सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ स्वीकार… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
मनीषाने घरी येऊन नववीच्या गणिताचे पुस्तक टेबलावर ठेवले व परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी बाहेर काढले. नुकत्याच कामाला लागलेल्या सुमनने गरम चहा मॅडमना आणून दिला.
“वैनी, तुम्ही गणित शिकवता?” सुमनने पुस्तकाकडे बघत विचारलं.
“हो!” मनीषाने चष्मा टेबलावर ठेवून तिनं सुमनने चहा घेतला का विचारलं व ती कामाला लागली.
“मला येत नाही गणित” – “मला जमत नाही” – मला आवडत नाही” अशी वाक्यं बोलायला तिच्या वर्गात कुणालाही परवानगी नव्हती. वर्षाच्या सुरूवातीला तिच्या वर्गातील करूणाला गणितात ५० मार्क देखील मिळत नव्हते. तिला आज ७० मार्क पडलेले बघून मनीषाचं मन अभिमानाने भरून आलं होतं. कायम नापास होणारा सदू हल्ली पास होत होता ! जीव तोडून शिकवलेलं कारणी लागतं असं वाटलं पण ती थबकली..
तिची लेक नेहा घरी आल्याचा आवाज आला.
“नेहा, कशी झाली ग गणिताची टेस्ट? किती मार्क पडले?” तिनं आतून ओरडून विचारलं.
“ शी काय हिची कटकट ! हिला व बाबांना मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलगी कधी दिसते का? बाबा ISRO मधे मोठे इंजिनीअर आणि ही गणित शिकवणारी म्हणजे मी रामानुजन असावं ही यांची अपेक्षा.. नाही येत मला गणित ! नाही मला आवडतं ! “.. वगैरे विचार बोलावेसे वाटले पण तिनं ते आतल्या आत गिळून टाकले.
“आई, खूप अवघड होता पेपर. ७० मार्क पडले !” तिनं खाली बघत उत्तर दिलं.
मनीषाचा चेहरा बदलला. “Highest कोण आहे?”
“ शीतलच की.. तिला १०० मार्क पडले. तिला नेहमी जमतं सगळं !” नेहाला आता रडायला येऊ लागलं..
मनीषा काही बोलली नाही पण मनात आलं.. खरंच पेपर कठीण असेल तर highest पण कमी मार्कांचा असतो असं झालेलं नाही.. म्हणजे..
तिनं नेहासमोर ओटमील व दूध ठेवलं व खाऊन होताच ‘ गणिताचं पुस्तक घेऊन ये ‘ म्हणाली..
“आई, तू आणि बाबा मला मी जशी आहे तशी कधी ॲक्सेप्ट कराल ग?” हे वाक्य बाहेर येऊ पहात होतं पण आईच्या चेहऱ्याकडे बघत तिने ते ओठाबाहेर येऊ दिलं नाही..
नेहा ओटमील खाऊन नाराजीने मनीषा समोर बसली.. मनीषाने तिला पाच सहा गणितं करायला दिली.
“मी भाजी घेऊन येते खालून. येईपर्यंत ही गणितं सोडवून ठेव” ती पिशवी घेऊन बाहेर पडली.
सुमन केर काढत होती. नववीतली पोर.. कामाला लागून जेमतेम आठवडा झाला होता. रात्रीची शाळा अन दिवसा काम करून घर चालवायला आईला मदत करत होती.
सुमननं केर थांबवून वाकून नेहाने सोडवलेली गणितं बघितली.
“नेहा ताई, पहिलं गणित बरोबर आहे. दुसरं चुकलंय.. हे बघ मी हे असं सोडवेन “ म्हणून तिनं नेहाला ते सोडवून दाखवलं. “ आमाला हे असं सोडवायला शिकवलय.. ”
“ सुमन, किती हुशार आहेस ग !” नेहाचा चेहरा खुलला होता.
मनीषा भाजी घेऊन आत आली. आपण करुणा, सदू वगैरे सगळ्यांना गणित शिकवू शकतो पण स्वत:च्या लेकीला का नाही शिकवू शकत? कुठे कमी पडतेय मी? मनीषाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तिनं डोळे मिटून नेहाचा अभ्यासातला संघर्ष आठवला. किती प्रकारे तिला शिकवत असते पण गणितात ६५- ७०% हून पुढे ती जाऊ शकत नाही.
नेहाने बरोबर सोडवलेली गणितं बघून मनीषा थोडी शांत झाली.
“आई, सुमनने मला ही तीन गणितं कशी सोडवायची ते दाखवलं ” नेहा प्रामाणिक होती.
“सुमनने?” तिनं आश्चर्याने विचारले. सुमनने भराभर ती गणितं कशी करायची याच्या दोन पद्धती मनीषाला सांगितल्या. मनीषा थक्क झाली..
“सुमन, उद्यापासून थोडी उशीरा ये. नेहा घरी आली की तिच्याबरोबर अभ्यासाला बस. नेहाबरोबर अभ्यास करणं हेच तुझं काम उद्यापासून. केरवारे वगैरेसाठी मी दुसरी बाई शोधेन! कळलं? ”.. मनीषाचं बोलणं ऐकून सुमन एकदम खूष झाली. नेहाचा चेहरा सुद्धा उजळला..
दुसऱ्या दिवसापासून त्यांचा हसत खेळत अभ्यास सुरू झाला. सुमन तरतरीत आहे हे मनीषाला पहिल्या दिवशीच जाणवलं होतं पण ती नेहाला हसवत, मजेशीर गोष्टी सांगत इतकं सुंदर कशी शिकवू शकते याचं तिला फार आश्चर्य वाटत होतं. नेहा पण उत्साहाने अभ्यास करत होती. अगदी बहिणींसारख्या दोघी सतत एकत्र असत.
पुढची परीक्षा झाली. नेहाला गणितात ७९ मार्क पडलेले बघून मनीषा खूष झाली.
मनीषाने आमोदशी चर्चा करून सुमनला नेहाच्या शाळेत घातले. दोघी नववीतच असल्या तरी तुकड्या वेगळ्या होत्या. दोघी छान अभ्यास करत होत्या. संध्याकाळी पळायला जात. सुमन नेहाला एक दोन पदार्थ करायला पण शिकवत असे. मनीषाची काळजी कमी झाली होती पण वार्षिक परीक्षेला नेहा परत मागे गेली तर.. वाटतच होते.
वार्षिक परीक्षेला नेहा व सुमन दोघींना उत्तम मार्क पडले होते. कशीबशी ७०% मिळवणारी नेहा यावेळी ८६% मार्क मिळवून पहिल्या दहा नंबरात आली होती आणि सुमन दुसरी आली होती.
मनीषाने दोघींना घट्ट मिठी मारली. “ सुमन, तू नक्की काय केलस म्हणून नेहाला गणित यायला लागलं?”
सुमन म्हणाली, “वैनी, नक्की सांगता येणार नाही मला.. पण तुम्हा दोघांच्या धाकात ती घाबरून जात होती. कधी कधी “शी कसला बेकार प्रॅाब्लेम “ म्हणून आम्ही कठीण गणित सोडून द्यायचो आणि दुसरं काहीतरी करायचो. असा प्रॉब्लेम देणाऱ्याचा उद्धार पण करायचो. ” नेहा खुदकन हसली..
“नंतर व्यवहारातलं गणित तिला दाखवताच तिला ते जास्त कळू लागलं.. वैनी, राग मानू नका पण प्रसिध्द गणित शिक्षिका, गोल्ड मेडॅलिस्ट मनीषा बेडेकर आणि ISRO इंजिनीअर आमोद बेडेकर यांच्या अपेक्षांचं फार मोठं ओझं आहे तिच्यावर.. तिला ते झेपत नव्हतं. ते ओझं कमी होताच तिला अभ्यास करावासा वाटू लागला.. “
“वैनी, माझे वडील पण म्युनिसिपालिटीच्या शाळेत गणित शिकवत. मी बाबांकडेच गणित शिकत असे. बाबा म्हणत, ” सुमन तू गणितात डिग्री मिळव.. तू खूप हूशार आहेस. ” ते अचानक गेले.. आई बाबांचं जाणं सहन करू शकली नाही. डोक्यावर परिणाम झाला म्हणून ती त्या दवाखान्यात आहे. त्या डॅाक्टरीण बाईंनीच मला दोन नोकऱ्या लावून दिल्या म्हणून तर तुम्ही मला भेटला वैनी !
नेहा, मनीषा आणि तेवढ्यात घरी आलेला आमोद थक्क होऊन तिचे बोलणे ऐकत होते. देवानं तिचं लहानपण काढून घेतलं होतं, पण कुशाग्र बुध्दी आणि बेडेकरांचं घर तिला मिळवून दिलं होतं.
“वैनी, सर तुम्हाला एक सांगू का? नेहाचे मराठी, इतिहास हे मार्क बघा. कायम हायेस्ट असते त्यात. तिला लिबरल आर्ट्समधे करिअर करायचं आहे.. त्या विषयात ती काही तरी उत्तम करेल बघा !” सुमन धैर्य एकवटून म्हणाली.
मनीषा व आमोद विचारात पडले…
आज बावीस वर्षांनी डॉ. नेहा बेडेकर या मानसशास्त्रातील एका विदुषीचे भाषण ऐकण्यासाठी मनीषा व आमोद सभागृहात पोचले होते.. हॅाल पूर्ण भरला होता. नेहाने पीएचडी संपताच अनेक पॅाडकास्ट तयार केले होते त्याला भरभरून प्रतिसाद येत होता. तिचं नाव झालं होतं.. कार्यक्रमाचे संचालन करत होत्या ISRO इंजिनीअर, सुमन पवार ! सुमनने माईक हातात घेतला व नेहाची ओळख करून दिली !
नेहाने बोलायला सुरुवात केली.. विषय होता,
“When will you accept me as I am?”
आई वडीलांनी मुलांना, सुना जावई यांनी सासु सासऱ्यांना, लहानांनी वृध्दांना, वृद्धांनी तरूणांना आणि एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारले तर केवढी नकारात्मक ऊर्जा कमी होईल यावर नेहा बोलत होती..
“कसं स्वीकारायचं असतं समोरचं माणूस जसं आहे तसं? अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर न टाकता, टीका न करता, दोष न देता? कसा आदर दाखवायचा मतभेद असताना? माझ्या आई बाबांनी मला जसं ॲक्सेप्ट केलं ते कसं करायचे? दोन गणितज्ञांच्या घरात आर्ट्सकडे जाणारी व गणित न आवडणारी मुलगी भरडली गेली असती, पण तिला आर्ट्सला जाण्यासाठी त्यांनी कसं प्रोत्साहन दिलं? घरी काम करणारी कामाची मुलगी आपल्या लेकीपेक्षा कितीतरी हुशार आहे हे कसे मान्य केले? त्या झोपडीत राहणाऱ्या मुलीने आपले डोळे उघडले पण त्यात स्वतःचा अपमान न मानता तिला पण उत्तम शिक्षण कसे दिले…. “
नेहा अप्रतिम मुद्दे मांडत लोकांना समजावून सांगत होती ! मनाचा मोठेपणा आणि ईर्षा, स्पर्धा यावर कसे काम करायचे सांगत होती.
… मनीषा व आमोद लेकीची वाणी ऐकून धन्य होऊन गेले होते ! सुमनचे ते शतश: आभार मानत होते ! सुमनला कसलं शिकवलं आपण? अत्यंत बुध्दीमान असलेली सुमन कुठेही असती तरी चमकली असती ! पण स्वतः चमकताना इतरांना चमकण्यास जो मदत करतो तो खरा वाटाड्या असतो !
सुमन व नेहा घरी आल्या. मनीषाने तिला मिळालेले गोल्ड मेडल सुमनच्या गळ्यात घातलं आणि बाबांनी त्याला ISRO मध्ये मिळालेले मेडल नेहाच्या गळ्यात घातलं..
“ बाबा, Propulsion Module बद्दल मला तुमच्यासाठी काही बोलायचं आहे.. “ सुमन आणि बाबा चांद्रयानाबद्दल बोलण्यात गर्क होते..
आणि
“झोपडी ते ISRO” या नेहाने लिहिलेल्या पुस्तकाचा रफ ड्राफ्ट आईला दाखवण्यात नेहा गर्क होती !
आई बाबानी मुलींना त्या जशा आहेत तसे ॲक्सेप्ट केले होते.. त्यामुळे दोघीही आपापल्या क्षेत्रात आज चमकत होत्या.
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈