श्री संजय जगन्नाथ पाटील
☆ “स्मरणाचं गच्च जावळ…” – भाग – २ ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील ☆
(घरात तर सुतक पडल्यागत.. कुणाच्याच तोंडात घास गिळवला नाही..
मेंढपाळानी माळ सोडलेला…
पुढचा मुक्काम कुठं असंल कुणास दखल… ।) – इथून पुढे —-
मी चिडी ला आलेलो…
शाल्या नाही हे सहन होत नव्हतं…
सकाळीसकाळी सायकलवर टांग टाकली.. आजूबाजूच्या पंचवीस तीस किलोमीटरच्या शेतारानातनं, पायवाटेनं, वड्या वघळीतनं वाट दिसंल तिकडं सायकल दामटली…
मेंढपाळांच्या राहुट्या धुंडाळल्या.. वाड्या वस्तीवरचं एक एक कुत्रं बघत फिरलो.. हाकारे घातले..
शाल्या कुठंच नाही.. पाळीव कुत्रा जाईलच कसा.. ? निराश होऊन परतलो…
दुसऱ्या दिवशी दुसरी दिशा.. दुसरी गावं..
उपाशीपोटी प्रचंड वणवण.. कुठंतरी शाल्या नजरेस पडेल.. पण पदरी निराशाच..
कुणी म्हणायचं, ” या दिशेनं मेंढरं गेली बघा.. ” कसलाही विचार न करता तिकडं निघायचो..
दिशा कळायच्या बंद झालेल्या..
संध्याकाळ झाली की थांबायचो.. निराशेनं प्रचंड थकवा यायचा.. पुन्हा माघारी.. दारात अण्णा वाट बघत असायचे.. एकटाच येताना बघायचे.. निमुटपणे मागं वळायचे..
कुणीसं सांगितलं म्हणून पार दंडोबाच्या डोंगरापर्यंत पल्ला मारलेला.. एका ठिकाणी रानात मेंढरं दिसली.. राग आवरला नाही.. तिथल्या मेंढपाळाना म्हणालो..
” जर माझा शाल्या मला मिळाला नाही तर बघा.. भोकशीन एकेकाला.. “
धमकी देतानाच गळा दाटून आलेला.. डोळे गच्च भरून आलेले.. हुंदका फुटला.. रडतंच निघालो..
धनगरं अवाक झालेली…
नंतर आशाच सोडली….
शाल्या सोडून गेला आता तो परत येणार नाही अशी समजूत करून घेऊ लागलो.. घरात सुतकाचा सन्नाटा बरेच दिवस होता..
” मालकानू ss ”
एक दिवस दुपारचीच हाक आली.. दारात एक धनगर म्हातारबुवा.. डोकीला मुंडासं.. हातात काठी.. बरोबर दोरीला बांधून शाल्या.. मी झडप घातली…
” आमच्या कळपात आलतं.. तकडं सोयरं भेटलं.. तुमी हुडकतायसा सांगितलं.. घ्यून आलुया.. “
चौकशी केली तर कळलं म्हातारा पंचवीस तीस किलोमीटर चालत आलाय.. आला, तसा झाडाबुडी चवड्यावर बसला.. घटाटा पाणी प्याला.. मला त्याची कीव वाटतेली..
” पाळलेलं कुत्रं तुमच्या मागं कसं आलं ?” मी त्याला विचारलं..
तो सांगू लागला…..
” लगट.. मालक लगट वं… लय वंगाळ..
मेंढराच्या कातडीचा वास कुत्र्याच्या नाकात बसला की भली भली धुंदावत्याती.. शेळीचं दूध प्याला दिलं की त्याची चटक लागती…. माणूस काय आन् जनावर काय, सारखीच की… मग आपसूक मागंमागं येतंय.. हाकाललं तरी मेंढरा मागं वड करतं.. मेंढरा मागं मेंढरू हुतं… अशी अंगचटी बघा.. “
म्हाताऱ्याचा हा अनुभव मला नवाच होता…
शाल्याला दोन दिवस बांधून ठेवला.. मग मोकळा सोडला..
पुढं आसक्ती चं वर्णन करताना धनगराच्या त्या ओळी कवितेत आबदार उतरल्या..
भरारा माझ्या डोळ्यासमोर सगळी चित्रं दिसू लागलेली..
पुढं काही वर्षात शाल्याला खरूज लागली.. सगळ्या अंगभर जखमा झाल्या.. त्याच्या अंगावरची केसं पुंजक्या पुंजक्यानं झडू लागली.. रात्रभर वेदनेनं व्हिवळायचा… स्वतःचं अंग, पाय कचाचा चावायचा.. जोरजोरात डोकं झिंजाडायचा.. त्याला वेदना सहन होत नव्हत्या.. आम्हाला बघवत नव्हतं.. उपचार केले.. पण फरक नाही…
खंगत गेला हाडाचा नुसता सापळा उरला.. डॉक्टर म्हणाले घरात ठेवू नका..
रात्री घराबाहेर काढलं की दार खराखरा वाजवायचा.. हाक मारल्यासारखा आवाज द्यायचा.. आम्ही डिस्टर्ब झालेलो.. काहीच कळत नव्हतं… ठरवलं, कुठंतरी याला दूर सोडून यावं….
रात्री दहाची वेळ..
काळजावर दगड ठेवला.. ” चल शाल्या.. ” म्हणालो आणि सायकलवरून निघालो.. आज्ञाधारकपणे तो शब्दाला मान देऊन माझ्या मागं धावत येतेला..
मी वळून वळून पाहायचो… तो जीवाच्या आकांतानं शक्ती एकवटून मागं येत होता.. घरापासून दूर धामणी रस्त्याला माझा मित्र अरुण थांबलेला… एमएटी गाडी घेऊन… आदल्या दिवशी तस ठरलं होतं.. मी सायकल बाजूला लावली.. खिशातलं बिस्किट त्याच्यासमोर धरलं.. त्यानं ते मान वर करून फक्त हुंगलं.. खाल्लं नाही…..
काळीज फाटल्यागत झालं.. त्याला डोळे भरून पाहिलं.. मेलेल्या डोळ्यांनं तो माझ्याकडं पहात होता.. निर्विकार….
मला भडभडून आलेलं… गाडीवर मागं बसलो. अरुणनं गाडी भन्नाट पळवली… त्याला कुठंतरी आड बाजूला चुकवायचं होतं.. शक्ती नसलेला शाल्या मागं उर फुटंस्तोवर धावत होता.. आडवी तिडवी गाडी मारत गल्लीबोळातनं उलट सुलट फेऱ्या मारल्या.. शाल्या मागं पडलेला पाहून गाडीचा वेग वाढवला.. गाडी लिमये मळ्यातल्या उसातल्या पायवाटेवर घातली.. तिथून बाहेर पडून धामणीच्या मूळ रस्त्याला बगल देत वाट फुटेल तशी गाडी पळवली… अर्धा पाऊण तास धड उडाल्यासारखं आम्ही बेभान झालेलो.. तिथून उदगाव.. शाल्या कुठं मागं राहिला ते कळलंच नाही.. घरापासून जवळ जवळ वीस-पंचवीस किलोमीटरवर आम्ही त्याला चकवा दिलेला…
कुठं असेल तो ?
काय करत असेल ?
प्रचंड अपराधीपण उराशी घेऊन घरी आलो.. मध्यरात्रीचे बारा वाजून गेलेले– पोटातली भूक मेलेली.. दिवा मालवला..
अंधारात टक्क जागा राहिलो…
उशिरा कधीतरी झोप लागलेली….
सकाळी उठून बाहेर आलो.. पाहतो तर बाहेरच्या वाटेवर शाल्या पाय पसरून पडलेला.. भकाळी गेलेलं पोट भात्यासारखं हापसत होतं.. जीव बाहेर लाळेचे थेंब भुईवर साडतेले.. शाल्या भुईसपाट झालेला…
रात्रीत कसा आला असेल हा ?
इतक्या दूरवरून त्याला घर तरी कसं सापडलं असेल ? किती वणवणला असेल ?
अंधारात वाटेतल्या असंख्य कुत्र्यांनी त्याला कसा फाडला असेल ?
दिशा तरी कशी कळली असेल त्याला ?
आणि का म्हणून तो आमच्याकडे आला असेल ? आम्ही असं वागूनसुध्दा ??
चूक झाली.. माफी कर..
आता कसाही राहूदे.. जे व्हायचं ते इथंच डोळ्यासमोर होऊदे.. आम्ही ठरवलं…..
पुढं एक-दीड महिन्यात तो खंगत खंगत गेला… त्याच्यासाठी बाहेर पोतं टाकलेलं असायचं.. रोज त्यावरच झोपायचा… गेला त्या दिवशी नारळाच्या. झाडाच्या आळ्यात जाऊन झोपला… कायमचा…
जणू जागाच दाखवली त्यांनं…..
रात्रभर खुळ्यासारखा पाऊस कोसळंत होता….
तिथंच खड्डा खोदला… आणि दृष्टी आड केला..
खत झालं त्याचं….
आणि आज असा उठून समोर उभाय.. कवितेतल्या ओळीमागनं…..
स्मरणाचं गच्च जावळ अंगभर लेवून…
अंगचटी आल्यावानी…..
– समाप्त –
© श्री संजय जगन्नाथ पाटील
9422374848
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈