श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ वाटणी… भाग – ४ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(“ध्येय आणि जिद्द असली की सगळं जमतं. रमेशचंच बघा ना!किराणा दुकानात साफसफाईचं आणि पुड्या बांधण्याचं काम करणारा रमेश आज क्लास वन ऑफिसर झालाय. ते या जिद्दीमुळेच ना?”) – इथून पुढे —
बैठकीत शांतता पसरली. कुणाला काय बोलावं ते सुचत नसावं. तेवढ्यात आतून शैला वहिनी बाहेर आली
“पण भाऊजी मी काय म्हणते….. “
“एक मिनिट शैला वहिनी. बायकांनी या प्रकरणात सहभागी होऊ नये असं मला वाटतं.
याच कारणास्तव आपण सुरेखा वहिनीला बोलावलेलं नाही. खरं ना?”
शैला वहिनी चुप बसली. मी पुढे बोलू लागलो
“आणि हा जो मी निवाडा केलाय तो फक्त दोन्ही भावांत भांडणं होऊ नये, गोष्टी कोर्टकचेऱ्यांपर्यंत पोहचू नयेत याचकरीता. शेवटी निर्णय बापूकाकांना घ्यायचा आहे “
” योग्य निवाडा केलाये तुम्ही वकीलसाहेब. बापू आता जास्त ताणू नका. मृत्युपत्र ताबडतोब बनवून घ्या. आमच्या सह्या घ्या आणि सगळ्यांना मोकळं करा “एक प्रतिष्ठित बोलले.
” ठिक आहे जयंता बनवून घे मृत्यूपत्र” बापूकाका माझ्याकडे बघत म्हणाले तसा मी माझ्या असिस्टंटला इशारा केला. तो लगेच कारमधून लॅपटाॅप आणि प्रिंटर घेऊन आला. मृत्यूपत्र बनलं. बापूकाकांनी आणि दोन्ही प्रतिष्ठित व्यक्तींनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या.
” उद्या तालुक्याला जाऊन हे मृत्यूपत्र रजिस्टर करुन घ्या. मी माझ्या माणसाला पाठवतो. तो सर्व काही व्यवस्थित करुन घेईल ” मी बापूकाकांकडे पहात म्हणालो. त्यांनी आणि रमेशने होकारार्थी मान हलवली. बैठक संपली.
सगळे निघाले. मीही निघालो.
” चला येतो ” बाहेर उभ्या असलेल्या रमेश आणि योगेशकडे पाहून मी म्हणालो. नेहमी मला निरोप द्यायला बाहेर येणारी शैला वहिनी आज मात्र बाहेर आली नव्हती. मी मघाशी तिला बोलायची मनाई केली होती याचा कदाचित तिला राग आला असावा.
मी घरी पोहचलो. आज बैठकीत काय निर्णय झाला हे सुनंदाला सांगितल्यावर ती म्हणाली
“तुम्ही असा कसा काय निर्णय बदललात?इथून जाण्यापुर्वी तर तुम्ही योगेश भाऊजींनाच सर्व काही देऊन टाकू असं ठरवलं होतंत “
” हो सुनंदा. मी तसंच ठरवलं होतं. पण गावाच्या अलीकडे माझा मित्र शरद मला भेटला. त्याने मला योगेशबद्दल जे सांगितलं ते ऐकून मी माझा हा निर्णय लांबणीवर टाकायचं ठरवलं. तो सांगत होता की योगेश शेतीकडे लक्ष देत नाही. तो सध्या गावातल्या राजकारणात जास्त रस घेतोय. नदीकाठच्या मंदीराजवळ तो आणि त्याचे हे राजकारणी मित्र कामंधामं सोडून दिवसभर एकतर चकाट्या पीटत असतात नाहीतर पत्ते खेळत बसलेले असतात. योगेशला आता सरपंच व्हायचे वेध लागले आहेत त्यामुळे तो या रिकामटेकड्या लोकांबरोबर भटकत असतो. या लोकांमुळेच त्याला गुटखा खाण्याचं आणि दारु प्यायचं व्यसन जडलंय”
“अरे बापरे!”
” शरद खरं बोलतोय का हे तपासण्यासाठी मी मुद्दामच मंदिराकडे गेलो आणि खरोखरच योगेश तिथे पत्ते खेळतांना सापडला. त्याला घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. घराची अवस्था अजूनही वाईटच आहे. घराचे वाटेहिस्से करतांना ते कदाचित विकावं लागेल या भीतीने योगेशची घरासाठी खर्च करायची तयारी नाही हे शरदचं म्हणणं खरं ठरलं. संसाराला हातभार लागावा म्हणून सुरेखावहिनीने शैला वहिनीला महिनाभर आपल्याकडे ठेवून शिलाईचा क्लास लावून दिला. स्वखर्चाने तिला शिलाई मशीन घेऊन दिली. पण ती मशीन धुळ खात पडलीये. शैला वहिनी त्या मशीनकडे ढूंकून पहात नाही. रमेश आणि सुरेखा वहिनी योगेशच्या कुटूंबासाठी नेहमीच धडपड करत असतात. मदत करत असतात. पण योगेश आणि शैला वहिनी त्यांची किंमत ठेवत नाहीत हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी ठरवलं की योगेशला दया दाखवण्यात काही अर्थ नाही. इस्टेटीची वाटणी दोघांना समान करुन द्यायची म्हणजे भांडणाची शक्यताच उरणार नाही. तुला काय वाटतं मी योग्यच केलं ना?”
” तुम्ही म्हणता ते मीही बऱ्याचदा अनुभवलंय. ती सुरेखा नेहमी या दोघांची तक्रार करत असते त्यात तथ्य आहे म्हणायचं. तुम्ही योग्य तेच केलंत”
मृत्यूपत्र रजिस्टर्ड होऊन सोळा दिवसही होत नाहीत तर बापूकाका गेल्याची नकोशी बातमी
रमेशने फोन करुन मला दिली. मी सुनंदाला घेऊन गावी गेलो. अंत्यसंस्कार होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही योगेश माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. बापूकाकांच्या जाण्याचं त्याला नक्कीच दुःख झालं असणार कारण रमेशपेक्षा तो त्यांच्या जास्त जवळ होता. शिवाय तो त्यांचा लाडकाही होता. दुसऱ्या दिवशी एका महत्वाच्या खटल्यात ऑर्ग्युमेंट असल्यामुळे मला नाईलाजास्तव घरी परतावं लागलं. सुनंदा मात्र तिथेच राहिली. तिसऱ्या दिवशीच्या धार्मिक विधीसाठी मात्र मी परत गांवी गेलो. दुपारच्या जेवणानंतर मी निरोप घेण्यासाठी योगेशकडे गेलो. “मी निघतो. काही मदत लागली तर कळव “असं त्याला म्हंटल्यावर त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. मी आणि सुनंदा गाडीत बसून निघालो. थोडं अंतर गेल्यावर सुनंदा म्हणाली
” योगेश भाऊजी तुमच्याशी काही बोलले नाहीत वाटतं?”
” सध्या तो दुःखात असेल. बापूकाकांवर फार प्रेम होतं त्याचं “
” प्रेमबीम होतं ते ठिक आहे. पण दुःख्खबीख्ख काही नाही. आपला राग आलाय त्यांना”
” काय सांगतेस?”
” हो मग!बापूकाका त्यांना पुर्ण प्राॅपर्टी देणार होते आणि तुम्ही ती अर्धी करुन टाकली. मग त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. ती शैलाही माझ्याशी तीन दिवसांत एक शब्दही बोलली नाही. मी काय घोडं मारलंय तिचं?तुम्ही तिला बैठकीत बोलू दिलं नाही त्याचा राग ती माझ्यावर काढतेय. सुरेखाही सांगत होती की योगेश भाऊजी आणि शैला दोघंही तिच्याशी बोलत नाहियेत. वाटण्या झाल्यावर शैला तिच्याशी फोनवर खुप भांडली. सुरेखाने तुमच्या मनात योगेशभाऊजींबद्दल काहीबाही भरवून दिलं असं तिचं म्हणणं होतं”
” कमाल आहे या लोकांची. भांडणं होऊ नये म्हणून दोघांना समान वाटे करुन दिले. तरी त्यावरुनही भांडणं करताहेत. बापूकाकांनी बोलावलं, त्यांनी निर्णय माझ्यावर सोपवला म्हणून मी मध्यस्थी केली. नाहीतर मला त्यांच्या भानगडीत नाक खुपसायचं काही कारण नव्हतं. असो. आता बापूकाका गेले. आता दोघं भाऊ भांडोत की प्रेमाने राहोत आपल्याला काय करायचंय “
नवव्या दिवशी रमेशचा फोन आला. दशक्रिया विधी, गंधमुक्ती आणि उदकशांतीच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण देत होता. मी त्याला म्हंटलं
” रमेश खरं तर निमंत्रण देण्याचं काम योगेशचं आहे. पण तो आणि त्याची बायको आमच्याशी बोलतही नाही. मग आम्ही यायचं तरी कशासाठी?”
” दादा ते आमच्याशीही बोलत नाहीत पण म्हणून आपल्याला आपलं कर्तव्य तर टाळता येत नाही ना? तुम्ही माझ्याकडे बघून कार्यक्रमाला या. तुम्ही आला नाहीत तर बापूंच्याही आत्म्याला शांती मिळणार नाही “
त्याने असं म्हंटल्यावर माझा नाईलाज झाला. इच्छा नसतांनाही मी आणि सुनंदा कार्यक्रमाला जाऊन आलो.
बापूकाका जाऊन तीन महिने उलटून गेले. या तीन महिन्यात ना योगेशचा फोन आला ना रमेशचा. मीही आता सगळं आलबेल झालं या समजुतीने कुणालाही फोन करणं टाळलं. इस्टेटीच्या वादात स्वतःहून नाक खुपसणं म्हणजे मुर्खपणा असतो याचा मी अनेकदा अनुभव घेऊन चुकलो होतो.
एकदिवस संध्याकाळी सुरेखावहिनीचा फोन आला आणि मी धास्तावलो.
” हं. बोल वहिनी. आज बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीस “
” हो भाऊजी. मला तुम्हांला हे विचारायचं होतं की आमच्या वाट्याची प्राॅपर्टी योगेश भाऊजींच्या नावावर करायला काय करावं लागेल?”
ते ऐकून मला धक्काच बसला.
” योगेशच्या नावावर?का गं?अचानक असा धक्कादायक निर्णय का?”
” खरं सांगू भाऊजी ह्यांना तर नाहीच नाही पण मलाही त्या प्राॅपर्टीत कसलाही इंटरेस्ट नव्हता. देवाच्या दयेने आमच्याकडे सगळं काही भरपूर आहे. मात्र बापूंनी आयुष्यभर ह्यांच्यावर जो अन्याय केला तो मला सहन होत नव्हता. ह्यांनी त्या घरासाठी इतकं काही केलं पण बापूंनी त्याची किंमत नाही केली. सतत लहान मुलाचे लाड केले. एखादा बाप असा दोन मुलात भेदभाव कसा करु शकतो या विचाराने माझा संताप व्हायचा. बघा ना त्यादिवशी तुम्ही मध्यस्थी केली नसती तर सगळी प्राॅपर्टी बापू योगेश भाऊजींना द्यायला निघाले होते. मग संताप येणार नाही तर काय?”
” तुझं म्हणणं बरोबर आहे. पण अर्धा हिस्सा मिळाल्यानंतर आता परत करायचं काय कारण?”
” भाऊजी परवा शैला आणि योगेशभाऊजी शैलाच्या तपासणीसाठी आमच्याकडे आले होते “
“का काय झालंय शैलाला? आणि ते तर तुमच्याशी बोलत नव्हते ना?”
“भाऊजी माणसावर संकटं आली की त्याची गुर्मी, ताठा गायब होतो. त्याला बरोबर नातेवाईक आठवतात. गावातल्या डाॅक्टरांना शैलाला ब्रेस्ट कँन्सरचा संशय होता. तो इथल्या डाॅक्टरांनी खरा ठरवला”
“ओ माय गाॅड!मग आता?”
“आता काय!तिला मुंबईला जावं लागणार आहे. केमोथेरपी सुरु करावी लागणार आहे. ऑपरेशन करावं लागेल. लाखो रुपये खर्च होतील. ते दोघं तर ते ऐकूनच खचूनच गेले आहेत. म्हणून मग मीच ह्यांना म्हंटलं की जाऊ द्या आपल्या हिश्शाची प्राॅपर्टी त्यांना परत देऊन टाका. अशीही ह्यांची प्रमोशनवर पुण्याला बदली झालीये. आम्ही सगळेच पुण्याला शिफ्ट होणार आहोत. आमचं असंही त्या प्राॅपर्टीकडे लक्ष देणं होणार नाही. मग कशाला तिचा मोह करायचा?”
“पण तरीही वाट्याला आलेली तीसचाळीस लाखाची इस्टेट अशी सोडून देणं तुम्हांला चुकीचं नाही वाटत?”
“असं बघा भाऊजी देव आपल्याला जन्म देतांनाच स्वभावगुणांची वाटणी करत असतो. कुणाला तो स्वार्थ, मत्सर, लोभ, बेजबाबदारपणा देतो तर कुणाला परोपकार, चांगुलपणा, निस्वार्थीपणा. देवाने अशी स्वभावगुणांची वाटणी करतांना ह्यांच्या वाट्याला प्रेम, दयाळूपणा, निस्वार्थीपणा, कर्तव्यपरायणता हे गुण दिलेत. मी माझी स्वतःची तारिफ करत नाही पण थोड्याफार प्रमाणात हेच गुण माझ्याही वाट्याला आलेत. मलाही दुसऱ्यांची दुःखं बघवत नाहीत. आणि कुणीही मदतीचा हात मागितला तर मलाही धावून जावंसं वाटतं. त्याच्या उलट शैला आणि योगेशभाऊजींच्या वाट्याला लोभीपणा, द्वेष, निष्क्रियता, दुसऱ्यांकडून फक्त घेण्याची प्रव्रुत्ती हे दुर्गुण दिलेत. जशी ही वाटणी होते तसा माणूस वागत असतो”
” हो बरोबर आहे तुझं. हो पण मग काय आता शैलाच्या ट्रिटमेंटचा खर्चही तुम्हीच उचलणार की काय?”
” हो. आमच्याकडून शक्य होईल तितका उचलू. काय करणार!शेवटी स्वभावाला औषध नसतं. बरं तुम्ही सांगताय ना ती प्रोसेस?”
मी तिला सगळं समजावून सांगितलं. सगळं कायदेशीर काम करुन देण्यासाठी माझ्या एका असिस्टंट वकीलाला पाठवण्याचंही कबूल केलं. तिनं समाधानाने फोन ठेवला तशी माझी नजर समोरच्या गणपतीच्या फोटोवर गेली. सुरेखावहिनीचे शब्द आठवले आणि माणसाला केलेल्या वाटणीसाठी मी देवाला मनापासून हात जोडले.
– समाप्त –
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈