प्रा. भरत खैरकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ काशा… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
“मॅडम बाई नमस्कार.. ओळीखलसं कां मला? मी.. मी काशा.. ” एका भिकारीवजा तरुणाचा आवाज माझ्या कानावर पडला. ऑफिस सुटल्यामुळे मी घाईघाईने शंकरनगरच्या सिटी बस स्टॉप वर जात होते. मला बर्डी बस पकडायची होती. सोबत माझ्या ऑफिस मधल्या माझ्या मैत्रिणी होत्या. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपली ‘पोझिशन’ मला राखायची होती. पण तो गडी पडल्यागत “मॅडम, मी काशा.. मला ओळखलं नाहीस.. मॅडम बाई म्या भेटलो नव्हतो कां तुम्हास्नी.. तुम्हीच नाही कां मला खाऊ पिऊ घातलं होतं.. उपदेश नव्हता कां दिला.. अरे, भिक मागू नकोस नव्हतं कां म्हटलं मला तुम्ही.. ऐकून तर घ्या मॅडम बाई, मी काय म्हणतो ते!!” मी सारखी त्याच्याकडे दुर्लक्ष करून जसं आपण त्याला ओळखतच नाही उगीचच गळी पडू इच्छितो.. असा भाव दाखवत मैत्रिणी सोबत चाललेली होती. सोबत त्याची तीच कॅसेटही चाललेली होती.. पण नाही.. बस स्टॉप वर पोहोचताच बस आली. मी भरकन
बस मध्ये बसले. तो खिडकीतून मला शोधीतच होता आणि सारखा ” मॅडम बाई.. मॅडम बाई ऐकून तर घ्या. ” असा ध्वनी मला माझा चिरत चालला होता.. बसच्या वेगासोबत… !
सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी बी. ए. फायनल ला होते. माझ्या अभ्यासिकेतून दूरवरची घरं.. आला गेला.. येणारे जाणारे दिसायचे. अभ्यासाचा कंटाळा आला तर मी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची धावपळ बघायची.. किती वेळ मी असं बघत बसलेली असायची माझं मलाच कळायचं नाही..
अशीच एक दिवस अभ्यासिकेतून बाहेर डोकावले तर समोरच्या घरी “देवो मा भिकाऱ्याला एखादी भाकरं. ” असं म्हणून आपली ताटली सरकावून समोरच्या घराच्या दारा खेळत असलेलं एक भिकाऱ्याचा पोर मला दिसलं.. मी अभ्यास सोडून सारखी त्याच्या हालचालीकडे लक्ष देत होती. ” देवो मा भिका-याले.. ” त्याची लाचारयुक्त हाक पुन्हा पुन्हा ऐकायला येत होती.. नखान दारावरच्या पेन्टशी तो खेळत होता.. हे सगळं नकळत घडत होतं.. मी “शुक.. शुक.. इकडे ये.. ” करून त्याला हाक दिली. ही मुलगी आपल्याला कां बोलवेल ? असं समजून की काय त्यांना माझ्याकडे लक्ष देऊन.. पुन्हा ” देवो माय भिकाऱ्याला.. ” ची कॅसेट वाजवली. मी पुन्हा “शुक.. शुक.. अरे, तूच.. तूच.. तू इकडे ये.. ” म्हणून त्याच्याकडे पाहून हात हलविला. तो येऊन अभ्यासिकेच्या दारात उभा राहिला. मी त्याला आत बोलावलं. नुकताच वहिनींनी माझ्यासाठी आणून ठेवलेला नाश्ता टेबलवर तसंच होता.. मी ती प्लेट त्याच्याकडे देत माझ्यासाठी दुसरी प्लेट वहिनी कडून मागितली.. त्यानं ती घेतली आणि मी इशारा केलेल्या बाजूच्या खुर्चीत तो बसला.. त्यानं पायजामा फाडून तयार केलेली भीक मागायची मळकट झोळी खाली
ठेवली. त्यातलं पीठ जमिनीवर आपण आत असल्याची जणू आठवण त्याला देत होतं.. जमिनीवरच्या पिठानं पिशवीच्या आजूबाजूला पांढरं कुंपण तयार केलं होतं!
त्यानं “ताईसाहेब, तुम्ही घ्या की.. असं म्हणत प्लेट माझ्याकडं सरकवली.. तितक्यात माझी प्लेट सुद्धा वहिनीने आणली. आम्ही दोघेही नाश्ता करायला बसलो.. मी उत्सुकता म्हणून त्याला बोलत केलं कदाचित माझा उद्देशही तोच होता.
“नाव काय रे तुझं?”
“काशा”
” आई वडील काय करतात तुझे?”
” ते नाहीत. “
” कां रे काय झालं?”
” मेलीत दोगं बी”
“कशी रे? “माझा प्रश्न.
“ताईसाहेब, माझा ‘बा ‘सुदीक असाच भीक मागून पीठ आणायचा.. ते पीठ किराणा दुकानात नेऊन विकायचा.. मिळालेल्या पैशात दारू ढोसायचा.. उरलेला पैका मायला देऊन घर चालवायला सांगायचा.. “
” मग रे? ” माझी तंद्री लागली प्लेटमध्ये चमचा तसाच पडून राहिला.
“असाच एक दिवस बा घरी आला.. खूप खूप खोकलला.. एकाएकी आमची सगळ्यांची घाबरगुंडी उडाली.. पण काही उपाव नव्हता. बा चा ठसा नड्डयात अडकला.. अन् मेला तो.. असाच उभ्या उभ्या ! काही दिसानं लोक म्हणायचे डोमा भिकाऱ्याले टीबी. झालती म्हणून.. लोकांचं ते म्हणणं समजत नवतं मले.. “
“मग रे?”
” मग काय ? माझ्या माय वर आली जबाबदारी सगळी.. तिनं जमा केलेल्या पैशातून एक म्हैस विकत घेतली. माझी मोठी ताई लग्नाला आलेली.. ती दिसायला एकदम तुमच्यासारखीच सुंदर.. ताई, घरची गरीब परिस्थिती इकडे झाकलं तर तिकडे उघड पडायची.. मायच्या जीवाले तिची काळजी लागली होती एक दिवस म्हशीले पाणी पाजायला ताई शिवारातल्या आडावर गेली.. माय चारा कापत होती धुर्यावर.. पाणी काढता काढता ताईचा पाय घसरला.. ती पडली अडात.. बादलीसकट.. “धप्पक्कन “झालेल्या मोठ्या आवाजाने माय धावत आली.. तर पोरगी विहिरीत पडली.. तिला कां करावं काही सुचत नव्हतं.. तिनं आंगचं लुगडं सोडलं.. पाण्यात टाकलं.. आडात.. “पकड… पकड.. “म्हणून ती ताईला सांगू लागली. तीनही ते लुगडं धरलं.. आई खंगलेली ताकद नसलेली.. कशी काय वडणार ताईला वर.. !! उलट ताई चांगली अठरा-एकोणीस वर्षाची तुमच्या एवढीच.. तिचं वजन हे जरा जास्तच.. आईच ओडल्या गेली आत मध्ये.. आडात..
अर्ध्या तासाने कोणीतरी गडी माणूस बैलांना पाजायला म्हणून आडावर आला.. त्यांना पाहिलं आडात पडलेल्या माझ्या मायला.. बहिणीला.. त्यानं उडी टाकून ताईला वर काढली.. तिच्यात जीव होता.. आई आतच मेली होती.. तिलाही त्यानं बाहेर काढलं.. मग गावात निरोप धाडला.. मी माझ्या लहान भावासकट धावत गेलो.. तर अडावर माय मरून पडली होती.. त्या इसमाने तिचं शरीर आपल्या टाॅवेलनं झाकलेलं.. ताई ही वलीचीप झाली होती.. फुगलेली होती.. तिची छाती अजूनही खालीवर होत होती.. तेवढीच फक्त जिवंत असल्याची खूण! मला वाटत होतं एखाद्यानं ताईला खांद्यावर घेऊन गरगर फिरवावं अन काढावं सार पाणी नाकातोंडातून बाहेर.. पण मी लहान हाय.. माझं कोण ऐकल.. म्हणून मी चूप राहिलो.. पाच-सहा तासातच ताई सुद्धा आईबाच्या रस्त्याला गेली.. मेली..
झालं संपलं सारं.. काही उपाव राहिला नाही जगण्याचा आम्हां भावंडापुढं.. म्हणून आली ही ताटली आमच्या हातात.. ” असं म्हणत त्यानं नास्त्याची प्लेट दाखविली. तो सांगताना इतका रमला होता की आपण नाश्ता करीत आहोत.. हेही तो विसरला होता.. आणि ती प्लेट त्याला आपली ताटलीच वाटली होती.. माझा घास तोंडातल्या तोंडात फिरला.. काय हे अपार दुःख !!काय ही दैना भगवंता!! ह्या विचाराने मी चरकले. तू एखादी नोकरी कां करत नाहीस ? मी त्याला पुन्हा बोलतं केलं.
“कोण देतो ताईसाहेब नोकरी.. साऱ्यांना वाटतें मी लहान आहे.. काय करल हे इतकसं हुतकाड.. म्हणून कोणी बी कामाला घेत नाही.. दुसरी गोष्ट कमी मोबदल्यात जास्त काम करून घ्यायची सवय आहे आपल्या इथल्या लोकायले.. म्हणून कोणीच ठेवले पाहत नाही मायासारख्याले.. उपदेश मात्र सारेच देते..
मी समाजाचं खरं चित्र दाखविणाऱ्या त्या पोराकडे अवाक् होऊन पाहतच राहिली.
“मग कसं भागतं रे तुम्हां दोघांचं?” “कां भागणार नाही.. म्या उन्हाळ्यामंदी शहरात जातो भावाला घेऊन.. तिथे एसटी स्टँड.. रेल्वे स्टेशनमंदी कधी कधी १०० रुपये येते.. कधी कधी २०० रुपये.. कधीकधी तर ३०० रूपये बी.. भिक म्हणून मिळतात.. चांगल भागतं आम्हां दोघांचंबी त्याच्यात.. “त्याचं उत्तर आणि इन्कम ऐकून मी चाटच पडली.
“बरं ताई साहेब, निघालं पाहिजे मला! आता बाया वावरात जायच्या आधी चार-पाच घर मागून घेतो.. मंग झालं आजच्या पुरतं काम. ” असं म्हणून त्यानं खाली प्लेट माझ्याकडे देत, आपल्या पिशव्या घेतल्या अन निघालाही.. मी पाहतच राहिले.. तो दिसेनासा झाला तरी त्याची कहाणी आठवतच राहिले..
तोच ‘काशा’ आज मला भेटला होता.. एकेकाळी समाजसेवेच्या उद्देशाने भारावलेली मी. माझ्या पोझिशनला.. प्रेस्टीजला.. धक्का लागेल म्हणून.. त्याला ओळखत असूनसुद्धा ओळख दाखवली नव्हती.. माझ्यातल्या ह्या परिवर्तनाचा आणि काशात अजून न झालेल्या बदलाचा विचार करत मी घरी केव्हा येऊन पोहोचले, माझं मलाच कळलं नाही..
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈