श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
झोपताना पाचवीपासूनची भारती माझ्या मनात तरळत होती.तिची तीन भावंडं आमच्या शाळेत होती. अनिता, भारती, कमल नि धाकटा उदय.सगळी मुलं हुशार होती नि शिक्षकांची आवडती पण. वडील शेतमजुरी करणारे, आई विटांच्या कारखान्यात विटा उचलायला जायची. मुली सुट्टीच्या दिवशी आईबरोबर कामाला जायच्या. भांडी घासायलाही जायची आई.
‘दोन तास लागतात भांडी घासायला, पण आई म्हनते, ‘जेवायला ताटं वाडून देत्यात दोन, दोन. म्हनून परवडतय. ‘ दुसऱ्याच्या अन्नावर पोसले ल्या ह्या मुली, पण गटगुटीत होत्या. काळ्या पण तेजस्वी.दात पांढरे शूभ्र, केस काळेभोर, डोळे चमकदार.
भारतीची बुध्दीमत्तेची चमक शिकवताना जाणवायची. तिच्या अशुध्द बोलण्यातूनही तिची समज लक्षात यायची. शिरिष पैंचा पप्पांबद्दलचा धडा वाचताना ती गालात हसायची. ‘गुलमोहोर ‘वाचताना भरून यायची, गणित सोडवताना डोळे मोठे करून विचार करायची, इतिहास समरसून ऐकायची. अभ्यासाची तळमळ इतकी की, मधल्या सुट्टीत उद्यांचा अभ्यास पुरा करताना दिसायची. आपल्याला घरी काम असतं त्यामुळे इतर मुलींसारखा वेळ फुकट घालवता नये हा तिचा सूज्ञपणा बघून कौतुक वाटायचं. अशा भारतीचं शिक्षण बंद व्हायची वेळ आलेली.अडचण अगदी विचित्र होती. घरचं अठराविश्व दारिद्रय, बहिणीचं अवेळी मरणं, नि बाळाचं संगोपन हे सगळं नेमक शिकायची खूप हौस असलेल्या भारतीच्याच वाट्याला का यावं?भारती इतकी मोठी नव्हती करखीी ह्या अडचणीतून मार्ग काढून शिकेल.आपणच काहीतरी करायला हवं. मला चैन पडेना. मार्ग सुचेना. जो सुचे त्यांत अनेक अडथळे होते. प्रश्न मला एकटीला सोडवता आला नसता. अनेकांना समजावून सांगायला हवं होतं.बोलणी खायला लागली असती.प्रयत्न करून, अडथळे पार करून
भारतीचं शिक्षण सुरु झालं, पण ती पास झाली नाही तर सगळं मुसळ केरात.वाटलं, जाऊदे. तिचं नशीब तिच्याबरोबर. आपल्या डोळ्यासमोर ही मुलगी आहे म्हणून, अशा कितीतरी मुलीना आवड असून शिक्षण सोडावं लागतं त्याला आपण काय करतो.पण पुन्हा भारतीचे केविलवाणे शब्द कानात भुणभुण करीत होते.
‘मला लई म्हंजे लई वाटतंय, दहावी नि फुढबी शिकावं मग तुम्ही म्हणता तसं डीएड व्हावं, आपल्याच शाळंत नोकरी मिळेल.राखीव म्हटल्यावर एडमिशन, नोकरी ह्यात अडचण येनार न्हाई. न्हवं का बाई?’
मीच तिच्या समोर अनेक वेळा रंगवलेली स्वप्नं ती मला ऐकवत होती. पण त्या प्रकाशमय शूभ्र चित्रावर एक अटळ असा काळा बोळा फिरला होता. त्यात दोष तर कोणाचाच नव्हता. आईवडिलांना कामावर जायलाच हवं होतं,दोन महिन्याच्या बाळाला कोणीतरी संभाळायला पाहिजेच. भारतीची धाकटी भावंडं लहानच होती, शेजारघरंही ‘हातावर पोट’असणारी.
मी पुन्हा भारतीकडे गेले तेव्हा तिला म्हटलं’अग भारती, अनिताचं सासर खातंपितं आहे ना?बायका कामाला नाही जात तिथल्या. सासू नाही सांभाळणार बाळाला?’
अनिताच्या आईनेच दिलं उत्तर.’बाई, अनिताची सासू?लई वांड. ह्या गोजिरवाण्या नातवाला कदी बगायलाबी येत न्हाई. उलटी म्हनतिया, सुनेच्या बाळतपनात लय पैसा ग्येला.अनिता वारली त्याचं त्यास्नी कायच न्हाय. न्हाई बाई कोवळ्या लेकराला त्या राक्षसनीकडं द्येनार.’
‘बरोबर आहे तुमचं. पण मग भारतीचं शिक्षण?बंदच होणार.’
‘बाई,तुमास्नी माझ्या बद्दल येव्हढ वाटतय खरं, पर आमचा बाबा काय म्हनतो,’आता शिकुन तर काय मोठी धन लावनार हाय पोरगी घरच्या अडचनीपेक्षा पोरीच्या शिक्षनाला म्हत्व देऊन आमास्नी कुटं झेंडे लावायचेत!’
‘ आई जरा हळहळती तरी. म्हनती ‘पोरीला शिकायची हौस हाय म्हनून वाटतय्’तर बाबा म्हनतो,’काय हौसबीस र्हात न्हाय. संसारात पडली की आपसूक हौस जिरती.’.
क्रमशः…
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈