श्री अरविंद लिमये
जीवनरंग
☆ अॅप्रोच – भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- ” मी तिला त्या मुलाचं नाव घेऊन स्पष्टच विचारलं तर उखडलीच ती माझ्यावर. ‘तू कुठल्या युगात वावरतोयस? ‘ असं मलाच विचारतेय. याला लग्न मोडणं याखेरीज दुसरं कोणतं उत्तर असू शकतं सांग ना मला. आता काय करायचं ते मी ठरवलंय आणि ते तुलाही सांगितलंय. ” रोहन म्हणाला.
“काय करायचं ते ठरवलंस पण कसं करायचं ते ठरवायला हवं कीं नको? मी.. आज रात्री.. पुण्याला यायला निघतेsय.. ” नेहाने रोहनला बजावून सांगितलं.)
(“आता बोलायचं बाकी आहेच काय पण? काय करायचं ते मी ठरवलंय, आणि ते तुलाही सांगितलंय.. “
“काय करायचं ते ठरवलंयस, पण कसं करायचं ते ठरवायला हवं नाs? .. की नकोs? ” तिचा तोल सुटत चालला.) – इथून पुढे —
“ठीक आहे. ये.. ” वरमल्यासारखा रोहन शांतपणे बोलला खरा, पण ‘ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल? ‘ या शंकेने नेहा धास्तावलीच. कितीतरी प्रश्न तिच्या मनात गर्दी करू लागले. पूर्वीच्या काळी आपल्यावेळी काळजी फक्त मुलींच्या लग्नाचीच असायची. मुलाच्या लग्नाची काळजी फारशी नसायची. आता मात्र मुलाच्या लग्नाची काळजीच नव्हे फक्त तर एक वेगळंच दडपणही असतं याचा अनुभव आज आपण प्रत्यक्ष घेत आहोत या विचाराने तर तिचं टेन्शन आणखीनच वाढलं. मुली मुलांच्या बरोबरीने शिकू लागल्या, नोकरी व्यवसायासाठी आत्मविश्वासाने समाजात वावरू लागल्या, स्वतंत्रपणे स्वतःचे निर्णय घेऊ लागल्या ही प्रगती म्हणायची की अधोगती? आजपर्यंत कधीच मनात न उभारलेला हा प्रश्न या सानिकाच्या निमित्ताने तिच्या मनात निर्माण झाला. खरं तर त्या दोघांची प्राथमिक पसंती, भेटणं-बोलणं हे सगळं झाल्यानंतर मग दोन्ही घरच्यांनी परस्परांशी चर्चा करून पुढचे सगळे सोपस्कार पूर्ण केले होते आणि अचानक कुणा एका मुलाचा फोन रोहनला येतो काय आणि पत्त्याच्या बंगल्यावर फुंकर मारल्यासारखं सगळं क्षणात कोसळतं काय.. सगळं एखादं दु:स्वप्न असावं असं तिला असोशीनं वाटलं खरं, पण त्याचवेळी पुढं वाढून ठेवलेलं वास्तव या दु:स्वप्नापेक्षाही भयंकर नसेल ना अशी भीतीही वाटत राहिली..!
पुण्यापर्यंतच्या प्रवासात रात्रभरातला एकही क्षण तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. उलट सुलट विचार तिच्या मनात सतत भिरभिरत राहिले होते. साखरपुडा होऊन पंधरा दिवसही झालेले नाहीयेत, पुढच्याच महिन्यातला मुहूर्तही ठरलाय, निरंजनच्या बहिणीकडे आणि प्रियाच्या सासरी अशी दोन्हीकडची केळवणंही झालीयत. निमंत्रणाचे फोन तर सर्वांनाच गेलेत. निम्म्याशिम्या पत्रिकाही पोस्टांत पडल्यात. त्यामुळे लग्न मोडण्याइतकंच हे पुढचं सगळं निस्तरणंही खूप अवघड होऊन बसेल या कल्पनेने ती धास्तावलीच!
रोहन म्हणाला ते सगळं खरंच नेमकं तसंच असेल? सानिका अशी वहावत जाणारी मुलगी असेल? वाटत तरी नाहीय तसं. आपण तिलाच एकदा समक्ष भेटावं कां? बोलावं कां तिच्याशी? थेट तिलाच विचारावं? मनाला या विचारांचा स्पर्श झाला आणि त्या ओझरत्या स्पर्शानेही तिला तरतरी आल्यासारखं वाटलं. यामुळे एक झालं, नेहा रोहनकडे पोचली तेव्हा कालच्यासारखं दडपणाचं ओझं तिला जाणवत नव्हतं. बोलण्याच्या ओघात ती ‘एकदा सानिकाला भेटावं म्हणते’ असं रोहनला म्हणाली आणि तो खवळलाच एकदम.
“तू अजिबात तिचे पाय धरायला जायचं नाहीस बघ. सांगून ठेवतो. ” त्यानं फर्मावलं. ती त्या क्षणी गप्प बसली, पण आता असं हातावर हात ठेवून स्वस्थ बसायचं नाही हेही तिनं मनोमन ठरवून टाकलं. सानिकाला नाही पण तिच्या आई-वडिलांना तरी भेटायला हवंच ना? न भेटून कसं चालेल?
*****
नेहाने दाराची बेल वाजवली. दार सानिकानेच उघडलं. नेहाला अचानक दारात पाहून ती चपापली.
” येऊ..? “
“अं? .. हो.. ” सानिकाच्या मनातली अस्वस्थता लपत नव्हती. घरी बाकी कुणाचीच चाहूल लागली नाही तशी नेहा विचारांत पडली.
” तुम्ही.. बसा ना.. ” मान खाली घालून सानिका म्हणाली. नेहा मनाविरुद्ध बसल्यासारखी अवघडून सोफ्यावर टेकली.
” मी.. मी पाणी आणते… आलेच. “
” नाहीs नको. ” नेहा तुटकपणे म्हणाली. “काय गं? तू घरी सांगितलंयस ना सगळं? म्हणजे नेमकं काय घडलंय ते ठाऊक आहे ना त्यांना? “
” न… नाही.. ” सानिका कसंबसं एवढंच बोलली. आपण असं अचानक आलेलं पाहून ती भेदरलीय हे नेहाच्या लक्षात आलं होतं.
” ठीक आहे. मीच बोलते त्यांच्याशी. तुझ्या आईला बोलाव.? मी आलेय असं सांग त्यांना. “
सानिकांने चमकून वर पाहिलं. तिची अस्वस्थ नजर थोडी गढूळ झाली.
“नाही.. तुम्ही.. तुम्ही आता इथं सांगू नका कुणाला कांही. मी.. मी सांगेन ना.. सांगायचं आहेच मला.. हो.. “
नेहाला सणकच आली एकदम. लग्न म्हणजे खेळ वाटतो कां हिला?
“तू बोलाव तरी आईंनाs” नेहाने फर्मावलं. आता मात्र तिचे डोळे भरून आले. केविलवाण्या भरल्या डोळ्यांनी तिने नेहाकडे पाहिले.
“आत्ता आई नाहीये घरी. ती बाबांना चेकअपला घेऊन गेलीय. “
”हो कां? ” नेहा उपरोधाने म्हणाली. ” बरंs मी थांबते ते दोघे येईपर्यंत. ”
“असं नका करू, प्लीsज.. प्लीज ऐका माझं. बाबा हार्ट पेशंट आहेत. त्यांना खरंच त्रास होईल या सगळ्याचा. म्हणून म्हणते, ऐका माझं. “
“हा विचार तू रंग उधळण्यापूर्वीच करायला हवा होतास. ” आता असं एक घाव दोन तुकडे करण्याशिवाय नेहाकडे तरी दुसरा पर्याय होताच कुठे? सानिका थोडी गंभीर झाली. मनाशी कांही एक ठरवून तिने भरुन येणारे आपले डोळे पुसून कोरडे केले…
” मी कसलेही रंग उधळलेले नाहीयेत. पण तरीही हात जोडून विनंती करते मी तुम्हाला.. हवं तर पाया पडते तुमच्या पण हा विषय निदान आत्ता तरी वाढवू नका. आई बाबा केव्हाही येतील. “
” हे बघ, हे घोंगडं आता मला असंच भिजत ठेवायचं नाहीये. “
“मलाही. ” ती ठामपणे म्हणाली. ” मी भेटेन तुम्हाला. बोलेन तुमच्याशी. “
” माझ्याशीच नव्हे आई-बाबांशीही बोल तुझ्या. मला रोहनकडून सगळं समजलंय. “
” रोहन? ज्याला स्वतःलाच नीट कांही समजून घेता आलेलं नाहीय, तो तुम्हाला काय सांगणार? पण मी भेटेन तुम्हाला. आपण बोलू. त्यानंतर तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा. विश्वास ठेवा माझ्यावर. “
” कधी भेटायचं? आणि कुठे? “
” आई बाबा आले कीं लगेच मी बाहेर पडेन. तुम्ही असाल तिथून जवळच्याच एखाद्या रेस्टॉरंटमधे बसू. “
” मी वाट पहाते तुझी. “
” हो. थँक्स. “
– क्रमश: भाग दुसरा
©️ श्री अरविंद लिमये
सांगली
(९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈