सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ हार्मोनल फेन्सिंग… (अनुवादित कथा) हिन्दी लेखक : श्री प्रबोध कुमार गोविल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ. रसबाला कोड्यात पडल्या होत्या. त्यांच्या एकवीस वर्षाच्या करियरमध्ये अशी एकही केस आली नव्हती. ना भारतात, ना जमैकामध्ये. त्यांच्या पतीचा पोस्टिंग जमैकामध्ये झाल्यानंतर त्याही तिथे राहिल्या होता आणि जवळ जवळ सात वर्षे त्यांनी तिथे प्रॅक्टीस केली होती. कुठल्याही पेशंटशी बोलताना आत्तापर्यंत त्यांनी पावणे चार तासांपेक्षा कधीही जास्त वेळ घेतला नव्हता. आणि आता या देखण्या युवकाबरोबर चार तास बोलल्यानंतर त्या गोंधळात पडल्या होत्या, की याला पेशंट म्हणावं की न म्हणावं.. नो ही इज नॉट ए पेशंट. ही कांट बी. या पेशंटबरोबर चाललेल्या चार तास चौकशीच्या दरम्यान, त्यांनी नऊ वेळा तरी डॉ. सनालीला फोन केला होता. डॉ. सनाली त्यांची बॅचमेट होती आणि प्रत्यक्षात तीनेच ही केस रिफर केली होती. सनालीने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रसबालाकडे या युवकाला पाठवण्यापूर्वी चार-पाच वेळा स्वत:च या युवकाची तपासणी केली होती.
युवकाला असं वाटू नये, की डॉक्टरांचं एखादं रॅकेट पैसे उकळण्यासाठी त्याच्या भावनांशी खेळतय, या भीतीने सनालीने त्याच्याकडून फक्त एकाच वेळचे पैसे घेतले होते. नंतर तिच्या मनात असंही आलं की एकदा घेतलेली फीदेखील परत द्यावी. पण यामुळेदेखील त्याच्या मनात संदेह निर्माण झाला असता, म्हणून तिने सगळ्या गोष्टी रसबालाला सांगून त्याला तिचाकडे पाठवले.
त्या युवकाचा नाव सौरभ होतं. डॉ. सनालीकडे येण्यापूर्वी जवळ जवळ दोन महीने तो जिममध्ये जात होता. ही जीम सनालीच्या नर्सिंग होमच्या परिसरात होती आणि तिचे पतीच ती चालवत होते.
सौरभने जेव्हा ती जीम जॉइन केली, तेव्हा पहिले दोन आठवडे सगळं ठीक ठाक चाललं. या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच सौरभनेदेखील तिथे ठेवलेल्या उपकरणांची माहिती घेतली आणि प्रॅक्टीस सुरू केली. पण हळू हळू जीमचे संचालक, जे कोचही होते, त्यांनी नोट केलं, की सौरभ इतर मुलांप्रमाणे एक्सरसाईज करत नाहीये. त्याचे लक्ष केवळ आपली छाती फुगवण्याच्या एक्सरसाईजवर केन्द्रित झालेलं आहे.
सौरभ एका कंपनीत नोकरी करत होता. विवाहित होता. आपल्या ऑफीसनंतर बाईकवरून जिमला येत होता. वय होतं जवळ जवळ चोवीस. कोचाला वाटलं, याला बहुतेक सैन्यात किंवा पोलीसमध्ये नोकरी करायची असावी. म्हणून चेस्ट इम्प्रुमेंव्हेंटसाठी प्रयत्न करतोय. कोचने एकदा त्याला सांगितलं, ‘पळण्यासाठी मजबूत पिंढर्या आणि स्नायुंची मजबुती आवश्यक आहे. इकडेही लक्ष दे, नाहीतर असंतुलीत ग्रोथ होईल.
सौरभने यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो आपल्या आभ्यासाला लागला. एक दिवस मसाज करणारा मुलगा संचालकांना म्हणाला की हा सौरभ लेडीज क्रीमने मसाज करण्यावर जोर देतोय. तेव्हा त्यांचं डोकं ठणकलं. त्यांना नंतर असंही कळलं, की महिलांसाठीची ही महाग क्रीम सौरभ स्वत:च विकत आणून देतो. संचालकांनी एकदा सौरभला आपली डॉक्टर पत्नी सनालीला भेटायला सांगितलं. तिने सौरभची इच्छा जाणून त्याला हार्मोन ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. तिने सौरभला सांगितले, की कधी कधी मुलांच्या शरिरात हार्मोन्सच्या असुंतलनामुळे मुलींसारखा लुक आणि इच्छा दिसू लागतात. त्यामुळे त्याला औषधे आणि इंजक्शन्स घेऊन आपले शरीर पुष्ट करायला हवे. पण तिला जेव्हा कळले, की सौरभ स्वत:च आपली छाती महिलांप्रमाणे वाढवू इच्छितो, तेव्हा ती थक्क झाली.
तिने सौरभला वक्ष वाढवणारी औषधे आणि इंजक्शन्स दिले, मात्र तिच्या मनाला ही गोष्ट पटली नाही. अखेर ती डॉक्टर होती. तिला वाटलं आपल्या पेशाची जबाबदारी यापेक्षा किती तरी मोठी आहे. एका रोग्याला एका रोगातून बाहेर काढून दुसर्या रोगाकडे जाणून बुजून ढकलण्याचा आपल्याला काहीही हक्क नाही. त्यांनी सौरभला समजावलं की त्याने आपल्या व्यक्तिमत्वाशी असे खेळ करू नयेत. तो चांगल्या उंचीचा – बांध्याचा, चांगल्या परिवारातला स्वस्थ युवक आहे. तो का आपली छाती बायकांप्रमाणे वाढवू इच्छितो? मुलं जेव्हा छाती वाढवतात, तेव्हा सार्या शरीराची मजबुती आणि स्वास्थ्य इकडे लक्ष देतात कारण त्यांना सेना, पोलीस यासारख्या सुरक्षेसंबंधीच्या सेवाकार्यात जायचे असते. छत्तीस इंच छाती पुरुषोचित पद्धतीने वाढलेलीच चांगली दिसते. त्याबरोबर पुरं शरीर तंदुरुस्त वाटू लागतं.
डॉक्टर सनाली म्हणाली, ‘आपल्याला माहीत आहे शरीरातील हार्मोनल गडबडीमुळे ज्या युवकांची छाती आशा पद्धतीने वाढते, त्यांना किती शरम वाटते. घट्ट कपडे घालून ते ती लपवण्याचा प्रयत्न करतात. ’
सौरभ काहीच बोलला नाही, पण त्याने असाही संकेतही दिला नाही की डोक्टरांचं बोलणं त्याला समजलय आणि तो त्याच्याशी सहमत आहे. डॉक्टरांनी ही गोष्ट निसर्गाचा प्रकोप आहे, असं मानलं. तिला आठवलं मागे एकदा एक पोलीस अधिकारी बघता बघता स्त्रीची वेशभूषा धारण करून तिच्याप्रमाणे वागू लागला होता. शरिराची ही विचित्र माया कुणाला कळणार? त्यांनी सौरभला अनुभवी मनोचिकित्सक डॉ. रसबालाकडे पाठवलं. एका युवकाला जाणून बुजून आजारी मानसिकतेच्या रस्त्याने जाऊ दिलं, या अपराधबोधाचं ओझं ती वागवू इच्छित नव्हती.
डॉ. रसबालाला हे ऐकून आश्चर्य वाटलं, की तो आई – वडलांच्या बरोबर रहातोय आणि त्याला एक दीड वर्षाची मुलगी आहे. त्याच्या पत्नीबद्दल विचारताच तो एकाएकी गप्प बसला. त्याचे डोळे भिजलेल्या हिर्याप्रमाणे चमकून सजल होऊ लागले.
‘इज शी नो मोअर…. ’ डॉटरांनी विचारले.
…………..
‘हं… बोला ‘
‘गेल्या वर्षी एका दुर्घटनेत ती गेली. माझे आई-वडील माझा दूसरा विवाह करू इच्छितात. पण मी माझ्या मुलीचं पालन पोषण करू इच्छितो. ’ सौरभ म्हणाला.
‘मग आई-वडीलांचं ऐका. ते बरोबर बोलताहेत. ’
‘पण मी माझ्या मुलीला काहीच नकली किंवा दुय्यम दर्जाचं दिलेलं नाही. जर मी तिला योग्य आई देऊ शकलो नाही, तर माझी दिवंगत पत्नी मला मुळीच माफ करणार नाही. ’
डॉ. रसबाला म्हणाली, पण यासाठी आणखीही मार्ग आहेत. तुम्ही विवाह करू नका. मुलीचं पालन पोषण करा. तिला शिकवा, पण तुम्ही आपली पर्सनॅलिटी का बादलू इच्छिता?… इट्स स्ट्रेंज… ’
‘आपल्याला माहीत नाही डॉक्टर, रात्री माझी मुलगी माझ्याजवळ झोपते. झोपेत प्रेमाने ती आपला हात माझ्या छातीवर ठेवते. त्यावेळी मला स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. पण…. ’
‘पण काय?’ डॉ. रसबालाने विचारलं.
‘पण कधी कधी ती झोपेत अतिशय घाबरते. माझ्या छातीवर हात ठेवताच कधी कधी तिला याची जाणीव होते की तिची आई तिच्याबरोबर नाही. ती घाबरते आणि झोपेत ती माझ्यापासून दूर जाते. मी तिच्या भावी जीवनासाठी तिच्या मनात एक हार्मोनल फेंसिंग बनवू देऊ इच्छितो. एक कुंपण, जिच्या आत ती स्वत:ला सुरक्षित समजेल……
डॉ. रसबाला आपल्या सीटवरून उठली आणि तिने सौरभला हृदयाशी धरले आणि दुसरीकडे तोंड फिरवून रुमालाने आपले डोळे टिपले.
सौरभ जेव्हा केबीनचं दार उघडून वेगाने बाहेर पडला, तेव्हा बाहेर बसलेला सहाय्यक हे पाहून आश्चर्याने थक्क झाला, की चार तास डॉक्टरांकडून इलाज करून घेऊन, पैसे न देताच हा माणूस निघून जातोय आणि डॉक्टरांनी निळा दिवा लावला नाही, जो डॉक्टर नेहमी फी घेण्यासाठी संकेताच्या स्वरुपात लावतात.
☆☆☆☆☆
मूळ हिन्दी कथा – ’हार्मोनल फेंसिंग‘
मूळ लेखक – श्री प्रबोध कुमार गोविल
मो. 9414028938
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूपच हृदयस्पर्शी