डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ किरण… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
” नमस्कार, आजच्या आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. विविध आजार व त्यावरील उपचार मार्गदर्शन आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन औषधोपचार. झाले की आजार बऱ्यापैकी नियंत्रणात येतो. कॅन्सर एक जीवघेणा आजार. साक्षात मृत्यूदंडाची शिक्षा विधात्याने दिलीय असे वाटते. परंतु आजकाल विविध संशोधित औषधे. केमोथेरेपी, रेडिएशन, ऑपरेशन, स्टेमसेलद्वारे केले जाणारे उपचार, बर्याच प्रमाणात विकसित झालेलं आधुनिक तंत्रज्ञान. यामुळे हा आजार. बर्याच प्रमाणात नियंत्रणात आला आहे. आणि कॅन्सर हाही एक आजार आहे. मृत्यूदंड नाही. हे आपण म्हणू शकतो. या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी. आज आमच्या भेटीला आल्या आहेत, प्रेमाताई. प्रेमाताई कोणी डॉक्टर किंवा कॅन्सर तज्ज्ञ नाहीत. त्या स्वतःच या जीवघेण्या आजारातून गेलेल्या आहेत. तर आपण स्वागत करुया प्रेमाताईंचं.
प्रेमाताई नमस्कार. “स्वस्थ भारत”च्या आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत.
“नमस्कार माधुरीताई आणि सर्व श्रोतुवर्गाला”
प्रेमाताई आज आपण कॅन्सरविषयी बोलणार आहोत. आपण कशा काय या सामाजिक कार्याकडे वळलात, आणि आपण कशाप्रकारे कार्य करतात हे आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे.
माधुरीताई, कॅन्सरचे निदान झाले म्हणजे भल्याभल्या लोकांची भीतीने गाळण उडते. मला कॅन्सर झालाच नाही? मला कॅन्सर होईलच कसा? मला कॅन्सर होऊच शकत नाही. ? हीच प्रतिक्रिया सर्वसामान्य रुग्णांची असते. सत्य पचवणं कोणालाही सहजी शक्य होत नाही. या जीवघेण्या आजाराचे निदान झाले की रुग्ण चिंतेने,साक्षात मृत्यू समोर पाहून ग्रस्त होतो. “माझं सगळं संपलंय. काय करावं मी?” ही त्याची धारणा होऊन बसते. रुग्ण शरीराने तर थकतोच पण त्याहीपेक्षा तो मनाने थकतो. अशा स्थितीत रुग्णांना सर्व समजावून सांगणं त्यानुसार त्यांची मनोभूमिका तयार करणं गरजेचं असतं. आजकालच्या वाढत्या शहरीकरणातील प्रत्येकाचं जीवनाचं घाईगडबडीचं झालंय. रुग्णांना डॉक्टर पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे रुग्ण हतबल होतो. मात्र मनात अनेक प्रश्नांचं जाळं पसरलेलं असतं आणि त्याचं मन त्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटत जातं. अशावेळी त्याला गरज असते धैर्याची, प्रेमाची, मायेच्या ओलाव्याची आणि त्या आजाराविषयी जाणून घेऊन त्याचे मनोधैर्य वाढवण्याची, जेणेकरून या आजाराचा सामना तर रुग्ण करेलच व गरजेनुसार सगळ्या औषधोपचार व अन्य थेरेपीसाठी तो तयार होईल. आणि या उदात्त हेतूने “कॅन्सरशी लढा विजयाकडे एक पाऊल” या संस्थेचा उदय झाला.
माधुरीताई, मी स्वतः या कॅन्सरशी लढा दिला आहे. आणि माझ्यासारख्या अनेक भगिनी आणि बंधूं देखील ज्यांनी कॅन्सरशी लढा देऊन विजयी मात केली आहे. त्या सगळ्यांच्या सहकार्यातून या संस्थेची निर्मिती झालीय.
अगदी छान प्रेमाताई. संस्थेची स्थापना आणि कार्य, माहित झाले. पण तुमच्या कामाचे स्वरूप आपल्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगाल का?
होय माधुरीताई. पहिल्यांदाच मी स्पष्ट करू इच्छिते की या संस्थेचे कार्यकारिणी नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य असे पदाधिकारीही नाही. संस्थेला येणारी प्रत्येक व्यक्ती संस्थेत. समसमान असेल तिच्या कार्याचे स्वरूपही समान असेल. विशेषता त्या व्यक्तीने कॅन्सरशी दिलेला लढा आणि त्याचा सामना करून मिळालेला विजय, या दरम्यानचे त्या व्यक्तीचे कटु-गोड अनुभव जे दुसर्यांना प्रेरणादायी ठरतात यांचा समावेश असतो.
डॉक्टर रुग्ण यांच्यात पाहिजेत तसा संवाद होत नाही. रुग्णांच्या प्रत्येक प्रश्नांचं समाधानकारक उत्तर मिळेल याची अपेक्षा नसणं आणि एकंदरीतच भांबावलेला, हवालदिल झालेला, नैराश्यानं ग्रासलेला, रुग्ण शेवटी काय होणार माझं? कसं होणार ? किती दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे माझं ? अशा अनेकविध प्रश्नांनी चिंतीत होतो, पण उत्तर शून्य. अशा रुग्णांचं काउंसिलिंग आम्ही करतो. त्यांचे मनोधैर्य वाढवतो, कॅन्सर हा जीवघेणा नसून तो पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो हे आम्ही त्याला पटवून देतो. तशी त्याची मनोभूमिका तयार करतो जेणेकरून ती व्यक्ती या आजाराचा धैर्याने सामना करून त्यात यशस्वी होईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो.
प्रेमाताई कॅन्सर पूर्णपणे बरा होतो असं विधान आपण केलंत, ते कितपत शक्य आहे ?
माधुरीताई, कॅन्सरचे लवकर निदान होणं यासाठी फार गरजेचं असतं. साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्या ग्रेडच्या कॅन्सरमध्ये हे शक्य होतं. तिसऱ्या ग्रेडच्या कॅन्सरमध्ये चॅन्सेस सर्व साधारणपणे 50:50 होतात. आणि चौथी शेवटची ग्रेड मात्र जीवघेणी ठरू शकते. म्हणूनच कॅन्सरचं निदान लवकर होणं फार गरजेचं आहे. पण होतं काय की रुग्णाला काही त्रास न होता, हा रोग शरीरात छुप्या पद्धतीने आगमन करून आपलं साम्राज्य हळूहळू फैलावत राहतो. जेव्हा रुग्णाला त्रास होऊ लागतो, वेदना जाणवू लागतात तोपर्यंत या आजाराने बरीच पुढची मजल गाठलेली असते. आणि आपले निदान उशिरा झाले अशी पेशंटची धारणा होते.
यासाठी मी एवढंच सांगू इच्छिते की वयाच्या चाळिशीनंतर प्रत्येक स्त्री पुरुषाने वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण शारीरिक तपासणी करून घ्यावी जरी काही त्रास होत नसला तरी. विशेषतः आमच्या भगिनी की ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते त्या मात्र प्रकृतीची हेळसांड करतात. दुखणे अंगावरच काढत राहतात. अनेकदा गर्भाशय,स्तन कॅन्सरशी संबंधित आजार लज्जेपोटीही लपविले जातात आणि जेव्हा तीव्र स्वरूपाचा त्रास होऊ लागतो तेव्हा आजाराने डोके बरेच वर काढलेले असते की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. म्हणून “कॅन्सरचे जितक्या लवकर निदान तितकं त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं” म्हणता येईल. इतकंच नव्हे तर कॅन्सरला रुग्णाच्या शरीरातून हद्दपार करण्यात यश येऊ शकते; आणि रुग्ण पुन्हा आपले नव जीवन आनंदानं जगू शकतो. आयुष्याच्या हा बोनस त्याचा आनंद द्विगणित करीत असतो. बोनसचा आनंद आपणा सर्वांना जसा मिळतो तसा हा जीवनाचा बोनस त्या व्यक्तीच्या जीवनी नवी पहाट, नवी उमेद,नवी आशेची किरणे, एक नवं संजीवनी बनून येत असतो.
खूपच छान प्रेमा ताई तुम्ही सविस्तर विश्लेषण करून प्रेक्षकांना पटवून दिलेले आहे. आमचे सूज्ञ प्रेक्षक याचा नक्कीच विचार करतील. प्रेमाताई “अहमदनगरहून शोभा कानडे चा फोन येतोय आपण हा फोन कॉल घेऊ या”, “अवश्य”
“नमस्कार”
“नमस्कार- तुमचा प्रश्न विचारा” “नमस्कार शोभाताई तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत तुमचा प्रश्न विचारा. ” “ताई मला तापाची बारीक कणकण वाटते भूक मंदावली आहे. शारीरिक थकवा जाणवतोय आणि थोड्या प्रमाणात रक्तस्त्रावही होतोय. “
“शोभाताई, तुम्ही स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्या. तुम्ही सांगितलेली लक्षणे सर्वसाधारण आजाराची ही असू शकतात. पण रक्तस्त्रावासाठी स्त्री रोग तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यातून काही निष्पन्न झाल्यास आपला इलाज अवश्य करून घ्या”.
क्रमशः भाग पहिला
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]