सुश्री नीला महाबळ गोडबोले
☆ रंगछटा… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆
“बाबा, किती जुनं दिसतय आपलं घर..! ! बदलून टाकायचं का? “
लेकीनं एखादा कपडा किंवा चपला बदलून टाकायच्या सहजतेनं विचारलं..
आम्हाला ते सहज पचणारं नसलं तरी तिचं वय आणि तिची पिढी विचारता घेता ते फारसं अयोग्य नव्हतं.
मधला मार्ग म्हणून आम्ही घर रंगवायचं ठरवलं..
रंगाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली.
लेकीनं जांभळा, पिवळा, हिरवा असे व्हायब्रंट रंग निवडले..
मी पांढरा, आकाशी, क्रीम अशा मंद रंगांना पसंती दिली..
नव-याला रंगाशी देणंघेणं नव्हतं..
“मला रंगातलं काही कळत नाही ” म्हणत तो मोकळा झाला..
त्याला फक्त काम लवकर नि चांगलं व्हायला हवं होतं..
“घर रंगवायचय की वृद्धाश्रम.. का मंदिर..? ” म्हणत लेकीनं पांढरा रंग निकालात काढला..
“संपूर्ण घराला एकच रंग लावूया म्हणजे घर मोठं दिसतं नि घराला कंटिन्युटी येते.. “
या पेंटरच्या सल्ल्यावर कशी कुणास ठाऊक पण आम्हा दोघींत एकवाक्यता झाली..
नि एक फिकटसा रंग आम्ही फायनल केला..
एका शुभदिनी रंगकामाला सुरुवात केली..
घरातल्या सा-या सामानानं आपापल्या जागा सोडून एखाद्या सभेला हजेरी लावावी त्याप्रमाणे दिवाणखान्यात गर्दी केली..
उड्या मारत, धडपडत, ठेचाकाळत चालावं लागू लागलं..
आमचा एककक्षीय (एका खोलीतला) संसार सुरू झाला..
“तुम्ही दोघी खाटेवर झोपा, मी खाली झोपतो.. ” म्हणत नव-याने जमिनीवर पथारी पसरली..
घरातल्या समस्त उशा, पांघरुणे, बेडशीट्स खाटेवर मुक्कामाला आल्याने आम्ही दोघी अंग चोरून कशाबशा झोपलो होतो..
मध्यरात्री लेक सरळ झाली नि तिची मला धडक बसली..
मी थेट खाली कोसळले ते नव-याच्या अंगावर..
त्याच्या किंचाळण्याने गल्ली जागी झाली..
पण वाचला बिचारा..
अडचण एवढी की मला उठता येईना.. ना त्याला..
शेवटी लेकीनं मला ओढून कसंबसं वर काढलं..
या प्रकरणाचा तिने एवढा धसका घेतला की
“आता इंटर्नशिप करायला हवी ” म्हणत रंगकामाची पुरस्कर्ती लेक सुट्टीतही काढत्या पायाने पुण्यास रवाना झाली..! !
टुथपेस्ट सापडली तर ब्रश न सापडणं, पावडर सापडेपर्यंत कंगवा गायब होणं..
वरणभात आणि पिठलंभाकरी सोडून इतरही पदार्थ असतात, याचा विसर पडणं..
कधीही घराकडे ढंकुनही न पहाणारी पाहुणे मंडळी नेमकी या काळात टपकणं..
पेंटरबाबुंची रोजची पैशाची मागणी..
मालाच्या एस्टिमेटची पानफुटीप्रमाणे होणारी अखंड वाढ आणि पैशाचा बाहेरच्या दिशेने वाहणारा अखंड झरा…
यामुळे आम्ही दोघे नवरा-बायको रोज
“कुठून या नस्त्या फंदात पडलो.. नि सुखातला जीव दु:खात घातला.. “
या मंत्राचा अखंड जप करू लागलो..
मला तर स्वप्नंही रंगकामाची पडू लागली होती..
एखाद्या भिंतीचा रंग सगळा खराब झालाय…
असलं काहीतरी बेकार स्वप्न पडून मी ओरडत उठत असे नि झोपमोड केल्याबद्दल नव-याच्या शिव्याही खात असे..
याच काळात पेंटरमामांची आजी वारली, वडिलांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं, त्यांचे किती दोस्त आणि शेजारी मयत झाले.. याला तर गणतीच नाही..
” आता तुम्ही स्वत: मयत व्हायच्या आधी आमचं काम पूर्ण करा.. “.
अशी आम्ही त्यांना विनंती केली..
तेंव्हा कुठे दहा दिवसात पूर्ण होणारं आमचं रंगकाम दीड महिन्यांंनी पूर्ण झालं..! !
रंगकामाचं घोडं एकदाचं गंगेत जाऊन न्हालं…!!
रोडावलेल्या बॅंकबॅलन्समुळे नव-याचं वजन चार-पाच किलोंनी घटलं असलं तरी मी मात्रं खुशीत होते..
नवीन फर्निचरचे, शोपिसेसचे बेत डोक्यात घोळत होते..
पैसे कमी झाले असले तरी उगीचच शेजारणींपेक्षा आपण श्रीमंत झाल्यासारखं वाटत होतं..
“संक्रांतीचं हळदीकुंकु करून सगळ्या शेजारणींना बोलवायचं नि त्यांना जळवायचं. “.
अशी कल्पना जेंव्हा मनात जन्मली तेंव्हा झालेला सगळा त्रास विरून गेला आणि मनमोर. नुसता थुईथुई. नाचू लागला..! !
याच आनंदात मी नवीन रंग पहायला खोल्याखोल्यांतून हिंडू लागले..
आणि लक्षात आलं की प्रत्येक खोलीतला रंग वेगवेगळा दिसतोय…
नव-याला बोलावलं..
“प्रत्येक खोलीतला रंग वेगळा दिसतोय.. बघ नां..! ! “
“सुरू झाली का तुझी किरकिर.. कितीही पैसा खर्च करा.. त्रास सहन करा.. या बाईला समाधान म्हणून नाही.. रंग वेगळा कसा दिसेल?” माझ्यावरच करवादत घालवलेले पैसे मिळवायला नवरोबा तडक निघून गेले.
“तुला प्रत्येक खोलीतले रंग वेगळे दिसतायत का बघ गं.. ” कामवाल्या सुमनला मी विचारलं..
“बाई, तुम्ही इथं लाल न्हाईतर पिवळाजर्द रंग द्यायला पायजे हुता.. आमच्या जावेच्या भैनीकडं तसलाच दिलाय.. कसला भारी दिसतुय.. तुमास्नी रंगातलं कळत न्हाई बगा..”
सुमननं नेहमीप्रमाणे ती कशी हुशार… आणि मला कसं काही कळत नाही.. हे दाखवायची नि मला डिप्रेस करायची, हिही संधी सोडली नाही..
दुपारी पुन्हा एकदा पाहणी केली..
आता तर रंग आणखी वेगळा वाटत होता..
अन् रात्री दिव्यांच्या प्रकाशात अजूनच वेगळा..
स्वयंपाकघरातला डार्क, हॉलमधला फिकट, बेडरूम्समधला थोडासा डल्…
आता मात्रं मी चक्रावून गेले.
सकाळी उठल्याबरोबर पेंटरकाकांना फोन केला..
“पैसे घेऊन जायला लगेच या.. “
पैशाच्या लालचेने पेंटरकाका दहा मिनिटांत हजर झाले..
“काका, आपण सगळीकडे एकच रंग वापरायचं ठरवलं होतं नं.. मग प्रत्येक खोलीतला रंग वेगळा कसा दिसतोय?”
पेंटरकाका थोडं गूढंसं हसले..
“ताई, रंग एकच आहे सगळीकडं..
पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे. भिंतीच्या पोतात फरक आहे..
आणि मुख्य म्हणजे प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे..
स्वयंपाकघरात एकच खिडकी आहे.. हॉलमधे चार खिडक्या आहेत..
शिवाय स्वयंपाकघर लहान आहे.. हॉल मोठा आहे.. म्हणून हॉलमधे रंग फिकट आणि ब्राईट वाटतोय.. तर स्वयंपाकघरात डार्क..
बेडरूमच्या बाहेर झाडं आहेत.. प्रकाशच येत नाही.. म्हणून तिथला रंग डल् वाटतोय..
शिवाय खोलीतल्या फर्नीचरच्या रंगाच्या रिफ्लेक्शननं भिंतीचा रंग वेगळा दिसतो..
ताई, रंगाच्या छटा त्याच्या मुळच्या रंगावर अवलंबून असतातच पण त्यापेक्षाही इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात..
या सा-या गोष्टी सारख्या करा.. मग रंगही समान दिसेल..!!
अजून काही महिन्यांनी बघा.. रंग अजूनच वेगळा दिसेल..
शिवाय पहाणा-याच्या नजरेवरसुद्धा रंगाचं आकलन अवलंबून असतं..
साहेबांना नाही वेगळेपणा जाणवला..
तुम्हाला जाणवला.. कारण तुमचा जीव या भिंतीत आहे.. या घरात आहे..! !
मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते..
त्या अशिक्षीत माणसाकडून केवढं मोठं तत्त्वज्ञान मला समजलं होतं.. रंगाच्या निमित्ताने..!!
माणसाचंही असच आहे नाही..
खरंतर प्रत्येक माणूस सारखाच…
पंचमहाभुतापासूनच बनलेला..
पण प्रत्येकाचा रंग.. म्हणजे स्वभाव, वागणूक, मन, बुद्धी, आचार, विचार किती वेगळं..
मग आपण. लावून टाकतो..
हा चांगला..
ती वाईट
ती उदार
तो कंजुष
तो दुष्ट
ती दयाळु
ती हुशार
तो मठ्ठ
तो कोरडा
ती प्रेमळ
अशी अनंत लेबलं..
तो माणुस जन्मत:च असा आहे, असं आपण ठरवूनच टाकतो..
आणि तो असा बनायला सभोवतालच्या कितीतरी गोष्टी जबाबदार आहेत, याचा आपल्याला विसर पडतो..
तो उद्या बदलेल.. हे मानायला आपण तयारच होत नाही..
निसर्गाकडून मिळालेलं शरीर, बुद्धी, बालपणीचे संस्कार, मिळालेलं प्रेम किंवा तिरस्कार, वाट्याला आलेली गरिबी किंवा लाभलेली श्रीमंती, लाड किंवा भोगावे लागलेले अत्याचार..
किती किती गोष्टींच्या प्रभावामुळे बनलेली अनंत छटांची अनंत व्यक्तीमत्त्वे…
काळी, पांढरी, करडी, हिरवट, पिवळी, निळी नि गुलाबी…!!
यातल्या कुणाला चांगलं म्हणत कौतुक करणं.. नि कुणाला वाईट म्हणत हेटाळण्यापेक्षा..
जाणीवेच्या शोभादर्शकातून पाहिलं तर रंगीबेरंगी नक्षीचं नयनसुख मिळेल..
नि सारं जग सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं सुरेख होऊन जाईल…!!
© सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
फोन नं. 9820206306, ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈