सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ एक पिल्लू, बारा अंडी… लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका पिल्लासमोर त्याच्याइतकीच निरागस दिसणारी बारा अंडी सुबकपणे एग कार्टन मध्ये ठेवली होती. पिल्लू माणसाचं होतं, अंडी कोंबडीची होती. पिल्लानं प्रथम काही वेळ ह्या नवीन खेळण्याकडे पाहिलं; नंतर आपल्या छोट्या बोटांनी त्यांना चाचपून बघितलं आणि ग्रीक तत्ववेत्त्याच्या अभिनिवेशानं एक अंडं जमिनीवर टाकलं. त्याचा आवाज, त्याचं फुटणं, त्यातला बलक जमिनीवर पसरणं ह्या सगळ्यांची नोंद घेतली गेली – अगदी क्लिनिकल डिटॅचमेंटने ! उरलेल्या अकरा अंड्याचं स्टॅटिस्टिकस होण्याच्या आत त्या प्रयोगात यशस्वी रित्या व्यत्यय आणण्यात आला आणि पिल्लू वाटी-चमच्यातून निर्माण होणाऱ्या संगीताचा अभ्यास करायला लागलं.

पिल्लाला माणसाच्या जमातीत जन्मल्यामुळे एक नांव ठेवण्यात आलं आणि त्याच्या गोंडस शरीरावर तऱ्हेतऱ्हेचे कपडे घालण्यात आले. स्वतःच्या नावातील ‘र’ म्हणता येण्याआधी पिल्लाला आपल्या अंगातले कपडे काढता यायला लागले. आणि खेळण्यांच्या पसाऱ्यात बसलेलं आणि स्वतःच्या कपड्यांनी जमीन पुसणारं बाळ बघून हसू, वैताग, लोभ अश्या मिश्र भावनांचे तरंग घरात उमटू लागले. घराच्या भिंतींमध्ये एक कोवळीक आली-वेलींची टेन्ड्रिल्स भिंतीचा आधार शोधत वरवर झेपावायला लागलीत की भिंती अश्याच कोवळ्या होत असतील का ?

घरात वाटी-चमच्याचं तर बागेत लॉरेलच्या खुळखुळणाऱ्या शेंगाचं संगीत ! राजानं हत्तीवर (!) बसून प्रजेची खबरबात घ्यावी तशी आजीच्या कडेवर बसून झाडांशी मूक संवाद करणं, हे एक आवडतं काम-आर्याचं आणि आजीचंही ! फुल ही एक स्वतंत्र, संपूर्ण चीज आहे हे कळायला वेळ लागला. पानं आणि पाकळ्या यात जास्त रस. कदाचित पाकळ्या, पानं, आकाशाकडे झेपावणारं बाकीचं झाड आणि त्यानंतर सुरु होणारं आकाश यातील भेद करणाऱ्या रेखा तिला दिसत नसाव्यात. त्याचं प्रतिबिंब तिच्या चित्रकलेत दिसायचं. रुक्ष नजरेच्या वडीलधाऱ्यांना ती गिचमिड दिसायची. हळूहळू ती रेषा आणि आकार काढायला लागली. ह्या रेषा बेदरकारपणे, प्रसिद्ध कलाकाराच्या आत्मविश्वासाने लेदर फर्निचरवर, भिंतींवर उमटायला लागल्या. आपल्या आईकडून भिंती रंगवण्याचं जीन तिनं मिळवलं असणार याची खात्री असल्यामुळे वॉशेबल क्रेयॉन्स आधीच आणून ठेवले होते. या आणि अश्या, फक्त आजी लोकात वावरणाऱ्या जमातीला प्राप्त होणाऱ्या शहाणपणामुळे एग कार्टनमधली अनेक अंडी वाचवली गेली.

ही प्रक्रिया आयुष्यात परत परत होत राहते का ? कुठल्याही नवीन जागी, नवीन देशात-प्रदेशात गेल्यावर प्रथम सगळी गिचमीडच असते आणि नंतर त्यातून आकार उमटायला लागतात. या गिचमिडीचा अर्थ लावायचा असेल तर त्याचा तटस्थपणे अभ्यास करावा लागतो; असा प्रोग्रॅम या पिल्लाच्या हार्ड ड्राइव्हवर आधीच टाकलेला आहे, अशी कौतुक-आश्चर्य मिश्रित जाणीव अनेकदा झाली.

(पण माझ्या हार्ड ड्राइव्हवर असलेल्या या प्रोग्रॅमचं काय झालं? काळाच्या वाळवीनं ग्रासला की काय?)

तटस्थपणा हा अभ्यासू नजरेचा भाग झाला; सतत काहीतरी नवीन शोधण्यासाठी धडपडणाऱ्या शरीराचा नव्हे, याची प्रचिती दिवसभरात अनेकदा यायला लागली. माणूस दोन पायांवर चालू लागेपर्यंत ज्या टप्प्यांमधून जातो त्या टप्प्यांमधून जाताना आर्याची आडनावं बदलत गेली – उदाहरणार्थ, झोपेश्वर, कडपालटे, पालथे, रांगणेकर, बैस, (उभं राहायला लागल्यावर) राजकारणे, आणि धावायला लागल्यावर -चोरे ! या सर्व स्थितीतून जाताना जमीन, पाय, डोळे, यांच्यात बेबनाव झाल्यामुळे डोक्याची आणि गुडघ्याची नारळं आपटून जे संगीत निर्माण झालं, ते ध्वनिमुद्रित करून संकलित केलं असतं तर वादनाचा एक नवीन प्रकार निर्माण झाला असता, यात शंका नाही. पडणे-दुखापती ह्यांचा मनावर व्रण उमटू नये अशी काही तरी पूर्वनिर्धारित योजना असावी; त्यांचे शिकवणारे, शहाणपण देणारे अनुभव झाले. त्यामुळे चालणं, धावणं थांबलं नाही.

ही वृत्ती जन्मभर माणसात टिकती तर कित्येक मनःस्वास्थ्याच्या समस्या उपजल्याच नसत्या.

मनात एक सतत वाहत असणारा, नवीन अनुभवासाठी पाटी सतत कोरी ठेवणारा चैतन्याचा धबधबा

असावा का? हा प्रवाह थांबला की अनुभवांचा ताजेपणा जातो, साचलेपण येऊन सर्व इन्द्रियातून जमा होणाऱ्या माहितीची पुटं जमत राहतात -शेवाळासारखी!

माणसाचं पिल्लू धडपड करत दोन पायावर चालायला लागलं की लगेच त्याच्या गतीत वाऱ्याची गती मिसळावी म्हणून घरातील लहान मुलाला त्याची पहिली सायकल घेऊन देण्यात येते; ही घटना सोन्याचा दागिना घेऊन देण्याइतकीच महत्त्वाची ! ही सायकल सगळं जग पादाक्रांत (चाकाक्रांत!) करू शकते. ही जादू सायकल चालवणाऱ्या मध्येच असते. अंगणाच्या एका टोकाला फीनिक्सच्या आजीचं ( खरं )घर असतं आणि दुसऱ्या टोकाला अहमदाबादच्या(हेमडाबॅडच्या) आजीचं ! मध्येच कुठेतरी डेकेयर (ढे खेय्य), सुपरमार्केट

(छुप्प मारक्के) ही ठिकाणं लागतात. रस्त्यावर दिसणाऱ्या (खरोखरीच्या) झाडांची फुलं तोडून (बुरुन) सायकलच्या बास्केटमध्ये टाकली जातात-आजी, फुयी (गुजरातीत आत्या) इत्यादी प्रेमाच्या लोकांना देण्यासाठी!

रस्त्यात पोलीस थांबवतो-वायुवेगानं सायकल चालवल्याबद्दल ! ( अमेरिकेत रेसिडेन्शिअल एरियातली स्पीड-लिमिट फॉल मध्ये (शरद ऋतूत) गळणाऱ्या पानांच्या गती इतकीच असावी असा अलिखित नियम आहे. ) डझनभर अंड्यांपैकी फक्त एक अंडं आतापर्यन्त फोडून बघितलेलं हे माणसाचं पिल्लू सहर्षपणे पोलिसाकडे पाहातं. बागेतील सर्व कळ्यांमध्ये असणारा निरागसपणा आणि वाऱ्याबरोबर डुलणाऱ्या फांद्यांमधला खेळकरपणा,

नियम तोडणाऱ्याच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहत असतो. ते पाहून पोलीस क्षणभर आपलं काम विसरतो. सायकलच्या घंटीचा आवाज ऐकून भानावर येत पोलीस म्हणतो, “मिस त्रिवेदी, तुम्ही खूप वेगानी सायकल चालवता आहात, म्हणून तुम्हाला पन्नास डॉलर्स पेनल्टी. ” गुन्हेगार गोड हसत (आपल्या आईसारखं)

“आय सी (छी)”असं म्हणतो आणि नसलेल्या खिशातले पैसे काढून पोलिसाला देतो. पोलीस पैसे मोजायला लागतो. गुन्हेगार म्हणतो, ” डू यू वॉण्ट मोअर ?” पोलीस अजून पैसेच मोजत असतो. तो नैतिकेतचा आदर्श असल्यामुळे मानेनं नकार दर्शवत “यू कॅन गो नाऊ” असं म्हणतो.

गुन्हेगार थोडा पुढे जातो आणि जाहीर करतो की आता तो टीचर आहे. क्षणात पोलिसाचं गुन्हेगारात रूपांतर होतं कारण त्यानी क्रेयॉन्स शेयर केलेले नसतात. त्याला “टाईम आउट” असं म्हणून कठोरपणे छोट्या छोट्या हातांनी एका कोपऱ्यात ढकललं जातं. पण टाईम आउट मध्ये असलेली व्यक्ती सकाळच्या चहाबरोबर घेतलेला नैतिकतेचा डोस विसरून थकलेल्या आणि चिडचिड करणाऱ्या टिचरला अॅपलची लाच देते आणि घरात नेते. थोडंसं अॅपल पोटात गेल्यावर टीचर हुंहू किंवा अहं किंवा हंहं असं म्हणताना मान कुठल्या दिशेने हलवली की त्याचा काय अर्थ होतो याचं गहन असं ज्ञान देते. तोपर्यंत तिच्या आईवडिलांची चाहूल तिला लागते, डोअर बेल वाजते, घरातला कुत्रा पोटतिडकीनं भुंकत दाराच्या दिशेनं पळायला लागतो. आर्या त्याच्यामागे वारा कानात गेल्यागत धावायला लागते आणि “आजही उरलेली अकरा अंडी कशी वाचवली” हा विचार मनात येऊन मी खुसूखुसू हसत त्यांच्यामागे दार उघडायला जाते. तेव्हा अंगणातली सायकल आणि वारा, झाडं आणि वेली, कळ्या आणि फुलं सगळेजण तिच्यावर मायेचे पाश टाकून “खेळायला परत ये, परत ये” असं गुणगुणत असतात.

…. ते सगळ्यांना ऐकू येतं.

लेखिका : सुश्री भाग्यश्री बारलिंगे

मेसा, ॲरिझोना

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments