☆ जीवनरंग ☆ बोध कथा – कल्पक योजना ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
लघु बोध कथा
कथा २०. कल्पक योजना
यवन देशात ‘महमूद सुलतान’ नावाचा राजा होता. परदेशात जाऊन युद्ध करण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याच्या प्रजेला खूप त्रास होत होता. त्यामुळे देश ओसाड, रिक्त झाला. जनता देश सोडून जाऊ लागली. तेव्हा त्याच्या मंत्र्याने ‘काहीतरी उपाय करून राजाची विवेकबुद्धी जागृत केली पाहिजे’ असा पक्का निर्धार केला. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो राजाशी संवाद साधत असे, तेव्हा तेव्हा तो म्हणत असे, “मी पूर्वी एका सिद्धपुरुषाची सेवा केली होती. त्याच्या कृपेमुळे मी पक्ष्यांची भाषा शिकलो. पक्षी जे बोलतात ते सगळे मला कळते.”
एकदा शिकारीहून परत येताना राजाने मार्गात एका वृक्षावर बसलेल्या घुबडांचे बोलणे ऐकून मंत्र्याला उद्देशून म्हटले, “अरे, तू पक्ष्यांची भाषा जाणतोस ना? तर हे दोन घुबड काय बोलत आहेत ते मला सांग.” खरोखरच ते बोलणे समजत आहे असे भासवत मंत्र्याने काही वेळ ते कूजन ऐकले आणि राजाला म्हणाला, “महाराज, आपण ते बोलणे ऐकणे योग्य नाही.” “जे काही असेल ते पण तू मला सांगितलेच पाहिजेस” असा आग्रह राजा करू लागला तेव्हा विनयपूर्वक मंत्री सांगू लागला.
“महाराज, या दोन घुबडांपैकी एका घुबडाला कन्या तर दुसऱ्याला पुत्र आहे. दोघांचाही त्यांच्या विवाहासाठी प्रयत्न चालू आहे. पुत्र असलेल्या घुबडाने दुसऱ्या घुबडाला शेवटी विचारले की ‘माझ्या पुत्राला कन्या देताना पन्नास उजाड गावे देणार का?’ ‘देवाच्या कृपेने आमचे सुलतान महमूद सुखाने राज्य चालवीत आहेत. तेव्हा आमच्याकडे उजाड गावांना काहीही तोटा नाही. आपण पन्नास उजाड गावे मागीतलीत, मी पाचशे देईन’ असे कन्या असलेले घुबड म्हणाले.”
मंत्र्याचे बोलणे ऐकून दुःखी झालेल्या राजाने तत्काळ उजाड गावांचे नूतनीकरण केले व विनाकारण युद्धे करणे थांबवून प्रजेला सुखी केले.
तात्पर्य –चातुर्याने आखलेली योजना सफल होतेच.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी