सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ सायसाखर… भाग-१ – लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
पडवीतून गोठ्यात उघडणारं दार, आईनं रात्री उघडलं, तेंव्हाच लक्षात आलं, आज काहीतरी वेगळं घडणार आहे.
एरव्ही ते दार कायम बंद असायचं. दरवेळी मुख्य दरवाज्यातून बाहेर पडून, अंगणातून गोठ्यात जावं लागायचं.
पण आज वेगळीच घाई सुरू होती.
बाहेर काळ्याकुट्ट रात्रीबरोबर गोठवून टाकणारी थंडी वाढत होती. आणि आम्ही ओटीवरच्या माच्यावर बसून सगळी घाई बघत होतो. मध्येच मदतीच्या नावाखाली थोडी लुडबूड केली पण अण्णांनी उबदार शालीत गुंडाळून माच्यावर बसवून ठेवल्यानं नाईलाज झाला होता. आम्हाला तिथं बसवून, अण्णा न्हाणीघरातील मोठ्या पाणचुलीत लाकडं पेटवायला गेले होते. आईनं त्यांना मोठ्या हंड्यात पाणी तापवायला सांगितलं होतं.
भिंतीवरच्या खुंटीवर अडकवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात आईची लगबग दिसत होती.
पडवीत आईनं पेंढा अंथरला होता आणि पडवीतल्या रेज्याला पेंढ्याची एक पेंडी बांधून ठेवली होती.
गोठ्यात गेलेली आई, कपिला गायीला घेऊन आली आणि तिचं दावं, खांबाला बांधलं.
कपिला गाय आमची लाडकी होती. पण आज ती वेगळीच दिसत होती. पोट खूप फुगलं होतं. ती चमत्कारिक चालत होती. खूप दमल्यामुळं मलूल व्हावं, तशी ती मलूल झाली होती. आणि तिच्या डोळ्यातून पाणी वहात होतं. खांबाला बांधल्यानंतरसुद्धा ती सतत इकडे तिकडे फिरायचा प्रयत्न करीत होती. मध्येच हंबरत होती. कसल्या तरी वेदना तिला होत होत्या.
आणि आई मात्र तिच्या अंगावरून मायेनं हात फिरवत होती. मध्येच पदरानं कपिलेचे वाहणारे डोळे पुसत होती.
आणि गंमत म्हणजे एरव्ही आम्हाला जवळ येऊ न देणारी कपिला आज आईला चिकटून उभी रहात होती. आईच्या अंगाला मान घासत होती. आणि आई तिला तेवढ्याच मायेनं जवळ घेत होती.
– आम्हाला झोप केव्हा लागली ते कळलंच नाही.
सकाळी गायीच्या हंबरण्यानं जाग आली आणि आम्ही ताडकन उठून पडवीत आलो.
आणि बघत राहिलो.
कपिलेजवळ हरणाचं पाडस उभं असावं असं एक गोड, गोंडस वासरू धडपडत उभं होतं. आणि कपिला त्याला जिभेनं चाटत होती. आई त्या वासराला कपिलेजवळ धरून बसली होती. आणि दुसऱ्या हातानं हळुवारपणे वासराला गोंजारत होती.
” तुमच्या आईनं केलं हो बाळंतपण कपिलेचं, अगदी हलक्या हातानं. “
अण्णा सांगत होते.
पण ते काय बोलत होते, त्याचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता.
सगळं लक्ष त्या वासराकडे होतं.
– आज इतक्या वर्षांनी आईचा मायाळू स्पर्श जाणवला.
एसटी बसमधून घरी येताना बाहेर सहज लक्ष गेलं.
रस्त्यात एक गाभण गाय कुणाची तरी वाट पहात असल्यासारखी दिसली. ती अस्वस्थ होऊन फिरत होती. आणि तिच्या तिच्या डोळ्यातून पाणी वहात होतं.
मग मला लहानपणीची कपिला गाय आणि तिच्या अंगावरून मायेनं हात फिरवणारी आई आठवली.
एसटी ने आता वेग पकडला होता आणि ती रस्त्यावरची गाय दृष्टीआड झाली होती.
पण माझ्या डोळ्यासमोर आई लख्ख उभी राहिली.
– न्हाणीघराची पडवी म्हणजे आईचं एकछत्री साम्राज्य होतं.
माजघरातून न्हाणीघरात जायला दार होतं, पण आईनं तिथून कधीच ये जा केली नाही. स्वयंपाकघरातून न्हाणीघरात जायला जे दार होतं, तिथून ती जात येत असायची.
उन्हाळ्यात रातांब्याची उस्तवार करण्यासाठी तिला न्हाणीघर बरं वाटायचं. रातांबे फोडायचे, सालं वाळत घालायची आणि बिया पिळून झाल्या की त्याचे मोठाले लाडू तयार करून ते अंगणात वाळत घालायचे आणि नंतर पावसाळ्यात रातांब्याच्या वाळलेल्या बिया कुटून त्याचं कोकमतेल बनवायचं.
हा तिच्या अनेक व्यापातला एक भाग होता.
एरव्ही आवळ्याची सुपारी, फणसाच्या गऱ्याची भाजी, सुपाऱ्या सोलून वाळत घालायच्या, शेतातून हळद, आलं आणून त्याची उस्तवार करायची, आंब्याच्या दिवसात बेगमीचं लोणचं, बेगमीची उसळी मिरची, उकडांबे हे सगळं करताना तिचा दिवस केव्हा सरायचा हे तिला कळत नसे. तिच्या हातच्या पदार्थांची चव अन्य कुणाच्या पदार्थांना येत नसे. अण्णांच्या शब्दात सांगायचं तर, ‘ती जीव ओतते सगळ्या गोष्टीत. ‘
एकदा अण्णांनी मला हळूच माजघराच्या दारात नेलं आणि लहानशा फटीतून बघायला सांगितलं.
मी बघू लागलो.
आई मोहरीचे उकडांबे घालत होती. प्रत्येक आंबा पुसून त्याला हळुवारपणे गोडेतेल लावून बरणीत ठेवत होती. आणि त्या आंब्यांशी गप्पा मारत होती.
” आता नीट आत रहा, चांगलं पुसून, तेल चोपडून ठेवलंय, एकमेकांना घासू नका, नाहीतर साल तुटेल. गुण्यागोविंदानं नांदा… “
असं बरंच काही बडबडत होती.
मला हसू आलं.
” कोण हसतंय मोठ्यांदा ? “
आई ओरडली खरी पण मग तीच हसू लागली. दार उघडलं.
” अरे, आंब्यांशी बोललं, हलक्या हातानं त्यांना हाताळलं, तर बरं वाटतं त्यांना. हसता काय सगळे ? त्यांच्याशी गप्पा मारताना वेळ पण जातो माझा. “
अण्णा कपाळावर हात मारून हसत बाहेर गेले.
मी आईच्या बोलण्यातलं तथ्य शोधत बसलो.
आईला हे सगळं करायला वेळ केव्हा मिळतो, हे कोडं कधीच उलगडलं नव्हतं. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ती कामात व्यस्त असायची.
चेहऱ्यावर कधी थकवा जाणवला नाही आणि कामाबद्दल तक्रार ऐकायला मिळाली नाही. कामात चुकारपणा पाहायला मिळाला नाही आणि काम नाही म्हणून स्वस्थपणा बघायला मिळाला नाही. प्रसंगपरत्वे जुनी गाणी गुणगुणत, स्तोत्रे म्हणत आणि सवड झाली की असेल, मिळेल, दिसेल ते पुस्तक वाचत बसलेली असायची. त्यातूनच तिचं जीवनविषयक तत्वज्ञान बनत गेलं होतं.
– क्रमशः भाग पहिला
लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈