सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ जीवनरंग ☆ मराटी असे आमुची मदरटंग – भाग -2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

त्या दिवशी छोट्याने अतिशय निराsगसपणे मला विचारलं, “ममा, तुला माहीत आहे, चर्चमध्ये प्रेयर म्हटली नाय तर काय करतात?”

“त्यांना माफ करतात,” ‘ते काय करताहेत, ते त्यांचं त्यांनाच….’वगैरे वगैरे म्हणणारा जीझस माझ्या तोंडून वदता झाला.

“रॉंग! त्यांना उंच जिन्यावर नेतात आणि वरच्या पायरीवरून ढकलून देतात. आजच आम्हाला शिकवलं –

देअर आय मेट ऍन ओल्ड मॅन

व्हू वुडन्ट से हिज प्रेयर्स

आय किक्ड हिम अप

अँड ही फेल डाऊन द स्टेअर्स ”

बाई ग! काय काय ही भयंकर गाणी! झाडाला बांधलेल्या पाळण्यात झोका घेणारं बाळ फांदी मोडल्यावर कसं खाली पडेल, भिंतीवर मजेत बसला असताना खाली पडून चक्काचूर होणारा हमटी डमटी आणि ज्याच्या आम्ही ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ‘म्हणून मिनतवाऱ्या करतो, त्याला ‘डू नॉट शो युवर फेस अगेन ‘अशी दिलेली अपमानास्पद वागणूक.

अलीकडेच वाचनात आलं की, ही सगळी गाणी मुळी लहान मुलांसाठी लिहिलीच नव्हती. प्लेगच्या की  कसल्यातरी साथीवर  लिहिलेल्या ‘रिंगा रिंगा रोझेस’ला मग मरणवास येऊ लागला. बाकीची गाणी तत्कालीन राजकारण, युद्धे वगैरेंवर रचली गेली होती.

आणि छोटी छोटी इंग्लिश बाळं आई -वडिलांचे कपडे लहान करुन घातल्यासारखी बिच्चारी वाटायला लागली.

“मम्मा, लवकर फिनिश कर ना ग तुझं वर्क. पायजे तर मी तुला विसल करायला हेल्प करतो.”

“विसल करायला?”

माझ्या डोळ्यांपुढे एकदम दोन्ही हातांच्या तर्जन्या दोन्ही बाजूनी तोंडात घालून मवाली स्टाईल व्हिसल मारणारी मी आणि माझा लडिवाळ छकुला असं दृश्य तयार झालं. आणि समोर अंगाचा तीळपापड झालेले माझे वडील. लहान असताना एकदा मी अशीच शिटीवर गाणं येतं का, म्हणून बघत होते, तर बाबांनी अशी झोड झोड झोडली होती मला!

“हो ग. विसल करायला. भांडी विसल करायला.”

आता मात्र भांडी विसळायची तशीच टाकून मी तडक ह्यांच्याकडे गेले.

“बघितलेत तुमच्या पोराचे प्रताप? झाली ना इंग्लिश मिडीयमची हौस पुरी?”

“अग, वापरत असेल थोडे इंग्रजी शब्द. पण मराठी बोलतोय तरी ना! माझ्या अर्ध्याअधिक मित्रांच्या मुलांना तर मराठी बोलायचीच लाज वाटते,”- इति  ‘चित्ती असो द्यावे समाधान ‘ वगैरे कोळून प्यायलेला माझा नवरा.

“ममा, फायटिंग वगैरे तुम्ही नंतर करा. पहिलं मला ते सॉंग लिहून दे ना. आणि मग मी स्पीच प्रिपेअर केलंय, ते चेक कर.”

या शेवटच्या शब्दांनी जादू केली.स्वतःहून भाषण लिहून काढणाऱ्या माझ्या छकुल्याविषयीच्या जिव्हाळ्याने आणि अभिमानाने माझं मातृहृदय  अगदी थबथबून गेलं.

सगळी कामं आणि भांडणं अर्धवट टाकून मी त्याला उराशी कवटाळलं आणि म्हटलं, “अरे, माझ्या चिंकुल्याने लिहिलंय स्पीच?”

“मी नाय लिहिलं. माझ्या टीचरने लिहून दिलं आणि मला बायहार्ट करायला सांगितलं. मी म्हणतो, तू चेक कर.

‘प्रिन्सिपल, टीचर्स आनि माझे डिअर फ्रेंड्स. आज आम्ही मराटी डे सेलिब्रेट करतो आहोत. मराटी ही आमची स्टेट लँग्वेज आहे. म्हणून आपण सर्वांनी ओथ करूया की आम्ही जास्तीत जास्त मराटीत बोलणार. मराटीत लिवणार, मराटीत स्वास घेणार. गिव्ह मी अ बिग हॅन्ड ‘

त्याच्यानंतर मी ते सॉंग म्हणणार, ‘मराटी असे आमुची मदरटंग. ‘ पुढे काय ग ममा?”

“पुढे? ‘कमॉन मारूया आपण तिला टँग.”

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments