सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ ज्योतिष ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे की निव्वळ योगायोग? कोणास ठाऊक!
माधवराव आपल्या एका मित्राबरोबर भावेंकडे गेले होते. भावे एक प्रसिद्ध ज्योतिषी होते. मित्राचं काम झालं आणि ते निघत होते. तेवढ्यात भावेंनी त्यांना थांबवलं आणि माधवरावांना सांगितलं, “काळजी घ्या. येत्या पाच दिवसांत तुम्हांला अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनापासून धोका आहे.”
“माझा असल्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही. आताही मी यांच्याबरोबर आलोय.”
“हे एक शास्त्र आहे. माझा या विषयाचा गाढा अभ्यास आहे. मी बोललो त्यात तथ्य आहे. तुमच्या जिवाला धोका नाही ;पण दीड-दोन महिने तुम्ही अंथरुणाला खिळून राहणार.”
“मी पैज लावतो पाच हजार रुपयांची. तुमचं हे भविष्य खोटं पाडून दाखवतो. मी पाच दिवस घरातच बसून राहीन. मग कसा होईल अपघात?”
“मी हरलो आणि तुम्ही सुखरूप राहिलात, तर मला आनंदच होईल. ठीक आहे. आजपासून पाच दिवसांनी रात्री साडेअकरा वाजता मी तुमच्या घरी येईन आणि हार स्वीकारून तुम्हाला पाच हजार रुपये देईन.”
चार दिवस कसेबसे गेले. पाचवा दिवस जाता जाईना. तिन्हीसांजेला तर माधवरावांचा धीरच सुटला.
“मी काय म्हणतो, मालू.मी अपघात टाळण्यासाठी घरातच बसून राहिलो, तर ते चीटिंग होईल. त्यापेक्षा मी खाली थोडं फिरून येतो. तरी अपघात झाला नाही, तरच ते भाकीत खोटं ठरेल, ना!”
“आणि काही झालं तर? विषाची परीक्षा कशाला घ्या.”
“कसलं विष आणि कसली परीक्षा! माझा असल्या थोतांडावर अजिबात विश्वास नाही. मी जातो.”
मग मालूने मनिषला फोन लावला.
“बाबा, तुमचा विश्वास नाही, तसा माझाही विश्वास नाही या गोष्टींवर. पण चुकून बोलाफुलाला गाठ पडली आणि काही झालं तर? घरात तुम्ही दोघंच. मी यायचं म्हटलं तरी सात-आठ तास जाणारच आणि आता तर माझी परीक्षा चालू आहे. तुम्ही घरीच थांबा ना. थोडेच तास राहिलेत आता.”
शेजारचा छोटा अनय खेळायला आला होता. तो गोंधळूनच गेला. एकदा काकांकडे, एकदा काकूंकडे, एकदा फोनकडे बघता बघता खेळायचंही विसरला.
माधवरावांनी टीव्हीवर न्यूज लावल्या. आरडाओरडा, हाणामारी, लाठीमार…..
“अहो, त्या न्यूज बंद करा बघू. अनय बसलाय ना इथे.”
“अरे!काय कटकट लावलीय! माझ्याच घरात मला न्यूज ऐकायचीही चोरी?” माधवरावांचा चढलेला आवाज ऐकून अनय भेदरला.
“जा बाळा, तू आपल्या घरी,” मालूचे शब्द ऐकले मात्र, तो पळतच सुटला.
“घड्याळ बंद नाही ना पडलं? मघाशीपण अकराच वाजले होते.”
“अहो, तेव्हा अकरा वाजायला आले होते आणि आता अकरा वाजून गेलेत. असं मिनिटामिनिटाला घड्याळाकडे बघितलं तर हेच होणार ना! झोपा बघू तुम्ही. नसेल झोप येत, तर नुसते पडून राहा डोळे मिटून.”
बरोबर साडेअकरा वाजता बेल वाजली. माधवरावांची सगळी अस्वस्थता पळून गेली. एखाद्या लहान मुलासारखे ते टुणकन उठून बसले.
“भावे आले असणार पाच हजार रुपये घेऊन. ठरवलं की नाही त्यांचं ज्योतिष खोटं!”
आनंदाच्या भरात ते बेडवरून उतरले आणि दरवाजा उघडायला धावले.
अचानक त्यांचा पाय कशावर तरी पडला. ते घसरले आणि उताणे पडले. त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला ;पण त्यांना हलताही येईना.
मालूने दरवाजा उघडला. भावे आत आले. बघितलं तर माधवराव अनयच्या खेळातल्या मोटारीवरून घसरून पडले होते.
अर्थात ही वेळ हार -जीत वगैरे विचार करायची नव्हती. भावेंनी डॉक्टरना फोन लावला. त्यांच्या सांगण्यावरून ऍम्ब्युलन्स मागवली आणि माधवरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
डॉक्टरांनी प्लास्टर लावलं. ‘दीड -दोन महिनेतरी ठेवायला लागेल’ म्हणाले.
माधवरावांना भावेंची क्षमा मागावीशी वाटत होती. पण त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता.
आणि भावे? त्यांना जिंकल्याचा आनंद झाला नव्हता. उलट आधी ठाऊक असूनही आपण भविष्य बदलू शकलो नाही, याच्या कितव्यांदा तरी आलेल्या प्रत्ययाने ते सुन्न झाले होते.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈