प्रा. भरत खैरकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ लोखंड्या… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
लोखंड्या, आपल्या गल्लीमध्ये, गळपु-यात कधीच चोरी करायचा नाही.. तो कुणाच्या धाकदपटशाला ऐकणारा नव्हता. तो पक्का चोर होता. पण चोरी आपल्या एरियात काही करायची नाही. रिस्पेक्टफुल राहायचा, मानाधनाने राहायचा.. गावातले सारे त्याला लोखंड्या म्हणायचे! पंधरा सोळाव्या वर्षांपासून चोरी केल्यामुळे पोलिसांनी पकडून पकडून त्याला कित्येकदा मारमार मारले होते. पण तो लोखंडासारखा मजबूत आणि निगरगट्ट झाला होता. पोलिसांनी मारून मारून त्याचे समोरचे दात पाडून टाकले होते. इतका तो मार खायचा! त्याचं नाव एरियामध्ये लोखंड्या असंच पडलं होतं.. वास्तविक त्याचं नाव अशोक होतं. पण पुढे जाऊन त्याला ‘असक्या’ किंवा अटक होते म्हणून ‘अटक्या’ असेही त्याला म्हणायचे..
असक्याची अंगकाठी दादा कोंडके सारखी होती.. तो दिसायलाही बराचसा तसाच होता.. त्याची कटिंग अगदी दादासारखीच.. चेहरा मात्र थोडासा रुंद होता.
आजीच्या घराला लागूनच त्याचं घर होतं.. आजीच्या घराच्या जाळीच्या खिडकीतून लोखंड्याचं घर आरपार दिसायचं. पण उलट्या बाजूने बघितल्यावर मात्र काहीही दिसायचं नाही. फक्त कोणीतरी उभा आहेस वाटायचं. त्यामुळे लोखंड्याच्या घरी काय चाललं आहे? हे सगळं दिसत होतं.. पण आजी खिडकीत उभे राहू द्यायची नाही. ‘काय त्या चोराचं घर बघायचं?’ म्हणून ती रागवायची! आमच्या खिडकीतून.. त्याची खिडकी आणि पुढचं भलं मोठा अंगण.. असं सगळं आरपार घर दिसायचं!
ज्या दिवशी त्या अंगणात गहू सुकायला टाकले.. त्यादिवशी समजायचं याने रात्री कुणाच्यातरी गव्हावर हात मारला, जेव्हा केव्हा तुरी पसरलेल्या दिसल्या तर समजायचं लोखंड्यानं रात्री कुठेतरी डाळ शिजवली!
आजूबाजूचे शेजारी असक्याकडून हा माल विकत घ्यायचे.. कमी किमतीत हा माल मिळायचा. आणि लोखंड्याही तो साठवून ठेवणे परवडायचं नाही!
कंट्रोलचे गहू घेण्यापेक्षा किंवा ते दुसरीकडे विकून असक्याकडून हे धान्य घ्यायला शेजाऱ्यांनाही परवडायचं!
खिडकीतून पलीकडचं सगळं दिसायचं.. पण आजी खिडकीमध्ये जावू द्यायची नाही. चुकून जर आजीला दिसलो की आपण पलीकडे असक्याच्या घरात बघत आहो तर आपली शामत आली म्हणून समजायची!
तो घराला वर्षातून कितीदा पेंट करायचा माहिती नाही.. कुठून बिचारा एवढे पेंट आणायचा माहित नाही.. दर महिन्याला त्याच्या घराला नवीन रंग दिलेला असायचा.. घर एवढं टापटीप असायचं की कोणीही हे चोराचं घर आहे असं म्हणणार नाही. येऊन जाऊन तो घराला सारखा पेंट करायचा.. घर अगदी चकचक दिसायचं.. महिना दोन महिन्यात घराचा रंग बदललेला असायचा..
त्याच्या घराच्या आतील जिना वेडावाकडा होता म्हणे.. जेणेकरून पोलीस आल्यानंतर त्यांना चकमा देऊन त्याला पळता यावं! त्याने तो स्पेशली बनवून घेतला होता. एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोलिसांनी त्याला सर्व मोह्हल्यामध्ये वरात काढून चांगला फोडून काढला होता! गावात काहीही झालं तरी पहिला टारगेट लोखंड्याच असायचा!
मात्र तोही इतका अट्टल गुन्हेगार होता की सगळ्या वस्तू तो जागच्या जागी रफादफा करायचा.. ह्या कानाची त्या कानाला खबर नाही लागू द्यायचा.. मात्र एरियातील लोकांना माहिती होतं.. ते बऱ्याच वेळा दहशती खाली राहायचे.. कारण हा शेतातीलही उभं पिक रात्री बेरात्री जाऊन कापून आणायचा. त्याच्या भीतीने काहीही कारण नसताना लोक शेतावर जागलीसाठी जायचे! तो अट्टल चोर होता.. रात्री त्याची सायकल वाजली.. की आजी म्हणायची, ” निघाला असक्या ड्युटीवर!”
रात्री चोरून आणलेल्या कोणत्याही मशीन, सायकली, शेतावरचे मोटर पंप, इत्यादी रात्रीच खोल खोल करून रफा दफा करण्यामध्ये लोखंड्याचा हातखंडा होता. कुऱ्हाडी, फावडे, सब्बल, लोखंडी सळ्या, मिळेल तो भंगार त्यातलं काहीही त्याला चालायचं.. रात्रभर त्याच्या घरामध्ये खुळ खुळ खुळ खुळ असा आवाज यायचा. रात्री बारा एक वाजता आणलेला माल पहाटेपर्यंत तोडताड करून व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे काम चालायचे.
तो कधीकधी रात्र- रात्रभर लाकडं तोडत राहायचा.. आरा मशीन वरून चोरलेले मोठमोठे लाकडाचे ओंडके.. तो छोट्या छोट्या तुकड्यात तोडून सरपण म्हणून भरून ठेवायचा ! त्याच्या घराच्या टीनावर भरपूर सारा माल पडलेला असायचा.. जोवर विकायचा जुगाड जुळत नाही.. तोवर त्या वस्तू त्याच्या गच्चीवर पडलेल्या असायच्या.. त्याही फक्त तीन-चार दिवस!
रात्री एकेक वाजता तो टेम्पो बोलावून लाकडं आणि त्या वस्तू रफादफा करायचा.. कुठे पाठवायचा माहित नाही.. पण त्याचा ठरलेला टेम्पोवाला होता.. मागील पंधरा-वीस वर्षापासून त्याचा हाच व्यवसाय होता. आजी त्याच्या आईला म्हणायची “लहानपणी याचे कान टोचले असते, तर असा असक्या निपजला नसता.. “पण आता उपयोग नव्हता. “लहाणपणी वस्तू चोरून आला होता तेव्हा तू मारलं नाही आता रडून काय उपयोग ?असं आजी त्याच्या आईला समजावायची.. पण चोरीच्या भरोशावर त्याने आपल्या बहिणीचं लग्न केलं.. स्वतःचं लग्न केलं.. घर चालवतो म्हटल्यावर त्याची आई पण त्याला काही बोलायचे नाही…
त्याच्या घरी कोणी आल्यावर असं म्हणणारच नाही की ‘हे चोराच घर आहे. ‘इतकं सुंदर घर त्याने ठेवलं होतं. घर जुनच होतं वडिलोपार्जित.. पण इतका चकाचक ठेवायचा की आपण कल्पना करू शकत नाही.
कोणत्याही लग्न समारंभात गेल्यानंतर इतका अपटूडेट आणि खाटखूट जायचा.. की कोणी संशय घेऊ शकणार नाही.. दाढी, कटिंग एकदम खटाखट, एकदम पॉश आणि टॉप टीप असे त्याचे कपडे असायचे. तो जेवण बी करायचा आणि हात बी मारायचा! पण त्याच्या पेहरावावरून कोणीही त्याच्यावर आरोप करू शकत नव्हते.. हे सर्व कार्यक्रम तो शेजारच्या गावांमध्ये करायचा.. आजी बरोबर ओळखायची की “आज असक्यान कुठेतरी डाव मारला!”
आता लोखंड्या थकला आहे.. नातू पणतू झाले आहेत त्याला.. ईवाया -जावयाचा झाला आहे तो. शरीरही आता त्याला साथ देत नाही.. आणि आता तसली कामही त्याला शोभत नाही.. अलिकडे दिवस-रात्र तो चंडीकेच्या मंदिरात पडलेला असतो.. आयुष्यभर केलेल्या चुकांची माफी देवीच्या दारात मागत असतो आणि तिच्यात पायऱ्यांवर आपला जीव जावा अशी त्याची इच्छा आहे..
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈