श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “प्रेमाची शिक्षा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
विकीनं तोंडावर दार बंद केल्यावर मायाच्या डोळ्यात पाणी आलं. पुन्हा पुन्हा विनंती केली पण दार उघडलं नाही. गर्दी व्हायला लागल्यावर माया परत फिरली.
“विकी, हा काय प्रकार?,” राजा.
“मरु दे तिला, पार डोक्याची मंडई झालीय. जा दारू घेऊन ये. अजून प्यायचीय”
“आधी मला सांग. कोण होती ती?”
“गप बोललो ना. तो विषय नको. ”
“चांगल्या घरातली दिसत होती. एकदम श्रीमंत कॅटेगरी”
“पंधरा पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे”
“आणि तू तिला शिव्या घातल्या, हाकलून दिलं आणि तिनंही गप ऐकलं. नक्की भानगड काय?”
“ऐकून घेतलं म्हणजे उपकार नाही केले. तशी मातीच खाल्लीयं ना” बोलताना विकीच्या डोळ्यात विखार होता.
“म्हणजे”
“हिच्यामुळेच बरबाद झालो ना”
“तुमचं लफडं होतं”
“नाही रे”
“मग”
“आमच्या गावातल्या सर्वात श्रीमंत माणसाची लेक, सगळा गाव त्यांच्याच तालावर नाचणारा. कुठंच बरोबरी नाही म्हणून आम्ही दहा हात लांब राहायचो. सावलीला सुद्धा फिरकायचो नाही.”
“मग ही बया कुठं भेटली”
“कॉलेजमध्ये भेटली अन माझी साडेसाती सुरू झाली. तेव्हा आतापेक्षा जास्त सुंदर दिसायची. कॉलेजची पोरं पार फिदा पण कोणी हिंमत करत नव्हते आणि प्रेम-बीम यासाठी लागणारा पैसा, वेळ आणि इच्छा या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. खूप शिकायचं अन मोठा अधिकारी व्हायचं एवढं एकाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होतो. पहिला नंबर कधीच सोडला नाही ना शाळेत ना कॉलेजमध्ये. दिसायला बरा त्यात व्यायामची आवड त्यामुळे तब्येत कमावली. अभ्यास सोडून दुसरं व्यसन नव्हतं. ”
“आता तुझ्याकडं बघून, सांगतोयेस ते खरं वाटत नाही”
“माझी पर्सनॅलिटी आणि हुशारी बघून ही प्रेमात पडली. सगळा एकतर्फी मामला.”
“भारीच की.. एवढी चिxx पोरगी फिदा म्हणजे..”
“डोंबलाची चिxx! !तिच्यामुळेच वाट लागली. इतकी पागल झाली की थेट प्रपोज केलं पण मी नकार दिला. माझ्यासाठी करियर जास्त महत्वाचं आहे असं सांगितलं पण तिच्या डोक्यात शिरलं नाही.”
“एकदम पिक्चर सारखं वाटतयं”
“खरंय!! आयुष्याचा पार पिक्चरच झाला. स्पष्ट नकार दिल्यावर सगळं थांबेल असं वाटलं पण झालं भलतंच. आपल्यासारख्या सुंदर, श्रीमंत मुलीला एक पोरगा चक्क नकार देतोय यानं तिचा ईगो हर्ट झाला. ”
“मग रे!!”
“हट्टाला पेटली. वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले. दबाव टाकत होती. नापास करण्याची धमकी दिली. हरप्रकारे प्रयत्न केले पण मी नकारावर ठाम होतो. कॉलेजची परीक्षा संपण्याची वाट बघत होतो कारण त्यानंतर आमचे मार्ग वेगळे होणार होते मात्र शेवटचा पेपर संपल्यावर कँटिनमध्ये तिनं जबरदस्तीनं थांबवत पुन्हा विचारलं. मी काहीच बोललो नाही तेव्हा विणवण्या करायला लागली तेव्हा अजून प्रकरण वाढू नये म्हणून तिथून जाऊ लागलो तेव्हा राग अनावर होऊन तिनं खाडकन माझ्या कानफटात मारली. आवाज ऐकून आजूबाजूच्या सर्व नजरा वळल्यावर भावनेच्या भरात केलेली चूक तिच्या लक्षात आल्यावर स्वतःला वाचवण्यासाठी एकदम वेगळा पवित्रा घेतला. जोरजोरात रडायला लागली आणि सगळ्यांना सांगितलं की मीच तिला त्रास देतोय. सारखं सारखं प्रपोज करतोय. तिचा अनपेक्षित “यू टर्न” माझ्यासाठी धक्कादायक होता. ”
“बाsबो, मग पुढं??”राजा
“एका क्षणात व्हिलन झालो. कॉलेजच्या पोरांनी संधी साधली. कसाबसा जीव वाचला. संध्याकाळी तिचे वडील, भाऊ आणि नातेवाईक घरी. पुढचे पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि दोन महीने हात गळ्यात. ”
“तू खरं का सांगितलं नाहीस”
“हजारदा सांगितलं पण कोणीच विश्वास ठेवला नाही उलट परत असं काही बोललास तर घरादारा सकट जाळून टाकू अशी धमकी मिळाली. झकत गप्प बसलो. आईवडिलांनी तिच्या बापाचे पाय धरले. गयावया केल्या म्हणून जिवंत राहिलो पण गाव कायमचा सोडावा लागला.”
“डेंजर आहे रे बाई!!एवढं सगळं झालं तरी ती खरं बोल्ली की नाही. माफी बिफी…”
“अं हं!!कुठल्या तोंडानं बोलेल. करून सावरून नामानिराळी झाली. मी मात्र बदनाम झालो. स्वप्नाचा चक्काचूर झाला. दिशाहीन जगण्यामुळे हताश, निराश झालो. सैरभैर भटकताना बाटलीच्या नादी लागलो. ”
“पण तुझी काहीच चूक नव्हती. पोलिसांकडे का गेला नाहीस. ”
“झाला तेवढा तमाशा बास होता. प्रकरण वाढवून काहीच उपयोग होणार नव्हता. जिवावर आलेलं गाव सोडण्यावर निभावलं असं समजून नशीब नेईल तिकडं जात राहिलो. ”
“इतकं सारं सोसलसं. कधी बोलला नाहीस. ”
“बरबादीची कहाणी सांगून काय फायदा? आधी फक्त अभ्यासाचं व्यसन आणि आता!!” विकी भेसूर हसला. त्या हसण्यातली वेदना राजापर्यंत पोचली. विकीच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला“जे झालं ते झालं. सोडून दे. आयुष्यात ती पुढं गेली. लग्न करून मोकळी झाली अन तू अजूनही तिथंच आहेस. स्वतःला संपवतोयेस. ”
“मग काय करू. कशासाठी जगायचं. पोराच्या आयुष्याचे धिंडवडे पाहून आई-वडीलांनी हाय खाल्ली अन झुरून झुरून गेले. आता तर पार एकटा उरलोय. वाट बघतोय. “विकीच्या आयुष्याची परवड ऐकून राजाच्या डोळ्यात पाणी आलं.
—-
*बेदम पिण्यानं विकीची तब्येत बिघडली. सरकारी दवाखान्यात भरती केलं. अवस्था पाहून डॉक्टरांनी ‘फक्त वाट बघा’ असं स्पष्ट सांगितलं.
*पश्चाताप आणि अपराधीपणाच्या भावनेनं मायाला नैराश्य आलं कायम शून्यात नजर, खाण्या-पिण्याकडं दुर्लक्ष, त्यामुळं हॉस्पिटलमध्ये भरती केलं. परिस्थिती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. तेव्हा बायकोवर जीवापाड प्रेम करणारा कैलास मनानं खचला.
—
मायानं एकतर्फी, हट्टी प्रेम केलं. त्याचे परिणाम ती, विकी आणि कैलास तिघांनाही भोगावे लागले आणि काहीही चूक नसताना त्या प्रेमाची शिक्षा विकी, कैलासला मिळाली. एकाचं आयुष्य तर दुसऱ्याचा सुखी संसार भरडला गेला.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈