श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ सातारकरची शाळा – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
राम सातारकर दुपारी अकराच्या सुमारास एसटी मधून वडगावच्या स्टॉप वर उतरला, समोरास त्याला एक स्टेशनरी दुकान उघडे दिसले, त्याचे कडे जाऊन मराठी शाळेची त्याने चौकशी केली.
सातारकर – अहो, इथे मराठी शाळा कुठे आहे हो?
दुकानदार – असं दोन मिनिटं मागं चालत जावा, तिथं आंब्याचं झाड दिसल, तिच्या समोर दिसते ती मराठी शाळा.
सातारकर – बर बर.
सातारकर मागं चालत गेला, दोन मिनिटं चालल्यानंतर त्याला एक आंब्याचं झाड दिसलं, पण शाळा कुठे दिसेना. तिथं एका पडक्या घरामध्ये दोन-तीन म्हशी बांधलेल्या दिसत होत्या. सातारकर म्हशींच्या दिशेने पुढे निघाला, तिथे त्याला एक बोर्ड दिसला “जिल्हा परिषद मराठी शाळा, गाव वडगाव ‘. सातारकर च्या लक्षात आले, इथे जवळपास कुठेतरी शाळा आहे. म्हशींच्या बाजूने तो पुढे गेला, तेव्हा त्याला पुढे दोन खोल्या दिसल्या, त्या दोन खोल्यात बारा तेरा मुलं बसली होती, आणि खोल्यांच्या बाहेर 35 36 वर्षाचा एक माणूस उभा होता. त्या माणसाला पाहता सातारकरनं ओळखलं, हेच कुरले सर असणार.
सातारकर – नमस्कार सर, मी सातारकर.
कुरले – बरं झालं की, तुमी आलं न्हवं, तुमचीच वाट पहात व्हतो. आता शालचा चार्ज घेवा आनी मल सोडवा.
सातारकर – एवढे कंटाळला की काय सर?
कुरले – कंटाळलो? ह्या गावात दोन वर्ष ऱ्हाणं, म्हणजे अंदमान शिक्षच की वो (कुरले सात मजली हसला). आता घेवा चार्ज.
सातारकर ने शिक्षणाधिकाऱ्यांच या गावात बदली केल्याचा आदेश त्यांना दाखवला. तसं कुरले नी रजिस्टर वर नोंद केली, आणि आदेश फायलीला लावला.
कुरले – चला सातारकर, तुमास्नी शाळा दाखवतो.
कुरले उभे राहिले, तसे सातारकर पण उभे राहिले, मग या खोलीतून त्या खोलीत जात, कुरले सातारकर ना म्हणाले
कुरले – ही आता तुमची शाळा. चार वर्ग हाईत, चार वर्गात मिळून अकरा मुलं हाईत. पाच मुलगे सहा मुली. पहिली दोन मुलं, दुसरी चार मुलं, तिसरी चार मुलं आणि चौथी दोन मुलं.
सातारकर – बरं ठीक आहे, आता मला तुम्ही राहत होता ती जागा दाखवा. माझी तेथे सोय होईल का?
कुरले – व्हाईल की, तसा आत्मराम काका बरा हाय, तेचि घरवाली बी बरी हाये, दुपारी त्यांची ओळख करून देतो.
सातारकर मग मुलांची चाचपणी करू लागले. पहिलीच्या मुलांना अक्षर ओळखच नव्हती. दुसरीची मुलं पण तशीच. तिसरीतील एक मुलगी मात्र स्वच्छ वाचत होती.
सातारकर – तुझे काय नाव ग मुली?
मुलगी – यशोदा, यशोदा उमाकांत सबनीस.
सातारकर – तुझ्या घरी कोण कोण आहेत?
यशोदा – माझे वडील नोकरी निमित्त मुंबईला असतात. इथे आजी आजोबा आणि आई. आजी आजारी असते म्हणून आई इथे राहिली आहे. माझी आई ग्रामपंचायत सदस्य आहे.
सातारकर – हो का, उद्या मी तुमच्या घरी येतो, तुझ्या आजी आजोबांना आणि आईला मला भेटायचं आहे.
यशोदा – या सर, मी आईला सांगते तसं.
दुपारी कुरले सरांनी सातारकरांना खोली दाखवली. कुरले सरांनी आपल्या दोन पिशव्या उचलल्या आणि सातारकरांनी आपली एक शबनम आणि एक पिशवी तिथे ठेवली. मग दोघे आत्माराम पाटलांना भेटायला गेले.
कुरले – पाटील, आमी चाल्लो, माझी बदली झालीय आमच्या गावी, ह्ये नवीन शिक्षक आलेत बघा, सातारकर.
सातारकरांनी पाटलांना नमस्कार केला, तोपर्यंत पाटलांच्या घरवालीने पाणी आणि गूळ आणून ठेवला होता.
सातारकर – कुरले सरांची तुम्ही जशी जेवणाची व्यवस्था केली, तशीबाची व्यवस्था होईल का तुमच्याकडे?
पाटील – व्हाईल की, आमी दोगच असतो इथं, एक पोरगी लगीन करून गेली, आमच्या घासत तुमचा एक घास. काळजी करू नका.
सातारकर – मला जेवण करायला येतं, पण जेवणात अडकलं की मुलांकडे व्यवस्थित पाहता येत नाही. माझं अजून लग्न झालं नाही, आणि घरून कोण माझ्याबरोबर येऊ शकत नाही.
पाटील – काय बी चिंता करू नका, आमी सकाळ सायंकाळी चा पण देऊ तुमाला.
सातारकरांना खोली दाखवून आणि आत्माराम पाटलांकडे जेवणाचे फिक्स करून दुपारच्या गाडीने कुरले आपल्या गावी गेले
दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर सातारकर यशोदे बरोबर तिच्या घरी गेले. यशोदेने कालच आपले सर उद्या भेटायला येणार आहेत हे सांगितल्यामुळे यशोदेची आई त्यांची वाटच पाहत होती.
यशोदेची आई –या सातारकर सर, कालच इकडे बदलून आलात का?
सातारकर – होय मॅडम, काल आल्या आल्या मी शाळेतील मुलांची चाचपणी घेतली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, इयत्ता तिसरी मधील यशोदा हीच एक मुलगी तिसरी च्या अपेक्षे एवढा अभ्यास करते आहें, म्हणून मी यशोदेला तिच्या घरच्या माणसांबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली तिचे बाबा मुंबईत राहतात, आणि तिची आई आणि आजी आजोबा इकडे राहतात. म्हणून माझ्या लक्षात आलं, यशोदेची आई तिच्या अभ्यासावर लक्ष ठेवून असणार, म्हणून मुद्दाम मी भेटायला आलो.
यशोदेची आई – हो खरंय, माझं माहेर रत्नागिरीचं, घरातील सर्व सुशिक्षित, माझ्या सासूबाई गेली दोन वर्षे बिछान्यावर आहेत, त्यांची शहरात यायची इच्छा नाही, आमची मुंबईतील जागा पण तेवढी मोठी नाही, त्यामुळे मी यशोदेसह इथे राहायचे ठरवले, इथल्या शाळेतील मुलांचा अभ्यास व्यवस्थित नाही, या आधीचे शिक्षक पण इंटरेस्ट घेऊन शिकवत नाहीत, त्यामुळे मीच माझ्या मुलीचा अभ्यास घेते.
सातारकर – वहिनी हे तुम्ही चांगलेच करतात, पण शाळेतील सर्व मुलांनी चांगला अभ्यास करावा असे माझे मत आहे, मी या गावात चार ते पाच वर्ष असेन, तोपर्यंत मुलांच्या अभ्यासात चांगला बदल व्हावा अशी माझी इच्छा आहे. या गावातील जे सुशिक्षित मंडळी आहे, ज्यांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल आस्था आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन हे काम करायला हवे. याकरता मला तुमचे सहकार्य लागेलच, पण अजून ज्यांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल आस्था आहे अशी मला माणसे हवी आहेत.
यशोदेची आई – सर, या गावात सौदागर नावाचे गृहस्थ आहेत, सचिवालयातून निवृत्त होऊन ते आणि त्यांची पत्नी इथे राहतात, त्यांना पुस्तकांची आणि वाचनाची खूप आवड आहे, मुलांसाठी काहीतरी करावे यासाठी त्यांची धडपड असते, पण या आधीचे शिक्षक त्यांना सहकार्य करत नव्हते. आपण त्यांना भेटू.
सातारकर – हो वाहिनी, मी उद्या सकाळी नऊ वाजता सौदागर काकांच्या घरी जातो आणि त्यांना भेटतो.
यशोदेची आई – उद्या मी पण काकांकडे सकाळी नऊच्या दरम्यान जाणार आहे, मी त्यांच्याकडून पुस्तके वाचायला आणत असते, मी आणलेली पुस्तके वाचून झाली आहेत, ती देऊन दुसरी पुस्तके घ्यायची आहेत, तेव्हा तुम्ही उद्या नऊ वाजता येणार असाल तर मी तिथे आहे.
सातारकर – हो वहिनी, फार बरे होईल, उद्या सकाळी नऊ वाजता मी तिथे येतो.
दुसऱ्या दिवशी सातारकर सौदागर काकांच्या घरी पोहोचले, तेव्हा काका आपल्या लायब्ररीत बसले होते, काकांच्या अवतीभवती पुस्तके पुस्तके होते, ताजी वर्तमानपत्रे होती. अनेक अंक होते. यशोदेची आई तिथे उभी राहून पुस्तके चाळत होती.
सातारकर तिथे जाताच, यशोदेच्या आईने त्यांची सौदागर काकांबरोबर ओळख करून दिली.
सौदागर काका – मला काल बातमी कळली, शाळेमध्ये कोणीतरी नवीन शिक्षक आले आहेत म्हणून. मागील शिक्षक मला कधी भेटून आल्याचे आठवत नाही. पण तुम्ही मला भेटायला आलात, खूप आनंद झाला.
सातारकर – होय काका, मी पाच वर्ष तरी या शाळेत आणि गावात असेन. मुलांच्या शिक्षणासाठी इथे काही बदल करावे लागतील. तुमची दोघांची मला मदत हवी. सबनीस वहिनी ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचा पण आपण उपयोग करून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे शाळेची इमारत, सध्याची मुलांची शाळा म्हशीच्या गोठ्यात आहे, आपल्याला ही जागा बदलावी लागेल, जर कुठे चार खोल्यांची पण स्वतंत्र अशी जागा देत असेल, तर शिक्षणाधिकाऱ्यांना मी सांगून ती जागा आपण भाड्याने घेऊ शकतो.
सौदागर काका – अहो भाड्याने कशाला, माझीच मागच्या बाजूला एक लहान बिल्डिंग आहे, त्यात खाली दोन खोल्या आणि वर दोन खोल्या आहेत, शाळेची स्वतःची जागा होत नाही तोपर्यंत माझी ही जागा मी शाळेसाठी फुकट देतो.
सातारकर – हे तर छानच झाले, मी तसे शिक्षणाधिकाऱ्यांना कळवतो.
सातारकरनी शिक्षणाधिकाऱ्यांना नवीन जागेबद्दल कळवले. सौदागर काकांनी शाळेची नवीन इमारत होईपर्यंत आपली जागा फुकट वापरायची परवानगी दिली. एका महिन्यात शाळा सौदागर काकांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या बिल्डिंगमध्ये आली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈