श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
रात्री कामावरून आल्यावर त्याला आजोबांनी परत ह्या गोष्टीची आठवण करून दिली. तेव्हा मग त्यांनी त्या द्रुष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली. विश्वासनी आपली कामं हाताखालच्या माणसांना आखून दिली. मग त्याला थोडा मोकळा वेळ मिळाला.
दिपकला प्रथम विश्वासरावांनी त्यांच्या फँमिली (डॉ.साने.)डॉक्टरांना दाखवले. त्यांना सर्व तपासण्या केल्या. नाक, कान, घसा, छाती याची तपासणी केली. रक्त, लगवी, थुंकी हे पण तपासले. एक्स-रे काढले. ह्या सर्व तपासणीत काहीच निघाले नाही. या सर्व गडबडीत २-३ दिवस गेले. काहीच निदान नीट होत नव्हतं. सर्व रिपोर्ट तर नॉर्मलच येत होते. त्यामुळे डॉक्टरांनी फक्त डोकेदुखी तात्पुरती कमी होण्यासाठी तेवढ्या गोळ्या लिहून दिल्या. कुणालाच काही सुचत नव्हते.
“ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय” सारखा नमिताचा, आजोबांचा जप सुरू होता. आजींनी तर देव पाण्यातच ठेवले होते. सर्वजण बेचैन होते. सर्वांची शंकरावर त्यांच्या कुलदैवतावर अपार श्रद्धा होती. सर्वजण त्याचीच आराधना करत होते. सगळे काळजीत बुडून गेले होते.
नवससायास करून झालेला कुलदिपक आजारी होता. कितीही पैसे खर्च करण्याची विश्वासरावांची तयारी होती. पण खरे आजाराचे निदान होत नव्हते. आज दिपकचं डोक थोड कमी दुखत होतं आणि दिपकचे काका दिपकजवळ दवाखान्यात थांबले होते. म्हणून नमिता-विश्वास दोघेही घरी आली होती. थोडी विश्रांती घेऊन विश्वास जरा कामावर चक्कर टाकून येणार होता. आणि नमिता स्वयंपाक करून जेवणाचा डबा घेऊन दवाखान्यात जाणार होती. तेवढ्यात दवाखान्यातून दिपकच्या काकांचा फोन आला. डॉ. सानेंनी दिपकचे ‘सिटिस्कँन’ करण्याचे ठरवले होते व त्याच्या मेंदूची तपासणी करण्यासाठीही डॉ. वझे यांना मेंदूच्या स्पेशालिस्टना कॉल केला होता. विश्वासने फोन ठेवला आणि परत दवाखान्यात जाण्यासाठी तयार होत असतानाच त्यांनी नमिताला हाक मारली,
“नमिताs, नमिता अगं, चल आवर लवकर. परत दवाखान्यात जायला हवं. दिपकला तपासायला मेंदूचे स्पेशालिस्ट डॉ. वझे येणार आहेत. त्याच सिटिस्कँनही करणार आहेत. आई-बाबाss आम्ही येतो हो.”
नमिता दहा मिनिटात जेवणाचा डबा भरून घेऊन तयार झाली. विश्वासने ड्रायव्हरला गाडी बाहेर काढायला सांगितली. २५-३०मिनीटात दोघेही दवाखान्यात हजर झाली. आत जाऊन पाहतात तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तयारी सुरू होती. वॉर्डबॉयच्या मदतीने दिपक स्ट्रेचरवर झोपला व सिटिस्कँन करायला घेऊन गेले. त्याचबरोबर त्याच्या मेंदूचेही फोटोही काढले. सर्व तपासणी नीट झाल्यावर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी विश्वासरावांना व काकांना कंन्सल्टींग रुममध्ये बोलावून घेतले. थोड्यावेळाने दिपकला त्याच्या रुममध्ये वॉर्डबॉयनी आणून सोडले. त्याच्याजवळ नमिता थांबली आणि विश्वासराव व दिपकचे काका डॉक्टरांबरोबर गेले. डॉ. वझे व डॉ. साने दोघे कन्सल्टींग रुममध्ये होते. त्यांनी दोघांना तिथे खुर्चीवर बसवून घेतले व कॉंम्प्युटरवर मेंदूचा फोटो दाखवून एका ठिकाणी छोटीसी लिंबाएवढी लहान गाठ दिसत होती. ती पॉइंटिंग करून दाखवली. आणि डॉ. वझे विश्वासरावांना म्हणाले,
“दिपकचं ऑपरेशन करून ही गाठ काढायला हवी. त्या गाठीची तपासणी करायला हवी.
क्रमशः….
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈