श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ राजवैद्य — भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(ज्ञानेश गप्प बसून होता. पण तो मनातल्या मनात पुढची आखणी करत होता. कंपनीने त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. आणि ती पुरी करण्याची त्याची जबाबदारी होती.) – इथून पुढे —-
ज्ञानेश – बापूसाहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. केरबा सारखी प्रामाणिक माणसं आता क्वचित. पण मला सांगा हा केरबा राहतो कुठे?
बापूसाहेब – इथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे, तेथील बाजूच्या जंगलात याची झोपडी आहे. याची म्हातारी मेली. आता हा आणि त्याचा मुलगा म्हदबा दोघेच राहतात. बरं तर मग असं म्हणून ज्ञानेश उठला आणि आपल्या हॉटेलवर गेला.
ज्ञानेश च्या लक्षात आलं आता केरबाचा मुलगा म्हदबा याला गाठावं लागणार. त्याने त्याच्या कंपनीचा सेल्समन अजय याला बोलावले आणि ताबडतोब हॉटेलकडे बोलावले.
ज्ञानेश – अजय एक कंपनीचे महत्त्वाचे काम आहे. आणि तुझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. येथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे हे तुला माहित असेलच. त्या गावात जायचं. तेथे केरबा धनगर नावाचा माणूस राहतो. अर्थात तो जंगलात झोपडीत राहतो. शेळ्या मेंढ्या राखत असणार. त्याचा मुलगा आहे महादबा. त्याची माहिती काढायची. त्याला जास्त काय आवडते हे चौकशी करायची. पण लक्षात ठेव. त्याची चौकशी करत आहोत हे म्हदबाला कळता कामा नये. तू हे महत्त्वाचे कंपनीचे काम आहे, ते व्यवस्थित केलेस तर मी तुझी शिफारस करीन.
अजय मोटार सायकलने भडगाव मध्ये गेला. भडगाव मधील केमिस्ट मनोहर त्याच्या खास ओळखीचा.
अजय– मनोहर तुला या गावातला केरबा धनगर माहित असेल. त्याचा मुलगा म्हदबा याला ओळखतॊस का, कसा आहे आणि कसले व्यसन वगैरे आहे का?
मनोहर– केरबा हा सरळ माणूस आहे, दारूच्या थेंबालाही शिवत नाही, पण त्याचा मुलगा महादबा हा पक्का बेवडा आहे. दिवस-रात्र दारूच्या नशेत पडून असतो. आता थोड्यावेळाने या देशी दारूच्या दुकानात येईल.
आणि खरंच थोड्या वेळाने म्हदबा देशी दारूच्या दुकानाकडे जाऊ लागला. अजयला अंदाज होताच म्हणून जाताना त्याने पाच सहा इंग्लिश दारूच्या बाटल्या बरोबर घेतल्या होत्या. त्याने म्हदबाची ओळख काढली दारूच्या बाटल्या दाखवून त्याला गाडीवर बसवले आणि ज्ञानेश च्या हॉटेल कडे घेऊन आला. एवढं मोठं हॉटेल बघून म्हदबा बावचाळून गेला. खोलीत आल्यावर ज्ञानेशने त्याला आपल्याकडच्या बाटल्या दाखवल्या.
म्हदबा – मला इत कशाला आणलंय?
ज्ञानेश – दारू प्यायला! पी हवी तेवढी दारू.’
ज्ञानेशने दारूची बाटली उघडली आणि ग्लासात ओतली, म्हडबाने एका दमात ग्लास रिकामा केला. दुसरा भरला दुसरा रिकामी, असे पाच ग्लास पटापट रिकामी केली.
ज्ञानेश – मादबा लेका, एक काम होत, तुझ्या बाबाकड एक औषधाची मुळी आहे, त्याच्यामुळे पोटाचे आजार बरे होतात. ती मुळी कोणत्या झाडाची हे फक्त तू आम्हाला सांगायचे. तू जर ते सांगितलेस तर तुला हवी तितकी दारू देतो. आणि भरपूर पैसे देतो. ज्ञानेशने पैसे भरलेली सुटकेंस दाखवली. तुझा बाबा तसा मुळी द्यायला ऐकायचा नाही, जर ऐकला नाही तर त्याला हे दाखवायचं, अस म्हणून ज्ञानेशने एक सुरा म्हडबाच्या हातात दिला. हा सुरा मानेवर ठेवलास की तो घाबरून ती मुळी तुला दाखवेल. त्या मुलीचे झाड आम्हाला दाखवायचे. मग तुला हे सगळे पैसे हवी तेवढी दारू “.
दारू पिऊन पिऊन तोल जाणाऱ्या म्हदबाला अजय ने त्याच्या गावात सोडले.
दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेब घरी हॉलमध्ये चहा घेत होते. एवढ्यात ” बापूसाहेब, बापूसाहेब चला माझ्याबरोबर ” असं म्हणत केरबा धावत धावत बापूसाहेबांच्या घरी आला,
” अरे कुठे?
” बापूसाहेब, माझ्या जीवाचं मला काय खरं वाटत नाय, माझा पोरगा राती सुरा घेऊन माझ्या मागे धावत होता. त्या मुळीच झाड मला दाखव म्हणूंन सांगत व्हता. बापूसो, तुमास्नी त्ये झाड दाखवितो आणि जबाबदारीतून मोकळा होतो. “.
” कसली जबाबदारी?’
“माझ्या आजानं मला सांगितलं व्हतंमुळीचा बाजार करायचा न्हाई, झाड कधी दाखवायचं असलं तर फकीत राज वैद्यना दसखवायचं. कारण त्या घराण्याने आमच्या राजाला बर केल व्हतं.’.
” आरो पण मी त्या मुळीच झाड बघून काय करू?
” बापूसो, तुमी राज वैद्यसाच्या घराण्यातले, परत एकदा दवा तयार करा, “.
आर, पण तू त्याचा बाजार करायचा नाही असं म्हणतोस ना?”.
“तुमी सोडून कुंनी नाही करायचं, फक्त तुमी करू शकत “. चला चला बापूसाहेब घाई करा “.
बापूसाहेबांनी आपला मुलगा दिलीप ला सोबत घेतला. दिलीप ने गाडी बाहेर काढली आणि केरबा आणि बापूसाहेब मागे बसले. किरबा दाखवत होता त्या रस्त्याने दिलीप गाडी चालवत होता. वीस पंचवीस किलोमीटर गेल्यावर कीरबानी गाडी थांबवायला सांगितली. आणि खूप उभ्या चढणीवर तो चालायला लागला. बापूसाहेबांना एवढं चढणे शक्य नव्हते म्हणून फक्त दिलीप त्याचे बरोबर गेला.
केरबाने तेथेच दिलीप ला ती झाडे दाखवली. त्याची मुळी कशी काढायची हे पण दाखवले. बापूसाहेब केरबाला आपल्या घरी चल आज तिथेच रहा म्हणून आग्रह करत होते, पण केरबा ने मानले नाही.
त्याच रात्री दारूच्या नशेत केरबाच्या मुलाने म्हडबाने केरबाचा सुरा पोटात खुपसून खून केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेबांना ही बातमी कळली, बापूसाहेब मुलगा दिलीप सह धावले, केरबाचे प्रेत झाडीत टाकून दिलेले होते. आणि बाजूला दारू पिऊन म्हडबा पडला होता. बापूसाहेबांनी दोन-तीन माणसांना बोलावून केरबाचे प्रेत आपल्या गाडीत घेतले आणि दोन किलोमीटर वरील आपल्या स्वतःच्या जमिनीत त्याचे पुढचे विधी केले.
बापूसाहेब कित्येक दिवस सुन्न सुन्न होते, आपल्यामुळे केरबा हकनाक मेला असे त्यांचे मत झाले. मुंबईच्या शिर्के साहेबांना किरबाच्या मरण्याची बातमी कळली. ते मुद्दाम बापूसाहेबांना भेटायला आले. बापूसाहेबांनी त्या दिवशी मुद्दाम केरबा धावत धावत आला आणि त्या मुळीची वनस्पती दाखवली हे पण सांगितले.
शिर्के साहेब – बापूसाहेब तुम्ही राजवैद्य आहात. तुम्ही पुन्हा औषधाच्या व्यवसायातउतरायला पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान आहे आणि आता ही मुळी आणि तिची वनस्पती पण तुम्हाला कळली आहे, मग आता वाट कसली बघता?
बापूसाहेब – शिर्के साहेब, आम्ही राजवैद्य असलो तरी आमच्याकडे पैशाची कमी आहे, आमच्याकडे दाम नाही आम्ही एवढी वर्ष गप्प आहोत.
शिर्के साहेब – बापूसाहेब, . तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला वाटेल तेवढे कर्ज बँक देईल. तुम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था मी करतो. आणखी काही रक्कम कमी पडत असेल तर मी तुमच्या मागे आहे. पण तुम्ही आता आयुर्वेदिक कंपनी सुरू करायलाच हवी. केरबाचीमुळीचा लोकांना फायदा व्हयला हवा “.
आणि शिर्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एका बँकेचा मॅनेजर सकाळीच त्यांच्या घरी हजर झाला. शिर्के साहेबांनी तुम्हाला हवे तेवढे कर्ज द्यायला सांगितले आहे, जामीन स्वतः शिर्के साहेब राहणार आहेत, तुम्हाला किती कर्ज हवे ते मला सांगा ‘. बापूसाहेबांनी मुलगा दिलीप याला हाक मारली. दोघांनी म्हणून विचार केला आणि कर्जाच्या अर्जावर सही केली.
ज्या ठिकाणी केरबाचे अंत्यविधी केले गेले, त्याच्या शेजारीच ” केरबा फार्मा ‘ उभी राहिली. गेटमधून आत गेल्यावर केरबा धनगरच पुतळा तुमचे स्वागत करेल, त्याला नमस्कार करून आत गेल्यावर केरबा फार्मा ची भली मोठी फॅक्टरी आणि दिलीप रावांचे मोठे सेल्स ऑफिस भेटेल.
दिलीप रावांनी आपल्या मित्रमंडळींची मदत घेऊन केरबा फार्मा चा व्यवसाय खूप वाढवला. यावर्षी केरबा फार्माने शंभर कोटीचा व्यवसाय पुरा केला.
आपले राज वैद्य बापूसाहेब नवीन नवीन आयुर्वेदिक संशोधनात मग्न आहेत, हे सर्व केरबा धनगराच्या कृपेने याची जाणीव राजवैद्यन आहे.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈