☆ जीवनरंग ☆ बोध कथा – आव्हान ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
लघु बोध कथा
(लघु बोध कथांचा हा उपक्रम आज संपतोय. आज शेवटची कथा आपण वाचणार आहोत. संस्कृत दुर्मिळ कथांचे मराठीत भाषांतर या निमित्ताने पूर्ण झाले. अरुंधती ताईंचे अत्यंत आभारी आहोत. ? रसिकहो या बद्दल आपल्याही प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. ? – सम्पादक ई-अभिव्यक्ति (मराठी) )
कथा २१. आव्हान
महिलापुर नगरात एक वाणी होता. त्याच्या पत्नीचे नाव चंद्रमुखी व मुलाचे नाव सुमती होते. सुमती पाच वर्षांचा असतानाच वाण्याचे निधन झाले. आता त्या दोघांचे रक्षण करणारे कोणी नव्हते म्हणून चंद्रमुखी सुमतीला घेऊन पतीच्या मित्राकडे – दुसऱ्या वाण्याकडे आली. त्याने त्या दोघांना आदराने स्वतःच्या घरी ठेऊन घेतले व अन्न-वस्त्र देऊन रक्षण केले.
काही काळाने सुमतीचा विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर चंद्रमुखी त्याला म्हणाली, “आता तू काहीतरी करून जीवन व्यतीत करावेस. आता इथे रहाणे योग्य नाही. आपला वाण्याचा पूर्वापार उद्योग आहे. तेव्हा तूसुद्धा तो केलास तर बरे होईल. त्यासाठी तुला काय करायचे आहे ते ऐक. या नगरच्या जवळच कुंडिनपुर नावाचे नगर आहे. तेथे धर्मपाल नावाचा वाणी आहे. तो त्याच्याकडे आलेल्यांना व्यापारासाठी अपेक्षित धन देतो. तू त्याच्याकडे गेलास तर सुखी होशील.”
सुमती आपल्या मातेचा निरोप घेऊन त्या धर्मपालाकडे आला. तेव्हा तो पूर्वी त्याच्याकडून अनेकवेळा धन घेऊन गेलेल्या व पुन्हा काही धन मागण्यासाठी आलेल्या माणसाला संबोधून म्हणाला, “अरे, आजपर्यंत तू मागत असलेले धन मी तुला दिले. तू काहीसुद्धा धनार्जन न करता ते धन संपवून परत धन मागण्यासाठी आलास! बुद्धिमान लोक मेलेल्या उंदरालासुद्धा भांडवल करून त्याच्या प्रयोगाने धनप्राप्ती करू शकतात. तू धन कमावण्यास पात्र नाहीस. मी तुला थोडेसुद्धा धन देणार नाही.”
सुमतीने वाण्याचे ते बोलणे ऐकून तो मृत उंदीर मला द्यावा अशी त्याच्याकडे विनंती केली. हा मुलगा माझी टिंगल करण्यासाठी आला आहे असे समजून रागावलेल्या वाण्याने त्याला एक मेलेला उंदीर देऊन निघून जाण्यास सांगितले.
सुमती तो मृत उंदीर बाजारात विकण्यासाठी घेऊन आला. तो गिऱ्हाईकाची प्रतिक्षा करत असताना एका मनुष्याने आपल्या मांजरीच्या पिल्लाला खाण्यासाठी म्हणून तो उंदीर भाजलेले चणे त्याला देऊन विकत घेतला. नंतर सुमती गावाजवळच्या एका मोठ्या झाडाच्या सावलीत बसून त्या मार्गाने जाणाऱ्या थकलेल्या लाकूड वाहणाऱ्या लोकांना थोडे चणे व पाणी देत असे. चणे खाऊन व पाणी पिऊन ताजेतवाने झालेले ते लोक आपल्या लाकडाच्या भाऱ्यातील एक एक लाकूड काढून त्याला मोबदला म्हणून देत असत.
अशा प्रकारे थोड्या दिवसांनंतर त्याच्याजवळ जमा झालेले लाकूड सुमतीने विकले. त्याद्वारे जमा झालेल्या पैशांतून तेथे आणलेल्या सगळ्या लाकडाच्या भाऱ्यांची खरेदी करून सुमतीने ते लाकूड स्वतःच्या घरी आणले. दुसऱ्या दिवसापासून आठ दिवस सतत मुसळधार पाउस पडत होता. त्यामुळे लोकांना इंधन मिळणे कठीण झाले. त्यावेळी सुमतीने साठवलेल्या लाकडाच्या भाऱ्यांची अधिक किंमत घेऊन विक्री केली. त्यामुळे त्याला भरपूर धनप्राप्ती होऊन तो सुखाने राहू लागला.
तात्पर्य – बुद्धिमान लोक टाकाऊ गोष्टीचा सुद्धा युक्तीने उपयोग करून त्यांची उपयुक्तता सिद्ध करून दाखवतात व सुख मिळवतात.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी