श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ धक्के पे धक्का… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(“थांबा डॉक्टर, शांता.. “ मी हाक मारली. शांता कॉफीचे मग घेऊन आली. कॉफी घेता घेता मी म्हणाले
“डॉक्टर, तुमच्या मुलाचा फोन नंबर द्या आणि त्याला केंव्हा वेळ असतो? मी बोलेन त्याच्याशी. ”) इथून पुढे..
डॉ. कुमार गेले आणि तासानंतर लीना आली. मी तिला म्हटलं
“काय एकदम यायचं नाही काय? कुमार एक तासापूर्वी गेले..
“हो ग. मला माहित आहे.. मीच त्याला चार वाजता तुझ्याकडे जायला सांगितलं होत.. मी मुद्दाम नाही आहे.. कारण म्हंटल त्याला स्पष्ट बोलूदे.. मी असताना त्याला अवघडायला नको. कसा वाटला तुला कुमार?
शांता मध्येच म्हणाली “एकदम क्यूट.. मस्त माणूस आहे लीना..
“हो ग.. किती मस्त.. कुठे दडून बसला होता.. मला आधी भेटला असता तर मी बिनलग्नाची राहिली नसते.
“पण मला भेटला ना..
“नशीबवान आहेस लीना.. आयुष्यात उशिरा का असेना पण अस्सल हिरा मिळाला.. मी बोलले त्याच्याशी.. त्याला लिव्ह इन मध्ये राहायचे आहे.. लग्न नाही करायचे.
“तोच तर प्रॉब्लेम आहे ग विजू.. मला असं लग्न केल्याशिवाय कुणाबरोबर राहणे अनैतिक वाटते.. मला एक वेळ चालेल पण माझी मुलगी महिमा.
. तिला अजिबात चालायचं नाही.
“तू बोललीस मुलीशी.. महिमाशी..
“हो.. ती कॅनडात रहात असली तरी आपल्या देशातील चालीरीती, धर्म याबद्दल तिला अभिमान आहे.. तिचे म्हणणे डॉ. ना म्हणावे.. करायचे तर लग्न करा.. हॆ असले लिव्ह इन नको.
“बापरे.. दोघांच्या मुलांच्या वेगळ्या तऱ्हा.. कुमारच्या मुलाचे म्हणणे.. लग्न नको लिव्ह इन चा विचार करा. तुझी मुलगी म्हणते.. लिव्ह इन नको लग्न करा..
“म्हणून तर तुझा सल्ला हवा ना विजू…. काय योग्य?
“लिव्ह इन म्हणजे तुम्ही एकत्र राहणार.. जे नवरा बायको करतात तेच सर्व.. एकमेकांची काळजी घेणार पण त्या दोघांनाही नवरा बायकोचे अधिकार नसणार.. म्हणजे नवरा मयत झाल्यानंतर पत्नीला त्याची पेन्शन मिळते.. किंवा त्याची संपत्ती, प्रॉपर्टी मिळते किंवा पत्नी मयत झाल्यानंतर नवऱ्याला तिची पेन्शन किंवा प्रॉपर्टी मिळते.. तसें इथे होत नाही. कारण त्याला किंवा तिला कायदेशीर पतीपत्नीचे अधिकार नसतात.
“मग ग… महिमा हॆ कधीच मान्य करणार नाही.. काही दिवसांनी त्याने आता आपण वेगळे राहू, असे म्हंटले तर?
“लिव्ह इनचे फायदे हेच आहेत.. बऱ्याच ठिकाणी आपण पहातो.. एखादा पुरुष किंवा स्त्री नाईलाजाने लग्न टिकवत असते.. भारतात विशेषतः स्त्रिया मरण येत नाही म्हणून नवऱ्या बरोबर नांदतात.. अनेकवेळा घटसफोटसाठी अर्ज करतात… तो मिळणे बऱ्याच वेळा कठीण असते.. अशा वेळी वाटते.. कायदेशीर लग्न नसतं तर सहज वेगळं व्हायला आलं असत. लिव्ह इन चे असे फायदे पण आहेत.
“मग काय करायचा ग विजू.. शांते तु सांग..
“मी असते ना तर तुझ्यासारखी विचार करत राहिले नसते.. असा पुरुष दिसतो का कुठे? शांता हसत हसत म्हणाली.
“तस करता येत नाही ना शांते… मुलीला दुखवून कस चालेल… उद्या कुमार बरोबर नाही जमलं तर आपली मुलगीच जवळ करणार ना.. ?
‘काही तरी मार्ग काढ विजू..
“तूझ्या मुलीचा फोन नंबर दे… मी तिला फोन करते.. मी कुमारच्या मुलाचा पण नंबर घेतलाय.. त्याच्याशी पण बोलणार आहे मी..
कॉफी घेउंन लीना गेली.
मी त्याच रात्री कुमारच्या मुलाशी फोनवर बोलले. पण तो आपल्या मताशी ठाम राहिला. दुसऱ्या दिवशी लीनाच्या मुलीशी बोलले.. ती पण आपल्या मताशी ठाम राहिली.
पुढील रविवारी कुमार आणि लीना एकदम माझ्याकडे आली.. मग पाचजणांनी ग्रुप चर्चा केली. पण यातून काहीच सोल्युशन मिळेना.
असेच काही दिवस गेले. एका सायंकाळी कुमार माझ्याकडे आला. मला खुप आनंद झाला.. माझ्या मनात आले बहुतेक काही मार्ग मिळाला असेल.
“या डॉक्टर.. खुप दिवसांनी आलात.. लीना पण आली नाही… फोन पण नाही केला तिने.
“लीना मला पण फोन करत नाही अलीकडे.. बहुतेक ती नोकरीं सोडून मुलीकडे जात्येय कॅनडाला..
“काय? आणि तुम्ही? तुमचा काही विचार केला नाही तिने?
“नाही ना.. पुन्हा मी एकटा..
डॉ. कुमार मान खाली घालून गप्प बसला. मी शांताकडे पाहिलं.. ती पटकन उठून कॉफी आणायला गेली.
“सांभाळा कुमार.. स्वतःला सांभाळा.
‘आता सांभाळत रहायचं.. दुसरं काय.. मनात काही असलं तरी आपण आपल्या मुलांना दुखवू शकत नाही.. आपला अंश असतो त्यांच्यात.. मुलं पण आईबाबाच्या मनाचा विचार करत नाहीत.. तीन वर्षांपूर्वी पत्नी गेली त्यानंतर लीना भेटली. ती मला योग्य वाटली.. सुस्वभावी.. सुसंस्कृत.. माझ्या मनातील पत्नीची जागा घेणारी होती ती… पण. पण.. पण त्यानिमित्ताने तुझी भेट झाली.. तिचीच मैत्रीण.. तशीच सुस्वभावी.. सुसंस्कृत पण प्रॅक्टिकल विचार करणारी.. फारश्या जबाबदाऱ्या नसणारी.. एकटी, लग्न न केलेली.. विजू.. आपण एकत्र राहू शकतो काय?
मला एकदम धक्का बसला.. अगदी अनपेक्षित प्रश्न.
“मी.. मी… मला समजले नाही. डॉक्टर.
त्याच वेळी कॉफी घेऊन आत येणारी शांता ओरडली..
“अग ते तुला विचारत आहेत विजू… हो म्हण.. हो म्हण..
मी रुमाल काढला आणि घाम पुसू लागले.
“मी तुला विचारतो विजू.. आपण… एकत्र राहू अखेरपर्यत.
“मला वेळ द्या डॉक्टर.. मला वेळ द्या.. मी भाबवून गेले आहे.
“ठीक आहे.. मी वाट पहातो..
डॉक्टर गेले. शांताने माझे अभिनंदन केले.
“ही संधी सोडू नकोस विजू.. तो भला माणूस आहे.. मला त्याने विचारलं असत तर मी आत्ताच त्याच्या गाडीतून गेले असते.
शांती हसत हसत माझी चेष्ठा करत होती.
पुढील गोष्टी जलद जलद झाल्या. मी लीनाला फोन करून डॉक्टरनी लिव्ह इन साठी आग्रह केल्याचे सांगितलं. ती कॅनडाला जायची होती.. तिने शुभेच्छा दिल्या. मी मग डॉक्टरच्या मुलाला. सुनेला फोन लावला आणि त्याना कल्पना दिली. त्याना सुद्धा त्यान्च्या ‘पपासाठी जोडीदारीण हवीच होती.
एका दिवशी मी डॉक्टरच्या घरी रहायला गेले. डॉक्टरने आठ दिवस सुट्टी घेतली आणि आम्ही सिमला मनाली फिरून आलो.
पुन्हा मी माझ्या ऑफिसमध्ये बसू लागले. शांता येत होतीच. मला पहाताच शांता म्हणाली..
“आयुष्यभर एकटी राहणार.. म्हातारपणी पेन्शन घेऊन वृद्धाश्रमात राहणार म्हणणाऱ्या विजू..
कसला धक्का दिलास सर्वाना..
“होय बाई, डॉक्टर भेटला म्हणूंन दिला धक्का..
“आता माझ्यासाठी शोध असा एखादा डॉक्टर नाहीतर प्रोफेसर..
मग देऊ” धक्के पे धक्का’… मिठी मारत शांती ओरडली.
“ होय होय.. देऊया – धक्के पे धक्का…”
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈