सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ ४९८ – अ… – भाग – ३ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
श्री हेमन्त बावनकर
(आपण आपली नोटीस थोड्या वेळात घेऊन जा. आणि पुढल्या सोमवारी आपणही इथे या. त्यावेळी बोलू या. ” आता आमची उत्सुकता वाढली होती.) – इथून पुढे
‘‘मग सोमवारी काय झालं?”
सोमवारी आम्ही आधी पोचलो – नंतर थोड्या वेळाने सरिता आणि सीताराम आले. मला सरिता शांतशी, गप्प गप्प व बदललेली वाटली. तिने आमच्याकडे मान वर करून पाहिले देखील नाही. केंद्राच्या इनचार्ज मॅडमनी सरिताला विचारले, ‘तू तुझ्या घरी का जाऊ इच्छित नाहीस?’ सरिता तरीदेखील काही न बोलता खाली मान घालून उभी होती. मला रहावलं नाही. मी म्हणालो, ‘आमच्या प्रेमात कुठे कमतरता होती का?’ सरिता तरीही गप्प होती. आता तिचे डोळे पाण्याने भरले होते. केंद्रप्रमुख म्हणाल्या, ‘सरिता, काही तरी बोल. तू काहीच बोलली नाहीस, तर आम्ही निर्णय कसा घेणार?’ आता सीतारामजी मधेच म्हणाले, ‘बोल सरिता बोल!’ आता माझा माथा ठणकला. काही तरी अनिष्ट होईल असं वाटू लागलं. सरिताने एकदा आपल्या वडलांकडे पाहीलं आणि नजर पुन्हा जमिनीकडे वळवली. केंद्रप्रमुख समजदार होत्या. वास्तव काय असेल, याचा त्यांना अंदाज आला. आता त्यांनी आपल्या पध्दतीने चौकशीस सुरूवात केली. त्यांनी अतिशय प्रेमाने सरिताला विचारले आणि प्रत्येक वेळी सरिता होकारार्थी किंवा नकारार्थी मान हलवत राहिली. प्रमुखांनी प्रेमाने विचारलं, ‘तुला सासरी कुणी कधी रागावलं?’ तिने ‘नाही’ अशा अर्थाने मान हलवली. ‘तुझे पती, सासू, सासरे यांना तू आवडतेस ना?’ तिने होकारार्थी मान हलवली. आता सीताराम मधेच जरबेच्या सुरात म्हणाले, ‘बोल सरिता बोल…’
केंद्रप्रमुख त्यांना टोकत म्हणाल्या, ‘आपण मधे बोलू नका. जेव्हा आपल्याला विचारलं जाईल, तेव्हाच बोला. ’ सीताराम सरिताकडे टवकारून बघू लागले. प्रमुख म्हणाल्या, ‘हे बघ, सरिता, जोपर्यंत तू काही बोलत नाहीस, तोपर्यंत आम्ही तुझी काहीच मदत करू शकणार नाही. ’ मग त्यांनी मला विचारलं, ‘तुमची काय इच्छा आहे?’
मी म्हंटलं, ‘आमचं निवेदन आहे की सरिताने आपल्या घरी रहायला यावं. बाकी आम्हाला काही नको. ’
त्यांनी पुन्हा सरिताकडे बघत म्हंटलं, ‘तुझं यावर काय म्हणणं आहे?’ सरिता पुन्हा गप्प झाली. मग त्या म्हणाल्या, ‘सरिता तुला विचार करायला आणखी थोडा वेळ हवाय का?’ तिने काहीच उत्तर दिले नाही. प्रमुखांनी तिथल्या अन्य सदस्यांशी चर्चा केली आणि तिला सांगितलं, ‘ठीक आहे. तुला विचार करायला आणखी एक दिवस देते. उद्या याच वेळी इथे या.’
सीताराम लगेच उभे राहिले. त्यांनी हात जोडले आणि सरिताचा हात धरून बाहेर पडले. सरिताने एकदाही आमच्या नजरेला नजर मिळवली नाही. प्रमुख म्हणाल्या, ‘रामजी, सरितावर बहुतेक दडपण आणलं जातय. तुम्ही आम्हाला आधी भेटला नसतात, तर कदाचित या केसने भलतंच वळण घेतलं असतं. आपण पुन्हा उद्या या. ’
‘याचा अर्थ सीतारामजींची काही वेगळीच इच्छा होती. ’
‘आपलं अनुमान अगदी बरोबर आहे. त्या दिवशी मी भरत बरोबर जयाला तिच्या माहेरी पाठवलं. तिच्या वातावरणात जरा बदल होईल, असा विचार तेव्हा केला. दुस-या दिवशी केंद्रावर यायला त्यांना बजावून सांगितलं. नंतर घरी आलो. रात्रीचं जेवण केलं आणि झोपलो. एवढ्यात दारावरची बेल वाजली. ‘आत्ता यावेळी कोण आलंय!’ असा विचार करत मी उठलो. दारात इन्स्पेक्टर बन्सीलाल होता. कन्हैयालालचा मुलगा. मला वाटलं की कन्हैयानेच त्याला पाठवलंय. पण तो म्हणाला, ‘काका, सरिताने आपल्याविरुध्द हुंड्यासाठी छळ केला, म्हणून अर्ज दाखल केला आहे. आपल्या वडलांना घेऊन ती आली होती. ’
‘अरे, काय बोलतोयस काय?’
‘खरं तेच बोलतोय. मला आपल्याला, भरतला आणि जयाकाकींना ४९८ अ या कलमाखाली अटक करावी लागेल. ’
मी त्याला भरत आणि जया घरात नसल्याचं सांगितलं. आता माझी शुध्द बुध्द हरपली. मी गर्भगळित झालो. पण स्वत:ला सावरत त्याला म्हंटलं, ‘चल, मी तुझ्याबरोबर येतो. पण मला बेड्या तेवढ्या घालू नको. ’ एव्हाना ही बातमी सगळ्या गावभर झाली होती. ”
रामजींचा चेहरा रागाने लालीलाल झाला होता. ते पुढे म्हणाले, ‘‘काय आहे साहेब, वाईट बातम्या पसरायला वेळ लागत नाही. मी गुपचुप बन्सीलाल बरोबर पोलीस ठाण्यात गेलो. त्याने आश्वस्त केलं. म्हणाला, ‘काका, मला खरं काय ते माहीत आहे. पण माझा नाईलाज आहे. पण आपण काळजी करू नका. आपल्याला कुणीही हात लावणार नाही. ’
त्या दिवशी रात्रभर ठाण्यात राहिलो. आजसुध्दा तो विचार आला की माझ्या शरिरावरचे केस ताठ उभे राहतात. ”
‘‘मग काय झालं? आपण कसे सुटलात?’’
‘‘साहेब, दुस-या दिवशी हरीभाई वकिलांनी धावपळ केली. परिवार केंद्राचा रिपोर्ट आणि एस्. पी. मॅडम सुधा गुप्ता यांच्या मेहेरबानीने आम्हाला जामीन मिळाला. कुटुंब कल्याण केंद्राच्या प्रमुखांनी माझी माहिती आणि आपला रिपोर्ट एस्. पी. मॅडमना दिला. मॅडमनी आमच्या केसच्या पैलूचा सखोल अभ्यास केला.
दुस-या दिवशी त्यांनी मला, भरतला, सीतारामना आणि सरिताला ठाण्यात बोलावलं. बरोबर केंद्राच्या प्रमुख मॅडमही होत्या. एस्. पी. मॅडम अतिशय कडक स्वभावाच्या आणि शिस्तीच्या होत्या. माझा देवीआईवर पूर्ण विश्वास होता. मी जर काहीच चूक केली नाही, तर ती मला साथ देईलच, याची मला खात्री होती.
एस्. पी. मॅडमनी सगळ्यांचे चेहरे एकदा नीट पाहून घेतले, जसं काही एकेक चेहरा वाचते आहे. मग त्या कडक आवाजात म्हणाल्या,
‘मी ज्यांना विचारीन त्यानेच उत्तर द्यायचे आहे. मधे कुणीही बोलायचं नाही. ’
प्रथम त्यांनी मला विचारलं की ‘माझी काय इच्छा आहे?’ मी हात जोडून म्हंटलं, ‘मी माझ्या मुलीपेक्षा सरितावर जास्त प्रेम केलं. सामुदायिक विवाहात स्वेच्छेने तिचा विवाह करून तिला घरी घेऊन आलो, तेही कुठल्याही प्रकारचा हुंडा न घेता. परंतु आता तिने मला लावलेल्या या कलंकानंतर ती मुलगी माझ्या घरात नको. ’
मग त्यांनी भरतला विचारले. तोही म्हणाला की, तो अशा मुलीबरोबर राहू शकणार नाही.
सरिता आमच्या नजरेला नजर भिडवू शकली नाही. मॅडम सरिताला म्हणाल्या, ‘मुली, तुला त्या घरात प्रेम, सुख, शांती मिळत होती, तर तू त्यांच्यावर हुंड्याबद्दल आरोप का केलास? तुमच्याकडून हुंडा घ्यायचाच असता, तर या लोकांनी सामुदायिक विवाहात, तुमचा विवाह करून तुला घरी का आणलं असतं. तुझ्याकडे काही पुरावा आहे का की त्यांनी तुला हुंडा मागितला? किंवा तुझ्या शरिरावर काही मारल्या-डागल्याच्या खुणा आहेत का?’ आता सरिता घाबरली. आपल्या वडलांकडे बघून रडू लागली. एस्. पी. मॅडमच्या सगळं लक्षात आलं. त्या पुढे म्हणाल्या, ‘वडलांकडे बघण्याची गरज नाही. संसार तुला करायचाय. वडलांना नाही. आता तू फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ अशा शब्दात उत्तर दे. तुझ्यावर कुणी अन्याय, जुलूम केलाय?’ आता ती घाबरली. ‘नाही’ तिने उत्तर दिले.
‘तू परत जाऊ इच्छितेस?’ ती पुन्हा गप्प बसली. मॅडम पुन्हा म्हणाल्या, ‘हो की नाही. ’ ती रडत रडत म्हणाली, ‘हो. ’ मॅडमने भरतला विचारलं, ‘तुझी काय इच्छा आहे?’ भरत म्हणाला, ‘मॅडम, जी आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला तुरुंगात पाठवू इच्छिते, तिच्याबद्दल आता आम्हाला कोणताही विश्वास वाटत नाही. तिने आमच्याकडून फार तर आणखी पैसे घ्यावे, पण मी आता तिच्याबरोबर राहू शकणार नाही. ’
मॅडम सरिताला कडक आवाजात म्हणाल्या, ‘सरिता हे लोक तुला ठेवून घ्यायला तयार नाहीत. तू चार-पाच लाखांचे दागिने आणि भारी किमतीच्या साड्या आपल्या बरोबर घेऊन गेलीच आहेस. तुला यांच्याकडून आणखी किती पैसे हवेत? दीड लाख दोन लाख- अडीच लाख?.. ’ तिने एकदा आपल्या वडलांकडे पाहीलं आणि फारसा विचार न करता म्हणाली, ‘दोन लाख’.
आता एस्. पी. मॅडमपासून काही लपून राहिलं नाही. त्यांनी सीतारामकडे पाहिलं. तो बेशरम, निलाजरा मॅडमकडे बघत बसून राहिला. तोंड उघडण्याची त्याची हिंमत झाली नाही. आता मॅडमनी सरिताला शेवटचं विचारलं, ‘दोन लाख… ठीक आहे?’
मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी म्हंटलं, ‘मी अडीच लाख रुपये द्यायला तयार आहे, पण ही केस इथेच संपवा. ’
एस्. पी. मॅडमनी लगेच कारवाई केली आणि एक तडजोडीचा अर्ज तयार केला. त्यावर भरत आणि सरिताच्या सह्या घेतल्या. सरिताच्या बाजूने साक्षीदार म्हणून सीतारामची व भरतच्या बाजूने साक्षीदार म्हणून माझी सही घेतली. नंतर त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, ‘‘आपल्याला जामीन मिळालेलाच आहे. यापुढील कार्यवाही कोर्ट करेल. जरूर पडल्यास मी स्वत: साक्ष द्यायला येईन. लक्षात ठेवा, ही तडजोड माझ्यासमोर दोन्हीकडच्यांनी पूर्ण स्वेच्छेने स्वीकारली आहे. ’
‘‘मग घटस्फोट झाला?”
‘‘होय साहेब! चार-पाच वेळा सुनावणी झाली आणि घटस्फोट झाला. त्या एस्. पी. मॅडमचं भलं होवो. सत्य परिस्थिती त्यांच्या लगेच लक्षात आली. देवीआईनेच त्यांना पाठवलेलं असणार. नाही तर आमचं जगणंच मुश्कील झालं असतं. त्यावेळी लक्षात आलं, की समाजसेवा म्हंटलं की लोक हात आखडता का घेतात?”
‘‘अच्छा!’ राजेशने मग दीर्घ श्वास घेतला. त्याची उस्तुकता पुन्हा वाढली. त्याने विचारले, ‘‘मग आपल्या मुलाचे पुन्हा लग्न झाले का? आणि सरिताचे काय झाले?”
‘‘साहेब, आपल्या आपल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. माझ्या हातून कळत-नकळत काही चुकीचं काम झालं असेल, ज्यामुळे मला हे सगळं भोगावं लागलं, ज्या लोकांचा आमच्यावर विश्वास होता, तेही आता आमच्याकडे साशंकतेने बघू लागले. भरतसाठी बराच काळ मागण्या आल्या नाहीत. चार वर्षापूर्वी आमच्या जावयांच्या दूरच्या नात्यातून एक मागणी आली. आम्ही त्यांच्यापासून काहीच लपवून ठेवले नाही. मग दोन्ही कडचे लोक तयार झाल्यावर भरतचे लग्न झाले. त्यानंतर दोन वर्षांनी लखनचेही लग्न झाले. आता देवीआईच्या कृपेने आमचा सगळा परिवार सुखात, आनंदात नांदतोय. ”
‘‘आणि सरिताचं काय झालं?”
‘‘साहेब, खरं सांगू, मला या सगळ्यात सरिताचा फारसा दोष वाटला नाही. तिला तिच्या वडलांनी आणि आसपासच्या लोकांनी भडकावलेलं असणार. काही जण नंतर आम्हाला म्हणाले की आम्हाला लुबाडण्याचा त्यांचा डाव होता. पुढे कळलं, गाव आणि समाजातील लोकांनी खूप दिवसपर्यंत त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. आजपर्यंत सरिता, तिच्या दोन बहिणी आणि भाऊ यांची अद्याप लग्ने झाली नाहीत. ”
‘‘ओह!” राजेशच्या तोंडून सहजच बाहेर पडलं. त्याला थोडीशी सरिताबद्दल सहानुभूतीही वाटली, पण तिथे त्या क्षणी ती प्रगट करणं अप्रस्तुत झालं असतं.
रामजी खिडकीबाहेर बघत म्हणाले, ‘‘बहुतेक भोपाळ आलेलं दिसतय. ”
मीही बाहेर बघीतलं. जंगल, शेतं, नद्या, ओहोळ मागे टाकत ट्रेन भोपाळ शहरात प्रवेश करत होती.
बघता बघता भोपाळ स्टेशन आलं. त्यांचे उरलेले सहयात्री इथे चढले. गाडी मथुरेच्या दिशेने पुढे निघाली. लोकांनी आपापल्या बर्थवर आंथरूण पसरले आणि ते झोपून गेले. राजेशच्या मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता.
बाहेर एकामागून एक छोटी स्टेशन्स मागे पडत होती. राजेशच्या डोक्यातून मात्र विचारांचा नुसता गुंता झाला होता. हुंडा विरोधी कायदा, कलम ४९८-अ विवाहितेने आणि तिच्या माहेरच्यांनी ‘हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार केली, तर तिचा पती, आई-वडील, भाऊ-बहिण, घरातली जवळची नातेवाईक मंडळी यांना बिनाचौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार’ या कायद्याने पोलिसांना दिला होता. हे बरोबर आहे का? चौकशीच झाली नाही, तर कोण निर्दोष आहे, हे कसं कळणार?
रात्रीचे दीड वाजून गेले, तेव्हा कुठे राजेशला झोप लागली. सगळी यात्रा संपेपर्यंत रामजी आणि जया त्यांच्याबरोबरच होते. या दीर्घ सहवासात हे दोन्ही परिवार मनाने जवळ आले. आत्मीय झाले. जया सरोजला नणंद मानू लागली तर रामजींनी तिला आपली बडी दीदीच करून टाकलं.
इटारसी स्टेशन जवळ आलं. जयाने सरोजला हळद-कुंकू लावून तिला चरणस्पर्श केला. रामजींनी आणि राजेशने गळामिठी मारली. ते उतरताना सगळ्यांनाच भरून आलं.
– समाप्त –
मूळ हिंदी कथा – ४९८ -अ
मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628
☆☆☆☆☆
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈