालखी गोल रिंगणासाठी क्षणभर चांदोबाच्या लिंबाखाली विसावली होती.
संध्याकाळचा मुक्काम अर्थातच तरडगाव येथे होता. आमचे गाव तरडगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर होते त्यामुळे माउली जणू आपल्या भेटीला येताहेत अशीच लगबग गावभर चालली होती. पालखीला जायचं म्हणून बायाबापडे, पोरे, पोक्त सगळेच हरखले होते. प्रत्येकासाठी वर्षाकाठी अनुभवायला मिळणारा तो एक अप्रतिम आनंदाचा सोहळा होता.
बायाबापडी माउलींच्या दर्शनासाठी आसुसलेली होती. पोलीस संरक्षणात तुफान गर्दित रांगेतून दर्शन घेणे ही एक वेगळी अनुभूती असायची.
पोरे जत्रेत मजा करायला म्हणून जायची. तंबूतला सिनेमा, छोटी सर्कस, मौत का कुआ, पाळणे, गोंदण, मिठाईची दुकाने हे सगळं तिथं असायचं. एवढंच नव्हे तर पोरींसाठी कर्णफुले, बांगड्या या वस्तू सुद्धा असायच्या. तिथले सगळे वातावरण भजन कीर्तनाने भारलेले असायचे. वारकऱ्यांची तुंबळ गर्दी असायची.
त्यादिवशी आई कामाला न जाता घरीच होती. पालखीला जाणार म्हणून ती घरी होती हे तर उघडच होते. पण त्यादिवशी तिचे काहीतरी वेगळेच चालले होते….
.. घरात तिने स्वयंपाकाचा बराच राडा घातलेला दिसला. आमची सकाळची जेवणे तर आधीच झाली होती. संध्याकाळी तर पालखीला जायचे होते. तिथे भंडाऱ्यात सगळेच खीर खातात. तर मग हा स्वयंपाक ती का ? कशासाठी? आणि कोणासाठी बनवत होती? असा प्रश्न माझ्या बाल मनाला पडला होता.
कोणी पाहुणे तर येणार नाहीत ना ? तर मग झाला सगळ्या पालखीचा बट्ट्याबोळ ! आजच या पाहुण्यांना घरी टपकायला काय झाले? मी मनाशीच पुटपुटत होतो. आपल्याला पालखीला जायला मिळणार नाही म्हणून मी थोडा उदास झालो होतो.
आई तव्यावर गरमागरम भाकरी टाकत होती, त्याचा खरपूस सुगंध घरभर दरवळत होता. टोपल्यात एकावर एक भाकरी पडत होत्या. बघताबघता टोपले भाकरींनी भरले होते…. टोपल्याच्यावर शीग लागत होती.
” आज भावकीत काही कार्यक्रम तर नाही ना? ” माझ्या मनाला पुन्हा आणखी एक प्रश्न पडला होता. कारण घरात आईवडील, चुलते, आजी आम्ही पाच भावंडे इतके सगळे असले तरी आमच्या घरातले भाकरीचे टोपले कधी इतके गच्च भरल्याचे मला तरी आठवत नव्हते…
भावकीत एखादा कार्यक्रम असला की मग प्रत्येकाच्या घरी पायली पायली पीठ दिलं जायचं… तेव्हा मात्र आमच्या घरातलं ते टोपलं शीग लागलेलं दिसायचं… !
बाजूच्या चुलीवर मोठ्या पातेल्यात झुणका रठरठ करत होता… ( पिठलं, झुणका, बेसन या सगळ्या संज्ञा आम्ही एकाच पदार्थासाठी तोंडात पटकन येईल तसे वापरतो ) आता तर घरी पाहुणे येणार याची मला पक्की खात्रीच वाटत होती. त्याशिवाय का आई इतका मन लावून स्वयंपाक करत असेल?
माझा पार मुड गेला होता…. कारण भाऊ आणि मोठ्या बहिणी, आई, शिवाही त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत पालखीला जाऊ शकत होते. कारण ते वयाने मोठे होते पण आमचं काय ? आम्हा लहान मुलांना कोण नेणार तिकडे? आई सोबत असेल तरच आम्हाला जायला मिळणार होतं… !
शेवटी न राहून मग मी आईच्या जवळ जाऊन घुटमळलो आणि दम खाऊन तिला विचारलेच,
” आई, मला पालखीला जायचं.. “
” व्हय जाऊ की ”
” तू खोटं बोलतेयं.. ”
” खरंच जायचंय बाळा… ”
आईने उजव्या हातातली भाकरी तव्यात टाकत उत्तर दिले.
” आपल्याकडं कोण येणार हाय ? ”
” कोण न्हाय, का? ” शेजारच्या चुलीवरच्या पातेल्यातलं पिठलं हालवत आई म्हणाली. आता तर भाकरीच्या सुगंधाची जागा खमंग पिठल्याने घेतली होती. त्या वासाने माझ्या तोंडाला चांगलेच पाणी सुटले होते… पण आधी पालखीचा प्रश्न सोडवणे महत्वाचे असल्याने मी स्वत:च्या भुकेवर नाईलाजानेच संयम ठेवला होता.
” मग तू एवढा सयपाक कुणासाठी करतीय? ”
” आरं आज पालखी हाय, देव भुक्यालं आसत्याल… ”
” देव? देवाला तर निवद लागतो ”
” आरं येड्या, देव म्हणजी वारकरी…. ”
” मग त्यानला आपून का जेवायला दयाचं ? ”
” ते घरदार सोडून पांडूरंगाच्या दर्शनाला पंढरीला जात्यात ना? म्हणून… ”
” मग आपूणच का दयाचं त्यानला जेवण ? ” पुन्हा माझा बालिश प्रश्न.
” आरं, आपुनच न्हाय सगळीच देत्यात माझ्या राजा… ”
” मग एवढ्या सगळ्या भाकरी खाऊन त्याचं पोट भरल की ?”
” वारकरी लय असत्यात… ” खळखळा हसत आई म्हणाली.
” किती ? ”
” लय असत्यात हजार, धा हजार… त्या पेक्षाबी जास्त… ”
असं म्हणत आईने शेवटची भाकरी टोपल्यात टाकली व पिठल्याच्या पातेल्यावर झाकण ठेवलं.
” आई, मला भूक लागलीय… ”
” का पोटात काळा केर न्हाय का? मघाशी खादाडलंस नव्हं? ”
पीठाच्या डब्याच्या झाकणात ठेवलेली अर्धी भाकरी आणि त्यावरचा मिरचीचा ठेचा माझ्या पुढे सरकावत ती म्हणाली, ” खा लवकर आपल्याला जायचयं पालकीला. ”
” हे नगं, ते गरम गरम दे की… ” दिलेलं ताट तिच्याकडं भिरकावत जिभल्या चाटत मी म्हटलं…
” ते वारकऱ्याचं हाय… ते न्हाय मिळायचं… ”
” मंग त्याला काय व्हतयं…. वाइच तरी दे की… ”
” न्हाय म्हणलं ना? गप खायाचं तर खा…. नाह्यतर आन हिकडं, उशीर झालाय मला आधीच, बाया निघाल्या असत्याल.. ”
मला भूक तर लागली होती पण जे खायला पाहिजे ते आई देत नव्हती. झुणका भाकरी म्हणजे फार अपृप नव्हते, पण त्यादिवशी माझ्यासाठी ते पक्वान होते. परंतु आई काही केल्या ते मला देत नव्हती… मोठ्या भक्तीभावाने तिने ते वारकऱ्यांसाठी चालवले होते… शेवटी माझा हिरमोड झाला ! जो होणारच होता… ती शिळी भाकरी घशाखाली उतरत नव्हती तरी सुद्धा ती खाऊनच अखेर मला माझे पोट भरावे लागले…. !
नटूनथटून सगळे पालखीला निघाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह त्यावेळी दिसत होता. जत्रेत जायला मिळणार म्हणून आम्ही धावतधावत रस्ता जवळ करत होतो. तर आई व तिच्या सोबतच्या काही महिला आपल्या डोईवर भाकरीचे गाठोडे घेऊन घाईघाईने रस्ता चालत होत्या. सगळ्यांच्या सोबत आनंदाच्या भरात दोन तीन मैलांचे ते अंतर कधी पार झाले तेच कळाले नाही.
तरडगावचा ओढा ओलांडून पुढे पालखीच्या तळाकडे आम्ही निघालो त्यावेळी सगळीकडे वारकरीच वारकरी दिसत होते… ! टाळ, मृदंगाच्या वातावरणात सगळे आसमंत न्हाऊन निघाले होते. सगळे वातावरण भक्तिमय झाले होते.
पण आमचे लक्ष मात्र खाऊची दुकाने, पाळणे याकडेच लागले होते. त्यामुळे आम्ही पुढे पुढे धावायला बघत होतो.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेवणावळी चालल्या होत्या. मोठ मोठ्या दिंड्या ट्रक मधून स्वत:चे सामन आणून स्वत:च जेवण बनवत होत्या. गावातले सामाजिक कार्यकर्ते इतर वारकऱ्यांना मोफत जेवण वाटत होते.
जिलेबी, मसालेभात, बुंदी असे पदार्थ सगळी पत्रावळ्यांवर दिसत होते. आम्हालाही पळत जाऊन खायची घाई झाली होती परंतु आई आम्हाला हलू देत नव्हती. आधी पालखीचे दर्शन, मग वारकऱ्यांना जेवण आणि मग आपण खायचं असा तिने नियम घालून दिला होता.
दर्शनासाठी आम्ही पालखी तळावर पोहोचलो त्यावेळी तिथले दृश्य अद्भुत होते… !
… ” वैष्णवांचा मेळा वाळवंटी भरला होता… ”
पोलिस सगळ्यांना रांगेत उभे करत होते. काही ठिकाणी तर अक्षरश: चेंगराचेंगरी चालली होती… ! ते पाहून आम्ही चांगलेच भेदरलो होतो. इकडेतिकडे जाऊ नये म्हणून आई माझ्या हाताला घट्ट पकडत होती.
कसेबसे दर्शन घेऊन आम्ही तंबूच्या बाहेर आलो. आता वारकऱ्यांना जेवण देण्याचा मुख्य कार्यक्रम होता.
वारीतले स्वच्छ कपड्यामधले वारकरी, सगळीकडे पक्वानांची चाललेली रेलचेल पाहून आई व तिच्या सोबतच्या बायकांनी आणलेले जेवण खरेच कोणी खाईल का? असा प्रश्न मला पडला होता… कारण आई आणि तिच्या मैत्रिणींच्या अंगावर गोट घातलेली लुगडी होती. त्यांचा अवतार निटनेटका असला तरी तिथल्या वातावरणाला नक्कीच शोभणारा दिसत नव्हता… ! त्यांचे दारिद्र्य त्यांच्या अंगावर स्पष्ट दिसत होते…. ते काही केल्या लपत नव्हते.. ! त्यामुळे तिथे गेल्यावर त्या सगळ्याजणी गांगरलेल्या दिसल्या… त्यांचे अवघडलेपण चटकन लक्षात येत होते.
आता काय होईल? कसे होईल? माझ्या आईच्या डोईवरची झुणका भाकरीची गाठोडी खाली ठेवल्यावर खरंच कोणी वारकरी ते खायला मागेल का? नाही मागितले तर त्या बापड्यांची अवस्था काय होईल ? दिवसभर राबून आपल्या लेकरांच्या तोंडचा घास काढून मोठ्या भक्तीभावाने त्या वारकऱ्यांसाठी घेऊन आल्या होत्या ! आणि आता कोणी त्यांचे अन्न खाल्ले नाहीतर त्यांच्या भावनेचे काय होईल? ही धास्ती मला वाटत होती…
रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकरी होते. जेवणासह इतर उपयोगी वस्तू दान करणारे अनेक श्रीमंत लोक दोन्ही हातांनी वारकऱ्यांना भरभरून देत होते… वारकऱ्यांची तिकडे वस्तू घेण्यासाठी नुसती झुंबड उसळली होती…. !
अशात आई व तिच्या मैत्रिणींनी रस्त्याच्या कडेला बसून आपल्या हातातले भाकरींचे गाठोडे सोडले…. ! आणि कुणी वारकरी मागायला यायची त्या वाट पाहू लागल्या… त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा पहायला नको म्हणून मी तर माझे डोळे मिटून घेतले होते…. कोणी नाहीच तिकडे फिरकले तर काय करायचे? आणि फिरकणारच नाही असे मला राहून राहून वाटत होते.
परंतु घडले ते वेगळेच … झुणका भाकरीचे ते जेवण दिसताच पक्वान हातातले टाकून सगळे वारकरी आमच्या दिशेने धावत होते… ! आई आणि तिच्या मैत्रिणी अर्धीभाकरी मोडून त्यावर पातेल्यातला झुणका वारकऱ्यांच्या हातावर ठेवत होत्या आणि वारकरी ते आनंदाने घेऊन जात होते. माझ्या माय माउलींचा उर आनंदाने भरुन येत होता. काही वेळातच आईसह त्या सगळ्यांची भांडी रिकामी झाली होती.
माझ्या माय माउलींच्या हातचे ते भोजन वारकऱ्यांना पंचपक्वानापेक्षा प्रिय वाटले होते का? ही काय जादू झाली होती ते मला कळत नव्हते आणि कळण्याचे ते वयही नव्हते.
रिकामी झालेली भाकरीची फडकी व भांडी हातात घेऊनच माउलींच्या पालखीच्या दिशेने हात जोडून आई बराच वेळ उभी होती…….
… ती माउलीला काय सांगत होती की त्यांचे आभार मानत होती ते आम्हाला काही कळलं नाही. पण त्यानंतर दरवर्षी ती पालखीला न चुकता झुणका भाकर डोईवर घेऊन जात होती.. !
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈