श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

?जीवनरंग ?

☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – २ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

(त्यानंतर बक्षिस वितरण सुरू झालं. उत्तेजनार्थ दोन बक्षिसं जाहीर जाहीर झाली. हॉल टाळ्यांच्या गजराने घुमत होता.) – इथून पुढे —

तृतीय क्रमांक पुकारला. द्वितीय क्रमांक पुकारला माझं नाव कुठेच नव्हतं. मी खूप नाराज झालो होतो. आत्ता इथून कसं निघायचं याचा विचार करत होतो. बोलणारा निवेदक मुरलेला होता त्याने प्रथम क्रमांक पुकारताना वातावरण लय टाईट केलं. माझी धडधड केव्हाच बंद झाली होती. निश्चितच आपण तरी प्रथम क्रमांक नसणारच याची खात्री होती. मी निघायचं कसं याचा विचार करत होतो.

तेवढ्यात प्रथम क्रमांक स्पर्धकाचं नाव आहे नितीन चंदनशिवे. अशी घोषणा झाली. मी उभा राहिलो आणि परत खाली बसलो. टाळ्या वाढल्या होत्या. मी कसातरी उभा राहिलो. स्टेजवर गेलो आणि पाडगावकरांच्या हस्ते ते बक्षीस घेतलं. टाळ्या जोरात वाजायला सुरवात झाली तशी टाळ्याऐवजी मला बच्चनचा ताशाचा आवाज येत राहिला.

ती ट्रॉफी आणि तीन हजाराचे पाकीट घेऊन मी बाहेर आलो.

 मी कधी एकदा स्टेशनवर जाऊन मंगल आणि बच्चनला भेटीन असे झाले होते. फार आनंद झाला होता. मी अगोदर खडकी बाजारात आलो सागर स्वीटसमधून पावशेर गुलाबजाम घेतले आणि कॉर्नर हॉटेलमधून तीन बिर्याणी पार्सल घेतल्या. मी आयुष्यात पहिल्यांदा स्पेशल रिक्षा केली, आणि स्टेशनजवळ आलो. मला माहित होतं यावेळी मंगल कुठे असणार ते. जय हिंद थिएटर जवळ गेलो तर एका रिक्षात गिऱ्हायकाबरोबर मंगल बसलेली दिसली. तिथेच थांबलो कारण तिथे जाणं म्हणजे तिच्या शिव्या खाणं होतं. रात्रीचे सव्वा नऊ झाले होते. कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस फ्लॅटफार्मला थांबली होती. गाडी जाईपर्यंत बाहेरच थांबलो. गाडी निघून गेली थोड्या वेळाने फ्लॅटफार्म रिकामे झाले.

 मी आमच्या बाकड्यावर जाऊन बसलो. वारंवार मी केशवसुत यांचे छायाचित्र असलेली ती केशवसुत करंडकची ट्रॉफी पाहत होतो. आणि आपण कसे सादरीकरण केले असेल याचा विचार करू लागलो. फ्लॅटफार्मवरच्या घड्याळाकडे नजर गेली रात्रीचे बारा वाजत आले होते. पुन्हा एकदा विडा मळला आणि तोंडात बार भरला. पहिली पिचकारी मारली तशी नजर पलीकडच्या बाजूला गेली. बच्चन आणि मंगल दोघेही हातात हात घालून चालत जिन्याच्या दिशेने जाताना दिसले. मी मोठ्याने ओरडलो “बच्चन भाय…”… त्या दोघांनी फक्त हात उंचावला आणि माझ्या बाजूला येणारा जिना चढू लागले. बच्चनच्या हातात काळी पिशवी दिसली. म्हणजे याने पण बिर्याणी आणली वाटतं. रोज त्याच्या हातातलं पार्सल बघून होणाऱ्या आनंदाने आज रागाची जागा घेतली. कारण मी पण बिर्याणी आणली होती. ते दोघे अगदी जवळ आले तसे मी विडा थुकला आणि पिशवीतली ट्रॉफी काढून सरळ मंगलच्या हातात देत बच्चनला म्हणालो बच्चन “जंग जिती हमने।”….

पहिल्यांदा मंगलने माझ्या गालाचा चिमटा घेतला. डोक्यावर हात फिरवत तिने मला छातीशी कवटाळून धरलं. आणि पाठीवर खूप जोरात थाप मारत म्हणाली बघ “मी म्हणलं होतं की नाही तू जिंकणार म्हणून… ” लगेच बच्चनने खांद्यावरचा ताशा कमरेत घातला आणि अंग वाकडं करून नाचून त्याने वाजवायलाच सुरवात केली. मी पण थोडा नाचलोच. त्याला मंगलने थांबवलं आणि म्हणाली “चला जेवण करून घेऊ. मला निघायचं आहे. ” आत्ता तिला कुठे जायचे आहे आम्हाला चांगलं माहीत होतं. मी म्हणालो मी आपल्यासाठी बिर्याणी आणि गुलाबजाम आणलंय. बच्चनपण म्हणाला पण बिर्याणी आणली आहे. मंगल म्हणाली, “असुद्या खाऊ सगळं त्यात काय एवढं. ” आम्ही तिघांनी मिळून तेवढी सगळी बिर्याणी खाल्ली. मला पहिल्यांदा जाणीव झाली की, आपली भूक मोठी आहे आणि जेवनपण भरपूर लागतं आपल्याला. तिघेही पाणी पिऊन आलो. बाकड्यावर बसलो. एवढे सुंदर सेलिब्रेशन आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही. मी डबल विडा मळायला घेतला अर्धा मंगलला दिला. दोघांनी तोंडात बार भरला. बच्चनने बिडी पेटवली आणि म्हणाला वाटलं नव्हतं तुला बक्षिस मिळेल म्हणून.

“नितीन ऐकव ना परत तिच कविता आणि तशीच. ” मी ऐकवली पण खरं सांगू स्पर्धेच्या सादरीकरणापेक्षा खूप उत्तम बोललो. दोघांनीही टाळ्या वाजवल्या.

मंगल निघून गेली तिचं गिऱ्हाईक तिची वाट पाहत होतं याची जाणीव बच्चनला आणि मला होतीच. ती गेल्यानंतर बच्चन आणि मी दोघेच बोलत बसलो. मी म्हणालो “बच्चन ही ट्रॉफी कुठे ठेवायची?” तेव्हा बच्चन म्हणाला, “त्यावर तुझं शाईने नाव लिही आणि मी सांगतो तसं कर. ” मी पेनातील शिस काढून त्यातली शाई बाहेर काढून माझं फक्त नाव लिहिलं. तेवढ्यात महालक्ष्मी एक्सप्रेस फलाटावर दाखल झाली. प्रवासी उतरले काही चढले. गाडी निघाली तशी बच्चनने माझ्या हातातली ट्रॉफी हिसकावून घेतली आणि धावत्या रेल्वेच्या एका डब्यात खिडकीतून मोकळ्या शीटवर टाकली आणि हसत हसत माघारी आला. मी खूप प्रयत्न केला त्याला अडवण्याचा पण त्याने बाजी मारली. मला बच्चनचा खूप राग आला. कमरेखालची भाषा ओठांवर आलेली होती तोच बच्चन म्हणाला “आ बैठ इधर” मी त्याच्या शेजारी बाकड्यावर बसलो तसा बच्चन म्हणाला, “हे बघ ही गाडी गेली. त्यात तुझी ट्रॉफीपण गेली. आता एक दिवस इतका मोठा हो इतका मोठा हो सगळ्या जगात तुझं नाव झालं पाहिजे. मग तुझी ट्रॉफी कुणीतरी स्वतःहून तुला आणून देईल त्यावेळी त्या माणसाचे पाय धर. ” माझ्यासाठी हे सगळं अजब होतं. बच्चन बोलत होता मी ऐकत होतो. ताशा वाजवणारा माणूस मला जगण्याचं कसलं सुंदर तत्वज्ञान सांगून गेला. आणि कशासाठी जगायचं हे शिकवून गेला.

तेवढ्यात मंगल आली. तिचं गिऱ्हाईक वाट पाहून चिडून दुसरीला घेऊन गेलं होतं. ती ही बसली मग आमच्याबरोबर. मला आठवतंय आम्ही रात्रभर झोपलो नाही. गप्पा मारत राहिलो. पहाटे थोडा डोळा लागला. सूर्य उगवायच्या आत फलाट सोडावं लागायचं. आम्ही उठलो बाहेर टपरीवर चहा घेतला. का कुणास ठाऊक पण मी खिशातील पाकीट बाहेर काढलं आणि एक हजार मंगलला आणि एक हजार बच्चनच्या हातात देत म्हणालो, “मंगल तुला एक साडी घे आणि मेकअपचं सामान घे जरा नटून थटून धंद्यावर थांबत जा… आणि रेट वाढवून सांगत जा. ” मी गमतीने हसत बोलत होतो. तिने नकार दिला पण मी जबरीने तिच्या हातात पैसे दिलेच. तिचे पाणावलेले डोळे स्पष्ट दिसत होते. बच्चनला म्हणालो, “तुला एक ड्रेस घे, आणि असा ताशा वाजव असा ताशा वाजव सगळं जग नाचत इथं आलं पाहिजे. ” त्याने नकार बिकार न देता हजार रुपये खिशात ठेवत मंगलला नेहमीप्रमाणे गमतीने बोलला “क्या मंगलाबाय शादी करेगी मेरेसे?” त्यावर कायम शिव्या घालणारी मंगल खूप लाजून लाजून हसली… त्याच धुंदीत पुन्हा विडा मळला. बच्चनने बिडी पेटवली. आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला तो पुन्हा संध्याकाळी तिथेच भेटण्यासाठी..

आज दिवस बदलले आहेत. मी माझ्या संसारात माझ्या नव्या जगात आहे. सहा वर्षांपूर्वी मंगल वारली. दोन महिने ससूनला पडून होती. बच्चन शेवटपर्यंत तिच्याजवळ होता. मी दोनदा भेटून आलो. मला पाहून खूप रडली होती ती. माझाही हुंदका आवरला नव्हता. बच्चनचा हात हातात गच्च दाबून धरला होता तिने. त्यांच्यात एक प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं. मंगल गेली तेव्हा बच्चन खूप रडला होता. तिचं अंत्यविधीचं सगळं मीच केलेलं होतं.

त्यानंतर बच्चनला दोन दिवसात दोनदा जाऊन भेटलो. म्हणलं “काय हवं असेल तर सांग नाहीतर चल घरी माझ्याजवळ राहा. ”तर तो नाही म्हणाला. अंगावर आलेले चांगले कपडे पाहून लांबूनच बोलत होता. मलाच त्याचा राग आला आणि मग “अबे हरामके, मंगलके दिवाने म्हणत त्याला गच्च मिठी मारली. त्याचा निरोप घेतला. नंतर त्याला भेटायला बऱ्याचवेळा गेलो दिसला नाही. जिवंत आहे की नाही माहीत नाही. पण जेव्हा पाऊस पत्र्यावर पडायला सुरुवात होते तेव्हा, आणि माझ्या कवितेवर समोर जमलेले पब्लिक टाळ्या वाजवत राहतं तेव्हा, माझ्या डोळ्यात बच्चन आणि बच्चनचा ताशा नाचत असतो. आणि मंगल मला छातीशी गच्च कवटाळून भिजवत राहते. ही दोन माणसं माझ्या आयुष्यात आलीच नसती तर… माझ्यातला कवी आणि लेखक जन्माला आलाच नसता.

– समाप्त – 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments