☆ जीवनरंग ☆ बोध कथा – धन्य सेवक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
लघु बोध कथा
कथा १८. धन्य सेवक
अनंतपुर नावाच्या नगरात कुंतिभोज नावाचा राजा राज्य करत होता. एकदा तो आपले मंत्री, पुरोहित व इतर सभाजनांसह सभेत सिंहासनावर बसला होता. त्यावेळी कोणी एक हातात शस्त्रास्त्रे असलेला क्षत्रिय सभेत येऊन राजाला प्रणाम करून म्हणाला, “महाराज, मी धनुर्विद्येचा खूप अभ्यास केलेला आहे. पण मला कोठेही काम न मिळाल्याने दुःखी आहे म्हणून आपणा जवळ आलो आहे.” राजाने त्याला रोज शंभर रुपये वेतन देण्याचे कबूल करून स्वतःजवळ ठेवून घेतले. तेव्हापासून तो रात्रंदिवस राजभवनाजवळ वास्तव्य करत होता.
एकदा राजा रात्रीच्या समयी राजवाड्यात झोपला असताना कोण्या एका स्त्रीचा आक्रोश त्याला ऐकू आला. तेव्हा त्याने त्या क्षत्रिय सेवकाला बोलावून त्याबद्दल चौकशी करण्यास सांगितले. त्यावर सेवक म्हणाला, “ महाराज, गेले दहा दिवस मी हा आक्रोश ऐकतोय. पण काही कळत नाही. जर आपण आदेश दिला तर मी याविषयी माहिती काढून येतो.” राजाने त्याला त्वरित परवानगी दिली. हा सेवक कुठे जातो हे बघण्याच्या विचाराने राजा वेषांतर करून त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला.
एका देवीच्या देवळाजवळ जवळ बसून रडणारी एक स्त्री पाहून सेवकाने विचारले, “तू कोण आहेस? का रडतेस?” तेव्हा ती स्त्री म्हणाली, “मी कुंतिभोज राजाची राजलक्ष्मी आहे. तीन दिवसांनंतर राजा मृत्यू पावणार आहे. त्याच्या निधनानंतर मी कुठे जाऊ? कोण माझे रक्षण करील? या विचाराने मी रडत आहे.” “राजाच्या रक्षणार्थ काही उपाय आहे का?” तसे सेवकाने पुन्हा पुन्हा विचारल्यावर ती स्त्री सेवकाला म्हणाली, “जर स्वतःचा पुत्र या दुर्गादेवीला बळी दिलास तर राजा चिरकाळ जगेल.” “ठीक आहे. मी आत्ताच पुत्राला आणून देवीला बळी देतो” असे म्हणून सेवकाने घरी येऊन मुलाला सगळा वृत्तांत सांगितला. पुत्र म्हणाला, “तात, या क्षणीच मला तिकडे घेऊन चला. माझा बळी देऊन राजाचे रक्षण करा. राजाला जीवदान मिळाले तर त्याच्या आश्रयाला असणारे अनेक लोक सुद्धा जगतील.”
सेवकाने मुलाला देवळात नेऊन त्याचा बळी देण्यासाठी तलवार काढली. तेवढ्यात स्वतः देवी तिथे प्रकट झाली व सेवकाला म्हणाली, “तुझ्या साहसाने मी प्रसन्न झाले आहे. मुलाचा वध करू नकोस. इच्छित वर माग.” सेवक म्हणाला, “ हे देवी, कुंतिभोज राजाचा अपमृत्यू टळून त्याने चिरकाळ प्रजेचे पालन करीत सुखाने जगावे असा मला वर दे.” “ तथास्तु!” असे म्हणून देवी अंतर्धान पावली. त्यामुळे खूप आनंदित झालेला सेवक मुलाला घरी ठेवून राजभवनाकडे निघाला. इकडे वेषांतरित राजा घडलेला प्रसंग पाहून सेवकाच्या दृष्टीस न पडता राजभवनात उपस्थित झाला. सेवक राजभवनात येऊन राजाला म्हणाला, “महाराज, कोणी एक स्त्री पतीशी भांडण झाल्याने रडत होती. तिची समजूत काढून तिला घरी सोडून आलो”. राजा त्याच्या ह्या उपकारामुळे खूप खुश झाला व त्याने सेवकाला सेनापतीपद बहाल केले.
तात्पर्य – खरोखरच श्रेष्ठ सेवक आपल्या स्वामीवर ओढवलेल्या संकटाचे निवारण करताना प्राणांची सुद्धा पर्वा करीत नाहीत.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी