डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

कुणाच्या खांद्यावर… — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आईला थोडे बरे नाही हे समजल्यावर आरती लंडनहून नोकरीतून रजा काढून मुंबईला आली.

आरतीच्या आई रजनीताई  म्हणजे एक बडे प्रस्थ होते… दिसायला सुंदर,शिकलेल्या,त्या काळात कॉलेजमध्ये नोकरी करणाऱ्या. त्यांचे यजमान रमेशराव सुद्धा खूप श्रीमंत घराण्यातले. गावाकडे पिढीजात जमिनी वाडे असे  वैभव असलेले. 

एका समारंभात त्यांनी रजनीला  बघितलं आणि मागणी घालून ही मध्यमवर्गातली मुलगी करून घेतली. रजनी होतीच कर्तृत्ववान. मध्यमवर्गातून आल्यावर हे सासरचे वैभव बघून डोळे दिपले नाहीत तरच नवल. 

आपल्या पगारातून रजनी वाट्टेल तसा खूप खर्च करत असे. कोणीही विचारणारे नाही आणि  रमेशरावांना एवढा वेळही नसे. बँकेत शिल्लक टाकावी, सेव्हिंग करावे असं रजनीला कधी वाटलंच नाही. 

रजनी स्वार्थी होती आणि तिचा हा स्वभाव तिची आई जाणून होती. रजनीचे आपल्या आईवडिलांशी तरी कुठे पटायचे ? मग भावंडे तर दूर राहिली… .. आणि श्रीमंत सासर मिळाल्यावर तर रजनीने आपल्या बहिणी आणि भावाशी संबंधच ठेवले नाहीत. भारी साड्या, दागिने, पार्ट्या,  सतत श्रीमंत मैत्रिणीत वावरणे हे रजनीचे आयुष्य बनून गेले. कॉलेजची नोकरी झाली की तिला वेळच वेळ असे रिकामा.

लागोपाठ तीन मुली झाल्या तरीही रजनीने नोकरी न सोडता त्यांना छान वाढवलं.  घरात खूप नोकरचाकर, हाताशी भरपूर पैसा, रजनीला काहीच जड गेलं नाही. 

रजनीबाईनी मुलींना चांगलं वाढवलं. मुली छान शिकल्या. दरम्यान लहानश्या आजाराने रमेशराव अचानकच वारले. रजनीने तिन्ही मुलींची लग्ने थाटात करून दिली. दोघी लगेचच परदेशात गेल्या.  

रजनीताईना आता एकाकीपण जाणवायला लागले   .त्यांची नोकरीही संपली होती  .  खाजगी कॉलेजात नोकरी असल्याने त्यांना  पेन्शन पण नव्हते. गावाकडचे वाडे जमिनी भाऊबंदकीत हातातून निसटून गेल्या. पण तरीही रमेशरावांनी ठेवलेलं काही कमी नव्हतं.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या . रजनीताईंची मोठी मुलगी अलका अगदी आईसारखीच होती स्वभावाने.तिला एक  मुलगा झाला . तिचा नवरा अचानकच एक्सीडेंटमध्ये गेला. अलकाने लगेचच कोणताही विचार न करता , आईलाही न विचारता आपला आठ वर्षाचा मुलगा चिन्मय आईकडे आणून टाकला.

”आई , मी दुसरं लग्न करतेय आणि तो आपल्या जातीचा नाहीये. तो चिन्मयला संभाळायला तयार नाही.

मी त्याच्याबरोबर दुबईला जाणार आहे.

रजनीताईंची संमती आहे का नाही हे न विचारताच अलका आली तशी निघून गेली. बिचारा चिन्मय घाबरून आजीकडे बघत राहिला. रजनीताईंचं मन द्रवलं. त्यांना या पोरक्या मुलाचं फार वाईट वाटलं.त्यांनी चिन्मयला पोटाशी धरलं आणि म्हणाल्या,

”  घाबरू नको चिन्मय. मी आहे ना? तू रहा माझ्याकडे हं. आपण चांगल्या शाळेत  घालू तुला.” रजनीबाईनी चिन्मयला चांगल्या नावाजलेल्या शाळेत घातलं. 

अलकाला फोन केला आणि सांगितलं. “ हे बघ अलका.तुझा मुलगा ही तुझी जबाबदारी आहे. त्याच्या खर्चाचे, फीचे सगळे पैसे जर देणार नसलीस तर त्याला मी मुळीच संभाळणार नाही. आई आहेस का कोण आहेस ग तू? माझी इतका भार सहन करण्याची ऐपत आणि ताकदही नाही. जर वर्षभराचे पैसे चार दिवसात जमा झाले नाहीत तर मी त्याला अजिबात संभाळणार नाही. येऊन घेऊन जा तुझा मुलगा.” 

चिडचिड करत अलकाने मुकाट्याने पैसे  रजनीताईंच्या खात्यात जमा केले.

ती कधीही बिचाऱ्या चिन्मयला भेटायलाही यायची नाही. 

बाकीच्या तीन मुलींपैकी एकटी आरती सहृदय आणि शहाणी होती.रजनीताईंशी तिचं चांगलं पटे. या सगळ्या गोष्टी रजनीताई आरतीच्या कानावर घालत. 

मधली अमला तर असून नसल्यासारखी होती.    

जमीनदारांच्या घरी तिला दिली होती खरी, पण तिच्या हातात काडीची सत्ता नव्हती.पार कर्नाटकातील ते खेडं आणि सतत देवधर्म कुलाचार यातच बुडलेली.दोनदोन वर्षं तिला माहेरी यायला जमायचं नाही. आपल्या आईचं बहिणींचं काय चाललंय याची तिला दखलही नसे. ती कधी माहेरीही यायची नाही आणि कोणाला आपल्या घरी बोलवायचीही नाही.  

नशिबाने चिन्मय बुद्धीने चांगला निघाला.  कोणाचाही आधार नसताना तो चांगल्यापैकी मार्क्स मिळवून पास होत गेला.

रजनीताई आता थोड्या थकायला लागल्या. चिन्मयला नाही म्हटलं तरी आजीचं प्रेम लागलं होतं. तिच्याशिवाय त्याला जगात होतंच कोण?

पण सतत  आजी जवळ राहून चिन्मय एकलकोंडा झाला होता.ना त्याचे मित्र घरी येत,ना तो कधी त्यांच्याकडे खेळायला जात असे. 

चिन्मय आता   एम कॉम झाला.त्याला बँकेत नोकरीही लागली.   रजनीताईंनी त्याला जवळ बसवून सांगितलं,”हे बघ चिन्मय.तू आता मिळवायला लागलास .आता तुझ्या खर्चाचे  पैसे मला दरमहा देत जा. 

निमूटपणे चिन्मय आजीला पैसे देऊ लागला.कोणालाही विरोध करण्याची ताकद त्याच्यात निर्माणच झाली नव्हती. सतत त्याच्या मनात एक  कमीपणाची भावना असे. 

सगळ्या बहिणींनी आपली आई म्हणजे जणू चिन्मयचीच जबाबदारी असेच गृहीत धरले होते.

बिचाऱ्या चिन्मयला स्वतःचे आयुष्यच उरले नव्हते.सतत आजीला डॉक्टरकडे ने, तिची औषधे आण, तिला फिरायला ने हेच आयुष्य झाले चिन्मयचे.

ना कधी त्याच्या आईने त्याला फोन केला की कधी कौतुकाने पैसे पाठवले. बँकेत मान खाली घालून काम करणे आणि घर गाठणे हेच आयुष्य झाले होते चिन्मयचे.

आरती पुण्यात आली तेव्हा  माहेरी,रजनीताईंकडेच उतरली होती.

त्यांना बरं नाही म्हणून तिला त्यांनी बोलावून घेतलं खरं पण चांगल्या मस्त तर होत्या त्या.

आरतीला सगळं चित्र लख्ख दिसलं.

बिचारा चिन्मय आजीकडे भरडून निघतोय हेही तिला दिसलं.दोन दोन मिनिटांनी त्याला हाका मारणारी आणि राबवून घेणारी आपलीच आई तिने बघितली. 

“चिन्मय, उद्या माझी  डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे,  लक्षात आहे ना?लवकर ये ऑफिसमधून.नंतर मग लगेच ते सांगतील त्या तपासण्याही करून टाकू.”

चिन्मयच्या कपाळावरच्या आठ्या आरतीला बरंच काही सांगून गेल्या.

आरती तेव्हा काही बोलली नाही.

नंतर चिन्मयला म्हणाली,”उद्या माझ्याबरोबर बाहेर चल चिन्मय.उद्या रविवार म्हणजे सुट्टी असेल ना तुला?आई, तू उद्या आपली जेवून घे ग.मी आणि चिन्मय बाहेर जाऊन कामे करून जेवूनच येऊ .”

रजनी ताईंच्या कुरकुरीकडे लक्षच न देता आरती चिन्मयला घेऊन बाहेर पडली.

एका छानशा हॉटेलमध्ये आरती चिन्मयला घेऊन गेली.”तुला काय आवडतं ते मागव चिन्मय.मला हल्ली फारसं तुम्हा नव्या मुलांना काय आवडतं ते समजत नाही”आरती हसत हसत म्हणाली. 

चिन्मय हळूहळू  आरती मावशी जवळ मोकळा होत गेला. या भिडस्त आणि पडखाऊ मुलाचं तिला फार वाईट वाटलं.

चिन्मय,कोणी मैत्रीण मिळालीय की नाही,  बँकेत किंवा आणखी कुठे?”

आरतीने गमतीने विचारलं.  मावशी, आहे ग माझ्याच बँकेतली  विदिशा माझी चांगली मैत्रीण. पणअजून लग्नाचं विचारलं नाही मी तिला.कोणत्या तोंडानं विचारू ग?

आधीच आजी सतत म्हणत असते, “ बघ, तुझी आई तुला टाकून गेली. मी सांभाळलं नसतं तर काय केलं असतंस रे तू? कठीणच होतं बरं बाबा तुझं.” 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments