☆ जीवनरंग ☆ लाल गुलाबाची भेट..भाग-1☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆
एका रम्य सायंकाळी फेरफटका मारून यावं म्हणून घराबाहेर पडलो. रस्त्यावरच्या वळणाच्या बाजूला एका बंगली वजा घर असलेल्या बागेत एक टपोरा आणि अतिशय मोहक असा गुलाब फुललेला दिसला. गडद लाल आणि हिरवाकंच देठ असलेलं ते फुल पहाताना अक्षरशः ब्रम्हानंदी टाळी लागली.
त्या बागेत इतरही फुलं होती, पण गुलाब तो गुलाबच. राजेशाही थाट त्याचा … नजाकत तर औरच. कुणीही प्रेमात पडावं असं देखणं रूप . उगीच नाही प्रेमी युगुलांचा जीवश्च सहचर म्हणत. अहो, नव्याने प्रेमात पडलेल्या तरुण तरुणीचा जणू हक्काचा आधारच .. तिच्या रागावरचा एकमेव उत्तम उपाय. ती रागावली की रुसवा काढण्यासाठी पहिली हटकून आठवण येते ती ह्या राजेशाही फुलाची.
देहभान हरपून मी त्या गुलाबाकडे बघत होतो आणि क्षणात ती नजरेसमोर आली. काळ थांबला … एखादं सुस्पष्ट चित्र दिसावं तसं दिसू लागलं.
कॉलेज नुकतंच सुरु झालं होतं. अजून कुणाशी नीटशी ओळखही नव्हती झाली. आणि एक दोन दिवसांनी वर्गात गुलाबाचा मंद सुगंध घेऊन एक मुलगी शिरली. अत्यंत सुस्वरूप, उंच शिडशिडीत … केसांची लांब वेणी पाठीवर झुलवत ती मुलगी येऊन वर्गात बसली. मला खात्री होती की सगळ्यांचं लक्ष त्या मुलीकडे असणार. मी मात्र तिने केसात खोवलेल्या टपोऱ्या लाल गुलाबाच्या फुलात नजर अडकवून बसलो होतो. त्या मुलीला बहुतेक ते कळलं असावं. कारण, तिच्या नजरेत एक आश्चर्र्याचा भाव उमटला. कदाचित आपल्यापेक्षा गुलाबच ज्यास्त सुंदर आहे की काय असं वाटलं असावं.
दिवस भुर्रकन उडून चालले होते. आमच्या ग्रुप मध्ये ती अगदी सहजरित्या मिसळली आणि हळूहळू मला उमगायला लागली. सुमती … त्या मुलीचं नांव … अत्यंत सधन अश्या घरातली एकुलती एक. पण घरच्या श्रीमंतीचा बडेजाव तिच्या पासून शेकडो मैल दूर होता. मितभाषी, आणि समोरच्यांशी बोलताना कुठेही श्रीमंतीचा डौल न बाळगणारी ती रूपयौवना … मला सुमतीचं नेहमी कौतुक वाटायचं. ही मुलगी इतकी वेगळी कशी ह्याचाच मी विचार करीत असे.
जसजसे दिवस पुढे सरकत राहिले तसतसे मी आणि सुमती एकमेकांना ज्यास्त ओळखू लागलो ..जाणू लागलो . कारण एकच … कविता , लेखन, जुन्या चित्रपटातील गाणी, नाटकं हे सगळं आमच्या दोघांचाही वीक पॉईंट होतं . पी एल आणि व पु म्हणजे आमची अत्यंत आवडती व्यक्तिमत्व. त्या दोघांच्या लिखाणावर आमची कित्येक तास चर्चा व्हायची. स्वामी कादंबरी तर आमचा श्वास …. रमा- माधव ह्यांच्या बद्दल आम्ही काहीच न बोलता खूप काही बोलायचो… अनुभवायचो. ती शांतता आम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जायची.
त्या वेळेस मी नुकतंच लेख, कविता लिहायला सुरवात केली होती. अर्थात सुमतीची ओळख होण्या अगोदर माझी बऱ्यापैकी साहित्य सेवा झाली होती. पण हे जेव्हा सुमतीला कळलं तेव्हा तर तिने सगळं वाचायला दे म्हणून माझा पिच्छाच पुरवला.
तुझं लेखन, कविता वाचण्यासाठी मी उद्याच तुझ्या घरी येणार… अचानक एक दिवस सुमतीचं फर्मान सुटलं आणि मी धाडकन जमिनीवर आलो. घरी येणार ? त्या चाळीतल्या खोलीत? झरर्कन सगळं डोळ्यासमोरून हललं. मी इतका गुंतलो होतो की काय तिच्यात ?? आणि समजा, जरी स्वतःच्या मनाविरुद्ध खोटं बोलता येत नसलं तर मग सुमतीचं काय? ती ही गुंतली असेल का माझ्यात? तीचही माझ्यावर प्रेम असेल कां? आणि समजा नसलं तर? तेवढ्यात एक मन म्हणालं.. समजा असलं तर ? माझा भोवरा झाला होता … डोक्यात भुंगे चावत होते. त्या असण्या-नसण्याने मला कुरतडून टाकलं होतं.
दुसऱ्याच दिवशी मी माझ्या कवितेच्या आणि लेखांच्या वह्या सुमतीच्या पुढ्यात ठेवल्या. तिला नवल वाटलं. म्हणाली सुद्धा ; अरे मीच येणार होते नं तुझ्याघरी वाचायला ? माझा चेहरा पडला… अगतिक झाला. तिला काहीच कळेना. मी एकदम इतका नर्व्हस का झालो ते. सुमतीने मला विचारण्याचा प्रयत्न केला. अगदी मनापासून केला. मीच काहीतरी सांगून वेळ मारून नेली. सवयी प्रमाणे आजही माझी नजर सुमतीच्या केसांकडे गेली. आज मात्र तिच्या केसातला तो शाही गुलाब माझ्याकडे बघून कुचेष्टेने हसतोय असा मला भास झाला.
क्रमशः …
© श्री बिपीन कुळकर्णी
मो नं. 9820074205
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈