श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ उल्हास… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
दरवर्षी उल्हास ठरवायचा.. पुढच्या वर्षी नक्की दिंडी बोलवायची.. पण मग वर्ष असंच निघून जायचं.. गावात दिंड्या यायच्या.. मुक्काम करायच्या.. एक दिवस थांबून त्र्यंबकेश्वरकडे निघून जायच्या.. उल्हासचं स्वप्न तसंच राहून जायचं.
नासिकपासून पंचवीस तीस किलोमीटर उल्हासचं गाव होतं. उल्हासला नाशिकमध्ये स्थायिक होऊनही पंचवीस वर्षे झाली होती. पण लहानपणीच्या आठवणी मनात रुतुन बसलेल्या असतातच ना!त्याचे वडील वारकरी.. घरात एकादशीचं व्रत.. एकादशीला त्यांचे बाबा पहाटे लवकर उठायचे.. दिड तास त्यांची पुजा चालायची.. त्यांच्या देवघरात एक शाळीग्राम होता.. त्यावर अभिषेक पात्रातुन संततधार चालायची.. उल्हासच्या मनावर ते दृश्य.. ती पुरुषसूक्ताची आवर्तने कायमची कोरली गेली होती.. बाबांची वद्य एकादशीची निवृत्तीनाथांची वारी कधीच चुकली नाही.. ते संस्कार मनात रुजलेले.
पौष महिन्यात त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची यात्रा असते. गावागावातुन दिंड्या निघतात.. त्यांच्या गावातुनही दिंडी निघायची.. त्याचं पुढारीपण असायचं उल्हासच्या बाबांकडेच. गावातुन दिंडी निघाली की पहिला मुक्काम असायचा नाशिकमध्ये.
आता बाबा नाही.. पण दिंडी निघते.. नासिकला एक दिवस मुक्काम करते.. उल्हासला वाटायचं.. आपल्या गावची दिंडी नासिकमध्ये आली की ती एखाद्या वर्षी आपल्या सोसायटीत एक दिवस रहावी.. पण हे जमणार कसं?तशी दिंडी काही फार मोठी नसायची.. जेमतेम साठ सत्तर माणसं.. पण एवढी माणसं रहाणार कुठं.. कशी?
डिसेंबरमध्ये उल्हासने सोसायटीच्या चेअरमनशी हा विषय काढला. एक रात्र आपल्या सोसायटीत कार्यक्रम करायचा का?चेअरमनने मिटींग बोलावली.. उल्हासचं म्हणणं मांडलं.. कोणी हो म्हणाले.. कोणी विरोध दर्शवला.. पण हो.. ना करता करता ठरलं..
यावर्षी दिंडी बोलवायची.
उल्हास लगेच पुढच्या रविवारी गावी गेला. दिंडी आयोजित करणारी गावची जी मुख्य माणसं होती.. त्यांना रितसर आमंत्रण दिलं. किती माणसं असणार.. त्यात स्त्रिया किती.. पुरुष किती.. गाड्या किती असणार.. किती वाजता येणार.. परत किती वाजता निघणार.. ही सगळी माहिती जाणून घेतली.
नासिकला आल्यावर पुन्हा एकदा सोसायटीची मिटींग झाली.. कार्यक्रमाची आखणी झाली.. जबाबदार्यांचं वाटप झालं..
पण..
.. उल्हास निश्चिंत झाला नव्हता.. त्याने हा सगळा घाट घातला होता.. दिंडी पण त्याच्या गावची होती.. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित पार पडेपर्यंत त्याला चैन पडणार नव्हतं.. एक प्रकारचं दडपण त्याला जाणवत होतं.
उल्हासच्या घरी हे सगळं अजिबात पसंत नव्हतं.. कुणी सांगितलेय नसते उद्योग करायला असंच सुषमा वहीनींचं म्हणणं होतं. पण आता नवर्यानी ठरवलंच आहे तर मदत करणं भाग होतं.
सोसायटीच्या आवारात मांडव घालण्यात आला.. केटररशी बोलुन झालं.. मेनू ठरवला.. आणि तो दिवस उजाडला
उल्हासनं गावी फोन लावला.. दिंडी निघाली होती.. संध्याकाळी पाच पर्यंत पोहोचणार होती.. उल्हास ची धावपळ सुरू झाली.. खरंतर आठ दिवसांपासूनच ही धावपळ चालू होती.. दिंडी अजुन यायची होती.. पण तो आत्ताच थकला होता.. नाही म्हटलं तरी त्याची पन्नाशी उलटली होती.
पाच पर्यंत पोहोचणारी दिंडी प्रत्यक्षात सहा वाजता आली.
दुरुनच ज्ञानोबा तुकाराम.. ज्ञानोबा तुकाराम असा आवाज यायला सुरुवात झाली… टाळांचे आवाज कानावर पडुन लागले.. आणि मग उल्हासचा थकवा गायब झाला.
ढगळ पॅन्ट.. आणि चेक्सचा लांब बाह्यांचा शर्ट हा उल्हासचा वेष.. मुलीनं त्याला सुचवलं होतं..
“बाबा तुम्ही मस्त नाडीचं धोतर आणा.. आणि वर लांब कुर्ता.. छानसा फेटापण बांधा.. दिंडीत असतीलच कुणीतरी फेटा बांधणारे. “
पण उल्हासनं ते उडवून लावलं.. त्याला स्वतःला असला शो ऑफ अजिबात पसंत नव्हता. त्याचा आपला नेहमीचाच ड्रेस.. आणि पायात साधी चप्पल.
गेटवर दिंडीचं स्वागत झालं. सत्तर ऐंशी जण होते.. त्यात वीस पंचवीस महिला. मांडवात जाड जाजम अंथरलं होतं.. त्यावर सगळेजण विसावले. स्टीलचा धर्मास, आणि कागदी कप घेऊन चायवाला फिरु लागला.. गेटपाशी माऊलींचा मानाचा घोडा बांधला होता.. त्याच्या पुढ्यात चारा टाकला.
एका लहान ट्रॅक्टरला गाडी जोडली होती.. त्यावर भगव्या पताका फडकत होत्या. ती गाडी सोडवुन आत आणली.. त्यात पालखी होती. पालखीत चांदीच्या पादुका होत्या.. सोसायटीतील लोक जाता येता पादुकांना हात लावून नमस्कार करत होते.. डोके टेकवत होते.
चहापाणी झालं.. किर्तनाची तयारी सुरु झाली.. उल्हासचा पाय एका जागी ठैरत नव्हता.
.. उल्हासभाऊ त्या पाण्याच्या बाटल्या कुठं ठेवल्या?
.. भाऊ तो स्पिकरवाला अजुन आला नाही
.. भाऊ तो केटरर म्हणतोय.. पुर्या तळुन ठेवलेल्या चालतील का?
जबाबदार्या वाटल्या होत्या.. तरीसुद्धा उल्हासचं लक्ष सगळ्या गोष्टीत होतं..
सात वाजता किर्तन सुरू झालं.. गावातल्या वारकरी शिक्षण संस्थेतील पंधरा बाल वारकरी मागे ओळीत उभे राहिले.. पुंडलिक बुवा म्हणजे गावातले ज्येष्ठ किर्तनकार.. सुंदरसा पांढरा शुभ्र फेटा.. स्वच्छ सदरा उपरणं.. कपाळी विष्णु गंध.. त्यांनी हातात वीणा घेतला.. सुरांवर लावला.. पखवाजावर थाप पडली..
‘जय जय राम कृष्ण हरी’.. मागे उभ्या असलेल्या बाल वारकऱ्यांनी टाळ्यांची साथ दिली..
“नामसंकीर्तन साधन पै सोपे.. जळतील पापे जन्मांतरीची.. “
बुवा निरुपण करता करता रंगुन गेले.. सोसायटीची पंढरी झाली.. अवघं वातावरण विठ्ठलमय झालं..
उल्हासला किर्तन एंजॉय करायचं होतं.. पण असं एका जागी बसून कसं चालेल?पुढची जेवणाची तयारी करायची होती.. साडेआठला कीर्तन झालं.. मग टाळ मृदुंगाच्या तालावर सगळ्यांनी फेर धरला.. काही बायका फुगड्या खेळु लागल्या.. कुणी दोन्ही कान पकडून उड्या मारु लागले..
तोवर पत्रावळी मांडल्या गेल्या.. उल्हास ने तरुण मुलांवर ही जबाबदारी सोपवली होती.. पहीली पंगत वारकऱ्यांची झाली.. मग सोसायटीतले.. रात्री दहा वाजता आपापल्या पथार्या सोडून हळूहळू सगळे झोपी गेले.
पहाटे पाच वाजता दिंडीला जाग आली.. एवढ्या लोकांचं प्रातर्विधी.. स्नान.. आवरणं व्यवस्थित झालं पाहिजे.. लाकडाच्या काटक्या गोळा करून शेगडी पेटवली.. त्यावर मोठी कढई.. कढईत पाणी गरम करून छोट्या छोट्या बादल्यांमध्ये घेऊन कुणी बाथरूममध्ये.. कुणी बाहेरच उभ्या उभ्या डोक्यावरून पाणी घेऊ लागले.
चहाचा थर्मास फिरत होता.. पहाटेच्या गुलाबी थंडीत.. स्पिकरवरुन येणार्या भजनाच्या निनादात वारकरी चहा घेत होते.. सगळा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला होता. बांधाबांध झाली.. कानावर टोप्या चढल्या.. मफलरची गाठ घट्ट झाली.. पालखी मधील पादुकांचे पूजन झाले..
एकामागून एक गाड्या निघाल्या..
‘हेची दान देगा देवा.. तुझा विसर न व्हावा’
ट्रॅक्टरवर असलेल्या दोन स्पिकरमधुन येणारा आवाज दुर दुर जाऊ लागला.. त्या भगव्या पताका… पाठमोरे वारकरी नजरेआड होत गेले.. उल्हासनं पाहीलेलं एक छोटंसं स्वप्न पुरं झालं होतं..
आपल्या बाबांच्या आठवणीने त्याला एकदम गलबलून आलं.. वर आकाशाकडे पाहत त्याने हात जोडले.. भरल्या डोळ्यांनी तो घराकडे वळला.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈