सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ माझी दुर्गा, माझी अष्टभुजा… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

आमची सोळा वर्षाची लेक मृण्मयी, कन्या-लक्ष्मी आहे. असंच समजा नां, आमच्या घरातली दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणजेच देवीच्या अनेक रूपातली ती एक अंश आहे. धोक्याच्या वयातही ती कधीच चुकीचे पाऊल उचलणार नाही, उलट इतरांना धोक्यातून वाचवते.

खडकवासला धरणाचं पाणी सोडल्याचा तो काळाकुट्ट दिवस, आजही माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. खडकवासला धरणातून सुटलेले पाणी थेट आमच्या घरांत शिरल होत. सन सिटी रोड वरच्या, उतारावरच्या, एकता नगर, निंबज नगर सोसायटी, धोक्यात असल्याच्या बातम्या टी. व्ही. वर झळकल्या. बऱ्याच जणांची घरे धुवून निघाली. पाणी आमच्याही घरांत शिरल. आम्ही गांगरलो. बायको माहेरी गेली होती. माझी वयस्कर आई तर मटकन् खालीच बसली. प्रसंगावधान राखून मृण्मयीने पदर बांधला आणि ती अष्टभुजा झाली. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे, कपडे तिने साडीच्या गाठोड्यात बांधल्या. आजीच्या पोथ्या आणि मुख्य म्हणजे तिची औषधे गोळ्यांची पुरचुंडी आजीच्या ताब्यात देतांना नातीनें बजावल, ” आजी ही तुझी इस्टेट नीट सांभाळ”.

थोडी आवराआवर झाल्यावर तिने माझ्याकडे मोर्चा वळवला, ” बाबा आता इकडचं आणि आजीचं मी बघते. तुम्ही आता आपल्या दुकानाकडे बघा. ” 

“अरेच्चा ! खरंच की ! दुकानांत पण पाणी शिरलं असेल. बापरे! मी विसरलोच होतो. वास्तवाचं भान मला आल आणि कापरंच भरलं. अगदी कालच मी दुकानात लोखंडी सामानाचा 80 हजाराचा माल भरला होता. वाटेतला चिखल तुडवत मी दुकान गाठल. तर खालचा कप्पा पूर्ण पाण्यात होता. मी हताश झालो, डोळ्यात जमा झालेले अश्रू ओघळले. आणि पाण्यात मिसळले. दिलाश्याची थाप पाठीवर पडली. आणि लेकीचा आवाज कानावर पडला, ” बाबा दुकानात शिरलेल्या पाण्यात तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची भर कशाला ? ऐका ना! शेजाऱ्यापाजाऱ्यांची, मुलाबाळांची, आजीची व्यवस्था करून आमची टीम आता आपल्या दुकानाकडे वळली आहे. ” इतक्यात उत्साही मुला-मुलींच्या मेळाव्यातून पुढे येत यशपाल हसत म्हणाला, ” काका शांत व्हा. इथे आरामात खुर्चीवर बसा बरं! आणि हे खडकवासल्याहूनच आलेलं पण शुद्ध, आणि घरचं पाणी प्या. आता सगळं आमच्यावर सोपवायचंय. आणि हो! अहो काका, सकारात्मक विचार करायला तुम्हीच तर शिकवलंत ना आम्हाला ?अर्धा पेला रिकामा झाला तरी अर्धा भरलेला आहे, ते बघायचं असत. असं तुमच्याकडूनच शिकलोय आम्ही हो ना? ” घोळक्यातली एक मैना चिंवचिंवली, “अय्या खरंच की! दुकानातला अर्धा माल पाण्यात आहे पण वरचा कप्पा अगदी कोरडा ठणठणीत आहे. काका बघा तर खरं! आपलं खूप नुकसान नाही झालं ” असं म्हणत उड्या मारत ती वानरसेना पुढे सरसावली. इतर कामांचा फडशा पाडून आबाल वृद्धांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था लावून ही ‘गॅंग’ आता आमच्या मदतीसाठी पुढे धावली होती.

पाणी ओसरल. बोल बोलता भिजलेल्या मशीनचे भाग सुट्टे झाले. पुसायला कोरडी फडकी मिळेनात. एक दोघांनी तर मशिन पुसायला अंगातला शर्ट काढला, आणि मशीन्स साफ केली. काही तासातच ओला कारभार कोरडा झाला. आता लोखंडी मालाला गंज चढण्याची भीती नव्हती. नुकसान टळलं होतं, ते वेळीच धाऊन आलेल्या या समाजसेवक तरुणांमुळे, हे मान्य करावेच लागेल. पाण्यामुळे मशीनचा काही भाग निकामी झाला होता, तो मित्रांच्या मदतीने, माझ्या कन्येने गाडीवर घालून जुन्या बाजारात विकला. तिजोरीच्या गल्ल्यात भर पडली. काही दिवसातच दुकान पहिल्यासारखं चकचकीत झालं. आता आलं नवरात्र, नंतरच्या दसऱ्यादिवाळीला मृण्मयी दुकान सजवणार आहे. ती म्हणाली, “बाबा आपण यावेळी फुलांच्या माळा सजावटीसाठी नको आणायला” वर्धमान ओरडला, “अगं मार्केट यार्ड मधून आणूया की आपण फुलं, स्वस्त आणि मस्त मिळतील. ” त्या तरुणाईत इतका सळसळता उत्साह संचारला होता की, मला वाटलं, हा आत्ताच मार्केट यार्ड गाठतोय की काय, त्याला खाली बसवत मृण्मयी म्हणाली, ” ऐक ना वर्धमान! आपण यावेळी लोकरीचेच तोरण आणि माळा आणूया. फुलं काय लवकर सुकतात. आणि कचऱ्यात जमा होऊन डासांची भरती होते. फुलं कुजल्यावर प्रदूषणही वाढतं त्यापेक्षा लोकरीच्या माळा टिकतातही हो कीनाही? आणि अरे आपली संस्कृती, आपली पारंपारिक कलाकुसर, काळा आड लोप पावतीय ना!तिला उजाळा तरी मिळेल. आणि हो लोकरीच्या माळा धुताही येतात. शिवाय प्रत्येक टाक्यात जिव्हाळा असतोच असतो, पण करणारीच्या हाताची उबही त्यात सामावलेली असते आणि निर्मितीचा आनंद असतो तो वेगळाच. ” 

तिचा बोलण्याचा धबधबा आवरतांना, मिस्किल संकेतला चेष्टेची लहर आली तो म्हणाला, ” बरं राहयलं! नाही आणत आम्ही फुलं आणि कागदाच्या माळा सुद्धा नाही आणत. मी बापडा तुळशीबागेतून लोकर आणि सुयांचे बंडलच आणतो. मग आमची मृण्मयी विणकाम शिकेल नंतर मग सावकाश विणत बसेल, आणि मग थोड्या दिवसांवर आलेल्या दसरा दिवाळीसाठी विणकामाच्या सुयांशी लढाई करत करत, माळा विणेल. क्या बात है” l त्याच्या चेष्टेच्या सुरात सगळ्यांचा सूर मिसळला आणि मग काय!हास्याची कारंजी उसळली. मी हा सगळा गंमतीचा मामला कान देऊन ऐकत होतो. नाकाचा शेंडा उडवत गाल फुगवून संकेतला चापट मारत, आमचं कन्यारत्न काहीतरी बोलणार इतक्यात छोटया गजुनी मुक्ताफळ उधळली,

” झाssल! मृण्मयी ताई लोकरीच्या माळा विणायला बसल्यावर, मग काय! पुढच्या वर्षीचाच दसरा दिवाळी उगवेल. “आणि मग पुन्हा हास्याची कारंजी उसळली.

काही वेळापूर्वी निराश झालेला मी खळखळून हंसलो. मित्र-मैत्रिणींना दटावत बाईसाहेब उत्तरल्या, ” ऐका ना बाबा! शेजारच्या सोसायटीतल्या वझे काकू लोकरीच्या माळा खूप छान करतात. त्यांच्या घरातही पाणी शिरलं होतं पण त्यांच्या तयार माळा वरच्या कप्प्यात असल्यामुळे वाचल्या. बाकी इतर नुकसान खूप झालंय त्यांच. त्यामुळे बाबा खूप निराश झाल्यात हो त्या. आपण मदत म्हणून त्यांच्याकडूनच माळा घेऊयात का हो बाबा ?त्यांची थोडीशी नुकसान भरपाई पण होईल आणि नर्व्हस झालेल्या वझे काकू खुशही होतील. बघा पटतंय का तुम्हाला सगळ्यांना? मी डोळे विस्फारून मृण्मयी कडे बघतच राहयलो कालपर्यंत शाळकरी असलेली माझी ही साळुंकी, मनानी, विचारांनी मोठी कधी झाली?ह्या सुखद प्रश्नचिन्हातच मी अडकलो, काही तासांपूर्वी निराशेच्या काळोखात अडकलेल्या माझ्या मनानी, खुशीनें होकार भरला. खडकवासला धरणाच्या पुराच्या पाण्याबरोबर माझी निराशा वाहून गेली. आणि हो! हे सगळं माझ्या लाडक्या लेकीमुळे आणि तिच्या चिरउत्साही चिरतरुण अशा मित्रमैत्रिणीमुळेच घडलं होत. प्रत्येक घराघरांत जाऊन ही ‘गॅंग ‘आशेचा दिवा लावते आणि अंधाराला पळवते. आता दसरा दिवाळी सगळेजण उत्साहाने साजरी करतील. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. पुराच्या पाण्याने चिखलमय झालेला मार्ग त्यांनी त्यांच्या कृतीने सुकर केला होता. आता नव्या उमेदीने आम्ही दसरा दिवाळी आणि पुढील येणाऱ्या वर्षांची वाट पाहत आहोत. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आणि त्याबरोबर धन्यवाद.

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments