श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ दत्तू… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
दत्तुला मी पहिल्यांदा पाहिलं ते कसारा लोकल मध्ये. ढगळ पॅंट.. कधीकाळी ती चॉकलेटी रंगाची असावी.. पण आता विटलेली.. पांढरा मळका शर्ट.. पायात चपला.. उंच.. शिडशिडीत अंगयष्टी.. तांबुस गोरा रंग.. दोन तीन दिवसाची दाढी वाढलेली.. दरवाज्याशीच उभा होता तो. पाठीवर सॅक.. पायाशी दोन तीन पिशव्या.
संध्याकाळची वेळ होती, साहजिकच ट्रेन गच्च भरली होती. मी मुंबईहून येत होतो. आसनगाव स्टेशन जवळ आलं.. उतरणारे दरवाजा पाशी गोळा झाले. त्या गर्दीत दत्तु होता.. अर्थात त्या वेळी मी त्याला ओळखत नव्हतो. दत्तु जवळ खुप सामान होतं. त्या गर्दीतून सामानासकट बाहेर पडणं म्हणजे तसं कठीणच. त्याच्या त्या सामाना मुळे बाकीचे प्रवासी चिडचिड करत होते.. त्याला शिव्या घालत होते.. पण दत्तुला त्याची सवय असावी. त्याचं त्या लोकांकडे लक्षच नव्हतं.
स्टेशन आलं. प्रवाशांच्या लोंढ्याबरोबर दत्तुही बाहेर प्लॅटफॉर्मवर फेकला गेला.. त्याच्या सामानासकट. पण एक पिशवी आतच राहीली.. तो गाडीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, पण लोकल सुटली. ती पिशवी आतच राहीली.
नंतर कधीतरी असंच मुंबईहून येताना तो दिसला. त्या दिवशीच्या घटनेनं तो लक्षात राहीला होता. आणि आज तर तो शेजारीच होता. तश्याच पिशव्या घेऊन. त्याला मी विचारलं.. त्या दिवशी लोकलमध्ये राहीलेल्या पिशव्या मिळाल्या का?
तर नाही.. असं होतं म्हणे कधी कधी. ती गोष्ट त्याने हसण्यावारी नेली. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. दत्तुचं छोटंसं किराणा दुकान होतं आसनगावात. दत्तु पाच वर्षाचा असतांनाच त्यांचे वडील गेले. आई आणि दत्तु उघड्यावर पडले. चार घरचे धुणे भांडी करुन आई बिचारी संसाराचा गाडा ओढत राहीली.
दत्तु शाळेत जात होता, पण अभ्यासात जेमतेमच. दहा बारा वर्षाचा असतांनाच शाळा सुटली. एका किराणा दुकानात काम करायला लागला. झुंबरशेठचं हे किराणा दुकान स्टेशन रोडवरच होतं. सकाळी आठ पासुनच उघडायचं.. ते रात्री नऊ पर्यंत. एवढा पुर्ण वेळ दत्तु त्या दुकानात असायचा. सकाळी साफसफाई करण्यापासून त्याचं काम सुरु व्हायचं.
गेली चाळीस वर्षे दत्तु त्या दुकानात काम करत होता. तसा आता तो दुकानाचा मालकच झाला होता. कारण झुंबरशेठला मुलंबाळं नव्हती. चार पाच वर्षांपूर्वी झुंबरशेठ गेले, आणि दत्तु दुकानाचा मालक झाला. त्या दिवशी ट्रेनमध्ये आमची ओळख झाली. मग ट्रेनमध्येच वरचेवर भेटी होत गेल्या.
तो नेहमी त्याच्या दुकानात बोलवायचा. पण मी टाळायचो. आसनगावला उतरायचं.. त्याच्या दुकानात जायचं.. पुन्हा कसारा लोकल पकडायची.. हे नकोसं होतं.
पण किती वेळा टाळणार ना! एकदा आसनगावला उतरलो, आणि त्याच्या दुकानात गेलो. दुकान छोटंसं होतं, पण गिर्हाइकं चांगली होती. दत्तुला बोलायला फारसा वेळ मिळाला नाही.
तेवढ्या वेळात माझ्या एक गोष्ट लक्षात आली. कितीतरी किरकोळ गिर्हाइकं उधारीवर माल नेत होते.
“मांडुन ठेवा दत्तु भाऊ”
असं म्हणून सामान घेऊन जात होती. पण दत्तु ती उधारी कुठेच लिहुन ठेवत नव्हता. मला आश्चर्य वाटलं. मधुन जेव्हा त्याला उसंत मिळाली, तेव्हा मी त्याला विचारलंच.
“दत्तु.. तु उधारी कुठेच लिहून ठेवली नाही.. हे सगळं लक्षात बरं रहातं तुझ्या. “
“देतात हो आणुन लोकं. आणि जरी नाही आणुन दिली उधारी.. बुडवले माझे पैसे.. मला काही वाटत नाही”
“असं कसं?”
“काय होतं माझ्याजवळ एकेकाळी? दिले.. दिले.. नाही दिले.. नाही दिले. मी नाही विचार करत. जे राहील ते आपलं. “
दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हाच दत्तुचा स्वभाव होता. वास्तविक त्यालाही संसार होता.. बायको होती, एक मुलगा होता. पण दत्तु म्हणायचा..
“पोटापुरतं मिळतंय ना ! बस्स.. “
तेवढ्यात एकजण बारीक तोंड करून दत्तुच्या दुकानात आला.
“दत्तु भाऊ.. पोराच्या उलट्या थांबतच नाही ओ.. “
“मीठ पाणी द्यायला सांगितलं ना तुला?
“दिलं वं.. सगळं केलं.. “
दत्तुने आतल्या खोलीत डोकावून बायकोला हाक मारली..
“सुमे.. जरा वेळ बस.. आलोच मी.. “
आणि घाईघाईत तो त्या माणसासोबत निघून गेला. त्याची बायको दुकानात आली. मी तिला विचारलं..
“आता हा दत्तु तिथं जाऊन काय करणार?”
“हे असंच असतं त्यांचं.. दुकानात बुड काही ठरत नाही.. आता ते त्या पोराला दवाखान्यात घेऊन जातील.. सलाईन बिलाईन.. औषधं.. सगळं मार्गी लावतील.. आणि मगच दुकान आठवेल त्यांना. “
दत्तुला यायला बराच वेळ लागणार.. म्हणून मग मी त्याच्या बायकोचा निरोप घेऊन निघालो.
दुकानातील माल आणण्यासाठी दत्तु वरचेवर मुंबईला जायचा. अनेकांची मुंबईत कामं असायची. ते लोक बेलाशक दत्तुला सांगायचे.. दत्तु, येताना हे आणि.. ते आण.. आणि दत्तूही त्यांची ती कामं करायचा.
दत्तुचा माझा परीचय वाढला.. त्याला भेटलं की मला पु. लं. चा परोपकारी गंपु आठवायचा. गंपु जसा उठसूठ याला त्याला सल्ले द्यायचा.. तसंच दत्तुचं. मुंबईला तो वरचेवर जायचा. त्यामुळे साहजिकच एक जाणतेपण त्याच्याकडे आलं होतं. गावात कुणाकडे लग्न निघालं की दत्तुची धावपळ बघावी.
मंगल कार्यालयाच्या बुकिंग पासुन दत्तुचं मार्गदर्शन सुरु व्हायचं. केटरर कोणता निवडावा.. आदल्या दिवशी काय मेनु निवडायचा.. लग्नाच्या दिवशी ताटात कोणते पदार्थ असावेत हे दत्तुचं ठरवायचा.
साड्या घ्यायच्या ना.. हं ते कल्याणचा रूपसंगम आहे ना.. तिथुनच घ्या…. शालुची खरेदी? ती मात्र दादरला करा….. असं सुचवणं चालू व्हायचं.
बरं हे सगळं निरपेक्ष वृत्तीने. दुकान सोडून तास तास दुसऱ्यासाठी भटकायचा.. पण या सगळ्यात एक रुपयाची अपेक्षा त्यानं कधी ठेवली नाही. उलट आपल्या माणसाचे पैसे कसे वाचतील हीच त्याला चिंता.
आणि अशा या चिरतरुण दत्तुची पन्नाशी आली हे मला कधी कळलं.. तर त्याच्या बायकोचा फोन आल्यावर. गावातल्या लोकांनी आपल्या दत्तुचा पन्नासावा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. दत्तुला याची अजिबात कल्पना दिली नव्हती. त्याच्या बायकोला आणि मुलाला विश्वासात घेऊन हा कार्यक्रम ठरवला होता. मला फोनवरून आमंत्रण आले.. जाणं आवश्यक होतं..
त्या दिवशी मी दत्तुची खरी श्रीमंती पाहीली. गावातले सगळ्या थरातले लोक घरचा कार्यक्रम असल्यासारखे जमले होते. स्टेजवर मोठं होर्डिंग.. त्यावर दत्तुचा फोटो.. त्याखाली गावातील कोणत्या तरी कवीने अभिष्टचिंतनाच्या चार ओळी लिहिल्या होत्या. स्पीकरवर सनई चालु होती.. मध्यमागी असलेल्या गुबगुबीत सोफ्यावर दत्तु आणि त्याच्या बायकोला बसवलं होतं. दोघांच्याही गळ्यात फुलांचे जाडजूड हार होते. दोघं बिचारे बुजुन गेले होते. लोक येत होते.. शुभेच्छा देत होते.. कोणी भेटवस्तू देत होते.. कोणी पाकिट देत होतं.. बुफेसाठी लागलेली रांग कमी होत नव्हती.. सगळीकडे आनंदीआनंद होता.
एक व्यक्ती गावासाठी काय करु शकते..
आणि गाव एखाद्या व्यक्तीसाठी काय करू शकतं..
याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खरंच छान! निरपेक्ष दिलेले कुठल्या तरी रुपाने वापस मिळतेच.