श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ जीवनरंग ☆ कथा – महिलादिन ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

सविता नेहमीपेक्षा लवकरच उठली.तिचा नवरा सतीश ऑफिसच्या कामानिमित्त परगावी गेला होता. घरात ती आणि तिचा बारा वर्षांचा मुलगा अक्षय दोघेच होते.तसं घरात फारसं काम नव्हतं. अक्षयची शाळाही दुपारची होती.पण नेहमी दहाला ऑफिसला जाणाऱ्या सविताला आज नऊ वाजताच ऑफिसला पोचायचे होते.आज आठ मार्च तिच्या ऑफिसमध्ये महिला दिनानिमित्त एक सक्षम महिला ऑफिसर म्हणून आज तिचा सत्कार होता. तिथं तिचं खाणपिणं होणार होतं.तिनं फक्त अक्षयपुरता त्याच्या आवडीचा शिरा बनवलां आणि आपलं आवरलं.ती निघाली तेव्हा अक्षय चित्र काढत बसला होता.

‘अक्षू, मी निघते.थोड्यावेळात सरला कामाला येईल ती मी येईपर्यंत थांबेल.तू कुठं जाऊ नकोस.मी तुझा आवडता शिरा करून ठेवलाय भूक लागली की सरला कडून गरम करून घे.’

अक्षयशी बोलत बोलतच पायात चप्पल अडकवून सरला बाहेर पडली.

चित्र काढून पूर्ण झाल्यावर अक्षयला भुकेची आठवण झाली तसे अक्षयने भिंतीवरचे घड्याळ बघितले. दहा वाजले होते.

‘सरलामावशी अजून कशी आली नाही.थोड्या वेळात सरलामावशी येईल असं आई म्हणाली होती.आईला ऑफिसला जाऊन बराच वेळ झाला. भूक लागली आता शिरा गरम कोण करणार?’

अक्षय आपल्याशीच बोलू लागला.अक्षयला गार शिरा आवडत नसे.घरात कुणी नसताना गॅसजवळ जायचं नाही असं आईनं त्याला बजावलं होतं.काय करावं त्याला कळेना.सरलाचे घर अगदी जवळच होतं.अक्षयने आपल्या घराला कडी लावली आणि तो सरलामावशीला बोलावण्यासाठी तिच्या घराकडं निघाला. अक्षय घराजवळ पोचला तेव्हा त्याला सरलाचे घर बंद असल्याचे लक्षात आले

घराला कुलुप नव्हते. अक्षयने दार उघडले. एका सतरंजीवर सरला आणि तिची सात आठ वर्षाची मुलगी झोपली होती. त्या दोघींना इतकी गाढ झोप लागली होती की अक्षय घरात आल्याचेही त्याना समजले नाही. अक्षयने हळूच आपल्या सरलामावशीच्या अंगाला हात लावला. त्याला सरलाचे अंग गरम लागले. त्याच्या हाताच्या स्पर्शाने सरलाच्या मुलीने डोळे उघडले.अक्षयला बघताच ती रडू लगली तशी सरलाही जागी झाली.

‘अक्षूबाळा…’

‘मावशी मी आलोच हं.’ म्हणत अक्षय पटकन आपल्या घरी आला.आईने केलेला शिरा एका डब्यात घालून तो पळतच सरलाच्या घरी आला.

‘आई,मला भूक लागली. उठ की’ सरलाची मुलगी तिला हलवत होती

‘हे बघ मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय.आईला बरं नाही. झोपू दे.मी बसतो तुमच्याजवळ ‘

अक्षयने शिऱ्याचा डबा उघडताच सरलाची मुलगी खूश झाली. पटकन आत जाऊन तिनं ताटली आणली.’ सावकाश खा’ म्हणत अक्षयने ताटलीत शिरा घालून तिच्यासमोर ठेवला.आत जाऊन तिच्यासाठी पाणी आणले.मग तो सरलाजवळ बसला.

‘मावशी, तू पण खा.’

सरला नको नको म्हणत होती तरी त्याने सरलाला शिरा भरवायला सुरवात केली.

ऑफिसमध्ये सविता महिलादिनाचा पुरस्कार स्वीकारत होती त्याचवेळी अक्षय सरला व तिच्या मुलीची सेवा करत महिलादिन साजरा करत होता.

© श्रीमती अनुराधा फाटक

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments