श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ सातारकरची शाळा – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(सौदागर काकांनी शाळेची नवीन इमारत होईपर्यंत आपली जागा फुकट वापरायची परवानगी दिली. एका महिन्यात शाळा सौदागर काकांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या बिल्डिंगमध्ये आली.) – इथून पुढे —–
आता रोजच सातारकर आणि सौदागर काका एकमेकांना भेटत होते, यशोदेची आई सुद्धा अधून मधून तिथे येत होती, एक दिवस सातारकर सौदागर काकांना म्हणाले
सातारकर – काका, तुमच्याकडे एवढी वर्तमानपत्र येतात पुस्तके आहेत अंक येतात, माझी अशी इच्छा आहे की दर शनिवारी मुलानी शाळे ऐवजी इथेच तुमच्या घरी जमावे. तुम्ही मुलांना पुस्तकांबद्दल वर्तमानपत्राबद्दल सांगावे. गोष्टी सांगाव्या. मध्ये मध्ये मी किंवा यशोदेची आई पण त्यांना कथा गोष्टी सांगेल. अशामुळे मुलांना पुस्तकाबद्दल आणि वाचनाबद्दल आस्था निर्माण होईल.
सौदागरकाका – हे फारच चांगले, मला पण मुलांना कथा गोष्टी सांगायला आवडतात, आणि त्यामुळे मुले माझ्या घरी येतील.
पुढील शनिवारपासून शाळेतील मुले आणि सातारकर सौदागर काकांच्या घरीच जमू लागले. सौदागर काकांनी मुलांना विवेकानंदांच्या गोष्टी सांगितल्या. गांधीजींच्या गोष्टी सांगितल्या. सातारकर बाल शिवाजी पासून शिवाजी महाराजांच्या सर्व कथा मुलांना सांगायला लागले. यशोदेची आई रामायणाच्या आणि महाभारतातल्या गोष्टी सांगायला लागली.
मुलांना शाळेत इंटरेस्ट निर्माण झाला. पुस्तकामध्ये त्यांना आस्था वाटू लागली. मुले आता रोजची वर्तमानपत्रे वाचू लागले. लहान लहान पुस्तके वाचू लागली.
एक दिवस सौदागर काका सातारकर आणि यशोदेची आई एकत्र असताना, सातारकर म्हणाले.
“आपल्या मुलांना सारखाच गणवेश मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रीमंत गरीब असा भेद राहत नाही. सर्वांना सारखेच कपडे. या करतात जर कोणी डोनर असेल तर त्या तर तो बघून त्याचे कडून कपडे मिळवावे. ‘
यशोदेची आई म्हणाली, मी सरपंचांना शाळेच्या गणवेशाची मदत करायला सांगते, हल्ली ते माझ्याकडे शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल नेहमी चौकशी करत असतात. आपण त्यांना पण या धडपडीमध्ये एकत्र घ्यावे.
सातारकर – ही चांगली कल्पना आहे, वाटल्यास मी सरपंचांना भेटतो, त्यांची मदत पुढील अनेक गोष्टीसाठी आपल्याला लागेल.
सातारकर दुसऱ्या दिवशी सरपंचांना भेटले. शाळेची प्रगती सरपंच ऐकून होते. स्वतः शाळेतील शिक्षक त्यांना भेटायला आल्याने त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मुलांना गणवेश देण्याची तयारी दाखवली एवढेच नव्हे तर सर्व मुलांना चप्पल देण्याची पण तयारी दाखवली.
सातारकर ने मुलांचे कपडे गावातील शिंप्याकडूनच शोध घेतले. सरपंचांकडून त्याच्यात त्याला पैसे देऊन शहरातून कापड आणायला सांगितले, एवढे का मिळाल्याने गावचा शिंपी सुद्धा खुश झाला. आता शाळेत जाणारी सर्व मुलगी आणि मुली एका ड्रेस मध्ये दिसू लागली. गावातील पालकांच्या पण हे लक्षात आले. शाळेमध्ये चांगले बदल होत आहेत हे त्यांच्या लक्षात आले.
सातारकर ने एकदा सौदागर काकांसमोर कल्पना मांडली. सौदागर काकांनी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी शाळेतील मुलांचे एक एक विषय शिकवावा. म्हणजे आपल्यावरील पण दबाव कमी होईल. सौदागर काकांना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी सातारकरणा सांगितले ” माझ्या पत्नीला गणित शिकवायला फार आवडते, तसेच मला मराठी आणि इतिहास भूगोल शिकवायला फार आवडतो, तुम्ही जर परवानगी दिली तर आम्ही मुलांना हे विषय शिकवू ‘. सातारकर खुश झाले.
सौदागर काकू तिसरी आणि चौथीचे गणित घ्यायला लागल्या. सौदागर काका मुलांचे इतिहास भूगोल आणि मराठी शिकवायला लागले. यशोदेची आई मुलांना इंग्लिश शिकवायला लागली. बाकी सर्व विषयांवर लक्ष ठेवायला सातारकर स्वतः होतेच.
शाळेचे वातावरण बदलले, मुलांना अभ्यासात इंटरेस्ट निर्माण झाला, मुलाची भाषा सुधारली, गणित जमू लागले, इंग्रजीची लिपी पाठ झाली, लिहायला यायला लागली.
तिसरीच्या मुलांपासून सातारकरणी स्कॉलरशिप ची तयारी करून घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्याच वर्षी दोन मुलांना स्कॉलरशिप मिळाली, त्यापैकी एक यशोदा होती. यशोतेच्या बाबांना आजी-आजोबांना खूप आनंद झाला. छोट्या गावात राहून सुद्धा यशोदेचा अभ्यास व्यवस्थित होत होता म्हणून ते खुश होते.
सातारकरांची इच्छा होती मुलांना सायकल चालवायला शिकवावे, पुढे आयुष्यात त्यांना वाहने चालवायला यायची असतील, तर मुला मुलींना यावेळी पासून सायकल चालवता यायला पाहिजे. पुन्हा सातारकर सरपंचांना भेटले. सरपंचांनी एका निधीतून मुलांच्या दोन सायकली आणि मुलींच्या दोन सायकली भेट दिल्या. मुलं आणि मुली सायकल शिकल्या. काही मुलांनी मग सायकल घेतली आणि सायकल वरून मुलं शाळेत यायला लागली.
हें चालू असताना सातारकर वरच्या वर्गाच्या परवानगी बद्दल धडपडत होते, मुले वाढत होती, पाचवीची परवानगी मिळाली, आजूबाजूच्या गावातील मुले पण या शाळेत यायला धडपडत होती, आता सरकारकडून एस्मिन शेख ही अजून एक शिक्षिका मिळाली, ही नवीन पिढीतील असल्याने कॉम्पुटर शिक्षण घेऊन आलेली होती, शिवाय ती चित्राकेलेच्या परीक्षा पहिल्या वर्गात पास झालेली.
सातारकर खूष झाले, शेख बाई मुलांना चित्रकला शिकवायला लागल्या, शाळेत इ्लिमेंटरी ड्रॉईंग ची तयारी सुरु झाली.
आता त्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक या शाळेला ” सातारकरांची शाळा ‘ म्हणु लागले, मुलाला कुठल्या शालला घातलं? म्हंटल की ” सातारकरच्या की, आनी दुसरीकडे कशाला जायचं ‘ आस्स उत्तर यायचं.
शाळेला स्वतःची जागा असावी असे सातारकर ना वाटत होते. सौदागर काकांनी आपली जागा फुकट वापरायला दिली हा त्यांचा मोठेपणा. पण शाळेचे हळूहळू वर्ग वाढत जाणार, तसतसे अजून वर्ग लागतील, त्या दृष्टीने सातारकर यांचे प्रयत्न सुरू होते.
गावच्या सरपंचाकडे सातारकर बोलले, हा तुमच्या गाव आहे आणि तुमची शाळा आहे. तुमच्या पुढच्या पिढीला जर चांगलं शिक्षण हव असेल, तर चांगल्या शाळेसाठी मोठी जागा हवी आहे. त्या दृष्टीने आत्तापासून प्रयत्न करायला हवेत. सरपंचांनी पण अनेकांकडे शब्द टाकला. शेवटी आत्माराम पाटील धावून आले. त्यांनी आपली 20 गुंठे जमीन शाळेकर्ता देण्याचे कबूल केले. आता जमीन तर मिळाली, बांधकाम पुढे करता येईल, असे सातारकर ने मनात म्हटले.
सातारकरणा या गावात येऊन चार वर्षे पुरी झाली होती. त्यांनी बदली फक्त पाच वर्षासाठी मागितली होती. आता सातवीपर्यंत वर्ग सुरू झाले होते. साडेचारशे मुले शाळेत येत होती. सध्याच्या चार खोलीत मुले मावत नव्हती, म्हणून सौदागर काकांच्या घरी पण काही वर्ग बसत होते, शाळेला अजून दोन शिक्षक मिळाले, आता स्टाफ चार शिक्षकांचा झाला,
सौदागर काकांच्या सल्ल्याने गाव मीटिंग झाली. गावातील सर्व मंडळींनी शाळेसाठी बिल्डिंग बांधावयाचे ठरले. सुरुवातीला आठ खोल्यांची बिल्डिंग असणार होती. आणखी खोल्यांसाठी नियोजन करून ठेवण्यात आले होते. पैशासाठी सरपंच आणि इतर ग्रामस्थ जिल्ह्यात फिरले मुंबईत फिरले. मूळ या गावातील पण आता मुंबईत नगरसेवक असलेल्या एका गृहस्थाने शाळा बांधून देण्याचा शब्द दिला. एका महिन्यात भूमिपूजन झाले आणि शाळेचे बांधकाम सुरू झाले.
सातारकर कॉलेजमध्ये असताना हेमल कसा ला जाऊन आले होते. आमटेंच्या त्या शाळेत आदिवासी मुले कॉम्प्युटर आणि टॅब सहजपणे हाताळत होते. सातारकरांची इच्छा होती आपल्या वरच्या वर्गातील मुलांना असे टॅब मिळावे. जेणेकरून ही मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतील. आता शहरातील मुले मोठमोठ्या विद्यापीठांचे क्लासेस आपल्या टॅब वर घेतात आणि यशस्वी अभ्यास करतात. येणाऱ्या काळासाठी “e’बुक वाचणे पण महत्वाचे होणार आहें.
असे सुमारे 25 ते 30 टॅब मिळणे आवश्यक होते. मुलांसाठी असा टॅब देणारा कोणी डोनर मिळाला तर हवा होता.
त्याच दरम्यान गावात जत्रेची धामधूम सुरू होणार होती. जत्रेचे होल्डिंग्स गावात लावले गेले होते. यावर्षी गावात ” माधवी पाटील ‘ हिचा तमाशा आयोजित केला होता. माधवी पाटील हिच्या तमाशाचे अनेक व्हिडिओज व्हाट्सअप फेसबुक वर फिरत होते. या भागातील सुद्धा अनेक तरुण लांबच्या गावात जाऊन तिचे तमाशे पाहत होते. माधवी पाटील हिचा तमाशा गावात होणार म्हणून गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते.
– क्रमशः भाग दुसरा
© श्री प्रदीप केळुसकरदुसरा
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈