सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-1 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
‘एकुलती एक’ हो खरंच मला ह्या दोन शब्दांचा अगदी वीट आला. लहानपणी कधी कधी आवडायचं कधी कधी राग यायचा.आईस्क्रीम, चाॅकलेटची कधी वाटणी करावी लागायची नाही. अख्खं मलाच मिळायचे.आणि शेजारच्या मंगलला एकच चाॅकलेट चार भावंडांना वाटून एक तुकडा मिळायचा तेव्हा मला एकुलताएक पणाचा आनंद व्हायचा. पण खेळात भांडण झाल्यावर ती चौघं एकत्र आणि मी एकटी पडायची.तेव्हा मला कोणी भावंडं असतं तर असं वाटून रडू यायचं.अजून पण वाटतं एखादी बहीण हवी होती.वाटणी काय ?माझा हिस्सा पण दिला असता पण मनातल्या गोष्टी, सुखदुःखात सहभागी झाली असती.काका काकीचुलत बहिणी घरी रहायला आल्या की इतका आनंद व्हायचा. आणि जायला निघाल्या की माझी रडारड सुरु.”काकी दोघींपैकी एका मुलीला तरी ठेवा ना.”नाहीतर मीच त्यांच्याकडे जायचे.अर्धअधिक माझ्या बालपणातील सुट्टी त्यांच्याकडेच गेली.
जाऊ दे मी कॉलेज मध्ये जायला लागले मला एकापेक्षा एक, जिवाला जीव देणा-या मैत्रिणी भेटल्या. माझ्याचं बरोबरीची माझी चुलतबहीण माझ्याचं कॉलेजमध्ये होती. दुधात साखर. माझंही एकुलते एकच दुःख काही प्रमाणात कमी झाले. मजेत दिवस जात होते. पदवीधर झाले. लगेचच नोकरीं पण चांगली बँकेत मिळाली. त्या वेळच्या रूढी प्रमाणे आई बाबाने वरसंशोधनाला सुरुवात केली. मला विचारण्यात आले, “तू कुठे जमवले आहेस का? तर सांग. नाही तर आम्ही बघतो. तुला नवरा कसा हवा? ते फक्त सांग म्हणजे तसा मुलगा तुझ्यासाठी शोधायला बरे पडेल”.
मी सांगितलं,” तुम्ही शोधाल तो चांगलाच शोधाल. फक्त माझी एकच अट आहे. एकुलता एक मुलगा मला नवरा म्हणून अजिबात नको. त्याचं घर माणसांनी भरलेले असू दे. त्याला भाऊ, बहीण पाहिजे”. आत्याबाई तिकडे होत्या त्यांनी कपाळाला हात लावला “अरे अण्णा, आजकाल मुलींना मोठा गोतावळा नको असतो. ‘मी आणि माझा नारा नको कोणाचा वारा ‘ आणि हिची अट तरी ऐक.”
आई बाबांनी वरसंशोधनाला सुरुवात केली. जर गोतावळावाला मुलगा मिळाला तर तिकडे पत्रिका जुळत नव्हती. पत्रिका जुळली तर मुलगा परदेशात जाणारा.
मला परदेशात अजिबात जायचं नव्हतं भारत देश, आणि माझ्या आईबाबाना सोडून. कारण मी एकच मुलगी होते ना त्यांची. शेवटी आपण एक ठरवतो पण वरचा दुसरंच. लग्नाच्या गाठी ह्या वरचाच मारतो. तसे म्हणा सगळ्याबद्दलच सगळे तोच ठरवत असतो. आपण मी हे केलं, मी ते केलं म्हणतो. पण प्रत्यक्षात तो वरचाच प्रत्येकाच्या बाबतीत सगळं ठरवून त्याला पृथ्वीवर पाठवतो.आपण फक्त कठपुतळ्या, किंवा बुद्धिबळातली प्यादी. माझ्याबाबतीत तेच झाले.
मुलगा चांगला उच्चशिक्षित, सुस्थापित, दिसायला चांगला, मुंबईतच राहणारा. नाही म्हणण्यासारखे काहीच नव्हते. पण माझ्या मुख्य अटीत तो बसत नव्हता. कारण तो एकुलता एक होता. जे मला मुळीच मान्य नव्हतं. पण आईबाबांनी आणि जिने स्थळ आणले होते त्या माझ्या लाडक्या माई मावशीने माझं ब्रेन वॉश करायला सुरवात केली” इतकं चांगलं स्थळ हातचं सोडू नकोस. एकतर तुझी पत्रिका सहजासहजी जमत नाही. ह्या ठिकाणी छानच जमते. गुणमिलन पण होतयं. शिवाय सासू सासरे हौशी. स्वतःच्या मुलीसारखं तुझे कौतुक लाड करतील. तुला काही कमी पडू देणार नाहीत ” . कारण मुलाची आई ती माई मावशीची जवळची मैत्रीण होती. प्रश्न लाडाकोडाचा नव्हता. ते तर माहेरी भरपूर होत होते. प्रश्न त्याच्या घरांत गोकुळ नव्हते. तोच एकटेपणा, तेच एकुलते एक प्रकरण. जे मला अजिबात नको होतं. पण शेवटी वडीलधा-याच्या व्यवहारी दृष्टिकोनापुढे माझा भावुक विचार दुर्बळ ठरला. ती वरच्याचीच इच्छा असणार. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना आणि अशा रितीने एकुलत्या एक मुलीचा एकुलत्या एक मुलांशी विवाह आनंदात धूमधडाक्यात पार पडला. “छान मस्त लग्न झालं.” “अनुरुप जोडी”.वगैरे वगैरे.
क्रमशः….
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈