श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “आहे अभिजात तरी ??” ☆ श्री मंगेश मधुकर

प्रसंग एक

सोसायटीच्या वॉचमनची ड्यूटी संपून अर्धा तास झाला तरी बदली वॉचमन आला नव्हता. काही वेळाने दुसरा आला. “सॉरी!!बस चुकली म्हणून उशीर झाला”

“कब से राह देख रहा हू”

“सॉरी म्हटलं ना”

“हररोज कोई बहाना करते हो. कभी तो टाइम पे आओ”

“घरी चाललाय ना. मग गप जा. ”

“कल भी बिना बताए छुट्टी ली. हमको डबल ड्यूटी करनी पडी. ”

“महत्वाचं काम होतं म्हणून दांडी मारली. ”

“दांडी मतलब!!”

“अरे बाबा!!वो मराठी मे बोला”

“लेकीन उसका मतलब क्या?”

“बिनाबताए छुट्टी मतलब दांडी मारना”

“अच्छा ऐसे हमको समझ मे आये ऐसा बोलो ना”

“ठिक है रे बाबा!!महाराष्ट्र इतने साल से काम कर रहे है फिर भी मराठी आती नही. तेरे वास्ते लिये हिन्दी बोलना पडता है. ”

“मेहरबानी”नंतर दोघं हिंदीत बोलायला लागले.

— 

प्रसंग दोन 

एक मध्यमवर्गीय कुटुंब वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या हॉटेलमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावर तिथली भव्यता, अलीशान फर्निचर, चकचकीतपणा पाहून नवरा, बायको आणि मुलगी तिघांचेही डोळे विस्फारले. कोपऱ्यातल्या टेबलावर जागा मिळाल्यावर वेटरनं यांत्रिकपणे स्वागत केलं. “गुड ईव्हनिंग सर, गुड ईव्हनिंग मॅडम”

“मेनूकार्ड”नवरा 

“शुअर सर”वेटरच्या वागण्या-बोलण्यातली आदब कमालीची कृत्रिम होती.

“मेन ऑर्डर नंतर आधी दोन मसाला पापड आणि टोमॅटो सूप टु बाय थ्री घेऊन या” 

“येस सर”ऑर्डर ऐकून विचित्र चेहरा करून वेटर निघून गेला 

“अहो, हे काय केलंत”बायको खेकसली.

“काय झालं”नवऱ्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव.

“कसं बोललात आपण पॉश हॉटेलात आलोय. निदान आजूबाजूचं वातावरण तरी लक्षात घ्यायचं ना. टपरीवर देतात तशी ऑर्डर दिलीत. आता एक शब्द बोलू नका. ”बायकोच्या बोलण्यावर नवऱ्यानं मान डोलावली.

“एक्सक्युज मी”

“येस मॅडम”

“मेन कोर्स का ऑर्डर देना है. आपके यहा अच्छा डिश कौनसा है”

“हमारी सभी डिशेश बेहतरीन है”

“वैसा नही रे बाबा, सबसे बढीया”

“आपको क्या पसंद है”वेटर 

“ऐसा करो. तुम्हारी पसंद कि एक डिश साथ मे एक पनीर मटर और बटर रोटी आणि लवकर लाना”

ऑर्डर घेऊन वेटर निघून गेल्यावर नवऱ्यानं बायकोला विचारलं “एकदम हिंदीत ” 

“हेच तर तुम्हांला कळत नाही. असल्या भारी वातावरणात मराठीत बोलणं फार ऑड दिसतं. लोकं विचित्र नजरेनं बघतात. ” बायकोकडे पाहत नवऱ्यानं कोपरापासून हात जोडले. बायकोला ते कौतुक वाटलं.

—-

प्रसंग तीन

भला मोठा काचेचा दरवाजा ढकलून रामरावांनी बँकेत प्रवेश केला सोबत बायको होती. बॅंकेतलं हाय-फाय वातावरण बघून दोघंही गांगरले. एका काउंटरवर जाऊन रामरावांनी विचारलं “एफडी विषयी कोण सांगेल”

“क्या चाहीये”

“एफ डी!!”

“चार नंबर पे जाइये”

“माझ्या तीन एफडी एकत्र करून एकच मोठी करायची आहे. ”रामरावांनी एका दमात बोलून टाकलं.

“अंकल, हिन्दी मे बताएंगे”काउंटर पलिकडच्या मॅडम.

“का?”

“मुझे मराठी नही आती”

“ठिक है. ”म्हणत रामराव मोडक्या-तोडक्या हिन्दीत बोलायला लागले मधूनच इंग्लिश वाक्य जोडत होते.

“अहो, मराठी समजणाऱ्या माणसाला बोलवायला सांगा”शेजारी बसलेली बायको रामरावांच्या कानात म्हणाली.

“नको. आजकाल सगळ्याच ठिकाणी मराठी बोलणारे असतात असं नाही त्यापेक्षा मीच हिंदीत बोलतो. ”

“असं कसं!!एकतरी मराठी समजणारा असेलच ना. बँक महाराष्ट्रात आहे का अमेरिकेत??बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केरत रामराव बोलत राहिले.

*****  

मराठी भाषा दिन साजरा करण्यासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत सुरवातीला वरील तीनही प्रसंगाचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

“प्रधानजी, हे काय होतं”राजांनी विचारलं 

“वस्तुस्थिती. ”प्रधान.

“म्हणजे”

“स्वतःच्याच घरात पाहुणी झालेल्या मराठीची अवस्था….. ”

“पण का?”

“माझ्याकडं उत्तर नाही. आता आपण पाहीलं. ते प्रातिनिधिक होतं. अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे मराठी बोलणं टाळलं जातं. खास करून शहरी भागात हे प्रमाण प्रचंड आहे. ”

“पण आपलेच लोक असं का वागतात”

“मराठी बोलण्याचा न्यूनगंड किवा डाउन मार्केट वाटतं म्हणून.. ”

“याला जबाबदार कोण?”

“मुद्दाम मराठीत बोलणं टाळणारे आणि मराठीविषयी दिखाऊ अभिमान असणारे, समोरच्याला मराठी येत नाही म्हणून भाषा बदलणारे महाराष्ट्रातले आपण सगळेच.. ”

“मातृभाषेत बोलायची लाज वाटणं हे संतापजनक आहे. कडक नियम केले पाहिजेत”

“काही उपयोग होणार नाही. इतरांना दोष देण्यापेक्षा आपली माणसंच चुकीची वागतात. कोणीही सांगितलं नसताना, बळजबरी नसताना, दबाब नसताना मराठी बोलणं टाळलं जातं. मानसिकताच तशी झालीय. ”

“यावर उपाय??

“शक्य तिथं मराठीतच बोललं पाहिजे. मातृभाषेचा सन्मान केला पाहिजे. इतर भाषांबद्दल आकस नाही. गरजेनुससार वापर जरूर करावा परंतु अतोनात महत्वही देऊ नये. नेमकं तेच होतंय. आपलेच लोक मराठीत बोलणं कमीपणाचं समजतात. म्हणूनच मग वाटतं की आहे अभिजात तरी ??????” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments