श्री अरविंद लिमये
☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 1☆ श्री अरविंद लिमये ☆
रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघाली. नेहमीसारखं रिझर्वेशन वगैरे करायला उसंतच नव्हती.
“जपून जा. काळजी घे.उगीच त्रागा करू नको. मन शांत ठेव. सगळं ठीक होईल” निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार आठवून सविताला आत्ताही भरुन आलं. सविता आज पुणे-मिरज बसमधे चढली ती ही अस्वस्थता सोबत घेऊनच.समक्ष जाऊन आण्णाना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती. आण्णा म्हणजे तिथे वडील. तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बर्यापैकी समृद्ध खेड्यातलं. मिरजस्टँडला उतरून सिटी बसने पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागे.एरवी ती माहेरी जायची ते कांही फक्त आई आणि आण्णांच्या ओढीनेच नव्हतं. तिच्या एकुलत्या एका भावाच्या संसारात तिलाही मानाचं स्थान होतंच की.पण आजची गोष्ट वेगळी होती.ती निघाली होती ते तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच.सारंगचाही या तिच्या निर्णयाला विरोध नव्हता.
एखाद्या माणसाच्या जाण्यानं,नसण्यानं, त्याच्या असतानाचे संदर्भ इतक्या चटकन् बदलू शकतात?तिला प्रश्न पडला. आई अचानक गेली तेव्हापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती. आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती. आण्णांच्याबद्दल तर सविता थोडी जास्तच हळवी होती. त्याला कारणही तसंच होतं. आण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते.आर्थिक परिस्थिती बेतासबात असूनही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच केला नव्हता.म्हणून तर सवितासारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनिअर होऊ शकली होती आणि पुण्यात एका आयटी कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होती.अण्णा गावातल्याच एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.घरी पैशाचा ओघ जेमतेमच असे.तरी स्वतः काटकसरीत राहून आईआण्णांनी सविता आणि तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं. आण्णांच्या संस्कारांचा फायदा त्यांच्या सुनेलाही मिळाला होताच. सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनिअर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून तिथे गावातच त्यांने गॅरेज सुरू केले होते. तो कष्टाळू होता आणि महत्त्वाकांक्षीही.त्यामुळेच त्याच्या लग्नाचं पहायला सुरुवात केली तेव्हा त्याला खूप चांगल्या मुली सांगून आल्या होत्या.पण त्या खेड्यात राहायची त्यांची तयारी नसायची.मग गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्याने पसंत केली.ती लग्नाआधी बीएससी झाली होती. हुशार होती. आण्णानीच तिला बी.एड् करायला प्रवृत्त केलं. लगेच मिरजेच्या एका शाळेत जॉबही मिळाला.असं सगळं कसं छान, सुरळीत होतं. परवापरवापर्यंत तरी तसं वाटलं होतं,पण आई अचानक गेली …आणि ..?
वहिनीला नवीन नोकरी लागली होती तेव्हा मिरजेला रोज जाऊन येऊन करता करताच ती मेटाकुटीला येई. पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती.ती होती तोपर्यंत घरात कसले प्रश्नच नव्हते जसे कांही. तेव्हा घरात भांड्याला भांडं लागलं असेलही कदाचित पण त्यांचे आवाज सवितापर्यंत कधीच पोचले नव्हते.
आई गेली.तिचं दिवसकार्य सगळं आवरलं तेव्हाच बदल म्हणून सविता-सारंगने आण्णाना थोडे दिवस बदल म्हणून पुण्याला चला असा आग्रह केला होता. पण ते पुन्हा पुढे बघू म्हणाले न् ते तसंच राहीलं.
आई गेल्यानंतर पुढे दोनतीन महिन्यांनीच दिवाळी होती.चार दिवस आधी फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला म्हणून आपल्याला सगळं समजलं तरी असंच तिला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते हेच सगळं सांगत. तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिकडे पोहोचला तेव्हा आण्णा अंगण झाडून झाल्यावर व्हरांड्यातला केर काढू लागले होते.सारंगला अचानक समोर पाहून ते थोडे कावरेबावरे झाल्यासारखे वाटले. थोडे थकल्यासारखेही.पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यांनी सारंगचं स्वागत केलं होतं. हे ऐकलं तेव्हा सविताला धक्काच बसला .आण्णा आणि घरकाम? शक्य तरी आहे का हे?
निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे.त्यांना वाचनाची आवड होती. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नव्हता. असं असताना ते न आवडणारी,न येणारी कामं या वयात आपण होऊन करणं शक्य तरी आहे का? हे सगळं वहिनीचंच कारस्थान असणार हे उघड होतं.तिचं जाऊ दे पण दादा? त्याला कळायला नको?सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती ते यासाठीच. आण्णांशीच नव्हे,दादावहिनीशीही या विषयावर बोलायचं आणि तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे तिने ठरवूनच टाकलं होतं. मिरजेला उतरताच सिटी बसस्टाॅपवर ती येऊन थांबली आणि तिला अचानक आण्णाच समोरून येताना दिसले.हातात दोन जड पिशव्या घेऊन ते पायी चालत बस स्टॉपकडेच येत होते. त्याना त्याअवस्थेत पाहून सविताला भरूनच आलं एकदम. ती कासावीस झाली.तशीच पुढे झेपावली.
“आण्णा त्या पिशव्या द्या इकडे.मी घेते.” पाच पाच किलो साखरेच्या त्या दोन जड पिशव्या होत्या.सविताच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली.
“सावू…तू..तू इथे कशी?”कपाळावरचा घाम रुमालाने टिपत त्यांनी विचारले. त्यांच्या थकून गेलेल्या चेहऱ्यावरही आनंद पसरला एकदम.
“मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”
“पण असं अचानक?”
“हो.भेटावं असं तिव्रतेने वाटलं.आले.कसे आहात तुम्ही?”
“कसा वाटतोय?”
“खरं सांगू?खूप थकल्यासारखे वाटताय.” तिचा आवाज भरून आला. तेवढ्यात समोरून बस येताना दिसली. मग सविता काही बोललीच नाही. बसमध्ये सगळेच गावचे. ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणं तिला प्रशस्त वाटेना.बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.
“आण्णा, आपण लगेच घरी नको जायला..”
“का गं?”
“वाटेत शाळेजवळच्या देवळात थोडावेळ बसू.मग घरी जाऊ. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.”
“अगं बोल ना. घरी जाता जाता बोल. घरी गेल्यानंतर निवांत बोल.”
“नाही…नको”
“लांबचा प्रवास करून आलीयस. ऐक माझं. आधी घरी चल. हात पाय धू. विश्रांती घे. मग बोल. घाई काय आहे एवढी?”
सविताला पुढे कांही बोलताच येईना.
तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं.
“सवितताई, हे काय? असं अचानक?” बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे झाली आणि बॅगेऐवजी सविताच्या हातातल्या त्या दोन जड पिशव्या पाहून चपापली. तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि आण्णांकडे पहातानाची तिच्या नजरेतली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नाही. सविताने त्या दोन जड पिशव्या तिच्या पुढे केल्या. मग मात्र वहिनीने त्या हसतमुखाने घेतल्या.
“आधी कळवलं असतंत तर मोटारसायकल घेऊन हे आले असते ना हो मिरजस्टॅंडवर तुम्हाला घ्यायला” तिच्या बोलण्यात सहजपणा होता पण सविताला तो सहजपणे स्वीकारता येईना.
“मुद्दामच नाही कळवलं. अचानक रजा मिळाली.आले. आण्णांना भेटावसं वाटलं म्हणून रजा घेतलीय”वहिनीकडे रोखून पहात ती म्हणाली .चहापाणी आवरलं तसं ती उठली.
“वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते.”
“बरं या”.
“चला आण्णा..”
“आण्णा..? ते कशाला..?” वहिनी आश्चर्याने म्हणाली.
“का? त्यांना का नाही न्यायचं?” सविताने चिडून विचारलं. तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखीच होता. ती चपापली. कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली.
“तसं नाही सविताताई..”
“मग कसं?” आता गप्प बसायचं नाही हे सविताने ठरवूनच टाकलं होतं.पण वहिनी वरमली.
“तुम्ही जा त्याना घेऊन, पण अंधार व्हायच्या आत परत या ”
सविता रागाने तिच्याकडे पहात राहिली. फट् म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता.
क्रमश:….
© श्री अरविंद लिमये
सांगली
मो ९८२३७३८२८८
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈