☆ जीवनरंग ☆ दृष्टी ☆ सुश्री प्रियदर्शिनी तगारे

 

मोबाईल वाजला. गुडघ्यावर हात चोळत उमाताई उठल्या. आशिषचा फोन होता.

“हॅलो .आई , कशी आहेस ?” त्याचा आवाज ऐकून क्षणभर त्यांच्या मनाला टवटवी आली.

“मी बरी आहे रे. तू कसा आहेस?मुलांचं काय चाललंय? रश्मीची नोकरी…..”

हळूहळू आपला आवाज निर्जीव होत चाललाय असं उमाताईंना वाटलं.त्या नुसत्या “हूं….हूं ” करीत राहिल्या.

फोन ठेवताच एकाकीपण दाटून आलं. अशोकराव होते तोपर्यंत असं कधीच वाटलं नव्हतं.बाहेर जाणंही कमी होत गेलं. जवळपासच्या फ्लॅटमधल्या सगळ्या नोकरीला गेल्या सारं सामसूम ! घरातलं काम करायला सुशी यायची तेवढीच काय ती घराला जाग.

आताशा संध्याकाळ बरोबर उदासी दाटून येते. टी. व्ही. बघण्यातही मन रमत नाही. रात्री ची अवेळी जाग येते. उगाचच घुसमटतं. जीव घाबरतो.

आज आशिषचा फोन येऊन गेल्यावर रात्रभर झोप लागली नाही.पहाटे पहाटे डोळा लागला.दहा वाजता सुशी आली.तिच्या पाठोपाठ एक काळी सावळी बाई आत आली , साडीचा पदर डोक्यावरून घेतलेली.

” ही माझी आई. कालच्याला आलीय. म्हनलं चल ,घरात बसून कट्टाळशील.”

तोंडभरून हसत ती बाई सुशीच्या मागोमाग किचनमध्ये गेली.थोडावेळ सुशीला मदत करुन हॉलमध्ये आली.

“बसा” असं उमाताईंनी म्हणताच जमिनीवर टेकली.

“कुठं असता तुम्ही ? ”

“मी व्हय तकडं सांगुल्यात  ”

“कोण कोण असतं घरात ?”

“म्या येकलीच की ! पोरी लगीन हून गेल्या. पोरगं तकडं म्हमईला नालासुपारीत कामाला हाय.  ”

” एकट्यानं रहायला भीती नाही वाटत ?”

” भ्या ? कशाचं वो ?”

“भीती हीच की आजारपणाची ,मरणाची .”

त्यावर ती खळखळून हसली.

“त्येचं कसलं आलंय  भ्या? पांडुरंगानं दिलाय ह्यो जीव. समदं त्येच्याच हाती. त्यो चल  म्हनला का जायाचं !” असं म्हणून तिनं गळ्यातली तुळशीची माळ चाचपली.

उमाताई क्षणभर तिच्याकडं बघत राहिल्या. एकाएकी त्यांना वाटलं ;घरात लख्ख् प्रकाश भरुन राहिलाय

 

©  सुश्री प्रियदर्शिनी तगारे

मो :9246062287

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments