श्री मेघःशाम सोनवणे
जीवनरंग
☆ ‘सहानुभूति…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
मी एका घराजवळून जात असताना अचानक मला त्या घरातून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्या मुलाच्या रडण्याच्या आवाजात एवढी वेदना होती की आत जाऊन ते मूल का रडत आहे हे जाणून घेण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.
आत गेल्यावर एक आई तिच्या दहा वर्षाच्या मुलाला हळूवारपणे मारतांना दिसली आणि ती स्वतःही मुलासोबत रडत होती. मी पुढे होऊन विचारले की, “ताई, या लहान मुलाला तुम्ही का मारताय? आणि तुम्ही स्वतःही का रडत आहात. “
ती म्हणाली, “भाऊ, याचे वडील देवाघरी गेले आहेत आणि आमची परिस्थिती खूपच नाजूक आहे. याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी लोकांच्या घरी धुणं, भांडी, साफसफाई ची कामं करते आणि घराचा व याच्या शिक्षणाचा खर्च कसाबसा भागवते. आणि हा नालायक दररोज शाळेत उशीरा जातो आणि घरीही उशीरा येतो. कुठेही भटकत फिरतांना तो मुलांसोबत खेळण्यात गुंगून जातो आणि अभ्यासाकडे ही लक्ष देत नाही. त्यामुळे त्याचा शाळेचा गणवेश दररोज घाण होऊन जातो ज्यामुळे शाळेत शिक्षकही रागावतात. “
मी त्या मुलाला आणि त्याच्या आईला कसंतरी थोडेफार समजावून सांगितले आणि तेथून निघालो.
ही घटना होऊन थोडे दिवस उलटले होते आणि एके दिवशी सकाळी मी काही कामानिमित्त भाजी मंडईत गेलो होतो. तेव्हा अचानक माझी नजर त्याच दहा वर्षाच्या मुलावर पडली ज्याला घरात मार खाताना मी बघितले होते. मला दिसले की, तो मुलगा बाजारात फिरत होता आणि दुकानदार त्यांच्या दुकानासाठी भाजी विकत घेऊन पोत्यात भरतांना त्यातील थोडीफार भाजी खाली जमिनीवर पडलेली राहिली की, हा मुलगा लगेच ती उचलून आपल्या पिशवीत ठेवत होता.
हे बघून माझी उत्सुकता ताणली गेली व हे काय प्रकरण आहे असा विचार करत मी त्या मुलाच्या मागे गुपचूप जाऊ लागलो. त्याची पिशवी या खाली पडलेल्या व त्याने वेचलेल्या भाजीने भरल्यावर तो रस्त्याच्या कडेला बसला आणि जोरजोरात ओरडून ती भाजी विकायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर धुळ व चिखलाचे पुट जमा झाले होते, गणवेश धुळीने माखलेला होता आणि डोळे पाणावलेले होते. असा दुकानदार मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो.
त्याने बाजारात ज्या दुकानासमोर आपले छोटेसे दुकान मांडले होते, अचानक त्या दुकानातून एक माणूस उठला आणि त्याने लाथेने या मुलाचे दुकान लाथाडून टाकले आणि ओरडत शिव्या देत त्या मुलाला दूर ढकलून दिले.
मुलाच्या डोळ्यात अश्रू आले व मुकाट्याने पुन्हा त्याने तो विखूरलेला भाजीपाला गोळा करायला सुरुवात केली आणि काही वेळाने घाबरत त्याने आपली भाजी दुसऱ्या दुकानासमोर विकायला ठेवली. यावेळी ज्याच्या दुकानासमोर त्याने आपले छोटेसे दुकान मांडले होते तो चांगला माणूस असावा, कारण ती व्यक्ती त्या मुलाला काहीच बोलली नाही.
थोड्याशाच भाज्या होत्या आणि त्या इतर दुकानांपेक्षा कमी भावाने विकत होता म्हणून लवकरच त्याच्या जवळची भाजी विकली गेली. तो मुलगा उठला आणि त्या बाजारातील कपड्याच्या दुकानात गेला. माजी विकून आलेले पैसे त्या दुकानदाराला दिल्यानंतर दुकानात ठेवलेलं शाळेचं दफ्तर उचललं आणि काहीही न बोलता तो परत शाळेत गेला. मी पण त्याच्या मागे मागे जाऊ लागलो होतो.
मुलाने वाटेत रस्त्यावरील नळावर तोंड धुवून तो शाळेत गेला. मी पण त्याच्या मागे शाळेत गेलो. मुलगा शाळेत गेला तेव्हा त्याला एक तास उशीर झालेला होता. त्याच्या शिक्षकाने त्याला छडीने जोरदार फटके दिले. मी पटकन वर्गात जाऊन शिक्षकांना विनंती केली की या निरागस मुलाला मारू नका.
शिक्षक म्हणाले की तो रोज दीड तास उशिरा येतो, आणि भीतीपोटी त्याने शाळेत वेळेवर यावे म्हणून मी त्याला दररोज शिक्षा करतो. मी त्याच्या घरीही अनेकवेळा हे कळवले आहे.
मार खाल्ल्यावर तो मुलगा बिचारा वर्गात बसून अभ्यास करू लागला. मी त्याच्या शिक्षकाचा मोबाईल नंबर घेतला आणि घराकडे निघालो. घरी पोहोचल्यावर लक्षात आले की मी ज्या कामासाठी भाजी मंडईत गेलो होतो तेच नेमके मी विसरलो होतो. सायंकाळी तेथून परतताना मी बघितले की ते निरागस बालक घरी गेले आणि त्याच्या आईने त्याला पुन्हा मारहाण केली. रात्रभर माझं डोकं भणभणत होतं.
सकाळी उठल्यावर मी ताबडतोब मुलाच्या शिक्षकाला फोन करून विनंती केली की थोडा वेळ काढून त्यांनी मंडईला पोहोचावे. शिक्षकाने होकार दिला. सूर्य उगवला आणि मुलाची शाळेत जायची वेळ झाली. मुलगा आपले छोटे दुकान थाटण्यासाठी घरातून थेट बाजारात गेला.
मी तिच्या घरी गेलो आणि त्याच्या आईला म्हणालो, “ताई, माझ्यासोबत चला. तुमचा मुलगा शाळेत उशिरा का जातो हे मी तुम्हाला दाखवतो. “
“आज मी याला सोडणार नाही…. आता याला दाखवतेच… ” असं बडबडत ती लगेच माझ्यासोबत निघाली. मुलाचे शिक्षकही बाजारात आले होते. आम्ही तिघेही बाजारात तीन ठिकाणी जाऊन उभं राहिलो, आणि गुपचूप त्या मुलाकडे बघायला लागलो. आजही त्याला नेहमीप्रमाणे अनेक लोकांकडून फटकार आणि धक्काबुक्की सहन करावी लागली होती. आणि शेवटी तो मुलगा भाजी विकून कपड्याच्या दुकानात गेला.
अचानक माझी नजर त्याच्या आईवर पडली. तीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या. मी त्याच्या शिक्षकाकडे पाहिले. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावरून मला असे जाणवले की जणू त्यांच्या हातून त्या निरपराध बालकावर अन्याय झाला होता आणि आज त्यांना त्यांची चूक कळाली होती.
त्याची आई रडत रडतच घरी गेली आणि शिक्षकही पाणावलेल्या डोळ्यांनी शाळेत गेले. आजही मुलाने आलेले पैसे दुकानदाराला दिले आणि जाऊ लागला तेव्हा दुकानदाराने त्याला लेडीज सूट चे कापड दिले आणि म्हणाला, “बाळा, तू जमा केलेल्या सर्व पैशांचे हे कापड आहे. त्यांचे सर्व पैसे मिळाले. हे कापड आता तू घेऊन जा. “
मुलाने ते सूटचे कापड घेऊन शाळेच्या दप्तरात टाकले आणि शाळेत गेला. मी ही मागावर होतोच. शाळेत यायला आजही त्याला एक तास उशीर झालेला होता. तो थेट शिक्षकाकडे गेला, त्याचे दफ्तर बेंचवर ठेवले, आणि छडी ची शिक्षा स्वीकारण्यासाठी त्याने हात पुढे केला. शिक्षक आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी मुलाला कवेत घेतले आणि ते रडू लागले. त्यांना पाहून मलाही अश्रू अनावर झाले. मी स्वतःला सावरत पुढे झालो, शिक्षकांना शांत केले आणि मुलाला विचारले की पिशवीतील सूट चे कापड कोणासाठी आणले आहेस.
मुलाने रडून उत्तर दिले की, “माझी आई श्रीमंत लोकांच्या घरी मजूर म्हणून काम करते. तिच्याकडे चांगले कपडे नाहीत व जे आहेत ते फाटलेले आहेत, शरीर पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे नाहीत आणि माझ्या आईकडे पैसे नाहीत, म्हणून मी माझ्या आईसाठी हा सूट विकत घेतला आहे. “
“मग आज हे सूट चे कापड घरी नेऊन आईला देणार का?” मी मुलाला प्रश्न विचारला.
त्याच्या उत्तराने माझ्या आणि त्या मुलाच्या शिक्षकाच्या पायाखालची जमीन सरकली. मुलगा म्हणाला, “नाही काका, सुट्टी झाल्यानंतर मी शिंप्याला ते शिलाईसाठी देईन. ” शाळा सुटल्यावर दररोज काहीना काही काम करून त्याने शिंप्याकडे थोडे पैसे जमा केले होते. ते ऐकून आमचा कंठ दाटून आला.
आपल्या समाजातील कितीतरी गरीब आणि विधवा स्रियांच्या बाबतीत असे किती दिवस चालणार, त्यांची मुले सणाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी किती दिवस तळमळत राहणार, असा विचार करून मी आणि शिक्षक रडत होतो.
अशा गरीब विधवांना देवाने दिलेल्या आनंदात काही अधिकार नाही का? आपण आपल्या आनंदाच्या प्रसंगी आपल्या इच्छेतील काही पैसे काढून आपल्या समाजातील गरीब आणि निराधारांना मदत करू शकत नाही का?
आपण सर्वांनी एकदा शांतपणे विचार करावा. आणि हो, जर तुमचे डोळे अश्रूंनी भरले असतील तर ते बाहेर पडू देण्यास अजिबात संकोच करू नका. शक्य असल्यास, ही प्रेरणादायी कथा त्या सर्व कर्तबगार लोकांना सांगा जेणेकरून आमच्या या छोट्याशा प्रयत्नाने कोणत्याही कर्तृत्ववान व्यक्तीच्या हृदयात गरीबांबद्दल सहानुभूतीची भावना जागृत होईल. आणि ही कथा कोणातरी गरीबाच्या घरात आनंदाचे कारण बनू दे.
मुळ हिंदी कथा लेखक- अज्ञात.
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈